Monday, January 9, 2012

घोटाळय़ावाल्यांचे वाटोळे


पंधरा वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता भोगणा-या शिवसेना-भाजप युतीला ही निवडणूक जड जाणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीचा तिढाही अजून सुटलेला नाही. मागच्या वेळीही आघाडी अंतिम टप्प्यात असतानाच केवळ एका जागेचा वाद उकरून काढून राष्ट्रवादीने आघाडीवर पाणी सोडले होते. परिणामी आघाडीला पालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. यावेळी दोन्ही काँग्रेसने समजूतदारपणा दाखविल्यास मुंबई महापालिकेत घोटाळे करणा-या शिवसेना-भाजपचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईसह दहा महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढील महिन्यात होत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना जोर चढला आहे, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना -भाजप - रिपाइं युती यांच्यात जागावाटपावरून तणातणी सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई शहरासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फुटकळ कामांचे मोठमोठे पोस्टर, होर्डिग्ज लावून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित जागा देऊन शिवसेनेने आपली ताकद संपली असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीवरून वादंग सुरू झाले असून   आघाडीची बिघाडी करण्यासाठी काँग्रेसचा एक गट सरसावला आहे. तर उमेदवारीवरून शिवसेना-भाजपमध्ये असंतोष वाढू लागला आहे. राजकीय पक्षांमध्ये ही सुंदोपसुंदी सुरू झाली असताना राजकीय पक्षांच्या मारामा-यांमध्ये लोकांना अजिबात स्वारस्य नाही. आपले प्रश्न, सोई-सुविधा, आणि अडीअडचणीत मदतीला धावून येणारे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याविषयी लोकांना आस्था असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जिव्हाळय़ाच्या प्रश्नांना महत्त्व देणारे आणि ते सोडविण्याचा विश्वास निर्माण करणारे नगरसेवक निवडून देण्याचा त्यांचा मानस असतो. शिवसेनेने मराठी माणसांच्या नावाचा जयजयकार करीत 15 वर्षे लोकांना झुलवत ठेवले. भूमिपुत्र आणि स्थानिकांचे केवळ गोडवे गायले. मराठी माणसांच्या नावाने महापालिकेची निवडणूक जिंकायची आणि पुन्हा पाच वर्षे भ्रष्टाचाराने तिला पोखरून काढायचे,   असा सपाटा शिवसेना-भाजप युतीने लावला होता. भावनिकतेच्या आधारावर लोकांना झुलवत ठेवून आपली पोळी भाजणा-या शिवसेना-भाजपचे पितळ उघडे करण्याचे काम ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केले. 

महापालिकेच्या विविध विभागांत झालेले घोटाळे नितेश राणे यांनी सप्रमाण लोकांसमोर मांडले. त्यासाठी त्यांनी एक दिनदर्शिका प्रकाशित करून लोकांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले. या दिनदर्शिकेचे शीर्षकच बोलके आहे. ‘शिवसेना-भाजपचे घोटाळे, झाले मुंबईचे वाटोळे’ या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामाच केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावेच राणे यांनी या माध्यमातून मांडले. दीड हजार कोटींची कामे मंजूर झालेली असताना निविदा न मागविताच फेरबदलाच्या नावाखाली तब्बल हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करून टक्केवारीचा कसा मलिदा लाटण्यात आला. पाणीगळती रोखण्याच्या नावाखाली कंत्राटदारांना प्रथम परिमंडळनिहाय व नंतर प्रभागनिहाय कंत्राट देत काम न करताही सुमारे 900 कोटी रुपये खर्च कसे केले. जकातकराच्या माध्यमातून महसुलात दहा टक्के वाढ होत असताना युतीच्या काळात मात्र बनावट पावत्यांच्या आधारे महापालिकेची तिजोरी कशी लुटली याचा लेखाजोखाच नितेश राणे यांनी दिनदर्शिकेत मांडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेची पोल खोलल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. नितेश  यांनी नुसत्या शिवसेनेच्या चुका दाखविलेल्या नाहीत, तर  लोकांच्या दैनंदिन जिव्हाळय़ाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून भरीव काम केलेले आहे. युतीच्या नेत्यांनी पाणीगळती थांबविण्याच्या नावाने पैसे खाल्ले याउलट नितेश राणे यांनी कोणतीही सत्ता हातात नसताना पाणीचोरी कशी होते, पाणी माफिया मुंबईकरांचे हक्काचे पाणी कसे पळवितात हे धाडी टाकून दाखवून दिले. त्याची एक ब्ल्यू प्रिंट असलेली डॉक्युमेंट्रीच प्रकाशित केली. 
 
पंधरा वर्षे सत्ता भोगल्यानंतरही मुंबईच्या विकासाऐवजी तिला भकास करण्यातच आघाडीवर असणा-या शिवसेना-भाजपच्या पायाखालची वाळू यावेळी सरकली आहे. म्हणून ज्या रामदास आठवलेंची शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतत टिंगळ-टवाळी केली त्यांच्याच पुढे झुकण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली. गेले वर्षभर ते रामदास आठवलेंना घेऊन मिरवत आहेत. परंतु इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी आठवले यांनी केलेल्या आंदोलनाला मात्र त्यांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आंबेडकरी जनता या अभद्र युतीमागे किती जाईल याबद्दल शंका व्यक्त केली आहे. राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वीच आठवले, उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीची घोषणा केली होती. यापुढे प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढविली जाईल, अशी भीमगर्जनाही या तिघांनी केली होती. मात्र त्यांची महायुतीची गर्जना हवेत विरण्याआधीच अनेक नगरपालिकांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्ते शिवसेना-भाजपपासून दूर केले.
 
निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्येही मोठय़ा प्रमाणात बंडाळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे ओझे जड झाले असून ते झुगारून द्यावे, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रीय पक्ष असताना महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेच्या तालावर नाचावे लागते. मुंबई महापालिकेच्या जागावाटपात केवळ 71 जागा पक्षाच्या वाटय़ाला येतात. शिवसेना मात्र 156 जागा आपल्या पदरात पाडून घेते. त्यातही आता शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयोगात भाजपच्या आणखी 9 जागांना कात्री लागून त्यांच्या वाटय़ाला आता केवळ 62 जागा उरल्या आहेत. त्यातील 31 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गज नगरसेवकांचे मतदारसंघ आरक्षित झाले. बाजूच्या वार्डात निवडणूक लढवावी, तर ती जागा शिवसेना किंवा आरपीआयच्या वाटय़ाला  गेलेली. त्यामुळे पक्षातील दिग्गज नगरसेवकांत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातूनच पळापळ होऊ लागली आहे. भाजपचे घाटकोपर येथील ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रत्यक्ष जागावाटप आणि तिकीटवाटपाची घोषणा झाल्यास भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात फूट पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही मोठे आव्हान शिवसेना-भाजप युतीसमोर असल्याने त्यांचा सत्तेकडे जाणा-या वाटेचा घाट अधिकच बिकट झाला आहे.
 
पंधरा वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता भोगणा-या शिवसेना-भाजप युतीला ही निवडणूक जड जाणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीचा तिढाही अजून सुटलेला नाही. मागच्या वेळीही आघाडी अंतिम टप्प्यात असतानाच केवळ एका जागेचा वाद उकरून काढून राष्ट्रवादीने आघाडीवर पाणी सोडले होते. परिणामी आघाडीला पालिकेतील सत्तेवर पाणी सोडावे लागले होते. यावेळी दोन्ही काँग्रेसने समजूतदारपणा दाखविल्यास मुंबई महापालिकेत घोटाळे करणा-या शिवसेना-भाजपचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP