Thursday, July 15, 2010

न्यायालयाच्या कचाटय़ातून..

सीमाप्रश्नावर महाराष्ट्राच्या तीव्र भावना पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीत सकाळीच दाखल झाले आणि इकडे विधानभवनात नेहमीची धावपळ थंडावली.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्राच्या तीव्र भावना पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीत सकाळीच दाखल झाले आणि इकडे विधानभवनात नेहमीची धावपळ थंडावली. सभागृहातील उपस्थितीदेखील रोडावली होती. जणू काही अधिवेशनाचे सगळे कामकाजच संपले आहे, असे वातावरण होते. पण तेवढय़ात खरलांजी प्रकरणी नागपूर खंडपीठाचा निकाल आला आणि विधानभवनात या निकालाचीच चर्चा सुरू झाली. विधानसभेत महागाई, विधान परिषदेत शिक्षण आणि सभागृहाबाहेर खरलांजी या प्रकरणांच्या उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.

खरे तर विधिमंडळ अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या मा-याला तोंड द्यावे लागते. परंतु राज्यात विरोधकांची धार बोथट झाली असल्याने सरकारपुढे विरोधकांचे आव्हान उरलेलेच नाही. मात्र, सरकार न्यायालयाच्या कचाटय़ात चांगलेच अडकले आहे. सीमाप्रश्न, बेस्ट फाइव्ह, खरलांजी या प्रकरणांचे निकाल अधिवेशन सुरू होताना येऊ लागले. बेस्ट फाइव्ह प्रकरणात लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला होता. त्यावरील सकारात्मक निकालाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळून सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी हा निकाल अंतरीम आहे. अंतिम निकाल यायचाच आहे. सीमाप्रश्नी केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून सीमा भागात आणि महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला होता. यावर महाराष्ट्र सरकारने दुरुस्ती द्यावी, असा आणखी एक दिलासादायक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा सरकारला हायसे वाटले. यावरही अंतिम निकाल प्रलंबित आहेत, मानेवर टांगती तलवार आहेच.

सीमाप्रश्न आणि बेस्ट फाइव्हने सरकार चांगलेच हादरले होते. लोकक्षोभाला सामोरे जाणार कसे, असा पेच निर्माण झाला होता, पण त्यातून तात्पुरती सुटका झाली. आज खरलांजीने सरकारला चांगलेच पेचात टाकले आहे. खरलांजी हत्याकांड घडवणा-या नराधमांना फाशीची शिक्षा होण्याऐवजी जन्मठेपेची शिक्षा झाली आणि सरकारबद्दल दलित मागासवर्गीय समाजात अविश्वासाची भावना निर्माण झाली. महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळेच या प्रकरणात त्रुटी राहिल्याचे आरोप अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केले. लोकांचा प्रक्षोभ वाढू लागला. त्याची हिंसक प्रतिक्रियाही उमटू लागली, हे प्रकरण वाढत गेले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठाच प्रश्न उभा राहील, असे चित्र दिसू लागले आहे.

माणुसकीला काळिमा फासणा-या या प्रकरणाची शिक्षा फाशीवरून जन्मठेपेवर आल्याचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटतील,अशी अपेक्षा होती. परंतु विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राम पंडागळे वगळता कोणीही या प्रश्नावर आवाज उठवला नाही. हा मुद्दा उपस्थित करून पंडागळे यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यावर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे आश्वासन दिले. विधानसभेत मात्र हा मुद्दा कोणीही उपस्थित केला नाही, याचे आश्चर्य वाटले. विधानसभेत अनुसूचित जातीचे 27 आमदार आहेत. त्यापैकी एकालाही हा मुद्दा उपस्थित करावा, असे वाटले नाही. मग इतरांकडून अपेक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

Read more...

Wednesday, July 14, 2010

एकीचे बळ!

एकीचे बळ काय असू शकते, याचा अनुभव मंगळवारी महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे मिळाला असेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची अनंतकाळ चाललेली पिळवणूक आणि सीमावासीयांची छळवणूक थांबवून या प्रश्नांची त्वरित सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे.

एकीचे बळ काय असू शकतेयाचा अनुभव मंगळवारी महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे मिळाला असेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची अनंतकाळ चाललेली पिळवणूक आणि सीमावासीयांची छळवणूक थांबवून या प्रश्नांची त्वरित सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे. याचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच या प्रश्नाचे गांभीर्य राखण्याचे आवाहन सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना केले. त्यामुळे काही तुरळक अपवाद वगळता विधानसभेने चर्चेला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवण्यात यश मिळवले. सीमावासीयांना दिलासा मिळावात्यांच्यामागे महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहेअसा विश्वास त्यांना द्यावामहाराष्ट्राने सीमेवरील बांधवांना वा-यावर सोडलेले नाही याची जाणीव त्यांना व्हावी यासाठी चर्चेचे गांभीर्य राहिले पाहिजे. सीमावासीयांना न्याय देण्याची तळमळ चर्चेत प्रत्येकाच्या भाषणात दिसली पाहिजेअसे एका प्रकारे निर्देशच वळसे-पाटील यांनी दिले होते.


सभागृहाने केलेला एकमुखी ठराव पंतप्रधानांना देण्याची सूचनाही त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे राजकीय भांडवल करून सभागृहात गोंधळगदारोळ करणा-या सदस्यांना आपोआप अटकाव झाला. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधकांनी समोरासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केलीच होती. वातावरण बिघडवणाऱ्यांची सभागृहात कमी नाहीपण त्यांना वठणीवर आणण्याचे काम वळसे-पाटील यांनी केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रश्नी दिलेल्या अल्पकालीन चर्चेला ठरावात रुपांतरीत करण्याची मौलिक सूचना केली आणि चर्चेचे गांभीर्य वाढवले.

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना त्यांनी वेशांतर करून बेळगावात आंदोलन केले होते. लाठय़ा खाल्ल्या होत्यातेव्हा पोलिसाला मारल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. भुजबळ बोलण्यास उभे राहिलेतेव्हा त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली आणि समोरच्या बाकावरील शिवसेना-मनसेचे आमदारही भावूक झाले. सीमाप्रश्नासाठी आंदोलन करणारे आक्रमक आमदार अशी ख्याती असलेल्या भुजबळांच्या भाषणाची सर्वाना उत्सुकता होती.

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे भाषण अत्यंत संयमित आणि सीमावासीयांचे दु:ख जाणून घेणारे होते. कर्नाटकात त्यांच्या पक्षाचे भाजपचे सरकार असूनही त्यांनी सीमावासियांची बाजू लावून धरली हे कौतुकास्पद होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात त्यांचे आभार व्यक्त केले असते तर अधिक चांगले वाटले असते.

यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजेकेंद्राने या प्रश्नी केलेल्या प्रतिज्ञापत्राला विरोध करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह सर्वानी घेतली असून एकीचे दर्शन घडवलेत्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Read more...

Tuesday, July 13, 2010

छत्रपतींचा रथ, राजकारणाचे घोडे!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांचा अपमान कोण सहन करणार? कोणी शब्दांनी अथवा कृतीने असे करील, त्याचे हात-पाय कलम करण्याची भावनाच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात असेल याबद्दल शंका नाही, याचे प्रत्यंतर आज पहिल्या दिवशी विधिमंडळात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांचा अपमान कोण सहन करणारकोणी शब्दांनी अथवा कृतीने असे करील,त्याचे हात-पाय कलम करण्याची भावनाच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात असेल याबद्दल शंका नाहीयाचे प्रत्यंतर आज पहिल्या दिवशी विधिमंडळात आले. जेम्स लेन नावाच्या विदेशी लेखकाने शिवरायांबरोबरच राजमाता जिजाऊंबद्दल अवमानकारक लिखाण केल्यावरून महाराष्ट्रात यापूर्वीच गदारोळ उडाला होता. जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्या पुण्याच्या भांडारकर संशोधन संस्थेवर हल्लेमोर्चेआंदोलनेकोर्टकचे-या सगळे होऊन गेले. सर्वोच्च न्यायालयाची दारेही ठोठावण्यात आली. या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने 2003मध्ये घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आणि जखमेवरची खपली निघाली. महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. लोकभावनेची तीव्रता लक्षात घेताराजकारणी कसे मागे राहतीलप्रत्येक पक्षाने आपल्या राजकारणाचे घोडे पुढे दामटले. जणू काही छत्रपती शिवरायांचा रथपण घोडे राजकारणाचे! असा प्रकार विधानसभेत दिसला.

समाजवादी पक्षाच्या अबू आझमींपासून थेट गृहमंत्री आर. आर. आबा पाटलापर्यंत शिवरायांविषयीची लोकभावना कॅश करण्याचा प्रयत्न सुरू झाला. छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणा-यांना चुल्लूभर पाणी मे डुब कर आत्महत्या करनी चाहिए असे जोशपूर्ण वक्तव्य अबू आझमी यांनी केलेच. पण हे करताना ते राजकारण विसरले नाहीत. मोहंमद पैगंबरांविरुद्ध लिखाण करून मुस्लिमांच्या भावना दुखवणारे सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. ते महाराष्ट्रात आल्यावर पोलिस संरक्षणात फिरतात. त्यांना बंदी नाही. छत्रपतींना एक न्याय आणि मोहंमद पैगंबरांना दुसराहे कसे चालेलअसा सवाल आझमींनी केला. आझमींनी मुस्लिमांचे राजकारण पुढे केले. मग हिंदुत्ववादी मागे कसे राहणारभाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी धर्माची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात कराअशी मागणी केली. त्याचबरोबर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि संसदेच्या आवारात छत्रपतींचा पुतळा उभा केलायाचे दाखले देत आपणही शिवरायांचे कैवारी असल्याचे दाखवलेतर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन आम्हालाच छत्रपतींचा किती अभिमान हे दाखवून दिले. 


राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे विधान परिषदेत शिवाजी महाराजांबद्दल आमच्याही भावना तीव्र आहेत. पण राष्ट्रपुरुषाच्या नावाने आम्ही धंदा केला नाही असा खणखणीत युक्तिवाद केला. या प्रश्नी चर्चेची तयारी दाखवून विरोधकांना निरुत्तर केले. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी वाजपेयी पंतप्रधान असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पुस्तकावरील बंदीला विरोध केल्याचे सांगताच विरोधक संतापले. अखेर शब्द मागे घेण्याच्या अटीवर वातावरण शमलेअसे राजकारण घडले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP