Wednesday, March 9, 2016

अमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा

उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन महाराष्ट्रभर साजरा होत आहे़; परंतु या दिवसाचे औचित्य साधून एक मार्च पासूनच ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे़ कार्यक्रमांमध्ये नेहमीप्रमाणे महिलांचे स्वातंत्र्य, महिलांचे सबलीकरण, महिलांची प्रगती, गगनभरारी यावर चर्चासत्रे झडू लागली आहेत़ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले़ त्यांच्या प्रगतीचे रोखलेले रस्ते खुले व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे व त्यानुसार तयार झालेली न्यायव्यवस्था विविध कायदे यांना अधिन राहून मिळणारे हक्क स्त्रियांना हवे आहेत़ त्यासाठी समाजाने जागे होण्याची होण्याची सरकारने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे़

Read more...

हे ‘प्रभू’, महिला प्रवाशांचे प्रश्न कायमच!

रेल्वे सेवेचा ‘प्रभू’ मार्ग हा खाचखळगे, अडीअडचणी यावर उपाययोजना करत देशभर सुविधांचे जाळे विणण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने उभे केले आहे़ कोणतीही भाडेवाढ नाही, नव्या रेल्वे मार्गांच्या पोकळ घोषणा नाहीत, अपूर्ण योजना पूर्ण करण्यावर भर, रेल्वे स्टेशनवर वाय­फाय सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता असा संयमित; पण रेल्वेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडला असला तरी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या अर्थसंकल्पाने कोणतीही नवी उपाययोजना केलेली नाही़ महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता या अर्थसंकल्पाने महिलांचा अपेक्षाभंग केला आहे, असेच म्हणावे लागेल़

Read more...

मेक इन मराठवाडा, प्लीऽऽज!

‘मेक इन इंडिया’ उत्सवाने पूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असताना मुंबईबाहेर महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या झळांनी गावे होरपळून निघत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे़ मुंबई शहरात नळ उघडताच धो धो पाणी सुरू होते. कित्येकदा नळ उघडे राहिले तर सारे पाणी वाहून जाते;पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कित्येक आठवडे गावात पाणीच येत नाही. पण शहरातील सर्व सोयीसुविधांनी युक्त वातानुकूलित खोल्यांमध्ये बसणाºयांना या परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही़ महाराष्ट्राची आर्थिक उन्नती करण्यासाठी जागतिक पातळीवर गुंतवणूक झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे यजमानपद स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक राजधानीत नेत्रदीपक उत्सवाचा बार उडवून दिला़ गिरगाव चौपाटीवरील मनोरंजन कार्यक्रमाचा संपूर्ण मंच आगीत जळून खाक झाल्यामुळे असुरक्षिततेचा संदेश गेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि नियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले़

Read more...

बुवा तेथे राजकारणी

धर्मसंस्थेने समाजव्यवस्थेवर अतिक्रमण केल्यामुळे या देशातील सामाजिक पर्यावरणावर विपरित परिणाम झाला़धर्माच्या ठेकेदारांनी जातव्यवस्था आणि त्याचबरोबर माणसा­माणसांमध्ये विषमतेची बिजे घट्ट रोवली़ अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि समानतेसाठी अथक प्रयत्न करणाºया पुरोगामी नेत्यांमुळे वातावरण बदलत असताना दुसरीकडे धर्माचा प्रभाव वाढवण्याचेही काम होत राहिले़ इतकेच नव्हे तर या देशाने स्वातंत्र्यानंतर जात, धर्म, पंथ, लिंग, भेदविरहित समानतेवर आधारलेली लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली, तरी देखील धर्म आणि जातीचा राजकारणासाठी पुरेपूर वापर करून घेतला जात आहे़ देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा लपून राहिलेला नाही़ दुसरा प्रमुख राजकीय पक्ष व सर्वाधिक वर्षे सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्षही वेगळा नाही़ या पक्षानेही मतांच्या राजकारणासाठी जाती­धर्माला महत्त्व दिले आहे़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे झुगारून देत धर्म व जातीय राजकारणच प्रभावी ठरत आहे़ अर्थात सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जाती­धर्माचा वापर केला जात आहे़

Read more...

भ्रष्टाचाराला जातकारणाचा मुलामा कशासाठी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाजपाशी, विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलेच सूत जमले आहे़ आजवर कोणी केली नसेल एवढी पवारांची भरभरून स्तुती मोदी करत आहेत़ सरकार चालवताना पवारांचे रोज सकाळी आपण मार्गदर्शन घेत असतो, अशा प्रकारचे राजकारणातले एक अफलातून वाक्य मोदींच्या नावावर फिक्स झाले आहे़ अर्थात मोदींनी अशा आशयाचे वाक्य उच्चारले तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उडालेली झोप परत आणण्यास चांगलाच लाभदायक ठरला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय वाट्टेल त्या चौकशा करू देत, आपल्याला थेट त्यांच्या हायकमांडचा वशिला मिळू शकतो, या भ्रमात सगळे गाढ झोप घेऊ लागले़; पण तपास यंत्रणांनी आपले काम सुरू ठेवले होते़ कोणतेही नवे सरकार आले की, आधीच्या सरकारची काही लफडी­कुलंगडी असतील त्यांचे पुरावे मिळवण्याचे काम पहिल्यांदा हाती घेत असतात़ पुराव्यांचा अंदाज आला की, विरोधकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवली जात असते़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत असेच घडले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे़ भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी भुजबळांना लक्ष्य करून त्यांचे कथित अपराध चव्हाट्यावर मांडले असले तरी ‘आप’ कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे़ सोमय्यांनी मात्र भुजबळांवरील आरोपांचा जाहीर भडिमार सुरू ठेवल्याने भुजबळांच्या चारित्र्यहननामागे भाजपाच असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे़

Read more...

शनिपीडेपासून कायमची मुक्ती मिळवा!

शनिदेवाची स्त्रीच्या गर्भावर विपरित परिणाम करण्याची ताकद असल्याने त्याच्या चौथºयावर महिलांनी जाऊ नये, अशी भीती दाखवण्यात आली आहे़ याला प्रखर विरोध करत आम्हालाही शनिदर्शन घ्यायचेच आहे, असा निर्धार करून पुण्याच्या भूमाता ब्रिगेडने शनिशिंगणापूरला धडक मारली़ अर्थात पोलिसी बळाने त्यांना अटकाव केला़ ही गोष्ट निराळी़ मात्र, गर्भावर विपरित परिणाम होतो, हे अमान्य करण्याइतपत महिलांची मानसिक तयारी झाली आहे़ हेही नसे थोडके़ अर्थात शनीची ही अरेरावी झुगारून देण्याऐवजी त्याला नको असताना त्याचे दर्शन घेण्याचा आटापिटा तरी का करावा?

Read more...

नेतृत्वाच्या पोकळीत गेला रोहितचा बळी

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील जीवशास्त्राचा संशोधक असलेला अतिशय हुशार आणि संवेदनशील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद देशभरातच नव्हे तर जगभर उमटू लागले आहेत़ देश­विदेशातील आंबेडकरी विचारांची जनता मोर्चे­निदर्शने करू लागली आहे़ त्यात मुंबई विद्यापीठही मागे नव्हते़ मुंबई विद्यापीठातील सामाजिक बांधिलकी मानणारे अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि काही सामाजिक संघटना अशा सर्वांनी एकत्र येऊन रोहित आत्महत्येप्रकरणी निदर्शने केली, घोषणा दिल्या़ हैदराबाद विद्यापीठात जे घडले ते येथे घडता कामा नये, असे म्हणत कुलगुरू संजय देशमुख यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार चालणारे विद्यापीठ दलित विद्यार्थ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला़ बुद्धिवादी क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण केले जात असून ओबीसी समाजाला भाजपाने वळवून घेतले़ आता डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांची ठिकठिकाणी स्मारके उभारून आणि १२५वी जयंती साजरी करून बौद्ध समाजालाही आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे़ विशेषत: बौद्ध समाज हा संघ विचारसरणीचा विरोधक असल्याने साम, दाम, दंड, भेद यांचा वापर केला जात आहे़

Read more...

साहित्य संमेलनात होतोय स्त्रीशक्तीचा जागर

पिंपरी­चिंचवड येथील साहित्य संमेलन हे संपन्नता आणि शाहीपणा, याचा प्रत्यय देणारे असल्याने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे़ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ़ पी़ डी़ पाटील यांनी संमेलनाचे आयोजन नेटकेपणाने करून महाराष्ट्राच्या साहित्य समृद्धीचेच जणू दर्शन घडवले़ त्यातच संमेलनाध्यक्ष प्रा़ श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाआधीच वादविवाद ओढवून घेतल्यामुळे हे संमेलन चांगलेच वाजत­गाजत आहे़ मात्र, सबनीसांनी सर्वसमावेशक धोरण ठेवतानाच स्वत:ची पुरोगामी मते तर मांडलीच; पण ती मांडताना सनातन्यांना चांगल्याच कानपिचक्याही दिल्या़ आजपर्यंत कोणत्याही संमेलनाध्यक्षाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची दिशा एवढ्या परखडपणे आणि स्पष्टपणे घेतली नसावी़ त्यामुळे त्यांचे भाषण विद्यमान राजकीय, सामाजिक परिस्थितीत महाराष्ट्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरले आहे़ याचा सर्वांनी खरोखर सखोलपणे आणि गांभीर्याने विचार करणे, ही आजची गरज आहे़ महाराष्ट्रातील सर्व घटक, सर्व प्रकारचे वाद आणि आव्हाने यांना स्पर्श करत असतानाच त्यांनी महिलांनाही तेवढेच प्राधान्य दिले आहे़ स्त्रीवादी विचारांच्या भारतीय व पाश्चात्त्य भूमिकांच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवादी साहित्याचे मूल्यमापन कोणत्या दिशेने व्हायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत़

Read more...

कर्जबुडव्या उद्योगपतींवरही कारवाईची हिंमत दाखवा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे पहिले पाऊल उचलले आहे़ ‘विनासहकार, नाही उद्धार’ असे म्हणणाºयांनी ‘कुंपणंच शेत खातं’ ही म्हण सार्थ ठरवली़ सहकाराच्या माध्यमातून आपल्या सात पिढ्यांचे भले करून ठेवण्याच्या हेतूने आपली घरे भरली़ त्यामुळे लोकशाही राज्यव्यवस्थेचा प्रत्यय देणारे हे क्षेत्र बदनाम झाले़ या क्षेत्राची तळापासून साफसफाई करण्याची गरज असून मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली असल्याने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे़ मात्र, सहकारी बॅँका बुडवणाºयांवर कारवाई करीत असताना अन्य राष्ट्रीय आणि खाजगी बॅँकांची लुटमार करणाºयांनाही चाप लावावा लागेल़ अदानी, अंबानी, विजय मल्ल्यांसारखे बडे उद्योगपती लाखो करोडोंची कर्जे थकवतात, त्यांच्यावरही कारवाईची हिंमत दाखवली पाहिजे़; परंतु अशी हिंमत दाखवणे राहिले बाजूला उलट त्यांचे करोडो रुपयांचे व्याज माफ केले जाते, मुद्दलाची रक्कम भरण्यात सवलत देण्यात येते आणि त्यांच्यावर करसवलतींची वारेमाप उधळण केली जाते, याचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार झाला पाहिजे़
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवल्यापासून सरकारच्या पाठिंब्यावर सहकार क्षेत्राची झपाट्याने वाढ होऊ लागली़ सत्तेतून सहकारासाठी पैसा आणि सहकाराच्या पैशातून सत्ता असे गणित इथल्या राजकारण्यांच्या चांगलेच अंगवळणी पडले होते़ त्यातूनच सहकारसम्राट, साखरसम्राट, दूधसम्राट अशा सम्राटांचे गावागावांत पेव फुटू लागले, शासनाच्या जमिनी पटकावून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली आणि बघता बघता शिक्षणसम्राट निर्माण झाले़ संचालक मंडळांवर तहहयात अध्यक्ष असणाºयांची कमी नव्हती़ कायद्यातून पळवाट काढून गैरव्यवहाराची प्रकरणे प्रलंबित ठेवायची आणि पैसा व सत्तेच्या जोरावर पुन:श्च निवडून यायचे, हे दुष्टचक्र चालू होते़ अशा संचालकांना बॅँकेची निवडणूक दहा वर्षे लढवण्यास बंदी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या़ विरोधी पक्षनेत्यांपासून शरद पवारांपर्यंत सगळेच संतापले़ पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना राज्य शिखर बॅँकेवर प्रशासकीय मंडळ बसवण्याची कारवाई करण्यात आली होती़ त्यामुळे पुढील कारवाई करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतल्यामुळे पृथ्वीराज बाबा भलतेच खूश झाले असतील, याबाबत शंका नाही़ बहुसंख्य सहकारी बॅँका राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे राष्ट्रवादीला शह देण्यात त्या वेळी पृथ्वीराज बाबा यशस्वी झाले होते़ तसे या वेळी मुख्यमंत्री फडणवीसदेखील राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्यात यशस्वी झाले आहेत़ मात्र, या निर्णयाने ‘बाधित’ झालेल्या नेत्यांनी लोकशाहीवर आघात असल्याची टीका सुरू केली आहे़
सहकारामध्ये मनमानी एवढी वाढली की, साफसफाईची गरज होतीच, सहकाराच्या नावाखाली सरकारकडून किती पैसा उकळायचा याला मर्यादाच राहिली नव्हती़ सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत काढायचे, त्यांचा लिलाव करायचा, आपल्याच चेलेचपाट्यांना तो कारखाना घ्यायला लावायचा आणि त्याच्या उभारणीसाठी पुन्हा सरकारकडून अनुदान घ्यायचे़ काही अपवाद वगळता हाच उद्योग सुरू होता़ दिवाळखोरीत गेलेले कारखाने खाजगी उद्योजकांना विकण्याचेही प्रकार घडू लागले़ सहकाराच्या माध्यमातून अब्जोपती होणारे बागायतदार कारखाने दिवाळखोरीत काढत असतात, गरीब शेतकºयांचा विचारही करत नाहीत. कॉँग्रेस­राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बड्या बागायतदारांवर मेहेरनजर ठेवण्यात तसूभरही कमी पडले नाही़ मात्र, बॅँकांनी दिलेली कर्जे सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांनी थकवल्यामुळे बॅँका अडचणीत आल्या़ राज्य सहकारी बॅँकेवर नेमलेल्या प्रशासकीय मंडळांच्या चौकशी अहवालानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई केली असल्याने आपला निर्णय राजकीय नसल्याचा दावा त्यांनी केला आहे़ त्यांनी कारवाईचा बडगा उचलला त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेससह शिवसेना भाजपा नेत्यांचाही समावेश असल्याने त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळत असली तरी त्यात राजकारण नाही, असे म्हणता येणार नाही़ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे त्यात बहुसंख्य संचालक असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा मुख्य हेतू तर आहेच; पण अंतर्गत राजकारणाचाही भाग आहे़; अन्यथा जळगाव जिल्हा सहकारी बॅँकेवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असताना त्यांच्या अनुपस्थितीत त्या बॅँकेवर कारवाई का झाली, हे सामान्य कार्यकर्तेही जाणून आहेत़ मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संचालकांवर होणार असलेल्या कारवाईबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे़ वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमात पवार आणि फडणवीस यांची जुगलबंदी झाली़ पवारांनी चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही, हे सांगत आयडीबीआय बॅँकेत पंधरा हजार कोटींचे कर्ज थकीत असताना संचालकांवर कारवाई झालेली नाही, याकडे लक्ष वेधून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवण्याचा प्रयत्न केला़ तर ही कारवाई सहकाराला शिस्त लावण्याच्या हेतूने असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली़ मुख्यमंत्री फडणवीस हे प्रामाणिक आहेत, एखादा निर्णय राजकीय असेलही; परंतु त्यामुळे सहकार क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार निपटून काढता येत असेल तर त्या निर्णयाचे समर्थन करावे लागेल़ ज्या सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली त्याचे जतन झाले पाहिजे.
खाजगी उद्योजकांना भरमसाट सवलती देऊनही हे उद्योजक बॅँकांना लुटण्याचा धंदा करत आहेत, बॅँकांची कर्जे थकवत आहेत़ तेव्हा शरद पवार म्हणतात त्यातही तथ्य आहेच़ खाजगी उद्योगांच्या प्रवर्तकांकडून बॅँकांना ३०­५० टक्के भांडवली गुंतवणूक फुगवून दाखवली जाते़ प्रवर्तक आणि बॅँका हातमिळवणी करून कर्जावरच्या व्याजाचे अनेकदा भांडवलीकरण करत असतात़ देशातील उद्योगपतींनी बॅँकांचे कोट्यवधी रुपये थकवले आहे़ त्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही़ एकट्या विजय मल्ल्याने राष्ट्रीकृत स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे हजारो कोटी रुपये थकवले आहेत़ विजय मल्ल्या, अदानी, अंबानी यांच्यासह काही मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांकडे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे़ महाराष्ट्र सरकारवर असलेल्या कर्जाइतकीच ती रक्कम मोठी आहे. मल्ल्या यांचे कॉँग्रेसशी तर अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध असल्यामुळे बॅँकांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत होत नाही़ या वेळी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कंपनी दिवाळखोरीविषयक कायदा करण्याचे ठरवले असून या कायद्यानुसार दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीची विक्री करून भांडवल मोकळे करता येऊ शकते; पण ज्याप्रकारे उद्योगपतींना पायघड्या घातल्या जात आहेत त्यावरून या कायद्याची अंमलबजावणी होईल का? ही शंकाच आहे़ रिझर्व्ह बॅँकेच्या एका अहवालानुसार बॅँकांच्या अनुत्पादक मालमत्तेच्या प्रमाणवाढीतील ९० टक्के वाटा या मोठ्या कर्ज थकवणाºयांचा (विलफुल डिफॉल्टर) आहे़ रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर डॉ़ रघुराम राजन यांनी वारंवार सांगूनही कॉर्पोरेट क्षेत्रातील विलफूल डिफॉल्टरवर कारवाई केली जात नाही़ केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष दडपणामुळेच ही कारवाई होत नाही़ अशा उद्योगपतींवर करसवलतींची पाच लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, त्यांना  एवढी भरमसाट करसवलत कशासाठी? खाउजा धोरण आल्यापासून गेल्या २५ वर्षांत अब्जाधीपतींची संख्या वाढली आहे, तसेच सहकारी चळवळीत मूठभर बागायतदार अब्जाधीपती झाले; पण श्रीमंत­गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही़ सहकार क्षेत्रातील साफसफाईबरोबरच खाजगी उद्योजकांना लाल गालिचे अंथरून त्यांच्यावर सवलतींची खैरात केली जाते़ मात्र, हे उद्योजक बँकांना लुटण्याचा धंदा करत आहेत़ त्यांचीही चौकशी झाली पाहिजे़

Read more...

नवे वर्ष, नव्या आशा, नवी आव्हाने

सरत्या वर्षाला निरोप देऊन २०१६चे स्वागत झाले़ नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवी स्वप्ने घेऊन नववर्षाचे संकल्प केले गेले़ नववर्षाची सुरुवात गोड व्हावी, असे सर्वांनाच वाटत असते़ त्यामुळे सर्वसामान्य माणसेही नववर्षाचा नवा संकल्प उराशी बाळगून भविष्याला गवसणी घालण्यासाठी स्वप्ने पाहत ती सत्यात उतरवण्यासाठी सिद्ध होत असतात़
सर्वसामान्य नागरिक जिथे हे संकल्प करतात तिथे राजकारणी मागे कसे राहणार? त्यामुळेच तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बलशाली, समृद्ध, प्रगतशील, महाराष्ट्र करण्याचा संकल्प सोडला आहे़ फडणवीसांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे़ त्यांनी ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवले असल्यामुळे जनतेच्या आशा, आकांक्षांचे मोठे ओझे फडणवीस यांच्या खांद्यावर आले आहे़ एक वर्ष हा कालावधी कोणत्याही सरकारला स्थिरस्थावर होण्यासाठी पुरेसा आहे़ या कालावधीत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामाचा आवाका नक्कीच आला असेल़ त्यामुळे नववर्षात मुख्यमंत्री जोमाने कामाला लागतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही़
प्रारंभीच्या काळात त्यांचा सहकारी शिवसेना हा पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरत होता़ प्रत्येक प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन भाजपाला कोंडीत पकडण्याचा शिवसेना प्रयत्न करत असे़ त्यातून आपले वेगळे अस्तित्व व अस्मिता दाखवण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न असे. राज्यातील दुष्काळ असो, शेतकºयांच्या मागण्या असोत, विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेनेच घेतली होती़ हा विरोध मुंबई महानगरपालिका व पुणे महानगरपालिका निवडणुकीपर्यंत केला जाईल़; परंतु नंतर मात्र ही धार राहणार नाही़ सत्तेत योग्य वाटा मिळवण्यासाठीच शिवसेनेची ही आदळआपट चालू होती; परंतु फडणवीस सरकार स्थिर होत चालले, तसतसा विरोध मावळत चालला आहे़ फडणवीसांनी शिवसेनेला अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळले आहे़ घटक पक्षांनाही मंत्रीपदाची आमिषे दाखवत झुलवत ठेवण्याचे काम गेले एक वर्ष चांगल्या पद्धतीने केले गेले आहे़ मित्रपक्षांची नाराजी वाढली की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या पेरून त्यांना आशेवर ठेवण्याचे काम भाजपाने केले आहे़ अलीकडे तर केंद्र सरकारमध्ये रामदास आठवलेंना घेणार, अशा बातम्या पसरवल्या गेल्या़
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याइतके काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ नाहीत़ मात्र, गेल्या वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेतृत्वहीन काँग्रेसला चांगले यश मिळाले़ धुळे, नंदूरबार, भंडारा या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा काँग्रेस आघाडीने जिंकल्या आहेत़ राज्यात भाजपा सत्ताधारी मोठा पक्ष असूनही त्याच्या जागा वाढल्या तरी सत्ता फारच कमी ठिकाणी मिळाली़ औरंगाबाद, कल्याण, नवी मुंबई, कोल्हापूरमध्ये भाजपाच्या जागा वाढल्या तरी या शहरामध्ये कोठेही सत्तेत वाटा मिळाला नाही़ शिवसेनेने अजूनही आपले वर्चस्व कायम राखले आहे़ नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादीची बºयाच ठिकाणी पिछेहाटही झाली आहे़ विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या़ भाजपाकडे राज्याची सत्तास्थाने असतानाही पक्ष फारसा वाढत नसल्याचे दिसत आहे़ काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन असला तरी तळागाळात त्यांची बिजे रूजली असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना अजूनही यश मिळत आहे़ राज्यातील या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाव फारसा दिसला नाही़ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे­पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे असे नेते असले तरी त्यांच्यात एकजूट दिसत नाही़ राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची हीच परिस्थिती आहे़ नरेंद्र मोदींसारख्या ताकदवान नेतृत्वापुढे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व फिके पडत आहे़ विरोधी पक्षातील नेत्याचा झुंजारपणा अजूनपर्यंत त्यांनी दाखवला नाही़ आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने उद्योगपतीधार्जिणे निर्णय घेतले आहेत़ खरे तर ‘अच्छे दिना’चे पोस्टमार्टम काँग्रेस पक्षाने करायला हवे होते; परंतु पक्षपातळीवर सामसूम दिसून येत आहे़ मात्र, बिहारच्या निवडणुकीनंतर या पक्षात आशा निर्माण झाली आहे़ गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या पक्षाला चांगले यश मिळाले असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत़
गुजरातमध्ये २५ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांपैकी २० समित्या काँग्रेसने जिंकल्या आहेत़ मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा निवडणूकही या पक्षाने जिंकली आहे़ येथील आठपैकी पाच नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत़ छत्तीसगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगले यश मिळाले आहे़ हळूहळू काँग्रेस पक्ष अपयशाच्या भयातून सावरत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीपासून पिछाडीवर गेला आहे़ शरद पवारांची राजकीय वाटचाल सावध असून त्यांची कधी भाजपाबाबत मवाळ, तर कधी काँग्रेससोबत आघाडी, ही तळ्यात मळ्यात भूमिका स्पष्ट करावी लागेल; पण सध्या तरी दबावाचे राजकारण करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय दिसत नाही़ त्यामुळे फडणवीस यांचे सरकार अधिक स्थिर झाले आहे़ राज्यापुढे अनेक संकटे आ वासून उभी राहिली आहेत़ शेतकºयांच्या आत्महत्या, दुष्काळ, आर्थिक स्थिती ही महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख आव्हाने आहेत़ मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरातच्या शेती विकासाची गती सरासरी पाच टक्क्यांहून अधिक असते़ महाराष्ट्रात मात्र ती उणे आहे़ दुष्काळी पार्श्वभूमीवर शेती विकासाचा वेग अजून कमी होण्याचा अंदाज आहे़ शेतकºयांना वेगवेगळी पॅकेजेस देऊनही आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही़ दुष्काळी परिस्थिती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर कायमचा उपाय शोधणे, हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे़
जसजसा उन्हाळा सुरू होईल तसतसा पाणीसाठा संपत जाईल. पाणीटंचाईचाही भीषण प्रश्न आ वासून उभा राहील. राज्यावर तीन लाख दहा हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे़ आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे विकासाच्या कामांना कात्री लावावी लागत आहे़ २० टक्के निधीला कात्री लावण्यात आली आहे़ सातव्या वेतन आयोगामुळे राज्यावरचा बोजा आणखी वाढणार आहे़ महसूलवाढीला मर्यादा आणि खर्च जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे़
दोन महामंडळेवगळता उर्वरित महामंडळे व साई संस्थान, यासारख्या मोठ्या संस्थांवर अजून नियुक्त्या झालेल्या नाहीत़ विनायक मेटे, महादेव जानकर, राजू शेट्टी, रामदास आठवले यांना सत्तेत वाटा किती व कसा द्यावा, हा प्रश्न बहुधा भाजपाला सतावत आहे़ नोकरशाही अजून सहकार्य करत नाही, ही तक्रार मुख्यमंत्र्यांनी करून चालणार नाही तर त्यांना वठणीवर आणण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे़ एलबीटी रद्द केल्याने याची वित्तीय तूट कशी भरून काढणार? विकासकामांना पैसा देतानाच समाजकल्याण निधीला कात्री लागणार नाही़ स्मार्ट सिटीचा उदो उदो सुरू आहे, तो केवळ भुलभुलैया असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. प्रत्येक स्मार्ट सिटीसाठी वेगळी कंपनी स्थापन करून ही कंपनी शहराचा विकास करणार आणि विविध करांच्या माध्यमातून पुढे अनेक वर्षे लुटत राहणार, अशी टीका होत आहे़ तेव्हा नवे वर्ष अनेक आशा, आकांक्षांबरोबर अनेक आव्हानेही घेऊन आले आहे, याचे भान सरकारला ठेवावे लागेल़ तरुण, तडफदार आणि त्याचबरोबर प्रश्नांची जाण असणारे अभ्यासू नेते, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे़

Read more...

Monday, October 19, 2015

अब की बार फिर डान्स बार!

राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होऊन छमछमचा आवाज सर्वत्र निनादणार आहे; पण संपूर्ण महाराष्ट्राने याचे स्वागत केले आहे का? तसे दिसत नाही. सोशल मीडियावर मात्र याचे भरभरून पडसाद उमटले असून ‘अब की बार फिर डान्स बार’, ‘अब की बार लेडीज बार’ अशा पोस्ट सर्वत्र फिरत होत्या़ याबाबत नक्कीच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत़ डान्स बार बंद करून तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून रोखावे, असे एक मत तर डान्स बारमधील बारबाला व इतर कामगारांचा रोजगार वाचवावा, हा दुसरा मतप्रवाह आहे़ यावर सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारच्या बाजूने कौल दिला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मात्र वाढली आहे़ याचे कारण काँग्रेस­राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या डान्स बार बंदीला विरोधी पक्षात असताना भाजपा­शिवसेना युतीनेही समर्थन दिले होते़आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरविचार करून तोडगा काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे़ सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदीला स्थगिती दिली आहे़ त्यामुळे डान्स बार बंदी करणार कशी, हा यक्षप्रश्न फडणवीसांसमोर उभा असणार याबाबत शंका नाही़ दिवंगत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आऱआऱ आबा पाटील यांनी २००५ साली विधिमंडळात डान्स बार बंदीची घोषणा केली होती़; परंतु तब्बल १५ वर्षे बंदी कायम ठेवण्यासाठी सरकार न्यायालयात धाव घेत असे़ देशातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराचा अधिकार असून त्यांची रोजीरोटी बंद करता येणार नाही, असे कायदेशीर मत न्यायालयाने मांडले असून अश्लील चाळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला दिला आहे़ तथापि महाराष्ट्राचे व्यापक सामाजिक हित लक्षात घेऊन सरकार बंदीच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे दिसते़ तसे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत़
आऱआऱ पाटील यांनी बंदीची घोषणा केल्यापासून त्यांच्या लोकप्रियतेत चांगलीच भर पडली होती़ त्यांना देशातच नव्हे विदेशातही भरपूर प्रसिद्धी मिळाली होती़ उपमुख्यमंत्री पदासह गृहखातेही त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्यावर कोणतीही टीका होता कामा नये, यासाठी ते सदैव दक्ष असत़ तरीदेखील भाजपाने डान्सबार बंदी नाहीच, असा आरोप करत त्यांना कायम आरोपीच्या पिंजºयात उभे केले होते़ त्या वेळी भाजपा आमदारांनी डान्स बारवर वॉच ठेवण्याची भूमिका व्यवस्थित पार पाडली होती़ विशेषत: विधानसभेत त्या वेळचे भाजपाचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अधिक लक्ष घातले होते़  विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात डान्स बारसंदर्भात प्रश्न उपस्थित करून आबांवर हल्लाबोल केला जात होता़ एका अधिवेशनात तर फडणवीस यांनी मुंबईत डान्स बार सुरू असल्याचा पुरावा म्हणून एक सीडीच सभागृहात सादर केली होती़ डान्स बार बंदीचा दावा करणाºया आबांवर आरोप करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते़ विधान परिषदेत विनोद तावडे यांनीही डान्स बार चालू असल्याचे पुरावे बारच्या नावांसहित दिले होते़ फडणवीस यांनी तर डान्स बारमध्ये पोलीस अधिकाºयांची भागीदारी असल्याचा सनसनाटी आरोप केला होता़ आता आबांच्या जागी हेच फडणवीस आले आहेत. ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनले असल्याने त्यांची खरी परीक्षेची वेळ आली आहे़ आबांनी एकदा घेतलेला बंदीचा निर्णय अमलात आणण्याकरीता मुंबई पोलीस(सुधारणा) कायद्यामध्ये दुरुस्ती करून डान्स बार बंदीचा कायदा लागू केला़; परंतु हा कायदाच घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे जेमतेम वर्षभरातच सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागले़ मात्र, २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून बंदीवरील स्थगिती उठवली़ २०१४ मध्ये पुन:श्च डान्स बार असोसिएशन आणि बारबाला संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती़ पंचतारांकित हॉटेलांमध्ये डान्स बारवर बंदी नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते़ त्यावर आघाडी सरकारने कायद्यामध्ये पुन:श्च सुधारणा करून पंचतारांकित हॉटेलातील डान्स बारवरही बंदी घातली होती़ सरकारने प्रतिष्ठेचा केलेला हा प्रश्न न्यायालयाने सतत डावलला असून अखेर बंदीला स्थगिती दिली आहे़
डान्स बारमध्ये काम करणाºया बारबाला या उपेक्षित समाजघटकांतील असल्यामुळे आपली रोजीरोटी मिळवण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेता कामा नये, असा मानवतावादी दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे़ बारबालांची संख्या किती लाखांत आहे, हा प्रश्न नाही़ काही हजार बारबाला असल्या तरी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांना सोडवायलाच हवा़ सर्वच बारबाला लाखो रुपये कमावणाºया नाहीत, झोपडपट्टीत राहून कुटुंबाची जबाबदारी घेणाºया आहेत़ केवळ बारबालाच नव्हे तर बारमध्ये काम करणारे वेटर, बारबालांना घेऊन जाणारे आॅटोरिक्षावाले, पान­विडीवाले असे अनेक जण डान्स बारवर अवलंबून आहेत़ या सर्वांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आघाडी सरकारने घेतलेली नव्हती़ घोषणा मात्र केल्या होत्या़ उलट त्याच सरकारच्या काळात बिल्डर कंत्राटदार, भ्रष्ट नोकरशाह, प्रस्थापित राजकारणी, अवैध धंदेवाले यांची अभद्र युती झाल्यामुळेच डान्स बार भरभराटीला आले होते़ डान्स बारमध्येच कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यात मोठमोठी डील्स होत असत़ कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असत़ या सर्वांना छुपा पाठिंबा सत्ताधाºयांकडून मिळत असल्यामुळे निर्विघ्नपणे हे डान्स बार सुमारे २० वर्षे चालू राहिले़; परंतु साखर कारखानदारांची तरुण मुले खिशात खुळखुळणारा पैसा बारबालांवर उधळू लागले आणि त्यांचे पाहून मध्यमवर्गातील मुलेदेखील या व्यसनाधीनतेकडे आकर्षित होऊ लागली़ घरातून दागदागिने व पैसे घेऊन बारमध्ये उडवू लागली़ पैसे दिले नाही तर आईवडिलांचे खून करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली़ २००५ पर्यंत या डान्स बार संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता़ यातून असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते़ सामाजिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम करणारे हे प्रकार थांबलेच पाहिजे, अशी ओरड सुरू झाली़ त्यासंबंधीचा एक प्रश्न विधिमंडळात उपस्थित झाला असता संवेदनशील असणाºया आबांनी तत्काळ डान्स बार बंदीची घोषणा करून टाकली़ त्यासंबंधीचा कायदा काय आहे, त्याचे परिणाम काय होतील तसेच राजकारण्यांच्या हितसंबंधाला कितपत बाधा येईल, याचा सारासार विचार न करता आबांनी बंदी घोषित केली होती़ महाराष्ट्रातील तमाम जनतेने या घोषणेचे स्वागत करताना आबांचे भरभरून कौतुक केले़ त्यांच्या लोकप्रियतेमध्ये हा एक मानाचा शिरपेच म्हणावा लागेल़

ही डान्स बार संस्कृती १९९०पासून सुरू झाली़ बनावट मुद्रांक तेलगी प्रकरण डान्स बारमध्ये करोडो रुपये उधळल्यामुळे उघडकीस आले़ डान्स बारमधील नर्तिका या बहुतांश परप्रांतीय व परदेशातील असायच्या़ मुबलक पैसा खुणावत असल्यामुळे बांगलादेशी, नेपाळ, भुतान, श्रीलंका, पाकिस्तान या गरीब देशांतील सुंदर व तरुण मुली या व्यवसायात आल्या़ इतकेच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, रशिया या देशांतील मुली अधिक पैसा मिळतो म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील डान्स बारमध्ये नाचू लागल्या़ या डान्स बारमुळे काही नर्तिका जशा करोडपती झाल्या तसे डान्स बार मालक अरबोपती झाले़ डान्स बारमध्ये तुफान काळ्या पैशाची चलती असल्यामुळे अनेक राजकारणी, नोकरशाह, गुंड­पुंड तसेच काही मोठे पोलीस अधिकारी या धंद्यात उतरले़ मोठमोठी डील्स या ठिकाणी होत असल्याने अनेक करोडपती व्यावसायिकही येथे येऊ लागले़ एवढी या डान्स बारची महती होती़ त्यामुळेच १९९० सालापासून सुरू असलेल्या धांगडधिंग्याने २००५ पर्यंत उग्र रूप धारण केले़

जाता जाता़़़
‘नाईटलाईफ’ची चलती
 शिवसेनेचे तरुण नेतृत्व उदयास आल्यानंतर त्यांनी तरुणांच्या भावनेला हात घालत ‘नाईटलाईफ’चा जोरदार पुरस्कार केला़ युवा पिढी संमोहित करण्याकरिता टाकलेले हे पाऊल होते़ सत्ताधारी शिवसेनेने ‘नाईटलाईफ’ला आधीच समर्थन दिले असल्यामुळे सर्वो
च्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेनेत ‘खुशी’ तर भाजपामध्ये ‘गम’ अशी परिस्थिती उद्भवली आहे़ भाजपा-शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या कलगीतुºयामध्ये आणखी एक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ आदित्य ठाकरे यांनी पब, डिस्को, डान्सबार या नाईटलाईफमुळे आर्थिक सुबत्ता येऊन महाराष्ट्राचा विकास होईल, अशी मांडणी केली़ त्यात न्यायालयाच्या निर्णयाची भर पडली असून संस्कृतीच्या बाता मारणारेहा प्रश्न कसा हाताळणार, हे लवकरच दिसून येईल़



Read more...

Tuesday, October 13, 2015

हंगामा है क्यूँ बरपा...


जगप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आणि संयोजकांनी मुंबईतील त्यांचा कार्यक्रम रद्द करून टाकला़ शिवसेनेने एकप्रकारे पाकिस्तानबरोबर अघोषित युद्धच जणू पुकारले आहे! युद्धाची एवढीच खुमखुमी असेल तर सीमेवर जावे; पण कलाकारांना विरोध करण्यामध्ये कसले आले आहे शौर्य? पण कायम धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्षांनी धार्मिक भावनांचा उद्रेक करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे़ भाजपा असो की शिवसेना अथवा एमआयएमसारखा पक्ष असो हिंदू­मुस्लिमांमध्ये तेढ वाढवल्याशिवाय त्यांना राजकारण करताच येत नाही़ सत्ता मिळाल्यानंतर राज्यघटनेचे पालन करणे बंधनकारक असते़ त्यामुळेच पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे़अशा वेळी केवळ आपण एकटेच राष्ट्रप्रेमी असल्याचे भासवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न हास्यास्पद आहे़ आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरणानुसार मार्ग काढायचा की लोकांच्या भावना भडकवून कलाकारांच्या कार्यक्रमालाही राजकारणाचे स्वरूप द्यायचे? शिवसेनेची ही प्रवृत्ती वेळोवेळी प्रकट झाली असून पाकिस्तान क्रिकेटपटूंना विरोध करताना खेळपट्टीच उखडून त्यावर डांबर फासण्याचे कृत्य त्यांनीच केले होते़ एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध करायचा, दुसरीकडे बाळासाहेबांनी जावेद मियाँदादशी दोस्ती करायची आणि आदित्य ठाकरेंनी राहत फतेहअली खानच्या कार्यक्रमात हजेरी लावायची असा विरोधाभासही पहावयास मिळाला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केंद्र सरकारच्या भूमिकेला अनुसरून कार्यक्रमाला समर्थन दिले़ गुलाम अलींच्या संरक्षणात तसूभरही त्रुटी राहणार नाही, अशी हमीदेखील दिली़; पण शिवसेनेच्या विरोधाला तोंड देण्याऐवजी संयोजकांनी कार्यक्रमच रद्द करून टाकला आणि गझलप्रेमी रसिकजन नाराज झाले़  गुलाम अलींच्या गझलांची ही अविट गोडी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आतुर झालेले कान आणि मन तृप्त होतील, याची ते प्रतीक्षा करत होते़ गुलाम अली महाराष्ट्रात येणार, हे समजताच त्यांच्या एकापेक्षा एक सरस गझला रसिकजन गुणगुणू लागले़

‘दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताजा हवा चली है अभी’
‘चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है ’
‘कल चौदहवी की रात थी
शब भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है
कुछ ने कहा चेहरा तेरा’
असे गझलमय वातावरण निर्माण होत असताना शिवसेनेमुळे हा कार्यक्रमच रद्द होतो
‘हंगामा है क्यूँ बरपा
थोडी सी जो पी ली है
डाका तो नही डाला
चोरी तो नही की है’
असे म्हणण्याची वेळ दस्तुरखुद्द गुलाम अलींवर आली आहे़ हा हंगामा कशासाठी, थोडी गझलची नशा द्यायची आहे, दरोडा घालायचा नाही किंवा चोरी करायची नाही अशीच रसिकजनांची भावना असणार आहे़
शिवसेनेचा विरोध असलेल्या कार्यक्रमाला समर्थन देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना­भाजपा युतीमधील संबंध अधिक दुरावत चालले असल्याचे दाखवून दिले आहे़ याच वेळी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्या आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित केले होते़ हा कार्यक्रमदेखील उधळून लावण्याची धमकी शिवसेनेने दिली़ मात्र, कुलकर्णी यांनी शिवसेनेवर टीका करताना विरोध करावा; परंतु तो कायद्याच्या कक्षेत असावा. कार्यक्रम होऊच देणार नाही, हा पवित्रा अनाकलनीय आहे असे स्पष्टपणे सांगितले़ कार्यक्रम करणे हा आमचा हक्क असून आम्हाला ते स्वातंत्र्य आहे व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडेल, असाही गर्भित इशारा त्यांनी शिवसेनेला दिला़ पाकिस्तानी मान्यवर आणि कलाकार यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका पाहता गुलाम अली नक्कीच म्हणत असतील,
‘कैसी चली अब ये हवा तेरे शहर मे
बंदे भी हो गये है खूदा तेरे शहर मे’
पण राष्ट्रप्रेमाचा उमाळा आलेल्या शिवसेनेला हे सांगणार कोण?
आजदेखील महाराष्ट्रात अनेक पाकिस्तानी कलाकार वास्तव्यास आहेत़ सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात कव्वाली गाणारा अदनान सामी, नुसरत फतेहअली खान यांचा पुतण्या राहत फतेहअली खान, ‘हीना’ चित्रपटाची नायिका झेबा बख्तियार, अभिनेत्री वीणा मलिक, मीरा असे अनेक पाकिस्तानी कलाकार येथे बॉलीवूड आणि चित्रवाहिन्यांमध्ये कामे करत आहेत़ इतकेच नव्हे तर सूफी संगीताची उपासना करणारे, संगीतामध्ये मोठे योगदान देणारे पाकिस्तानी यात्रेकरू तसेच कव्वाली गायक भारतामध्ये दर्गे आणि मदरशांमध्ये आपली कला सादर करत आहेत़ त्या सर्वांना येथून हाकलून द्यावे लागेल. हे अभियान शिवसेना केव्हा हाती घेते, हेच आता पाहायचे़
महाराष्ट्रात सध्या मराठी गझल अत्यंत लोकप्रिय होत चालली आहे़ गझल ही सूफीतील कलाप्रकार असून मराठीत या गझलेचे अनुकरण करण्यात आले आहे़ सुरेश भटांनी प्रथम ही गझल परंपरा आपल्या येथे निर्माण केली़ यापूर्वी मराठीत कविता, पदे, गीते अशाच रचना होत्या़ औरंगाबादचे सुप्रसिद्ध गझलकार बशर नवाझ या प्रतिभावंत गझलकारांनी तयार केलेल्या गझला गुलाम अली, तलत अझीज यांच्यासारख्या नामवंत गायकांनी गायल्या आहेत़ संतांचे बोधप्रद कीर्तन, अभंगाप्रमाणे रचना असलेली उर्दू गझल आपल्या देशात इतकी लोकप्रिय झाली की, सुरेश भटांपासून प्रेरणा घेऊन अनेक गझलकार येथे तयार झाले़ इलाही जमादार, सतीश दराडे, सुधीर मुळीक, ममता सपकाळ, सदानंद बेंद्रे, अमित वाघ, प्रकाश घोडके आदी अनेक गझलकारांनी मराठी गझल आपल्या प्रतिभेने समृद्ध केली आहे़ इलाही जमादारसारख्या गझलकारांच्या गझल भीमराव पांचाळेंसारख्या समर्थ गायकांनी नावारूपाला आणल्या़ गझल केवळ मनोरंजनासाठी नसून वीरा राठोडसारख्या गझलकाराने दलितांचे दु:ख गझलेच्या चार ओळींमधून मांडले़ त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला़ विविध कलांचे अदानप्रदान होत त्यांना वैश्विक रूप मिळाले असल्याचे देशविदेशातील कलाप्रकारांनी सिद्ध केले आहे़ गझलकार मेहदी हसन यांनी कलाकारांना धर्म नसतो अशा प्रकारचे विधान केल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी आकाशवाणी व दूरदर्शनने बंदी घातली होती़ तशीच बंदी आपल्या लोकशाही देशात असावी का? दहशतवादाला आपल्या येथील जनतेचा जसा विरोध आहे तसा तेथील जनतेचाही विरोध आहे़ दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानबरोबर व्यापार व अन्य क्षेत्रांशी असलेली आपली देवाणघेवाण सर्वांना चालू शकते़  मग त्यांच्या गझल आणि क्रिकेटलाच विरोध का? त्यांच्या धर्मालाही कडवा विरोध दाखवायचा आणि आपलाच धर्म आणि संस्कृती श्रेष्ठ असल्याचा उद्घोष करायचा़ हिंदू धर्म हा सहिष्णू असल्याच्या बाता मारायच्या आणि असहिष्णुतेचे दर्शन घडवायचे हे कसे?

विकृत मानसिकतेचा बळी
पुण्यामध्ये गेल्या शुक्रवारी एका ६० वर्षांच्या इसमाने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिचे शिर कुºहाडीने धडावेगळे केले, ते शिर हातात घेऊन त्याची रस्त्यावर धिंड काढली़ एवढी क्रौर्याची परिसीमा गाठली असतानाही त्याला हे क्रूर कृत्य केल्याची जराही भीती वाटली नाही़ विकृत पुरुषी मानसिकता कोणत्या थराला पोहोंचली आहे, हेच यावरून दिसून येते़ महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत तरी त्याची जरब आजही पुरुष वर्गाला बसलेली नाही, हे पुण्यातील घटनेने सिद्ध झाले आहे़ एका मॉडेलवर अ‍ॅसिड हल्ला केलेल्या सहाय्यक दिग्दर्शकाला नुकतीच दोन वर्षांची शिक्षा झाली आहे़ या मॉडेल प्रेयसीने त्याला नकार दिला म्हणून तिला कोणत्याही पुरुषाने स्वीकारू नये, यासाठी तिच्या चेहºयावर अ‍ॅसिड टाकून  चेहरा विद्रुप केला़ पुण्यात पत्नीचे शीर धडावेगळे करणारा अशिक्षित तर मॉडेलचा चेहरा अ‍ॅसिडने विद्रुप करणारा दिग्दर्शक उच्चवर्णीय सुशिक्षित आहे़ त्यामुळे पुरुष कोणत्याही वर्गाचा, धर्माचा, जातीचा असो त्याची मानसिकता ही स्त्रियांच्याबाबत विकृत अशीच असून स्त्री ही केवळ भोग्य वस्तू आहे आणि तिने पुरुषाच्या दास्यातच राहायला हवे़ तिला आचारस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य नसावे, अशी पुरुषाची अपेक्षा असते़ त्यातून तिने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर पुरुषी अहंकार दुखावला जातो व त्यातून अशा प्रकारे क्रूर हत्याकांड, बलात्कार, अत्याचार घडत असतात़

Read more...

Monday, September 7, 2015

दुष्काळमुक्तीचे राजकारण नको, नियोजन करा

सरकार ही आपत्ती इष्टापत्तीमध्ये परावर्तीत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत़ अनेक सरकारे यापूर्वीसुद्धा हे म्हणत असत, पण काही झाले नाही. फडणवीसांची ही संवादफेक सर्वसामान्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणारी असली तरी ती प्रत्यक्षात कशी उतरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल़
‘नेमेचि येतो पावसाळा’ ही म्हण आता मागे पडली असून ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे त्याची सर्वांनाच चिंता लागली आहे़ मराठवाड्यात त्याची सर्वाधिक तीव्रता भासू लागली आहे़ पाऊसच नसल्यामुळे धरणे कोरडी होऊ लागली आहेत़ त्यांच्यात जो पाणीसाठा आहे तो पिण्यासाठी राखून ठेवला आहे़ ग्रामीण भागात पाणीपुरवठा आठ­दहा दिवसांनी होऊ लागला आहे़ मुंबई­पुण्यातही पाणी कपात सुरू करण्यात आली आहे़ जुलैमध्ये थोडाफार पाऊस पडला, पण आॅगस्ट कोरडा गेला आहे़ हे पुढील एक­दोन महिन्यात पाऊस फारसा पडण्याची शक्यता दिसत नाही. उलट पावसाने माघार घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे़ आता पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू होतील़ मराठवाड्यात हे हाल आधीपासूनच सुरू झाले आहेत़ पावसाअभावी शेतकºयांची पिके हातातून गेली आहेत़ कर्ज काढून पेरण्या केल्या असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे़ तीन दिवसांपूर्वी एकाच दिवशी सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ कर्जबाजारी झाल्यामुळे सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत, ही महाराष्ट्राने मान खाली घालावी अशीच बाब आहे़देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असून येथेच वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे याचा राज्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे़
महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागांतर्गत सिंचन प्रकल्पांचे नियोजन, बांधकाम आणि व्यवस्थापन केले जात असून सिंचन प्रकल्पांसह जलविद्युत प्रकल्पांचाही त्यात समावेश आहे़ या प्रकल्पांची बहुतेक सर्व कामे खाजगी कंत्राटदारांकडून केली जात आहेत़ सर्व जलस्रोतांचा वापर करून पर्यावरणासह सर्वांची पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी या विभागावर आहे़ मात्र ठराविक मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यात या विभागाला पूर्णत: अपयश आले असून राज्यातील पाणी प्रश्न सोडविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे़ सध्या महाराष्ट्रात ४५२ प्रकल्पांचे काम सुरू असून त्यासाठी ७० हजार ७५० कोटी रुपयांची गरज भासणार आहे़ देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या प्रकल्पांवर ७५ टक्के रक्कम खर्च झाली आहे आणि ज्यांची पाणी साठविण्याची क्षमता ७२५.५२४ टीएमसी एवढी आहे तसेच ज्यामुळे ६९ हजार ६६४ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे असे प्रकल्प आगामी दोन वर्षांत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ सरकारने ८२ प्रकल्पांची यादी तयार केली असून त्यापैकी ४१ प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे़ विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ७ हजार २७२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे़ देशातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असूनही गेल्या कित्येक वर्षात ०.१ टक्क्यांनीदेखील सिंचनात वाढ झाली असून सिंचन क्षमता २००१ ते २०१० या १० वर्षांमध्ये केवळ  १७.९ टक्के एवढी झाली आहे़तरीदेखील त्यावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले आहे़ याचा पर्दाफाश तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच वादावादी झाली होती़ काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारवर विशेषत: ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जलसंपदा खाते सलग १५ वर्षे होते़ त्या पक्षाच्या नेत्यांवर चोहोबाजूंनी सडकून टीका झाली होती़ या प्रकल्पांमुळे कंत्राटदार, राजकारणी आणि अधिकारी यांचे उखळ पांढरे झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार १५ वर्षांनंतर सत्तेत येताच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यापैकी जलयुक्त शिवार ही महत्त्वाची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली़ ही योजना चांगली असली तरी त्यात सर्वसामान्य शेतकºयांचा जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेचे आहे़ कंत्राटदारांनी एका रात्रीत तळे बांधले तर त्याचा फायदा शेतकºयांना होणारच नाही़ त्याऐवजी रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे घेतली तर त्याचा गरीब शेतकºयांना आर्थिक लाभ मिळू शकतो़
जलयुक्त शिवार ही योजना तशी जुनीच असून जलसंधारण व मृदसंधारणाद्वारे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हाच कार्यक्रम राबवला जात आहे़ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ही योजना सर्वदूर राबवली असल्यामुळेच महाराष्ट्रात हरितक्रांती झाली होती़ त्यानंतर वसंतदादा पाटील यांनीदेखील हा कार्यक्रम राज्यभर राबविला़ पहिल्या २०­२५ वर्षांत जे विकासाचे काम झाले त्यानंतर मात्र विकासाला खीळ बसली़ नंतरच्या राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या प्रकल्पांवर अधिक भर दिला़ मात्र करोडो रुपये खर्च करूनही त्याचा लाभ मात्र राज्यातील जनतेला मिळाला नाही़ आजपर्यंत मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प मिळून दोन हजारांहून अधिक सिंचन प्रकल्प उभारण्यात आले, हजारो विहिरी आणि विंधन विहिरी घेण्यात आल्या, हजारो नळपाणी पुरवठा योजना आणल्या, कालवे, तलाव, पाझर तलाव, उपसा सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांचेही प्रयोग झाले़ मात्र सर्वाधिक खर्च मोठमोठ्या प्रकल्पांना   होऊ लागला आहे़ ऊस, संत्रा, केळी आणि द्राक्ष या पिकांसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची वेळ आली आहे़ बेसुमार पाण्याच्या वापरामुळे ऊस उत्पादक शेतकºयांना फायदा होतो आणि साखर कारखानदार गब्बर होत आहेत़ परंतु महाराष्ट्रातील उर्वरित जनता मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहे़ मोठी आणि मध्यम धरणे बांधण्यापेक्षा सरकारने हाती घेतलेली जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रभर राबविण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे राज्यातील शेती उत्पादनापैकी अर्ध्यापेक्षा अधिक उत्पादन हे कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या चार नद्यांवर अवलंबून आहे़ सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात पडत असून तेथून वाहणाºया सर्व नद्या अरबी समुद्राला मिळत असल्याने त्या पाण्याचा उपयोग करून घेता येत नाही़ त्यामुळे हे पाणी अडविण्याची आणि दुष्काळग्रस्त भागांकडे वळविण्याची सर्वाधिक गरज आहे़ विंधन विहिरींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल खोल गेली असून ही परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती अनेक जलतज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे़ ग्रामीण भागांत विशेषत: आदिवासी भागांत अनेक उद्योजकांनी खोलवर विंधन विहिरी घेतल्या असल्याने या भागांत पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे़ पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असल्यामुळे टँकर लॉबीचे फावले असून टंचाईग्रस्त भागाला टँकर लॉबीचा विळखा पडला आहे़ राजकारणी, अधिकारी आणि टँकर लॉबी यांची हातमिळवणी झाली असल्याने टंचाईचा या लॉबीला सर्वाधिक फायदा होऊ लागला आहे़ 
शरद पवारांसारखे महाराष्ट्राचे दिग्गज नेतेही यंदाचा दुष्काळ आपल्या आयुष्यात पाहिलेला सर्वात भीषण दुष्काळ असल्याचे सांगत आहेत़ याअगोदरही १९७२ साली दुष्काळ पडला होता़ तो दुष्काळ भीषण समजला जात असे़ त्या दुष्काळात माणसांना खायला अन्न मिळत नव्हते म्हणून सरकारने अमेरिकेकडून मिलो नावाचे मक्याचे, गव्हाचे तयार खाद्य खरेदी केले होते़ याला ग्रामीण भागात सुकडी असेही म्हणत़ या दुष्काळात हातांना काम मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने गावातील रस्ते, विहिरी, तलाव, पाझर तलाव, छोटी धरणे यांची कामे सुरू केली होती़ लोकांना रोजंदारीबरोबर या सुकडीची पाकिटे खायला दिली जात होती़ १९७२ च्या दुष्काळातील तीव्रता अशी होती की, गावात  मिरविणारे गाव पुढारी रस्त्यावर काम करताना जनतेने पाहिले आहेत़
सुगीच्या दिवसांची चाहूल देणाºया सप्टेंबर महिन्यात सर्वांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून तोच आता आपल्याला तारेल, या आशेवर लोक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत़ पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, या पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या इशाºयाकडे आपण दुर्लक्ष केले़ सरकार ही आपत्ती इष्टापत्तीमध्ये परावर्तीत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत़ अनेक सरकारे यापूर्वीसुद्धा हे म्हणत असत, पण काही झाले नाही. फडणवीसांची ही संवादफेक सर्वसामान्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणारी असली तरी ती प्रत्यक्षात कशी उतरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल़

Read more...

Sunday, September 6, 2015

आरक्षणाचे निष्कारण राजकारण


आरक्षण हा शब्द उच्चारताच आरक्षण समर्थक आणि विरोधक यांच्यात वादावादी सुरू होते़ जे समर्थक आहेत त्यांना आपल्या आरक्षणात कोणी नवीन भागीदार नको आहेत तर जे विरोधक आहेत त्यांना भागीदारी हवी आहे, मात्र भागीदारी मिळत नसेल तर स्वतंत्र आरक्षण हवे आहे़ भागीदारी आणि स्वतंत्र आरक्षण मिळत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, असा पवित्रा घेतला जात आहे़ आरक्षण विरोधकांचा आवाज वाढत असून खुल्या प्रवर्गातील समाज घटकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळू लागला आहे़ सर्व जातींच्या गरीबांना आरक्षण मिळावे, आर्थिक निकषावर मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ याचाच दुसरा अर्थ मागास प्रवर्गातील जातीय आरक्षण रद्द करावे, असा होतो़ या प्रकाराने आरक्षण समर्थक सतर्क झाले असून पुढील काळात समर्थक ­विरोधक आमने­सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे आरक्षणाचे वास्तव समजून घेणे आवश्यक बनले आहे़ गुजरातमधील हार्दिक पटेल नावाच्या अवघ्या २२ वर्षीय युवकाने पाटीदार समाजाच्या आरक्षणाची मागणी करत मोठे आंदोलन उभे केले आहे़ भारतभर पटेलांसहित मराठा, जाट, गुज्जर, ठाकूर अशा संख्येने मोठ्या असलेल्या जातींचे संघटन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे़ त्याच्या लाखोंच्या सभा होत असून या आंदोलनाला सर्व आरक्षण विरोधकांचा पाठिंबा मिळू लागला आहे़ सत्ताधाºयांना धडकी भरविणाºया या आंदोलनाचे भवितव्य काय, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे़ ‘आम्हाला नाही तर कोणालाच नको’ असा आक्रमक पवित्रा हार्दिक पटेलने घेतला असून सर्वांनाच आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे़ आर्थिक निकषावर आरक्षण मागणाºयांचे जातीय आरक्षणाबाबत काही आक्षेप आहेत़ त्यांच्या मते स्वातंत्र्यापासून आरक्षणाचे लाभ घेणाºया समाजाने प्रगती केली असून यापुढे त्यांना आरक्षण देता कामा नये़ दुसरा आक्षेप असा की, शैक्षणिक गुणवत्ता तुलनेने कमी असतानाही केवळ आरक्षणामुळे त्यांना शिक्षण आणि नोकºयांमध्ये संधी मिळत आहे आणि आपल्याकडे गुणवत्ता असूनही आपल्याला डावलले जात आहे, त्यामुळे देशाच्या एकंदर विकासावर त्याचा परिणाम होत आहे़ अशा प्रकारच्या चर्चा अधूनमधून डोके वर काढत असल्यामुळे हार्दिक पटेलसारख्या तरुणांना प्रोत्साहन मिळत आहे़ समाजातील कथित बुद्धिवंत देखील आर्थिक निकषावरच आरक्षण दिले पाहिजे, जातीय आरक्षण संपुष्टात आले पाहिजे, त्याबरोबरच आरक्षणाची तरतूद केवळ दहा वर्षांसाठीच होती, असा सूर लावू लागले आहे़ दहा वर्षांसाठी मुदत असताना ते अद्याप सुरू ठेवले आहे, या आक्षेपावर गेली अनेक वर्षे पुराव्यांसह खुलासे देऊनही जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहे़
भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्क कलम १४­१५(४)­१६(१, २, ३, ४, ४ क, ४ ख)यामध्ये अनुसूचित जाती­जमातींना तसेच इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक आणि सामाजिक समतेसाठी आरक्षणाची तरतूद करताना कालमर्यादेचे बंधन ठेवलेले नाही़ तसेच घटनेच्या कलम ३३४ अन्वये राजकीय आरक्षणाचा कालावधी दहा वर्षे करण्यात आला होता़ परंतु पहिल्या दहा वर्षांत अनुसूचित जाती­जमातींची प्रगती झाली नसल्याने दर दहा वर्षांनी या तरतुदीचे पुनर्विश्लेषण व्हावे आणि आवश्यकता वाटल्यास ही तरतूद रद्द करावी, असे नमूद करण्यात आले़ मात्र आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी या मुदतवाढीला मान्यता दिली आहे. गेली सहा दशके ही तरतूद कायम राहिली आहे आणि यापुढेही चालू राहिल़ आजचे राजकीय वातावरण पाहता ही तरतूद नसेल तर एससी, एसटी, व्हीजेएनटी यांचा एकतरी उमेदवार निवडून येऊ शकेल का, याविषयी शंका आहे़ याचे कारण राजकीय पक्षांची तत्त्वप्रणाली निधर्मी असो अथवा धर्मवादी, त्यांना जातीय अस्मितेच्या मुद्द्यांवर जातीसमूहांचे संघटन करून निवडणुका जिंकणे सोपे झाले असल्यामुळे जातीय राजकारण अधिक प्रबळ झाले आहे़
  खरे तर आरक्षणाबाबत असलेल्या आक्षेपांचे सखोल विश्लेषण होण्याची गरज असून वास्तव जनतेसमोर ठेवले तर आरक्षण विरोधकांची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकेल; परंतु मागील २५ वर्षांत आरक्षणाच्या राजकारणाने उचल खाल्ली असून समर्थक व विरोधकांच्या वादावादीने जाती संघटन अधिक मजबूत करण्याचा कल वाढत आहे़ परिणामी, सामाजिक स्वास्थ्य हरवून बसले आहे़ आर्थिक निकषावर आरक्षण ही मागणी मुळातच घटनेतील तरतुदीनुसार मान्य होण्याजोगी नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत़ पण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाºया घटकांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे़ जाती व्यवस्था हे आपल्या देशातील भयाण वास्तव आहे़ या व्यवस्थेने निर्माण केलेल्या जातींच्या उतरंडीत जे सर्वात खाली आहेत, त्यांना समान पातळीवर आणण्यासाठी प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तरच सामाजिक न्याय मिळू शकेल, हे आरक्षणाचे धोरण आहे़ या देशातील जाती व्यवस्थेने खालच्या समाज घटकाला प्रगतीच्या संधी नाकारल्या, हे सत्य मान्य करूनही ६० वर्षांपर्यंत आरक्षण दिले तेवढे पुरे, या भावनेने आरक्षणाला विरोध होत आहे. पण प्रगती नेमकी किती झाली याचे उत्तर कोणालाच देता येणार नाही़ महाराष्ट्रात अनुसूचित जातींना १३ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के, विमुक्त जमाती ३ टक्के, ओबीसी २७ टक्के असे मिळून ५० टक्के आरक्षण आहे़भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ़ आंबेडकरांनी बौद्धांना जास्त आरक्षण दिले आहे, असाही एक गैरसमज आहे़ अनुसूचित   जातींसाठी जे १३ टक्के आरक्षण आहे, त्यात ६० जाती असून त्यापैकी एक बौद्ध आहे़ बाकीच्या सर्व जाती हिंदू आहेत़ म्हणजे या सर्व जातींनी आरक्षणाचे लाभ घेतले तर बौद्धांच्या वाट्याला केवळ ०.२१ टक्का एवढेच आरक्षण मिळू शकते़ जे आरक्षण ५० टक्के आहे, त्यापैकी शासकीय नोकºयांच्या जागा किती भरल्या? पदोन्नतीच्या जागा किती भरल्या? हे पाहिले तर आरक्षणाच्या जागा नियमाप्रमाणे भरल्या जात नसल्यामुळे राखीव जागांचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे़ राखीव जागेवर पात्र उमेदवार मिळत नाहीत, या सबबीवर जागा भरल्या जात नाहीत़ ज्या जागा भरल्या आहेत, त्या कर्मचाºयांची गुणवत्ता नसल्याचे मानून त्यांचा मानसिक छळ केला जातो़ एवढेच नव्हे तर त्यांचा गोपनीय अहवालदेखील चुकीचा देऊन त्यांच्या पदोन्नतीमध्ये अडथळा आणला जात आहे, अशा तक्रारी होत आहेत़ आरक्षणाचा लाभ घेणाºया कर्मचाºयांची अवहेलना एकविसाव्या शतकातही  केली जात असल्याने जातीभेदाचा दाहक अनुभव त्यांना येत आहे़ दुसरीकडे मुळात शासकीय नोकºयाच जास्त राहिलेल्या नाहीत़ त्यातच खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण(खाउजा) हे धोरण भारताने गेली २५ वर्षे स्वीकारल्यामुळे शासकीय स्तरावर नोकºयाच राहिलेल्या नाहीत़ कंत्राटी पद्धतीने कामगारांच्या नियुक्त्या होत असल्याने आरक्षणाचा पुरता फज्जा उडाला आहे़ केंद्रात मागील काँग्रेस सरकारने मागासवर्गीयांना खाजगी क्षेत्रातही आरक्षण देण्याचा मनोदय व्यक्त केला होता़ परंतु उद्योगपतींनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे हे आरक्षणही बारगळले़
केंद्राने अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये बौद्ध किंवा नवबौद्ध यांचा उल्लेख केला नसल्यामुळे शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना संधी मिळू शकत नाही़ ज्यांनी प्रमाणपत्रांवर पूर्वाश्रमीची जात लावली असेल, त्यांनाच लाभ मिळत आहे़ त्यामुळे बौद्ध तरुणांमध्ये असंतोष आहे़ मागासवर्गीयांना सर्वच पदांवर आरक्षण असल्याचाही गैरसमज आहे़ सचिव पातळीवरील पदे, संरक्षण, परराष्ट्र खाते, न्यायालये यातील पदांवर आरक्षण नाही़ आरक्षणाचे लाभ आजपर्यंत पाच ते दहा टक्के मागासवर्गीय लोकांनाच मिळाले आहे़ ९० टक्के लोक शिक्षणाअभावी अद्याप वंचित असल्याचा दावा केला जात आहे़
भारतात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती आणि ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय या हजारो वर्षे पीडित, शोषीत, उपेक्षित राहिलेल्या जातींसाठी आरक्षण ठेवणे भाग पडले़ सामाजिक न्याय हे एकमेव सूत्र समोर ठेवून घटनाकारांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जाती, जमातींना आरक्षणाची तरतूद केली आहे़ आपल्या देशात जातीव्यवस्था आणि त्याअनुषंगाने आलेल्या रुढीपरंपरांनी समाजातील मोठ्या घटकांना सापत्न वागणूक दिल्यामुळे हे सर्व घटक उन्नतीपासून उपेक्षित राहिले़ आरक्षणाने आता कुठे त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ लागली आहे आणि ज्यांना आरक्षणाचे लाभ मिळाले त्यांनी स्वत:ची प्रगती करून घेतली आहे़ परंतु अद्यापही मोठ्या संख्येने हे घटक उपेक्षित असून आरक्षणाचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत़ भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केल्यापासून त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली असती तर आज कदाचित आरक्षणाची गरजही भासली नसती़ परंतु असे घडले नाही़ मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला राखीव निधी त्यांच्यासाठीच वापरण्याची अट असतानाही या अटीचे सर्रास उल्लंघन करून हा निधी अन्यत्र वळवला जातो़ म्हणजेच मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी आखलेल्या योजनासुद्धा नीटपणे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत़ या योजनांचा निधी मधल्यामध्ये हडप होतो़ हे चक्र वर्षानुवर्षे चालू असल्याने आजही अनेक भागांत  मागासवर्गीय समाजाची प्रगती खुंटलेली अथवा धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येते़ ग्रामीण भागात याची अधिक तीव्रता जाणवत असल्याने आरक्षणाला विरोध होताच या उपेक्षित समाजातून प्रतिक्रिया उमटू लागतात़ 
ओबीसीसाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही़ पी़ सिंग यांनी २५ वर्षांपूर्वी मंडल आयोग लागू केला तेव्हा आरक्षण विरोधकांनी तसेच आरक्षणाबाबत अनभिज्ञ असलेल्या काही ओबीसी जातींमुळे देशभर गदारोळ होऊन आगडोंब उसळला होता़ या आरक्षण विरोधकांचे आंदोलन भाजपाचे लालकृष्ण अडवाणी हे प्रत्यक्ष­अप्रत्यक्षपणे करीत होते़ २५ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले़ आता कोणताही राजकीय पक्ष  आरक्षण व्यवस्थेला विरोध करू शकत नाही, कारण ती संवैधानिक तरतूद आहे़ याला विरोध करणे म्हणजे जाती समूहांचा रोष ओढवून घेणे, असा राजनैतिक अर्थ निघू शकतो म्हणून कोणताही राजकीय पक्ष या आरक्षणाला प्रत्यक्ष विरोध करू शकत नाही़ जे आरक्षण लाभार्थी आहेत, त्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के असल्याने आरक्षणाला विरोध करणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही़ आरक्षण विरोधकांनी यापूर्वी विरोध करण्याच्या अनेक पद्धती अवलंबिल्या होत्या़ त्या कालबाह्य झाल्याने आता स्वत:च आरक्षण मागून अप्रत्यक्षपणे विरोध करू लागले आहेत़ म्हणूनच हार्दिक पटेल नावाच्या तरुणाला १५ दिवसांपूर्वी कोणी ओळखत नव्हते तो आज या आरक्षण विरोधकांचा ब्रँण्ड अ‍ॅम्बेसेडर झाला आहे़ मीडियानेही त्याला उचलून धरले आहे़ बहुजन समाजाच्या एखाद्या आंदोलनासाठी लाखो लोक अनेक वेळा जमले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही़ हार्दिकला मात्र गेले १५ दिवस मीडियाने डोक्यावर घेतले आहे़ संपूर्ण आरक्षण व्यवस्था मोडून टाकण्याचा हा डाव असल्याची शंकाही घेतली जात आहे़ जेव्हा आरक्षणविरोध   सुरू होतो, त्या त्या वेळी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून विरोध करतो़ परंतु आरक्षणाचे सर्व लाभार्थी एकजुटीने प्रतिकारासाठी उतरत नाहीत़ त्यामुळे विरोधकांचा आवाज वाढला आहे़ फुले, आंबेडकरी चळवळीने शिक्षीत झालेले तरुण ओबीसींच्या आरक्षणासाठीही रस्त्यावर उतरून लढा देण्याच्या तयारीत असतात़ पण आरक्षण रद्द करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी आरक्षणाचे सर्व लाभार्थी एकत्र येत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
जे समूह कायम आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करीत होते, तेच आज आरक्षण मागू लागले आहेत़ हा आरक्षण धोरणाचाच विजय मानावा लागेल़ मराठा समाजाने महाराष्ट्रात आंदोलन करून १६ टक्के आरक्षण पदरात पाडून घेतले खरे; पण आरक्षण सिद्ध करण्यात सरकार कमी पडल्यामुळे ते उच्च न्यायालयात अडकून पडले आहे़ विशेष म्हणजे ब्राह्मण समाजही आरक्षणाची मागणी करू लागला आहे़ सर्व समाजातल्या गरीबांना आरक्षण द्यायचे तर राज्य घटनेत तशी तरतूद करावी लागेल़ सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील इंदू सहानी खटल्याचा निर्णय देताना देशात आरक्षण ५० टक्के असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे़ मात्र सरकारने ठरवले तर हे आरक्षण वाढविता येऊ शकते़ त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत असलेले सरकार आले पाहिजे़ गेली सुमारे ३० वर्षे या देशातील दोन्ही सभागृहांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आलेले नसल्याने आरक्षणात बदल करणे शक्य झालेले नाही आणि राजकीय कारणास्तव असा बदल होण्याची शक्यता दिसत नाही़ तेव्हा निष्कारण माथी भडकावण्याचे राजकारण करण्यात अर्थ नाही़

Read more...

Monday, August 31, 2015

महाराष्ट्रात होईल का ‘हार्दिक पटेल’?

महाराष्ट्रातील मराठा समाज हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक संघटनांमध्ये विभागला गेला असल्याने त्यांच्यात एकजूट होऊन हार्दिक पटेल निर्माण होणे केवळ अशक्य आहे़ त्यामुळे आरक्षणाची मागणी लावून धरण्याची तीव्रता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दिसू शकत नाही़

Read more...

Wednesday, August 26, 2015

कांद्याची साठेबाजी : शेतकरी उपाशी, दलाल तुपाशी

शेतकरी टिकला तरच शेती टिकेल आणि शेती टिकली तरच देशातील अन्नधान्याचा प्रश्न सुटेल़; पण धोरणे उद्योजकांसाठी राबवायची आणि शेतकºयांच्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली तर काँग्रेसच्या ६० वर्षांच्या धोरणावर टीका करायची, अशी पळवाट मोदींनी काढू नये़

Read more...

Monday, August 17, 2015

मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मेक इन महाराष्ट्र’

महाराष्ट्रातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई असून दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे आलेल्या पाणी संकटावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी जलयुक्त शिवार योजना आणि राज्याचा औद्योगिक विकास साधत बेरोजगारीवर मार्ग काढण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ मिशन हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी केला आहे़ गेल्याच सप्ताहात जागतिक पातळीवर तंत्रज्ञानयुक्त उत्पादन करणाºया फॉक्सकॉन कंपनीने महारा
ष्ट्रात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली़ या संबंधीचा सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाºयांशी अनेकदा सविस्तर चर्चा करून केला आहे़ या करारानुसार अ‍ॅपलचे आयफोन आणि आयपॅड, ज्यांचे वर्चस्व अद्याप कायम आहे अशी उत्पादने महाराष्ट्रात होणार आहेत. ही कंपनी चीनप्रमाणे महाराष्ट्रालाही प्राधान्य देणार आहे. लहान­मोठ्या उद्योगांना भरपूर चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे़ फॉक्सकॉनचे संस्थापक अध्यक्ष टेरी गावू यांनी स्वत:च ही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी स्वित्झर्लंडमधील डाव्होस, जर्मनी, अमेरिका, चीन, इस्राएल या देशांमध्ये दौरे करून आल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले़ यापूर्वी पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे आपल्या राज्यात येऊ घातलेले उद्योग परराज्यात विशेषत: गुजरातमध्ये गेले असल्याची अनेक उदाहरणे आहेत;परंतु मुख्यमंत्र्यांनी जनरल मोटर्सचा गुजरातमध्ये गेलेला प्रकल्प महाराष्ट्रात आणून दाखवला, हे विशेष़ पुण्याजवळ तळेगाव येथे जनरल मोटर्सचा प्रकल्प सुरू असून गुजरातचा प्रकल्प बंद करून तळेगावच्या प्रकल्पाचाच विस्तार करण्याचा निर्णय या कंपनीने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती घेतला आहे़ सरकारने या कंपनीला जागाही दिली आहे़ फॉक्सकॉन कंपनीलाही तळेगावजवळच १५०० एकरची जागा सरकारने उपलब्ध करून दिली आहे़ जागतिक पातळीवर होणारी उत्पादने विदेशी गुंतवणुकीने महाराष्ट्रात सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा स्तुत्य प्रयत्न असून आजच्या डिजिटल युगात जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करण्याची आपली कुवत सिद्ध झाली तर अधिकाधिक गुंतवणूक होण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, याबाबत शंका नाही़ चीनप्रमाणे महाराष्ट्रात मनुष्यबळ आहे आणि उद्योग व्यवसायासाठी तुलनेने कमी खर्चात मनुष्यबळाची उपलब्धता असणे, ही बाब विदेशी गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी आहे़ मात्र त्याचबरोबर वीज, पाणी, उत्तम रस्ते या प्रकारच्या पायाभूत सुविधादेखील आवश्यक असून या सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर देण्याची तेवढीच गरज आहे़
आजपर्यंत महाराष्ट्रात औद्योगिक विकास झालेलाच नाही, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही; परंतु महाराष्ट्रातील औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येणाºया उद्योगांची स्थिती काय आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे़ महाराष्ट्रातील विस्तीर्ण पसरलेल्या एमआयडीसींकडे पाहिले तर वातावरण अत्यंत भकास आणि निराशाजनक असल्याचे दिसून येते़ वास्तविक पाहता आपल्या राज्यातील एमआयडीसी देशात अग्रगण्य समजल्या गेल्या;परंतु याआधीच्या काँग्रेस­राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात बहुतेक एमआयडीसींमधील उद्योग बंद पडले आहेत़ तर अनेक ठिकाणी उद्योग सुरू झाले नसून उद्योगांसाठी घेतलेल्या जमिनी तशाच पडून आहेत़ एमआयडीसीमध्ये वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे तेथील उद्योग हे गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा राज्यांमध्ये गेलेले आहेत़ उद्योगांसाठी जमीन मिळवण्यात वेळ जात आहे. भूसंपादन वेळेत होत नाही त्यामुळे ज्यांना उद्योग उभे करायचे आहेत ते उद्योजक त्यांच्या उद्योगांसाठी मान्यता मिळूनही येत नाहीत़ जवळपास ४४ टक्के संपादित जमीन उद्योगाविना पडून आहे़ या जमिनीचा योग्य विनियोग करावा लागेल़ अहमदनगरजवळ सुपे एमआयडीसीसाठी ९०४ हेक्टर जमीन आवश्यक  असून त्यापैकी केवळ २०० हेक्टर जमीन संपादित झाली आहे़ हेक्टरी २० लाख रुपये देऊनही जमीन संपादित होऊ शकत नाही़ असाच प्रकार अन्य जिल्ह्यांतही असून भूसंपादनाअभावी उद्योगवाढीवर परिणाम होत आहे़ नाशिक जिल्ह्यात सिन्नर एमआयडीसीमध्ये २००४ साली इंडिया बुल्सचा २९०० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात आला असून २००९ साली तो पूर्ण केला जाणार होता़ सध्या १३५० मेगावॅट वीज उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे़; परंतु हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही़ कोळसा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला प्रकल्पापर्यंत येणारा ४० किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार नसल्यामुळे सुरू होऊ शकत नाही़ इंडिया बुल्सचाच दुसरा प्रकल्प अमरावती येथे उभारला जाणार असून या प्रकल्पाची अद्याप काहीच प्रगती झालेली नाही़ आपल्या शेजारच्या गुजरात राज्यातील जीआयडीसीमध्ये प्रकल्प उभारणे सर्वात सुलभ आणि सोयीचे असल्याने महाराष्ट्रातील उद्योजकदेखील गुजरातमध्ये उद्योग उभारणे पसंत करत आहे़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जीआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी सात दिवसांत सर्व परवानग्या दिल्या जात आहेत़ एवढेच नव्हे तर सात दिवसांत परवानग्या दिल्या गेल्या नाहीत तर त्या दिल्या असे गृहित धरावे, अशी सवलतही देण्यात आली आहे़
गुजरातमध्ये त्वरित उद्योग सुरू व्हावे, अशी अधिकाºयांची मानसिकता असल्यामुळे कोणतेही प्रस्ताव लालफितीत अडकून   पडत नाहीत़ याउलट महाराष्ट्रात अधिकाºयांकडून होत असलेली दिरंगाई आणि वर्षानुवर्षे लाल फितीत अडकून पडलेले प्रस्ताव हा एक मोठा अडथळा आहे़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी जालीम उपाययोजना करण्याची गरज आहे़ आपल्या राज्यात एक खिडकी योजनेचे ढोल बडवले जातात, त्यासाठी निर्णयदेखील घेतले जातात, अर्थसंकल्पात तरतुदी केल्या जातात. प्रत्यक्षात या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्याची मानसिकताच दिसत नाही़ एक खिडकी योजना गतिमान झाली आहे असा अनुभव उद्योजकांना येत नाही़ राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव लाल फितीत अडकून पडले, हे भूषणावह निश्चित नाही़ उलट राज्य सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार आहे़  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला केवळ ‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखवलेली नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे़ शेती सिंचनासाठी यंदा २२०० कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली असून आत्महत्याग्रस्त अशा १४ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांत अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ उद्योग विकासाला चालना देण्यासाठी मुंबई ते नागपूर असा सुपर एक्स्प्रेस मार्ग तयार केला जाणर असून मुंबई, औरंगाबाद, नाशिक विभागातील एमआयडीसींशी तो जोडला जाणार आहे़ विकासाची दृष्टी ठेवून योजना राबविण्याचा हा प्रयत्न असला तरी तो सफल होण्यासाठी शासकीय यंत्रणेने सक्षमतेने साथ देणे तितकेच गरजेचे आहे़ निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करणेदेखील तेवढेच आवश्यक आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दिशेनेही पावले टाकली असून नगरविकास विभागाचे स्वत:कडे असलेले अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत़ त्यामुळे परवानगीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याची गरज नाही; विभागीय आयुक्तांच्या पातळीवरच काम होऊ शकेल़ उद्योग व्यवसाय असो अथवा शेती व्यवसाय किंवा सर्वसामान्य माणसांची कामे असोत, फायलींचा प्रवास गावपातळीपासून मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत होत असतो़ त्यामुळे मंत्रालयात सतत गर्दी वाढलेली असते़ पण फायली हलत नसल्यामुळे लोकांना वारंवार मंत्रालयात चकरा माराव्या लागत असतात़ मंत्रालयातील गर्दी कमी करून लोकांचा त्रास वाचविण्यासाठी सर्व विभागांच्या विकेंद्रीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे़ 

Read more...

Monday, August 10, 2015

सरकारची डोकेदुखी ठरणार 'महाराष्ट्र भूषण'

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा सरकारचा निर्धार दिसत असला तरी अन्य पुरस्कारांबाबत मात्र सरकार एवढे गंभीर दिसत नाही. त्यामुळेच पुरस्कारांची प्रक्रिया असो अथवा महामंडळांच्या नियुक्त्या, त्यादेखील योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याने सरकारवर नामुष्कीची वेळ येत आहे.

Read more...

Monday, August 3, 2015

देशभक्त कलामांना सलाम; देशद्रोह्याला फाशी

गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे म्हणजे गुन्हेगारांना जरब बसवून त्यातून कायद्याचे पालन करण्याची जाणीव समाजात निर्माण होणे, हा उद्देश आहे़ समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समाजकंटकांना व देशद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे़

Read more...

Tuesday, July 28, 2015

मिसाइल मॅनशी बोलण्याचे भाग्य

देशाचे राष्ट्रपती, अद्वितीय कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ, भारताचे मिसाइल मॅन अशी जगभर ओळख असणारे एवढे असामान्य उत्तुंग व्यक्तिमत्त्व असतानाही अत्यंत साधे, सरळ, सर्वसामान्यांना आपले जवळचे वाटणारे ए़पी़जे़ अब्दुल कलाम यांच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले़ मात्र या जगप्रसिद्ध, असामान्य अशा व्यक्तिमत्त्वाला भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणे, हे केवढे भाग्य़ हे भाग्य मला लाभले हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो़ अब्दुल कलामांना भेटून त्यांच्याशी बोलण्याचा योग आला, हे मी खरोखर माझे भाग्य समजते़ अब्दुल कलामांना मी जेव्हा भेटले तेव्हा ते राष्ट्रपती नव्हते, परंतु जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते़ त्यांची सुमारे पंधरा वर्षांपूर्वी २००० साली मुंबईच्या विमानतळावर भेट झाली होती़ त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि त्यांच्यासोबतचे काही क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले़
मुंबईच्या विमानतळावर मी आणि माझे दोन­तीन सहकारी काही कारणास्तव थांबलो होतो़ लोकमतचे विजय दर्डाही सोबत होते़ तेवढ्यात दिल्लीहून अब्दुल कलाम मुंबईत आले होते़ ते विमानतळाबाहेर येत असताना विजयबाबूंनी अब्दुल कलाम समोरून येत असल्याचे आम्हाला सांगितले़ त्यांना पाहताच मी सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले़ मला थेट समोर आलेले पाहून तेही थांबले़ मी माझी पत्रकार म्हणून ओळख करून दिली आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले़ त्यांच्याशी काय बोलावे, काय विचारावे याचा काहीच विचार मनात नव्हता़ पण तरीदेखील पत्रकार नेहमी विचारतात त्याप्रमाणे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली़ खरेतर अशाप्रकारे अनाहूतपणे कोणी पत्रकार येऊन प्रश्न विचारतो असे पाहून कोणीही उत्तर दिले नसते़ नंतर भेटा असे सांगून निघून गेले असते़ असे अनुभव पत्रकारांना नेहमीच येत असतात़ पण आश्चर्य म्हणजे अब्दुल कलाम थांबले़ खरे सांगायचे तर त्यांच्या संशोधनाबद्दल मला फारशी माहितीही नव्हती़ पण मी विचारले की, आपले नवीन संशोधन काय असेल? त्यांनी सांगण्यास सुरुवात केली़ मिसाइलसंदर्भात बोलले़ मग मी विचारले, त्याचा देशाला किती आणि कसा लाभ होईल? देशाच्या एकात्मतेसाठी ते आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ पुढे मी असेही विचारले की, लोकांना काय संदेश द्याल आणि मुख्य म्हणजे पत्रकारांना काय संदेश द्याल? असे तीन­चार प्रश्न विचारले़ त्याची उत्तरेही त्यांनी सविस्तर दिली़ त्यांच्या आजूबाजूचे लोक माझ्याकडे एकप्रकारे रागाने आणि आश्चर्याने पाहात होते़ एवढ्या मोठ्या माणसाला थांबवून बोलणारी ही कोण, असे त्यांचे भाव होते़ पण पत्रकार म्हणून माझे काम झाले होते़ त्याचा आनंद तर होताच, पण एवढ्या लहान पत्रकाराशी एवढा मोठा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ वाटेत थांबून बोलला, याचा आनंद शब्दातीत होता़ पत्रकारांसाठी त्यांचा संदेश होता, ‘‘सामान्य माणसांसाठी काम करा’’़ असामान्य माणूस, पण सामान्य माणूस हाच त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू हे त्याक्षणी भेटीतही जाणवले़ एवढा मोठा हिमालयाएवढ्या ज्ञानाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा माणूस असूनही सर्वसामान्य माणसाशी सामान्यांप्रमाणे बोलत उभा राहतो, हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे़ एका अल्पशा भेटीतही खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने आपल्याशी संवाद साधला, त्या माणसातल्या माणसाला भावपूर्ण आदरांजली़

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP