शिमगा
राज्याचा कारभार कसा चालतो, आपले आमदार कसे प्रश्न मांडतात, मंत्री ते कसे सोडवतात हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विद्यार्थी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मंगळवारी कामकाजाचा दर्जा इतका घसरला होता की, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रंगलेला शिवराळ शिमगा पाहण्याचे दुर्दैव गॅलरीत बसलेल्या शाळकरी मुलांच्या वाटय़ाला आले.
विधिमंडळचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र साजरे करतो आहे. उच्च प्रथा आणि परंपरांचे दाखले देत चालणा-या विधिमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होताना कामकाजाचा दर्जा वाढावा, उच्च पातळीवर चर्चा व्हावी, विविध आयुधांच्या माध्यमांतून आमदारांनी अभ्यासपूर्ण विषय मांडावेत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी आणि मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना उत्तरे देत लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. मात्र मंगळवारी कामकाजाचा दर्जा इतका घसरला होता की, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रंगलेला शिवराळ शिमगा पाहण्याचे दुर्दैव गॅलरीत बसलेल्या शाळकरी मुलांच्या वाटय़ाला आले. राज्याचा कारभार कसा चालतो, आपले आमदार कसे प्रश्न मांडतात, मंत्री ते कसे सोडवतात हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विद्यार्थी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गॅलरीत आलेल्यांना सभागृहातील भांडणे पहावी लागली. विधानसभेत शिवसेना आमदार विनोद घोसाळकर व रवींद्र वायकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी एकमेकांना गलिच्छ शिव्यांची लाखोली वाहिली. तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार राम पंडागळे आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य जैनुद्दिन जव्हेरी यांच्यात राडा झाला. अखेर सभापतींनी दोघांनाही निलंबित केले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच सभागृहातील वातावरण तणावाचे झाले. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांना दृष्टी गमवावी लागली. याबाबतचा प्रश्न असमाधानकारक उत्तरामुळे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी राखून ठेवला होता. तो पुन्हा चर्चेला आला तरीही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्याकडून ठोस उत्तर येईना तेव्हा अध्यक्षांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले. त्याच वेळी शिवसेना, भाजप आणि मनसेचे सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
सभागृह तहकूब असताना शिवसेना आमदार विनोद घोसाळकर आपल्या जागेवर बसून बडबडत होते. बोलता बोलता त्यांनी असल्या सरकारचे डोळेच काढले पाहिजेत, असे वक्तव्य केले. चहूबाजूने होणारा विरोधकांचा हल्ला आणि त्यात अध्यक्षांनी दिलेले निर्देश यामुळे आधीच बिथरलेले डॉ. गावीत यांचा तोल सुटला आणि त्यांनी सरळ आईवरून शिवी दिली. मंत्र्यांची शिवी ऐकताच घोसाळकर त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर सदस्यांनी दोघांनाही शांत केले.
इकडे विधानसभेत असा राडा झालेला असताना विधान परिषदेतील परिस्थिती अधिकच चिघळली. राष्ट्रवादीचे राम पंडागळे यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या विषयावर बोलताना त्यांची गाडी नेहमीप्रमाणे घसरली. गिरणी कामगांचा संप चिघळला तेव्हा कामगारांची उपासमार होत होती. त्याच दरम्यान चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चनला अपघात झाला होता. अमिताभ बच्चनला पहायला त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपाशी मरणाऱ्या गिरणी कामगारांसाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे गिरणी कामगारांच्या कुटुंबांतील अनेक महिलांनी आत्महत्या केली, काहींनी कुटुंब चालवण्यासाठी देहविक्रय केला, असे उद्गार पंडागळे यांनी काढताच जैनुद्दीन जव्हेरी संतप्त झाले आणि त्यांनी पंडागळे यांना शिवीगाळ केली. त्याला जोडय़ाने मारा, असे म्हणत ते पंडागळेंच्या दिशेने धावून गेले. सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. एकंदरीत दिवस शिवीगाळीचाच ठरला आणि सभागृहातील कामकाजाच्या दर्जाने नीचांक गाठल्याची प्रचितीही महाराष्ट्राला आली.
0 comments:
Post a Comment