Monday, March 5, 2012

अफूची गोळी घ्या आणि बसा गुमान


अफूच्या शेतीकडे विमनस्कपणे पाहत बसण्याची वेळ गृहमंत्री आर.आर.आबांवर आली आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीने त्यांना जर विचारले, ‘आप गृहमंत्री होते हुये आपके जिल्हे मे इतनी बडी गैरकानूनी अफीम की खेती हुई कैसे?’ तर आबा क्षणाचाही विलंब न लावता आनंदाने निरागस हास्य करीत उत्तर देतील, ‘छोटे छोटे गावों मे ऐसी बडी बडी खेती होती हैं’. या आबांचे आता करायचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अनेकदा पडला.

शेतकरी, व्यापारी, पोलिस, तलाठी, कृषी अधिकारी, आणि राजकारणी अशा सर्वाना आरोपीच्या पिंज-यात उभी करणारी,सर्वसामान्य माणसांना अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकवणारी आणि  साधू-संतांना चिलीम गांजावर जगवणारी अफूची शेती सध्या भलतीच गाजत आहे. जसजशी ही शेती चच्रेत फुलू लागली आणि कारवाईच्या बडग्याने पिके वाकू लागली, तसतसे तिच्यात राजकीय रंग भरू लागले आहेत.
 
जोपर्यंत ही शेती गुमनाम होती तोपर्यंत शेतकरी, व्यापारी तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी आणि राजकारणी यांना बदनाम होण्याची भीती नव्हती. अफूच्या बोंडातून जशी खसखस निघत होती तशी या सर्वामध्ये हास्याची खसखस पिकत होती. खसखशीच्या हास्याची नशा चढत होती आणि अफूच्या बोंडापासून तयार झालेल्या चरस- गांजाच्या सेवनाने लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागत होती. पण निर्बंध असूनही बीड, सांगलीत अफूची शेती झाली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आणि मग राजकारण सुरू झाले. सांगली जिल्ह्याचे तीन ताकदवान मंत्री, काँग्रेसचे नेते वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री आर.आर.पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री व माजी गृहमंत्री जयंत पाटील हे राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री असून बेकायदेशीर अफूचे पीक डौलाने उभे असताना त्यांनी अफूची गोळी घेऊन गुमान गपगार बसणे कसे काय पसंत केले, हाही प्रश्न आहेच. पण हा प्रश्न उभा राहिल्यानंतर त्याचा साकल्याने सखोल विचार करतील ते राजकारणी कसले?लगेच राजकीय फटकेबाजी सुरू झाली.
 
सर्वात ज्येष्ठ आणि शिक्षणातील डॉक्टर असलेलेल्या पतंगरावांनी राजकीय कुरघोडीसाठी ही संधी तात्काळ घेतली. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आर.आर आबांवर त्यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत हल्ला चढवला. आबांच्या पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळल्याचे जाहीर वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या पतंगरावांकडे आलेले औटघटकेचे महसूलमंत्रीपद व सहकारमंत्री पद गेले आणि त्यांना वनखाते देऊन थेट जंगलातच पाठवून देण्यात आले. त्याची रुखरुख वाटत असली तरी जंगलात नंदवन फुलवण्याचा,अफू नव्हे; ध्यास घेऊन पतंगराव कामाला लागले. जंगलाची सर करून कंटाळले की थेट दिल्ली गाठून दहा जनपथला सोनियांच्या चरणी निष्ठा वाहून येतात. तिथून आले की एकदा तरी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतल्याशिवाय त्यांना राहावत नाहीत. नुकतेच पतंगराव दिल्लीला जाऊन आले. काँग्रेस निष्ठा दाखवण्यासाठी कोणाला गाठावे या विवंचनेत असताना त्यांना प्रत्यक्ष सांगलीतच अफूची हिरवीगार अवैध शेती थेट वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर दिसली आणि जणू काही पहिल्यांदाच बातमी समजल्याच्या थाटात त्यांनी आबांना टाग्रेट केले. सहकारावर पोसलेल्या आमच्या सांगलीत असले अवैध धंदे कधी नव्हते पण आबा पाटील गृहमंत्री झाल्यापासून त्यांच्या तासगावातून असले धंदे सर्वप्रथम सुरू झाले, असे सांगत बेदाण्याची द्राक्षे पिकवणारे तासगाव वाईनची द्राक्षे पिकवू लागले, पोलिसांनी हप्ते घेण्याचे थांबवले तर चांगले होईल, असा टोला पतंगरावांनी लगावला. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आबांवर कसा हल्ला चढवला, याचा दाखला देऊन आबांच्या अकार्यक्षमतेवर त्यांनी ठपका ठेवला. आबा मात्र नेहमीचा सूर लावून अवैध अफू शेतीबाबत पोलिस कारवाई सुरू असल्याचे सांगत राहिले. अफूच्या शेतीकडे विमनस्कपणे पाहत बसण्याची वेळ गृहमंत्री आबांवर आली आहे.

वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीने त्यांना जर विचारले, ‘आप गृहमंत्री होते हुये आपके जिल्हेमे इतनी बडी गैरकानूनी अफीम की खेती हुई कैसे?’ तर आबा क्षणाचाही विलबं न लावता आनंदाने निरागस हास्य करीत उत्तर देतील, ‘छोटे छोटे गावों मे ऐसी बडी बडी खेती होती हैं’. या आबांचे आता करायचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अनेकदा पडला. पण करणार काय? पतंगरावांनी जसे कायम दहा जनपथला निष्ठा वाहण्याचे काम सुरू ठेवले आहे, तसे आबांनी सहा जनपथला शरद पवारांच्या निवासस्थानी तहहयात निष्ठा वाहण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. त्यामुळे दादांचे काही चालेनासे झाले आहे.
 
पण आबांच्या दुर्दैवाने अफूचे पीक त्यांच्या सांगली जिल्ह्यातच फोफावले आणि त्यांच्या राजकारणातील विरोधकांना नशा चढली. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही, पोलिसांना शेतक-यांनी हप्ते दिले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रघुनाथदादांसह शेतकरी संघटनेचे शरद जोशी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत पोलिसांना कारवाईबद्दल दोष दिला आहे. शेतकरी खसखस पिकवतात, अफू नाही, असे सांगून शेतक-यांची पाठराखण केली आहे. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. अफू्च्या बोंडातील खसखस काढून बोंडापासून हेरॉईन, चरस, गांजा बनवला जातो. बोंडावर प्रक्रिया करून मॉíफन, नार्कोटिन, कोडीन, कोकेन,ब्राऊन शुगर हे अंमली पदार्थ तयार केले जातात. वैद्यकीयदृष्टय़ा उपयुक्त असलेल्या अल्काईड्ससाठी देखील अफूचा वापर केला जातो. ही रसायने वेदनाशामक असली तरी मादक पदार्थ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा वापर आणि व्यापार होत आहे. मुख्यत्वे अफगाणिस्तान पाकिस्तानात अफूची शेती होत असल्याने अंमली पदार्थाच्या काळ्या बाजाराचे जाळे येथूनच सर्वत्र पसरवण्यात आले आहे. पाकिस्तानची आयएसआय संघटनाही अंमली पदार्थाच्या पैशांवरच पोसली गेली आहे. त्यामुळे भारतीयांनी अफू शेतीच्या दुष्पपरिणामांचा अधिक विचार करण्याची गरज आहे. भारतात ब्रिटिशांनी अफू निर्मितीवर कायद्याने बंदी आणली होती.
 
सध्या भारतात केवळ तीन ठिकाणी सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सच्या देखरेखीखाली अफूची लागवड होत आहे. मध्य प्रदेशमधील नेमूच, उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूर आणि राजस्थानात चितोडगड येथे अफूची शेती केली जात आहे. महाराष्ट्रात होणारी शेती बेकायदेशीर आहे. परंतु महाराष्ट्रात धान्ये, द्राक्षे आणि उसापासून दारू तयार होते. मग अफू पिकवली तर बिघडते कुठे, असा युक्तिवाद करून अफू पिकवण्याला परवानगी द्या, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शेतकरी संघटनांनी केलेला हा युक्तिवाद निराधार असून शेतक-यांच्या हाती अफूसारखे विषारी हत्यार देणे समाजासाठी घातक आहे. अफूच्या पिकांना पर्याय म्हणून अनेक चांगली पिके घेता येऊ शकतात आणि त्यासाठी शेतक-यांना विशेष सोयी-सुविधा देता येऊ शकतात.
 
राजकारणापेक्षा मादकद्रव्यांचे परिणाम तसेच अंमली पदार्थाचा जगभर विळखा पडून अवैध धंद्यांची झालेली वाढ आणि त्यातून होणारी शस्त्रात्रे खरेदी या सर्वाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बीड आणि सांगलीची शेती उघडकीस आली. तशी इतर ठिकाणीदेखील होत असावी. सध्या कारवाई करून जाळलेली वीस टक्के असेल. पण चोरलेली 80 टक्के असू शकेल.
 
शेतकरी संघटनांचे नेते अफू शेतीला समर्थन देत असताना शेतक-यांचा ‘जाणता राजा’ आणि देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांची भूमिका काय आहे? त्यांनी वाईन उत्पादनाला जोरदार समर्थन देऊन वायनरीज् सुरू केल्या असल्या तरी अफू सहकारी संस्था स्थापन करण्यास त्यांच्याकडून मान्यता मिळणार नाही असे वाटतेकारण अफूच्या दुष्परिणामांची आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटची त्यांना चांगली कल्पना आहे. त्यामुळे अफू शेतीला रामराम ठोकलेला बरा.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP