Monday, February 11, 2013

'ताईगिरी'ने केली आघाडीत बिघाडी!

महिलांनी पूर्वीच्या मराठी चित्रपटातील नटय़ांप्रमाणे सोज्वळ, विनम्र, रडूबाई राहावे, अशी अपेक्षा नाही. आज महिला बंडखोर, सक्षम, स्वाभिमानी बनल्या आहेत. त्याचबरोबर दुसर्‍यांचाही आदर केला पाहिजे. नेता बनू इच्छिणार्‍या महिलांवर तर जास्त जबाबदारी आहे; पण रेडीमेड नेत्यांना याचे भान राहत नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मिळालेले 50 टक्के आरक्षण, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मिळालेले बळ आणि शैक्षणिक प्रगतीमुळे महिलांची विविध क्षेत्रात सुरू असलेली घोडदौड यामुळे महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची क्षमता याचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला आहे. 

महिलांची बुद्धिमत्ता, त्यांची कामगिरी, त्यांची ताकद यावर चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केले जात आहेत. संसद आणि विधिमंडळातही महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांवरील अन्याय, अत्याचार, बलात्कार तसेच त्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक यावर मात करण्यासाठी सर्व बाजूंनी प्रबोधन आणि परिवर्तन करण्यावर जोर दिला जात आहे. अशावेळी महिलांमधून येणार्‍या नेतृत्वाकडे समाजाचे विशेष लक्ष आहे. स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरावर सुरू असलेले विविध उपक्रम तसेच महिला धोरण पाहता या पुढील काळात महिलांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावर वाढत जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी महिला नेतृत्व निर्माण करण्यासाठी महिलांना पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने प्रा. वर्षा गायकवाड यांना तरुण वयातच कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे, तर रजनीताई पाटील यांना राज्यसभेवर खासदारकी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना नेतेपदाचा मान दिला आहे. शिवसेनेच्या डॉ. निलम गोर्‍हे, भाजपाच्या शोभा फडणवीस, शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील या नेत्या म्हणूनच कार्यरत आहेत. या सर्वाच्या बरोबरीने महिला आघाडय़ा आणि युवा संघटनांमधून काम करण्याची संधी महिलांना मिळू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस स्थापन करून शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही राजकारणाचे धडे गिरवण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यांच्या नेत्या अर्थातच सुप्रिया सुळे आहेत; पण नेतृत्वाच्या सर्व निकषांवर तावून सुलाखून निघण्याआधीच त्यांच्या नेतेपदावर प्रश्नचिन्ह लागले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या वर्ष-दीड वर्षावर आलेल्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम करण्यावर भर देण्याऐवजी आघाडीत बिघाडी होईल, असे वर्तन सुप्रियाताईंसारख्या नेत्यांकडून घडणे योग्य ठरणार नाही. गेल्या शनिवारी पुण्यात महिला महोत्सवानिमित्त जे घडले त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये चांगलाच तणाव वाढला.

राजकारणात हेवेदावे, शह-काटशह, रुसवे-फुगवे अत्यंत आनंदाचे अथवा तणावाचे प्रसंग येत असतात. आनंदाच्या प्रसंगी हुरळून गेल्याचे आणि वाईट प्रसंगात खचून गेल्याचे प्रदर्शन करण्याऐवजी समतोल राखण्याचे कौशल्य नेत्याने आत्मसात केले पाहिजे. मनात कितीही खळबळ असली तरी राजकारणी चेहर्‍यावर काही दाखवत नाहीत. स्वत: शरद पवारांच्या मनात काय चाललेले असते याचा थांगपत्ता या पृथ्वीतलावर कोणालाही लागणार नाही, असे त्यांचे मुत्सद्दी नेतृत्व आहे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते; पण सुप्रियाताईंनी आपल्या पित्यापेक्षा भावाच्या म्हणजे अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून 'ताईगिरी' सुरू केली आहे. अजितदादा उर्मट आहेत, त्यांच्या आवाजात जरब आहे, ते फटकळ आहेत, रोकठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दादांची 'दादागिरी' हा वाक्प्रचार महाराष्ट्रात रुढ झाला आहे. पण 'दादागिरी' आणि 'ताईगिरी' यात फरक आहे. दादांच्या परखडपणात त्यांची कामाची तत्परता, काम मार्गी लावण्याची तळमळ आणि आणि जास्तीत जास्त कामे गतीने करण्याची जिद्द दिसून येते. अजितदादांनी मानपानाकडे कधी लक्ष दिलेले नाही. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी मंर्त्यांना, आमदारांना, अधिकार्‍यांना चार खडे बोल त्यांनी सुनावले तरी कोणाला त्याचे वाईट वाटत नाही. सामर्थ्यवान नेते असलेले काका मागे असताना त्यांनी आपल्या कामाने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ते परप्रकाशित राहिलेले नाहीत. ताईंचे नेतृत्व अद्याप सिद्ध व्हायचे आहे. मेळाव्याला आलेल्या मुलींवर आगपाखड करायची, दुसर्‍या पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या महिला नेत्यांना किंमत द्यायची नाही, त्यांचा अपमान करायचा, अशा वागण्याने नेतृत्व तयार होत नाही, यातून अपरिपक्व, अहंकारी आणि मिजासखोर या अवगुणांची चर्चा होते, लोकप्रियता लाभू शकत नाही.

पुणे येथे शुक्रवार-शनिवार असे दोन दिवस महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने महिला महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी बचत गटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई आणि काँग्रेसच्या खासदार रजनीताई यांच्या उपस्थितीत होणार होते. सुप्रियाताई येताच राष्ट्रवादीच्या महापौर वैशाली बनकर आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या मीनल सरोदे यांनी त्यांचे स्वागत केले. ताई तात्काळ उद्घाटन करण्यासाठी निघाल्या. राष्ट्रवादीच्या सर्व महिला ताईंच्या मागे निघून गेल्या. ताईंनी ताबडतोब फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर व्यासपीठावर जाऊन दीप प्रज्वलनासाठी गेल्या. महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा काँग्रेसच्या सुनंदा गडाळे यांनी 'रजनीताई आल्या आहेत, त्यांच्यासाठी थोडे थांबू या' अशी विनवणी केली; पण, सुप्रियाताईंना त्याचा राग आला आणि रागाच्या भरात मेणबत्ती बाजूला भिरकावरत ' तुमच्या ताईंच्याच हस्ते उद्घाटन करा' असे सांगून त्या दुसर्‍या रांगेत जाऊन बसल्या. रजनीताईंनी ही परिस्थिती समंजसपणे हाताळली. त्यांनी रागावलेल्या ताईंना समजावले. हाताला धरून व्यासपीठावर आणले आणि दीपप्रज्वलन केले. वास्तविक पाहता राष्ट्रवादीच्या महिलांनी रजनीताईंना डावलले तरीही त्यांनी प्रसंगाचे औचित्य राखले.

दुसर्‍या दिवशी पुनश्च असाच प्रकार घडला. काँग्रेसच्या महिला व बालविकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना समारोपाला बोलाविण्यात आले होते; पण मंर्त्यांचे स्वागत करण्यासाठीदेखील राष्ट्रवादीच्या महापौर वैशाली बनकर आल्या नाहीत. शरद पवारांचा कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसच्या एकमेव महिला मंत्री असलेल्या वर्षाताईंना डावलले. वर्षाताई कार्यक्रमातून बाहेर पडताच पाचव्या मिनिटाला बनकर तेथे हजर झाल्या. राजकीय हेव्यादाव्यातून राष्ट्रवादीच्या महापौरांनी निमंत्रण देऊनही आपल्या उपस्थितीची दखल घेतली नाही, हे समजले असूनही वर्षा गायकवाड यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. उलट अत्यंत खेळीमेळीने त्यांनी महिलांना आवाहन केले, 'महिलांनो भांडू नका' महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षा काँग्रेसच्या सुनंदा गडाळे यांना आपल्या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादी महिलांनी केलेला अपमान सहन झाला नाही, त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला. पुणे महानगरपालिकेत 78 महिला आणि 76 पुरुष सदस्य आहेत, शहकाटशहाच्या पक्षीय राजकारणाने महापालिकेत जसा शिरकाव केला आहे. तसा तो महापालिकेतील वेगवेगळय़ा समित्यांमध्येही झाला आहे. पुणे महापालिकेत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती असा पुणे पॅटर्न असताना राष्ट्रवादीने काँग्रेसची पार कोंडी करून टाकली होती. आतादेखील भाजपा-सेनेशी राष्ट्रवादीची अप्रत्यक्ष युती आहेच. त्यात मनसेचीही भर पडली आहे. टक्केवारीच्या राजकारणाचा हा परिपाक असल्याचे सर्रास बोलले जाते. राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे त्याचा अर्थ राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी आपणच श्रेष्ठ असल्याची समजूत करून 'ताईगिरी'चा झटका द्यायचा हे कितपत बरोबर आहे? महिलांनी पूर्वीच्या मराठी चित्रपटातील नटय़ांप्रमाणे सोज्वळ, विनम्र, रडूबाई राहावे, अशी अपेक्षा नाही. आज महिला बंडखोर, सक्षम, स्वाभिमानी बनल्या आहेत. त्याचबरोबर दुसर्‍यांचाही आदर केला पाहिजे. नेता बनू इच्छिणार्‍या महिलांवर तर जास्त जबाबदारी आहे; पण रेडीमेड नेत्यांना याचे भान राहत नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP