Monday, March 25, 2013

गांधीगिरी.. लगे रहो

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षाही केवळ स्फोट घडवणार्‍या हातांना दिलेली आहे. मेंदू अद्यापि देशाबाहेरच आहे. त्याला अटक करण्यासाठी सर्वांनी आवाज उठविला पाहिजे. दबाव निर्माण केला पाहिजे. पण ते सोडून संजूबाबाची शिक्षा माफ करण्यासाठी आकांत सुरू आहे. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याने भोगावी, तावून-सुलाखून बाहेर यावे, गांधीगीरी सिनेमात नव्हे प्रत्यक्षात आचरणात आणावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

'रात के दो बजे बेहरामपाडासे एक बुढीया कहें की बेटा मुझे बचाव ये लोग घरमें घुसकर मुझे सता रहे है, मार देंगे. तो क्या किया जाऐ' असे सांगताना ढसा ढसा रडणारा अभिनेता संजय दत्त एके-४७ रायफल जवळ बाळगली पाहिजे, असा विचार करत असेल तर आश्‍चर्य वाटायला नको. भावनेच्या आहारी जाऊन जसे त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक निर्णय घेतले, तसाच एके-४७ जवळ बाळगण्याचाही निर्णय त्याने घेतलेला दिसतो. दंगल काळात लोकांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी चित्रपटसृष्टीतील काही निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते मंत्रालयासमोरील उद्यानात उपोषणास बसले होते. त्यांच्यासोबत असलेला संजय दत्त विमनस्क मनस्थितीत आपल्या भावना व्यक्त करीत होता. मूळात अत्यंत उथळ, बावळट, अज्ञानी आणि भावनेच्या आहारी जाऊन डोके बधीर झालेल्या अशा माणसाकडून कोणी काय अपेक्षा करावी. मूर्खपणाचा कळस आणि बुद्धय़ांकाचा तळ गाठलेला संजय दत्त हा एक बिघडलेला मुलगा होता. अमली पदार्थांचे सेवनदेखील करत होता. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या समंजस, कुटुंबवत्सल आईवडिलांचा हा लाडावलेला मुलगा अभिनेता झाला आणि भरकटल्यासारखे वागू लागला. २000 ते २0१0च्या दशकात आर्थिक मंदीचा फटका हिंदी चित्रपटसृष्टीलाही बसला. या वेळी गुन्हेगारी टोळय़ांचे म्होरके म्हणजेच डॉन पैशांच्या थैल्या घेऊन वावरू लागले. चित्रपटसृष्टीला भासू लागलेली आर्थिक चणचण या टोळय़ांनी कमी केली. निर्माते, दिग्दर्शक नट-नट्या सर्वांशी त्यांचे लागेबांधे निर्माण झाले. आर्थिक व्यवहाराच्या युतीमधूनच समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला हे संजूबाबाच्या संपर्कात आले. बॉम्बस्फोट मालिका घडविण्यासाठी दाऊद इब्राहिमने दंगल काळात जी साधनसामग्री आणि शस्त्रास्त्रे पाठविली होती, त्यातील चार एके-४७ रायफली हिंगोरा व कडावाला यांनी संजयला दिल्या. दंगलीमध्ये संरक्षणासाठी एक तरी एके-४७ आपल्याकडे असावी, ही एक इच्छा आणि दुसरे आपल्याकडेही अत्याधुनिक एके-४७ आहे हा पुरुषी अहंकार यामुळे त्याने एक रायफल स्वत:कडे ठेवली आणि तीन परत केल्या, असे त्याने पोलिसांना सांगितले. लोकांच्या संरक्षणासाठी ही रायफल असावी, असा हेतू मनात ठेवला खरा पण परिणाम त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात झाला. 


महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार करणारा 'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट बॉक्स ऑफिस हीट ठरला, या चित्रपटाने संजूबाबा ऊर्फ मुन्नाभाईला वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले. त्याची गांधीगिरी घराघरांत आणि मनामनांत जाऊन पोहोचली. १९९३ साली अशीच गांधीगिरी करण्याच्या हेतूने एके-४७ बाळगली होती. पण झाले उलटे, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला १८ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. गुरुवारच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वी १८ महिने शिक्षा भोगली असल्यामुळे उरलेली साडेतीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. मुन्नाभाईचे कुटुंब त्याच्या दिवंगत आईवडिलांची पुण्याई. वडील कॉँग्रेसचे खासदार असताना त्यांचे शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांशी असलेले संबंध त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली मदत आणि संजय हा उगवता सूर्य आहे. असे केलेले सर्मथन यामुळे संजयला बॉम्बस्फोट प्रकरणातून वगळण्यात आले आणि केवळ बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. 


शिक्षेने हेलावून गेलेल्या संजूबाबाने आपले कुटुंब आणि चाहते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, न्यायालयावर आपला विश्‍वास आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाचा निकाल मान्य असून शिक्षा भोगायला आपण तयार आहोत, असे त्याने म्हटलेले नाही. त्याच्या चाहत्या वर्गालाही त्याने पुन्हा तुरुंगात जाऊ नये असे वाटत असावे. चाहता वर्ग हा रस्त्यावरच्या फाटक्या माणसापासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल, कायदामंत्री अश्‍विनी कुमार, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी संजूबाबाच्या शिक्षा माफीला अनुकूलता दर्शविली आहे, तर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू यांनी राज्यपाल शंकर नारायणन यांना पत्र लिहून त्याची शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या कलम १६१ चा आधार घेतला आहे. त्याचबरोबर जया भादुरी, जयप्रदापासून बिपाशा बसूपर्यंत आणि महेश भट्ट, करण जोहरपासून हृतिक रोशनपर्यंत सर्वांनी त्याला दिलेली शिक्षा कठोर असल्याचे तसेच त्याने खूप सहन केले आहे, असे मतप्रदर्शन केले आहे. त्याच्यावर न्यायालयाची टांगती तलवार होती; पण त्याच्यापेक्षा अधिक दु:ख, वेदना सहन करणारे कितीतरी आरोपी आहेत. प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि पैसा असलेल्यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा, असा पक्षपातीपणा होऊ शकत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. 


गांधीगिरीसाठी फेमस असलेल्या मुन्नाभाईकडे आधीच्या तीन बंदुकी होत्या. अधिकृत तीन शस्त्रे असताना चौथे बाळगता येत नाही. तो गुन्हा ठरतो; परंतु संजूबाबाला या कायद्याचे ज्ञान नव्हते. कायदा काय आहे, हे जाणून घेण्याची अक्कल त्याला वापरता आली नाही. आपल्याकडे चार एके-४७ रायफली घेऊन दोघेजण आले, हे जर त्याने पोलिसांना कळवले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. रायफल ठेवून घेण्याचा जो मूर्खपणा त्याच्या हातून घडला, त्याची शिक्षा त्याला मिळाली. हे प्रकरण झाले त्याच सुमारास पंजाबमध्ये पोलीस आयुक्त असलेले के. पी. एस. गिल यांनी चंदिगड येथे शूटिंगला आलेल्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्रीला भोजनासाठी आमंत्रित केले होते. तिला भेटवस्तू म्हणून त्यांनी चक्क एक एके-४७ रायफल दिली. 

खलिस्तान्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. त्या अभिनेत्रीने ती रायफल तिच्या दिग्दर्शकाला देऊन टाकली. त्याने मोठय़ा अभिमानाने आपल्या कार्यालयातील भिंतीवर ही रायफल लावून ठेवली; पण संजयचे प्रकरण बाहेर येताच त्याने ती रायफल पोलिसांना नेऊन दिली. प्रत्यक्ष पोलीस अधिकार्‍याने दिलेली रायफल असूनही त्याने ती ठेवून घेतली नाही. पण संजूबाबाकडे एवढी अक्कलहुशारी नव्हती. आपल्या मूर्खपणाची अग्निपरीक्षा देण्यासाठी म्हणजेच 'स्वत:साठी गांधीगिरी.. लगे रहो मुन्नाभाई' असेच म्हणावे लागेल. बॉम्बस्फोट केवळ मुंबईतच नव्हे, देशात घडविण्याचा कट रचण्यात आला होता. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएआयने दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, याकूब मेमन यांच्या मदतीने कट रचला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षाही केवळ स्फोट घडवणार्‍या हातांना दिलेली आहे. मेंदू अद्यापि देशाबाहेरच आहे. त्याला अटक करण्यासाठी सर्वांनी आवाज उठविला पाहिजे. दबाव निर्माण केला पाहिजे; पण ते सोडून संजूबाबाची शिक्षा माफ करण्यासाठी आकांत सुरू आहे. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याने भोगावी, तावून-सुलाखून बाहेर यावे, गांधीगिरी सिनेमात नव्हे प्रत्यक्षात आचरणात आणावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP