Friday, April 8, 2011

दादांची दादागिरी


देशातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उपोषणाचा गांधीमार्ग अवलंबणा-या अण्णांनाच भ्रष्टाचारी म्हणण्याची हिंमत दाखवून राजकारणातल्या सर्व दादांना मागे सारणारे दादा अशी सुरेशदादांची प्रतिमा निर्माण झाली. हजारे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप असताना ते या जनआंदोलनाचे नेतृत्व कसे काय करू शकतात, असा सवालच त्यांनी सभागृहात केला.

दादांची दादागिरी म्हटले की अजित पवार यांचे नाव समोर येते. पण गुरुवारी दुसरेच दादा चर्चेत आले. आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या हजारेंना थेट आव्हान देणा-या सुरेशदादा जैन यांनी संसदेबाहेर उपोषणाला बसलेल्या हजारेंना विधानसभेत आव्हान दिले. देशातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उपोषणाचा गांधीमार्ग अवलंबणा-या अण्णांनाच भ्रष्टाचारी म्हणण्याची हिंमत दाखवून राजकारणातल्या सर्व दादांना मागे सारणारे दादा अशी सुरेशदादांची प्रतिमा निर्माण झाली. हजारे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप असताना ते या जनआंदोलनाचे नेतृत्व कसे काय करू शकतातअसा सवालच त्यांनी सभागृहात केला.
 
सुरेशदादा जैन हे राज्याच्या राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. जळगावच्या राजकारणावर काही दशके पकड ठेवणारा हा नेता म्हणजे पक्ष असेच समीकरण रूढ झाले आहे. कधी राष्ट्रवादीअपक्ष तर आता शिवसेना.. कुणाच्याही तिकिटावर उभे राहून हमखास निवडून येणारे जैन त्यामुळे कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना जुमानत नाहीत. त्यांची ध्येयधोरणेही तेच ठरवतात. लोकशाही प्रक्रियेत जनाधार भक्कम असल्यानेच जैन यांनी गुरुवारी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवले. बाळासाहेबांचाही हजारेंना पूर्ण पाठिंबा नाहीअसे जैन यांना वाटते आहे. सहा वर्षापूर्वी अण्णा हजारे आणि सुरेशदादा जैन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. हजारे यांच्यामुळे मंत्रीपद सोडावे लागणारहे लक्षात येताच जैन यांनी हजारेंवरच पुराव्यानिशी हल्ला चढवला होता. हजारे आझाद मैदानावर उपोषणाला बसले असताना त्यांच्यासमोरच जैनही त्यांच्याविरुद्ध उपोषणाला बसले होते. मंत्रीच समाजसेवकाच्या विरोधात उपोषणाला बसल्याची तेव्हा देशभर चविष्ट चर्चाही झाली होती. जैन यांनी तेव्हा हजारेंना उघडेच पाडले होते. यामुळे न्या. सावंत आयोगाकडून हजारे यांच्या संस्थेची चौकशीही त्यांनी करवून घेतली. या संस्थेच्या लेखापरीक्षणात अनियमितता असल्याचा ठपका आयोगाने ठेवला होता. त्याआधीपासूनच जैन यांनी हजारेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा प्रकार सुरू केला.

जनलोकपाल विधेयकासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे अण्णांनी उपोषण सुरू केले आहे. खरे तर या उपोषणाशी थेट जैन यांचा संबंध नव्हता. यावेळेस हजारेंचे टार्गेट कुणी मंत्री नसून केंद्राचे धोरण होते. तरीही लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला अंतिम रूप देण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्रिगटाचे सदस्य असलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांना मंत्रिगटाचा राजीनामा द्यावा लागला. एकप्रकारे प्रश्नातून स्वत:ची सोडवणूक करवून घेण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. सुरेशदादांनी जेव्हा अण्णांवर शरसंधान केले, तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांचे चेहरे फुलले आणि त्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला. जैन यांनी एका मराठी वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे यांच्यावरही हल्ला चढवला. विधानसभेतील 288 आमदारांना भ्रष्टाचारी ठरवणा-या या संपादकाला सर्वात मोठा गुंड का म्हणू नये, असा सवाल त्यांनी केला तेव्हा सर्वपक्षीय आमदारांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. समाजसेवक असोत की पत्रकार कुणालाही शिंगावर घेताना आपण घाबरत नाही, असेच दादांनी दाखवून दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP