Thursday, March 29, 2012

झोपी गेलेले जागे झाले

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आणि करवाढीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनीच करवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि विरोधकांना नंतर जाग आली, असा प्रकार घडला. 

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आणि करवाढीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनीच करवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि विरोधकांना नंतर जाग आली, असा प्रकार घडला. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढवण्यास सर्वप्रथम काँग्रेस पक्षानेच आक्षेप घेतला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळही नेले. मुख्यमंत्र्यांनीही फेरविचाराचे आश्वासन दिले. त्यानंतर इतर पक्षांना जाग आली

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप, मनसे गॅस दरवाढीबद्दल ओरड करत असताना शिवसेनेला मात्र गाढ झोप लागली होती. इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा नेहमीप्रमाणे भावनेच्या राजकारणावरच अधिक भर होता. गॅस सिलिंडरपेक्षा त्यांना गणपतीची चोरी जास्त महत्त्वाची होती. लोक म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा पण शिवसेनेचे उलटे आहे. आधी गणपती मग गॅस सिलिंडर याचा प्रत्यय आला खरा.

मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिवेआगरच्या गणपतीची चोरी आणि मुंबई महापालिकेचे प्रश्न यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. चर्चेनंतर सर्वाना बाहेर काढून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड गुफ्तगू केले. पण गॅस सिलिंडरचा मात्र त्यांना विसर पडला. सत्ताधाऱ्यांकडून कर कमी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर झोपी गेलेले शिवसेनेचे सदस्य तिस-या दिवशी जागे झाले आणि सभागृहात निषेधाचे फलक घेऊन हजर झाले. गॅसवरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सभागृहात करण्यास त्यांनी सुरुवात केली. शिवसेनेच्या काही सदस्यांनी अंगावर फलक फडकावत वाढीव कराचा निषेध नोंदवला. पण आधी सत्ताधाऱ्यांनीच गॅसवरील कराची मागणी रेटून धरल्याने शिवसेनेच्या निषेधाचा बार फुसकाच ठरला. सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी करून दाखवतोय, एवढाच दिखावा शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केला. काही मिनिटे निषेध करत हे सदस्य बाहेर पडले. मात्र या आंदोलनात फारसा जोर नव्हता.

मुळात अर्थसंकल्पात घरगुती गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना त्याची झळ पोहोचणार हे निश्चित होते. पण शिवसेनेला त्याची तीव्रता जाणवलीच नाही. गॅसच्या विषयावर सत्ताधारी काँग्रेस आक्रमक झाल्याने शिवसेनेला सर्वसामान्यांचा कळवळा आला आणि सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेनेचे काही सदस्य सभागृहात निषेधाचे फलक अंगावर झळकवत हजर झाले. मात्र, त्यांच्या आंदोलनाचा जोर कमीच होता. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही आणि इतर विरोधी सदस्यांकडून समर्थनही मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना सदस्यांचा उत्साहच मावळला. आपले आंदोलन फुसका बार ठरला असल्याचे ध्यानी येताच या सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर जाण्याचा रस्ता धरला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP