Thursday, July 28, 2011

कुठे आहेत वार-करी?


गृहमंत्री आबा पाटलांनी एक पाऊल पुढे टाकत दारुडय़ाला वाहन चालक ठेवणा-या मालकाचीही चौकशी करू, असे सांगून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून टाकली. मालकाची चौकशी ऐकून सगळेच अवाक झाले. सगळी ‘मिलीजुलीभगत’ असल्याचे चित्र असून, सरकारवर हल्ला करणारे वार-करी कुठे आहेत, असा प्रश्न पडला आहे.


शेगावच्या गजानन महाराजांची पालखी-दिंडी नेहमीप्रमाणे निघाली होती. मजल-दरमजल करत त्यांना शेगाव गाठायचे होते. पंढरपूरहून परतीच्या मार्गाने शेगावकडे निघालेले वारकरी विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसले होते. हरिनामात मग्न असलेल्या बेसावध वारक-यांवर एक भरधाव कंटेनर गेला आणि त्याने अकरा वारक-यांचा जागीच बळी घेतला. अनेकांना जखमी केले. वारक-यांना असा भयानक अपघात घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. जवळच असलेल्या गावातील गावक-यांनी केलेली संतप्त दगडफेक, मोटारगाडय़ांची जाळपोळ असे प्रकार घडले आणि परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागली. लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार या पोलिसी आयुधांचा वापरही झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मात्र एवढय़ा मोठय़ा दुर्घटनेनंतर विधिमंडळात रणकंदन होईल आणि विरोधी पक्ष एकजुटीने सरकारवर तुटून पडतील, अशी अपेक्षा होती. ती संपूर्णपणे फोल ठरली. बॉम्बस्फोटाची चर्चा गांभीर्याने झाली नाही, तोच प्रकार या दुर्दैवी घटनेबाबतही घडला.

विरोधी पक्षांकडे या संबंधीच्या स्थगन प्रस्तावाबाबत कोणतेही डावपेच नव्हते. बॉम्बस्फोटासंबंधी दोन तासांच्या निश्चित कालावधीची चर्चा सरकारला मान्य करायला लावून मतदान घेण्याचा आग्रह विरोधकांकडून धरला जाईल अथवा किमान सभात्याग तरी केला जाईल, असे वाटले होते. पण तसे काही घडले नाही. उलट विरोधकांमध्ये फूट दिसली. एकटय़ा मनसेने हे प्रकरण लावून धरले. बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, नितीन भोसले आदींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. एवढा अपवाद वगळला तर अपघातप्रकरणी स्थगन प्रस्तावावर दोन तासांची चर्चा घेतली खरी पण त्यावर पोटतिडकीने बोलणे तर सोडाच मतदान मागण्यासाठीही विरोधी पक्षनेते उभे राहिले नाहीत. निरपराध, बेसावध लोक बॉम्बस्फोट होऊन ठार होतात. ट्रक, कंटेनर यासारखी अवजड वाहने त्यांना चिरडतात, राज्यात खून, दरोडे, बलात्कार अशा घटना राजरोस,दररोज घडत आहेत, लोकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी लोकांची बाजू घेऊन तळमळीने उभा राहणारा आणि सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष आहे तरी कुठे, असा प्रश्न पडतो.

वारक-यांच्या स्थगन प्रस्तावानिमित्ताने राज्यातील रस्ते सुरक्षा किती ढासळली आहे, दररोज किती अपघात होत आहेत,त्याची कारणे कोणती आणि अपघात टाळण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली यावर भर देण्याऐवजी विरोधक आपण कसे गजानन महाराजांचे भक्त आहोत. आपल्या खिशात गजानन महाराजांचा फोटो आहे. आपण नेहमी कसे वारीला जातो,असे हे सांगण्यात विरोधकांनी धन्यता मानली. त्यामुळे स्थगन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही वारीला जात असतो, हे सांगण्याची संधी सोडली नाही. बॉम्बस्फोटप्रकरणी उत्तरामध्ये त्यांनी जसे करमणूक प्रधान भाषण केले तसाच गांभीर्याचा अभाव बुधवारीही दिसला. बॉम्बस्फोटांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी न करता सरकारवर विश्वास दाखवणारे आणि वारकरी अपघातप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी सरकारवर वार करणार तरी कसे? कोणत्या प्रकरणात काय मागणी करायची याच्या अभ्यासाचा अभावही दिसला. दारू पिऊन गाडी चालवणा-यांची न्यायालयीन चौकशी ती काय करणार? त्यावर कडी म्हणजे गृहमंत्री आबा पाटलांनी एक पाऊल पुढे टाकत दारुडय़ाला वाहन चालक ठेवणा-या मालकाचीही चौकशी करू, असे सांगून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून टाकली. मालकाची चौकशी ऐकून सगळेच अवाक झाले. सगळी ‘मिलीजुलीभगत’ असल्याचे चित्र असून,सरकारवर हल्ला करणारे वार-करी कुठे आहेत, असा प्रश्न पडला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP