Monday, March 30, 2009

'हीरो'ला झीरो करण्याचा डाव

अडवाणींनी मनाचा मोठेपणा सोडाच, अत्यंत कोतेपणाचे प्रदर्शन घडवले आहे. मुडेंसारख्या हीरोला झीरो करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.


भारतीय जनता पक्षाचे इंडिया शायनिंग आणि फिल गुडचे नारे मागील लोकसभा निवडणुकीत चालू शकले नाहीत. सत्ता नसल्यामुळे पक्षात बेदिली माजू लागली. त्यात पक्षाचे नेतृत्व हेकेखोर, संकुचित मनोवृत्तीचे असेल तर अशा खुज्या नेतृत्वाचा त्या व्यक्तीला स्वत:ला फायदा होण्याऐजी नुकसानच अधिक होते आणि त्या पक्षालाही उतरती कळा लागते. असा अनुभव सध्या भाजप घेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चरणी आपली सेवा रुजू करून पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणा-या लालकृष्ण अडवाणींच्या भाजपमधील उरल्यासुरल्या लोकप्रियतेची चांगलीच घसरण सुरू झाली आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव निश्चित करण्यास पक्षांतर्गत प्रचंड विरोध होता, हे आता लपून राहिलेले नाही. नागपूरच्या रेशमी बागेत स्वत:बद्दलचे गुडविल निर्माण करण्यात त्यांनी जेवढा वेळ खर्ची घातला, तेवढा वेळ जर पक्ष सावरण्यात घातला असता, तर पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव लवकर पुढे आले असते. ज्या नेत्यांनी भाजपला बहुजन चेहरा दिला, त्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा अडवाणींचा डाव त्यांच्याच अंगलट येण्याची अधिक शक्यता दिसू लागली आहे. पक्ष मतभेदाने पोखरला असून मित्रपक्षही बाजूला होऊ लागले आहेत. पंतप्रधान होणार कसे?


अडवाणींनी मनाचा मोठेपणा आणि उदारपणा सोडाच, पण अत्यंत कोतेपणाचे प्रदर्शन घडवले आहे. मुडेंसारख्या हीरोला झीरो करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. प्रमोद महाजन यांच्याबद्दल मनात जो आकस आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे खच्चीकरण केले आणि रेखा महाजन व पूनम महाजन यांना राजकारणात संधी देण्याचे टाळले. ह्यात नसलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचे नसते, अशी आपली संस्कृती सांगते असे नव्हे तर माणुसकीच्या दृष्टिकोनातूनही हे योग्य नाही. मेलेल्या माणसाबद्दल असलेल्या आकसातून त्यांच्या कुटुंबीयांना डावलणे हे क्षुद्र मनोवृत्तीचे द्योतक आहे. प्रमोद महाजनांनी भाजपसाठी काय केले, हे देशाला माहीत आहे. महाजन-मुंडे या दोघांनी भाजपच्या वाढीसाठी केलेली मेहनत लोक जाणून आहेत. महाजनांनी देशपातळीवर काम करायचे आणि मुंडेंनी महाराष्ट्रात, अशी वाटणीच त्यांनी करून घेतली होती. महाजन यांच्या निधनानंतर त्यांची जागा मुंडे घेतील, असे अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवले जात होते; पण झाले भलतेच. मुंडेंमधील नेतृत्वगुणांना अधिक व्यापक वाव मिळण्याऐवजी त्यांचे पाय मागे खेचण्याचाच प्रकार सुरू झाला.  


महाजन गेल्यानंतर त्यांच्या पत्नी रेखा महाजन यांना राज्यसभेवर पाठवावे, ही मुंडेंची मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यावेळी पुनम महाजनला तिकीट नाकारण्यात आले. पुनमला तिकीट देऊन किरीट सोमय्यांना राज्यसभेवर पाठवता आले असते. संसदीय मंडळातील ११ पैकी सदस्यांचा पाठिंबा असतानाही अडवाणींनी स्वत:च्या अधिकारात तिकीट नाकारले. मुंडेंना विश्वासात न घेताच मुंबई भाजप अध्यक्षांसहित पदाधिका-यांच्या नियुक्त्या होऊ लागल्या. मुंडेंच्या शिफारशी डावलण्याचा सपाटा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी चालवला. तेव्हा उद्विग्न झालेल्या मुंडेंनी सर्व पदांचे राजीनामे देऊन टाकले. पक्षात लोकशाही राहिली नाही, अन्याय होत आहे, असा आरोपच मुंडेंनी केला होता. भाजपमध्ये लोकशाही होती, हा मुंडेंचा भ्रम असावा. कट्टरपंथीयांच्या पक्षात लोकशाही नसते. शिवसेनेत जशी एकाधिकारशाही आहे, तशीच भाजपमध्येदेखील आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या इशा-यावर चालत होती. आता उद्धवच्या इशाऱ्यावर चालवली जात आहे. तसा भाजप नेहमीच संघाच्या इशाऱ्यावर चालत आला आहे. बाळासाहेब आपली भूमिका परखडपणे आणि उघडपणे बोलून दाखवतात. हम करे सो कायदा असा त्यांचा आविर्भाव असतो. संघाचे तसे नाही. संघाच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा अनेक संघटना असून, त्यांच्यामार्फत संघाचे काम चालत आहे. दहा संघटनावाले दहा तोंडांनी बोलून सामाजिक, सांस्कृतिक वातावरण खराब करण्याचे काम करीत आहेत. भावनिक मुद्दयांवर लोकांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.


मुंडे स्वत: हाडाचे कार्यकर्ते आहेत. संघ-भाजपच्या विघातक प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून विधायक कामावर लक्ष केंद्रित करणारे नेते आहेत. ते भाजपमधले काँग्रेसी आहेत, असे त्यांच्याबद्दल विनोदाने बोलले जाते; पण ते भाजपचे निष्ठावंत सेवक आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते दुस-या पक्षात चालले जातील, याची सुतराम शक्यता दिसत नाही. महाजनांच्या दोस्तीमुळे ते भाजपमध्ये गेले आणि संकुचित जातीयवादी पक्ष असूनही तो वाढवण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. स्वत: ओबीसी वंजारी समाजाचे असून इतर ओबीसींना तर त्यांनी जवळ केलेच; पण अनुसूचित जाती-जमाती, दलित मुस्लिमांनाही भाजपजवळ आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वरण-भाताबरोबर तोंडी लावायला लोणचे ठेवतात, तसे संघ-भाजपने उत्तमराव पाटील, महादेव शिवणकर, पांडुरंग फुंडकर, अण्णा डांगे, सूर्यभान वहाडणे यांच्यासारखे नेते जवळ केले होते; पण त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा होत्या. मुंडे लोकनेते असल्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा संचार आहे. त्यांनी पक्षासाठी अथक मेहनत केली. विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी महाराष्ट्रात जनजागरणाचे मोठे काम केले. शरद पवारांसारख्या ताकदवान नेत्याला आणि महाराष्ट्राच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी आव्हान दिले. युतीची सत्ता आणण्यात बाळासाहेब ठाकरेंचा जसा मोठा हात होता त्यात मुंडेचाही वाटा होता.


मुंडेंमध्ये संघटनकौशल्य, संसदपटुत्व, उत्कृष्ट वक्तृत्व आणि कर्तृत्व असे नेतृत्वासाठी आवश्यक असलेले सर्व गुण असूनही राष्ट्रीय राजकारणात त्यांना महत्त्व दिले गेले नाही आणि राज्यात शिवसेनेशी युती असल्यामुळे त्यांना नेहमीच दुय्यम भूमिकेत राहावे लागले आहे. खरे तर युतीच्या राजकारणात मुंडेंची आधीपासूनच कोंडी झाली आहे; पण जेव्हा जेव्हा मोठय़ा पदावर जाण्याची संधी मिळाली, त्या संधीचा त्यांनी विधायक कामांसाठी व पक्षवाढीसाठी उपयोग केला. पक्षाला बहुजन चेहरा देऊन पक्षवाढीसाठी अथक मेहनत करणा-या नेत्याचेच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जेव्हा अडवाणींनी सुरू केला, तेव्हा अडवाणींनाच लक्ष्य करून मुंडेंनी बंडाचा झेंडा उभारला. पण भाजपमध्ये नेतृत्वगुणांचे चीज होत नाही. आदर राखला जात नाही. भाजपअंतर्गत तसेच शिवसेनेच्या राजकारणाचा सतत सामना करावा लागत असतानाही त्यांनी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था उभारल्या. सहकारी आणि खाजगी साखर कारखाने उभारले. ते चांगले चालवून दाखवले. पण महाजनांबद्दल मनात किंतु असल्यामुळे मुंडेंना त्रास द्यायचा, ही राजकारणातील पाताळयंत्रीपणाची हद्द म्हणावी लागेल. खरे तर अशा कर्तृत्ववान नेत्याला पवारांच्या रांगेत मराठी पंतप्रधान म्हणून संघाने आणि भाजपने पुढे करायला हवे होते; पण वेळ आलीच तर पवारांच्या ताटाखालचे मांजर होण्याची तयारी ठेवणारे भाजपवाले मुंडेंना हा बहुमान कसा देतील? पण मुंडे जनसामान्यांचे नेतृत्व आहे. त्यांचे पक्षात खच्चीकरण झाले म्हणून लोकांमध्ये होणार नाही. नेतृत्वाची दुसरी-तिसरी फळी निर्माण करण्याकरिता ते महाराष्ट्रभर फिरत राहतील आणि अडवाणींचा डाव फसवा ठरेल. अडवाणी जातील, पण मुंडे राहतील. 

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP