Monday, May 18, 2009

शिवसेनेच्या गडाला सुरुंग



17 May, 2009 10


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. कल्याणमध्ये मात्र युतीचे आनंद परांजपे यांनी यश मिळवून युतीची लाज राखली. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षित विजय मिळवला. तर रायगड मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बॅ. ए. आर. अंतुले यांना पराभवाचा हादरा बसला. या ठिकाणी शिवसेनेच्या अनंत गिते यांनी विजय मिळवला. शिवसेनेला भोवला फाजील आत्मविश्वासअनेक वर्षे ठाणे लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवत पारंपरिक मतदारांना गृहीत धरणा-या शिवसेनेला यंदा प्रथमच हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. आपलाच मतदारसंघ असल्याच्या आविर्भावात गाफील राहण्याचा फाजील आत्मविश्वास शिवसेनेला या निवडणुकीत चांगलाच नडला. येथील मतदारांनी संजीव नाईक यांना विजयी करताना मनसेच्या पारड्यातही भरभरून मते टाकली. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आले.


यातच ‘कॉस्मोपॉलिटीन’ झालेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापाव चारून मराठी बाण्याचा हाकारा द्यायला सांगितला. मात्र महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने डम्पिंग ग्राऊंड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसला. याशिवाय युतीच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीही मतदारांची नाराजी ओढवून घेण्यास कारणीभूत ठरली. यात भरीस भर टाकत मनसेच्या राजन राजे यांनी मतांचे धुव्रीकरण केल्याने नाईक यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. ठाणेकर आपल्याच तालावर नाचतात, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटला, हेही या निकालावरून स्पष्ट होते.


राखली युतीची लाज भूकंपाचे हादरे बसावेत आणि उत्तुंग इमारती क्षणार्धात जमीनदोस्त व्हाव्यात अगदी अशीच परिस्थिती युतीची ठाण्यात झाली असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आनंद परांजपेंनी परांजपे यांनी विजय मिळवून शिवसेना-भाजप युतीची आक्षरश: लाज राखली. खरे तर परांजपे यांचा ठाणे हा मतदारसंघ. तरी पक्षाने त्यांना कल्याण हा नवीन मतदाससंघ दिला. त्यामुळे त्यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपासून डावखरे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिग्गज नेत्यांना उतरवून सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु या सगळ्या प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही. युतीच्या बालेकिल्ल्यात मनसे फॅक्टर प्रभावी ठरला.


मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख मते मिळाल्याने येथील युतीचे मताधिक्य घटले. मनसेमुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावरील आंदोलनाची ठिणगी कल्याण-डोंबिवलीत चांगलीच धगधगली होती. नंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. मनसेने युतीच्या बालेकिल्ल्यात मिळवलेली मते म्हणूनच युतीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहेत.संतोष गायकवाड मुस्लिम फॅक्टरच ठरला निर्णायकनव्याने निर्माण झालेल्या भिवंडी मतदारसंघात मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा होता. या ठिकाणी युतीने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. खरे तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण आर. आर. पाटील यांनी बंडखोरी करून सपची उमेदवारी मिळवल्याने मतविभाजन होण्याचे आखाडे काही जणांनी बांधले होते.


परंतु त्यानंतरही येथील मतदारांनी काँग्रेसलाच पसंती दिली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथेही मनसे फॅक्टरचा फटका युतीच्या उमेदवाराला बसला. १९८४च्या दंगलीनंतर भिवंडी हे शहर संवेदनशील म्हणून देशात ओळखले जाऊ लागले. त्यामुळे मुस्लिमांचे खरे कैवारी आपणच आहोत, असे समजणाऱ्या समाजवादी पक्षाने येथे आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. समाजवादीने अलीकडे कल्याणसिंग यांच्याशी जवळीक साधल्याने येथील मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावला. त्याचे स्पष्ट चित्र या निवडणुकीत दिसले. या साऱ्याचा परिपाक म्हणजे काँग्रेसशिवाय आपणास पर्याय नाही, अशी मतदारांची समजूत झाल्याने त्यांनी काँग्रेसलाच भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचा येथील विजय अधिक सुकर झाला. गटातटाच्या राजकारणाचा जाधवांना फायदाबहुजन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बळीराम जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयाची मोहोर उमटवत प्रस्थापितांना पराभूत केले.


काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा, युतीचे अ‍ॅड. चिंतामण वनगा आणि माकपचे लहानू कोम असे दिग्गज उमेदवार असूनही जाधव विजयी होणे हा आ. हितेंद्र ठाकूर यांचाच करिश्मा म्हणावा लागेल. येथे शिंगडा यांच्याविषयी काँग्रेसमध्ये नाराजी होती. भाजपचे चिंतामण वनगा व माकपच्या लहानू कोम यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध नसला तरी त्यांची ताकद कमी पडली. शिवसेना कार्यकर्त्यांची आ. ठाकूर यांच्याशी जवळीक होती. त्याचा फटका युतीला बसला. माकपच्या कोम यांना जनता दलाचा पाठिंबा होता. पण त्याचा फायदा झाला नाही. आ. ठाकूर यांनी वसई विकास आघाडीची सारी ताकद जाधव यांच्या मागे उभी केली होती. त्यामुळे एका बाजूला ठाकूर आणि दुस-या बाजूला युती, आघाडी आणि माकप असे चित्र होते. त्यात ठाकूर आपला उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


पालघर, डहाणू, तलासरी, बोईसर इत्यादी भागांतील नव्याने मतदारसंघात आलेल्यांनाही आकृष्ट करण्यात यश आले. पक्षांतर्गत बंडखोरीचा काँग्रेसला फटकारायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांना प्रवीण ठाकूर व सिद्धार्थ पाटील यांच्या बंडखोरीचा चांगला फटका बसला. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील, बहुजन समाज पक्षाचे किरण मोहिते व श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक या सर्वाच्या उमेदवारीमुळे अंतुले यांना मतविभाजनाचा फटका बसेल, अशी चर्चा होत होती. त्याचा नेमका फायदा गीते यांना झाला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व काँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी अंतुले यांना पाठिंबा दिला असला तरी तरुण वर्गाला अंतुलेंची उमेदवारी मान्य नव्हती. पक्ष शिस्तीचा भंग करून आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर तसेच पेणचे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार ए. टी. पाटील यांचे पुत्र सिद्धार्थ पाटील यांनीही अंतुले यांना आव्हान दिले होते. त्याचाही येथे परिणाम झाला. शिवसेनेचे अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला होता. त्याचा चांगलाच फायदा गितेंना झाला. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आगरी व कोळी समाज शेकापबरोबर असून त्यांची एकगठ्ठा मते गिते यांच्या पदारात पडली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अंतुले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला.

Read more...

राष्ट्रवादीची वाटचाल दिल्लीकडून गल्लीकडे!

शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले.


देशाच्या राजकारणात आघाडय़ांचे पेव फुटले होते. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना विश्वास देण्याऐवजी पंतप्रधानपदासाठी एकमेकांना विश्वास देण्यात अनेक नेते आघाडीवर होते. आपापल्या वेगवेगळय़ा आघाडय़ा करायच्या आणि वेळ येताच पंतप्रधानपदावर दावा ठोकायचा, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. देशाला स्थिर आणि मजबूत सरकार देणा-या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने सरकार बनवण्यासाठी आघाडय़ांवर अवलंबून राहावे आणि त्यांना सरकार बनवणे अशक्य करून टाकावे म्हणजे ते आपलेच नाव पर्याय म्हणून पुढे करतील, अशा वेडाने अनेकांना झपाटले होते. त्यात महाराष्ट्रातील ‘जाणते राजे’ आघाडीवर होते. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, मायावती, मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद पवार, जयललिता, चंद्राबाबू नायडू, रामविलास पासवान, सीताराम येच्युरी, प्रकाश करात असे किती तरी सिंहासनावर उडी मारण्यासाठी टपून बसले होते; पण एकालाही जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर या सर्व नेत्यांच्या किती तरी आधी पंतप्रधानपदावर नजर ठेवली होती; पण कालच्या निकालाने त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. गल्लीतून दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला माढाच्या गल्लीतच परतावे लागले, ‘दिल्ली बहोत बहोत दूर है’ हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राष्ट्रवादीला आणि शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे तोडफोडीचे राजकारण आजवर केले, त्याचा सर्वाधिक फटका त्यांना स्वत:लाच बसला आहे. आता तरी जाणते राजे वास्तव जाणून घेतील का, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून त्यांच्या सगळय़ा चाली चुकल्या आणि त्यांनी स्वत:ला हास्यास्पद करून ठेवले, इतके की एकाने निकालानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, ‘आता बारामतीचे पंतप्रधान होणार का?’ अशा प्रकारे पवारांची लोकांनी खिल्ली उडवावी, हे अत्यंत खेदजनक आहे.

आघाडय़ांच्या राजकारणाचा जमाना असून कोणालाही बहुमत मिळत नसल्याने कितीही कमी जागा आल्या तरी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, असे मानून चाललेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला आपली प्रतिक्रिया देताना दुसरे टोक गाठावे लागले व सांगावे लागले की, लोकांना स्थिर सरकार हवे असल्याने यूपीएच्या बाजूने कौल दिला आहे. शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले. राज्यात १००हून अधिक प्रचारसभा घेणा-या पवारांना राष्ट्रवादीची एक जागादेखील वाढवता आली नाही. उलट आधीच्या नऊ जागांमधली एक कमी झाली आहे. राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रवादी काँग्रेस अशी अवहेलना केली जात होती; पण या वेळी आणखी गजब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता पश्चिम महाराष्ट्रवादीदेखील राहिला नाही. जिकडे - तिकडे पाटलांच्या सवत्यासुभ्यांना खिंडारं पडली आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून येणे अपेक्षित होते, तसे माढातून स्वत: पवार निवडून येणार नाहीत, असे म्हणण्याचे धाडस कोणी केले नाही. थोडय़ाफार फरकाने का होईना निवडून येतील, अशी भावना लोक बोलून दाखवत होते.
 
बारामती व माढा वगळता पवारांच्या सर्वाधिक प्रचार सभांचा परिणाम एकाही मतदारसंघात दिसला नाही, साता-यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले, त्याचे श्रेय पवारांना देता येणार नाही. उदयनराजेंनी तिकीट घ्यावे याकरिता राष्ट्रवादीनेच त्यांच्यासमोर लालगालिचे पसरले होते. निकालानंतरची उदयनराजेंची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. ते म्हणाले, ‘मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, माझ्या हिमतीवर जिंकली आहे, पक्षबिक्ष गेला खडय़ात!’ पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ातच जाणार आहे. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकची समीर भुजबळ यांची जागा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निवडून आणली आहे. तिथे मराठा समाजाने त्यांना भरपूर त्रास दिला होता. त्यानंतर भंडारा-गोंदियाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांची जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा हातभार लागला आहे. पटेलांनी सोनियांच्या सभेचा आग्रह धरला होता. त्यानंतर मराठवाडय़ात उस्मानाबादची डॉ. पद्मसिंह पाटील यांची जागा त्यांनीच निवडून आणली. त्यांच्या भावनिक आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला. बारामती, माढा, सातारा, नाशिक, भंडारा, उस्मानाबाद या सहा जागा प्रत्येकाच्या ताकदीवरच्या आणि उरलेल्या ईशान्य मुंबईची संजय पाटील यांची व ठाण्याची संजीव नाईक यांची जागा मनसेच्या कृपेने आल्या आहेत. तेव्हा पवारांचा करिश्मा कुठेही दिसलेला नाही. पंतप्रधानपदासाठी ज्या नेत्याला महाराष्ट्रासमोर उभे करण्यात आले, त्या नेत्याच्या शब्दाला किंमत देऊन अधिकाधिक जागा जिंकून द्यावयास हव्या हात्या; पण तसे काही घडले नाही. याचे स्वत: पवारांना व त्यांच्या चेलेचपाटय़ांना आत्मपरीक्षण करावे लागेल.
 
राष्ट्रवादी पक्षाला व्यापक दृष्टिकोणातून वाढवणे पवारांना शक्य झाले नाही. प्रत्येक मतदारसंघातील प्रस्थापित मराठा नेत्यांच्या सवत्यासुभ्यांवर लक्ष ठेवून एका जातीची अस्मिता जोपासण्याचे आणि त्यांचे संघटन आपल्या बाजूने उभे करण्यावरच त्यांच्या राजकारणाचा भर राहिला, त्यातूनच विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकरांसारखे फुटीर वृत्ती जोपासणारे लोक पुढे आले. दलित मागासवर्गीय आणि महिला यांचे संघटन करून उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याच्या वल्गना अनेकदा केल्या; पण त्या हवेतच विरल्या. या वल्गना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न झाला नसल्यामुळे राष्ट्रवादीची निवडणूक म्हणजे वाऱ्यावरची वरात ठरली. राष्ट्रवादीच्या ज्या जागा निवडून आल्या त्यात काँग्रेसच्या पुण्याईचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, यापुढे काँग्रेसने स्वबळावरच निवडणुका लढवल्या पाहिजेत. विश्वासघातकी राजकारण करणा-यांचे लोढणे किती दिवस सांभाळायचे याची चर्चा सुरू झाली आहे.


आता देशात काँग्रेसच्या बाजूने वारे वाहू लागले आहेत, ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणारच आहेत. शिवसेना-भाजपला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला, मनसेने त्यांची उरलीसुरली ताकददेखील खच्ची केली आहे. या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा गौण ठरला. भावनिक मुद्दय़ांऐवजी लोकांनी विकासाला अधिक महत्त्व दिले. ‘हिंदूंचा मसिहा’ अशी प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींनाही लोकांनी झटका दिला. अनेक राज्यांनी मोदींच्या सभा नाकारल्या. मनसेला मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर भरपूर मते मिळाली. शिवसेनेपासून मराठी माणसे दूर गेली होती आणि अमराठींचे काँग्रेसच्या बाजूने मजबूत संघटन झाले, त्यामुळे मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. 

Read more...

Friday, May 15, 2009

अहो आबा, मला विधानसभेचे तिकीट द्या ना!


14 May, 2009

लावणीच्या फडात बोर्डावर उभे राहून रसिकांना घायाळ करणा-या सुरेखा पुणेकर गेल्या काही दिवसांपासून राजकीय फडावर येण्यास उत्सुक आहेत.

लई दिवसाची विनंती माझी लक्षात जरा घ्या ना अशी लाडिक साद लावणीसम्राज्ञी ‘नटरंगी नार’ सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष आर. आर. आबांना घातली. लावणीच्या फडात बोर्डावर उभे राहून रसिकांना घायाळ करणा-या सुरेखा पुणेकर गेल्या काही दिवसांपासून राजकीय फडावर येण्यास उत्सुक आहेत.

मागच्या विधानसभेच्या वेळीसुद्धा त्यांनी उमेदवारीच्या ‘तिकीट-बारीवर’ हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांना ती मिळू शकली नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ संपण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या नव्या खेळाचे बोर्ड सर्वच पक्षांच्या कार्यालयात लागले आहेत. उमेदवारीच्या तिकीट बारीवर इच्छुकांची झुंबड उडालेली आहे. प्रत्येक पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकांचे फड रंगू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी होत असल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधान सभा मतदारसंघातून उत्सुक असणा-या सुरेखा पुणेकर यांनी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या युवानेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि‘ताई मला मोहोळचा मोह काही आवरेना’ अशी आळवणी केली. सुप्रिया सुळे यांनीही, ‘चला आपण आबांनाच जाऊन भेटूया’ असे सांगितले आणि त्या पुणेकर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या. तेथे प्रदेश अध्यक्ष आर. आर. पाटील यांची त्या दोघींनी भेट घेतली.

उमेदवारीसाठी उतावीळ झालेल्या पुणेकर यांच्याकडून, माझ्या उमेदवारीचे काही तरी ठरवाआबा माझा मोहोळचा हट्ट जरा पुरवा अशा अचानक झालेल्या मागणीने आबा जरा गांगरलेच पण स्वत:ला सावरून ते लगेच म्हणाले, ‘मागच्या विधान सभेच्या वेळीच उत्तर सोलापूर या राखीवर मतदार संघातून तुमचा विचार सुरू होता.

पण ते काही जमलं नाही. यावेळी मात्र नक्कीच विचार करू’ आबांनी आश्वासन देताच आपण आमदार होणार या कल्पनेने हरखून गेलेल्या सुरेखा पुणेकर मग गुणगुणतच बाहेर पडल्या..होणार होणार गं, बाई मी आमदार होणार गं..

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP