Monday, November 10, 2014

शिवसेनेला तडजोडीचे शिवबंधन अमान्य

शिवसेनेने हिंदुत्वाच्या धाग्याचे भाजपाबरोबर शिवबंधन बांधून २५ वर्षे युती टिकवली. ही युती टिकवण्याकरिता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांना साथ दिली. एकदा युतीचे बंधन बांधून घेतल्यानंतर मैत्री धर्म पाळण्याचे बंधन अनिवार्य होते. ते दोन्ही बाजूंनी निभावण्यात आले. 


बाबरी मशीद जेव्हा भाजपासह संघ परिवारातील संघटनांनी पाडली, तेव्हा अटकेच्या भीतीने सर्वांनी काढता पाय घेतला; पण बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्यांचा मला अभिमान आहे, असे प्रखर हिंदुत्वाचे तेज दर्शवणारे रोखठोक विधान केले. भाजपाने राममंदिर बांधण्याची भूमिका घेऊन देशभर हिंदुत्वाचे रान पेटवले; पण जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा हिंदुत्व आचरणात आणण्याचे टाळून सर्वधर्मसमभावाची भूमिका घेणे त्यांना भाग पडले. शिवसेनेने मात्र एकदा घेतलेल्या भूमिकेपासून फारकत घेतली नाही. आज केंद्र सरकारमध्ये भाजपाचे बहुमत असल्याने त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील म्हणजे एनडीएतील इतर घटक पक्षांची गरज नाही. देशात प्रथमच बहुमताचे सरकार आले असल्याने त्यांच्यातील अहंकार आणि उन्माद अधिक बळावला असून महाराष्ट्रात सर्वाधिक जागांच्या जोरावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले असल्याने शिवसेनेचे महत्त्व कमी करण्यावर एवढेच नव्हे, तर शिवसेनेला अपमानास्पद वागणूक देण्यावर त्यांनी भर दिला. शिवसेनेची भाजपाने चालवलेली ही फरफट पाहता शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.

बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना हीच का? असा प्रश्न राज्यातील लाखो शिवसैनिकांना पडला होता. 'आली अंगावर तर घ्या शिंगावर' 'गद्दार पोसण्याची शिवसेनेची पद्धती नाही', 'लखोबा लोखंडेला.. वर' लाथ घालून हाकलून दिले, अशी ठाकरी भाषा ऐकून उत्साहित झालेल्या शिवसैनिकांना सत्तेसाठी चाललेल्या वाटाघाटी नको होत्या. शिवसेनेला नको असलेले सुरेश प्रभूंचे नाव भाजपाने मंत्रीपदासाठी निश्‍चित केले, अनंत गिते मंत्री असूनही पंतप्रधानांनी भेट दिली नाही. त्यामुळे गितेंना परत बोलावावे लागले, अनिल देसाईंना मंत्रीपद देण्याचे कबूल करून राज्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सांगितले. तेव्हा त्यांनाही परत बोलवून घेण्यात आले. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद अथवा गृहमंत्रीपद देण्याची मागणी असेल अथवा पाच कॅबिनेट आणि सात मंत्रीपदे देण्याची मागणी असेल, त्यावर गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. आधी सरकारमध्ये सहभागी व्हा, नंतर मंत्रीपदाचे बघू अशाप्रकारची भाषा करण्यात आली. एवढी अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी धमक दाखवली आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला. एकप्रकारे सत्तेचा मोह आवरून श्रीरामाच्या त्यागी भूमिकेचे दर्शन शिवसेनेने घडवले. सत्तेसाठी शिवसेना सर्वप्रकारची तडजोड करेल हा भाजपचा होरा त्यांनी फोल ठरवला. खरे तर शिवसेनेला बाजूला सारणे हे भाजपाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच घडले आहे. महाराष्ट्रात निर्भेळ यश मिळालेले नसतानाही केवळ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्यांनी शिवसेनेची एवढी फरफट केली, याचा प्रचंड संताप शिवसैनिकांमध्ये होता. शेवटी व्हायचे तेच झाले. शिवसेनेने आपला स्वाभिमानी बाणा दाखवून दिला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपा सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असून शरद पवार, प्रफुल्ल पटेल, नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकाच विचाराने चालणारे उद्योगधंद्यांना आणि उद्योगपतींना प्राधान्य देणारे नेते असल्याचे त्यांच्या वर्तणुकीने उघड झालेले आहे. या सर्वांनी शिवसेनेच्या वाघाचे मांजर करण्याचा जो प्रयकेला त्याला तोड नाही, त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांचा संताप झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वतंत्र विदर्भ आणि मुंबईसाठी सीईओ या दोन महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक भूमिका मांडली. या भूमिकांना तीव्र विरोध केला. शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी तडजोड करणार नाही, ही भूमिका घेतली. त्यामुळे शिवसैनिक सुखावला; पण सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्करू नये, अशी शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करावी अशी रास्त मागणी शिवसेनेने केली आहे. सरकारला या सप्ताहात बहुमत सिद्ध करायचे आहे; परंतु भाजपाच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात सरकार आल्याचा प्रचंड उन्माद असून शिवसेनेला सरकारमध्ये यायचे असेल तर कसलीही अट घालू नये, आधी सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी ताठर भूमिका भाजपानेते बोलून दाखवू लागले. राष्ट्रवादी आपल्या सरकारचा पाठिंबा काढणारच नाही, या बद्दल त्यांनाही खात्री वाटत नसावी; पण अमित शहांना असे वाटत असते तर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे त्यांनी शिवसेनेचा योग्य सन्मान करून सेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेतले असते; पण राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना वज्र्य नाही. त्यांनी राष्ट्रवादीतून आलेल्या सुमारे ६0 लोकांना पक्षात पवित्र करून घेतले आणि त्यांना उमेदवारीही दिली.

शिवसेनेतील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले नेते वगळता कोणालाही भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छा नव्हतीच; पण सत्तेचा मोह असलेल्यांचा दबाव, शिवसेना फुटू नये यांची दक्षता आणि खर्‍या अर्थाने सरकार स्थिर ठेवण्याची भूमिका यामुळे सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे एका गटाचे म्हणणे होते. सरकार केवळ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राहिले तर अस्थिरच असेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. राष्ट्रवादीचे एखादे प्रकरण काढण्याचा प्रयदेवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केला, तर तत्क्षणी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली जाणार नाही, याची खात्री कोण देणार. राष्ट्रवादी स्वत:चे महत्त्व वाढवून घेईल, सरकारचा फायदा घेऊन राष्ट्रवादीचा विस्तार करील, राजकीय स्थान मजबूत करेल आणि एक-दीड वर्षात सरकार खाली खेचू शकेल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. अल्पमतातील सरकार टिकवण्यासाठी फार प्रयकरावे लागलात, राजकीय परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी सतर्क राहावे लागते; पण सरकार पाडण्यासाठी डोके लागत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा सन्मान राखत बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा साक्षात्कार होऊन शिवसैनिकांनी जल्लोष केला नाही तरच नवल!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP