Monday, October 19, 2015

अब की बार फिर डान्स बार!

राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होऊन छमछमचा आवाज सर्वत्र निनादणार आहे; पण संपूर्ण महाराष्ट्राने याचे स्वागत केले आहे का? तसे दिसत नाही. सोशल मीडियावर मात्र याचे भरभरून पडसाद उमटले असून ‘अब की बार फिर डान्स बार’, ‘अब की बार लेडीज बार’ अशा पोस्ट सर्वत्र फिरत होत्या़ याबाबत नक्कीच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत़ डान्स बार बंद करून तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून रोखावे, असे एक मत तर डान्स बारमधील बारबाला व इतर कामगारांचा रोजगार वाचवावा, हा दुसरा मतप्रवाह आहे़ यावर सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारच्या बाजूने कौल दिला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मात्र वाढली आहे़ याचे कारण काँग्रेस­राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या डान्स बार बंदीला विरोधी पक्षात असताना भाजपा­शिवसेना युतीनेही समर्थन दिले होते़आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरविचार करून तोडगा काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे़ सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदीला स्थगिती दिली आहे़ त्यामुळे डान्स बार बंदी करणार कशी, हा यक्षप्रश्न फडणवीसांसमोर उभा असणार याबाबत शंका नाही़ दिवंगत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आऱआऱ आबा पाटील यांनी २००५ साली विधिमंडळात डान्स बार बंदीची घोषणा केली होती़; परंतु तब्बल १५ वर्षे बंदी कायम ठेवण्यासाठी सरकार न्यायालयात धाव घेत असे़ देशातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराचा अधिकार असून त्यांची रोजीरोटी बंद करता येणार नाही, असे कायदेशीर मत न्यायालयाने मांडले असून अश्लील चाळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला दिला आहे़ तथापि महाराष्ट्राचे व्यापक सामाजिक हित लक्षात घेऊन सरकार बंदीच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे दिसते़ तसे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत़
आऱआऱ पाटील यांनी बंदीची घोषणा केल्यापासून त्यांच्या लोकप्रियतेत चांगलीच भर पडली होती़ त्यांना देशातच नव्हे विदेशातही भरपूर प्रसिद्धी मिळाली होती़ उपमुख्यमंत्री पदासह गृहखातेही त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्यावर कोणतीही टीका होता कामा नये, यासाठी ते सदैव दक्ष असत़ तरीदेखील भाजपाने डान्सबार बंदी नाहीच, असा आरोप करत त्यांना कायम आरोपीच्या पिंजºयात उभे केले होते़ त्या वेळी भाजपा आमदारांनी डान्स बारवर वॉच ठेवण्याची भूमिका व्यवस्थित पार पाडली होती़ विशेषत: विधानसभेत त्या वेळचे भाजपाचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले विद्यमान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अधिक लक्ष घातले होते़  विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात डान्स बारसंदर्भात प्रश्न उपस्थित करून आबांवर हल्लाबोल केला जात होता़ एका अधिवेशनात तर फडणवीस यांनी मुंबईत डान्स बार सुरू असल्याचा पुरावा म्हणून एक सीडीच सभागृहात सादर केली होती़ डान्स बार बंदीचा दावा करणाºया आबांवर आरोप करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते़ विधान परिषदेत विनोद तावडे यांनीही डान्स बार चालू असल्याचे पुरावे बारच्या नावांसहित दिले होते़ फडणवीस यांनी तर डान्स बारमध्ये पोलीस अधिकाºयांची भागीदारी असल्याचा सनसनाटी आरोप केला होता़ आता आबांच्या जागी हेच फडणवीस आले आहेत. ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनले असल्याने त्यांची खरी परीक्षेची वेळ आली आहे़ आबांनी एकदा घेतलेला बंदीचा निर्णय अमलात आणण्याकरीता मुंबई पोलीस(सुधारणा) कायद्यामध्ये दुरुस्ती करून डान्स बार बंदीचा कायदा लागू केला़; परंतु हा कायदाच घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे जेमतेम वर्षभरातच सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागले़ मात्र, २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवून बंदीवरील स्थगिती उठवली़ २०१४ मध्ये पुन:श्च डान्स बार असोसिएशन आणि बारबाला संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती़ पंचतारांकित हॉटेलांमध्ये डान्स बारवर बंदी नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते़ त्यावर आघाडी सरकारने कायद्यामध्ये पुन:श्च सुधारणा करून पंचतारांकित हॉटेलातील डान्स बारवरही बंदी घातली होती़ सरकारने प्रतिष्ठेचा केलेला हा प्रश्न न्यायालयाने सतत डावलला असून अखेर बंदीला स्थगिती दिली आहे़
डान्स बारमध्ये काम करणाºया बारबाला या उपेक्षित समाजघटकांतील असल्यामुळे आपली रोजीरोटी मिळवण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेता कामा नये, असा मानवतावादी दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे़ बारबालांची संख्या किती लाखांत आहे, हा प्रश्न नाही़ काही हजार बारबाला असल्या तरी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांना सोडवायलाच हवा़ सर्वच बारबाला लाखो रुपये कमावणाºया नाहीत, झोपडपट्टीत राहून कुटुंबाची जबाबदारी घेणाºया आहेत़ केवळ बारबालाच नव्हे तर बारमध्ये काम करणारे वेटर, बारबालांना घेऊन जाणारे आॅटोरिक्षावाले, पान­विडीवाले असे अनेक जण डान्स बारवर अवलंबून आहेत़ या सर्वांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आघाडी सरकारने घेतलेली नव्हती़ घोषणा मात्र केल्या होत्या़ उलट त्याच सरकारच्या काळात बिल्डर कंत्राटदार, भ्रष्ट नोकरशाह, प्रस्थापित राजकारणी, अवैध धंदेवाले यांची अभद्र युती झाल्यामुळेच डान्स बार भरभराटीला आले होते़ डान्स बारमध्येच कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यात मोठमोठी डील्स होत असत़ कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असत़ या सर्वांना छुपा पाठिंबा सत्ताधाºयांकडून मिळत असल्यामुळे निर्विघ्नपणे हे डान्स बार सुमारे २० वर्षे चालू राहिले़; परंतु साखर कारखानदारांची तरुण मुले खिशात खुळखुळणारा पैसा बारबालांवर उधळू लागले आणि त्यांचे पाहून मध्यमवर्गातील मुलेदेखील या व्यसनाधीनतेकडे आकर्षित होऊ लागली़ घरातून दागदागिने व पैसे घेऊन बारमध्ये उडवू लागली़ पैसे दिले नाही तर आईवडिलांचे खून करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली़ २००५ पर्यंत या डान्स बार संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता़ यातून असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते़ सामाजिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम करणारे हे प्रकार थांबलेच पाहिजे, अशी ओरड सुरू झाली़ त्यासंबंधीचा एक प्रश्न विधिमंडळात उपस्थित झाला असता संवेदनशील असणाºया आबांनी तत्काळ डान्स बार बंदीची घोषणा करून टाकली़ त्यासंबंधीचा कायदा काय आहे, त्याचे परिणाम काय होतील तसेच राजकारण्यांच्या हितसंबंधाला कितपत बाधा येईल, याचा सारासार विचार न करता आबांनी बंदी घोषित केली होती़ महाराष्ट्रातील तमाम जनतेने या घोषणेचे स्वागत करताना आबांचे भरभरून कौतुक केले़ त्यांच्या लोकप्रियतेमध्ये हा एक मानाचा शिरपेच म्हणावा लागेल़

ही डान्स बार संस्कृती १९९०पासून सुरू झाली़ बनावट मुद्रांक तेलगी प्रकरण डान्स बारमध्ये करोडो रुपये उधळल्यामुळे उघडकीस आले़ डान्स बारमधील नर्तिका या बहुतांश परप्रांतीय व परदेशातील असायच्या़ मुबलक पैसा खुणावत असल्यामुळे बांगलादेशी, नेपाळ, भुतान, श्रीलंका, पाकिस्तान या गरीब देशांतील सुंदर व तरुण मुली या व्यवसायात आल्या़ इतकेच नव्हे तर इंग्लंड, अमेरिका, रशिया या देशांतील मुली अधिक पैसा मिळतो म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील डान्स बारमध्ये नाचू लागल्या़ या डान्स बारमुळे काही नर्तिका जशा करोडपती झाल्या तसे डान्स बार मालक अरबोपती झाले़ डान्स बारमध्ये तुफान काळ्या पैशाची चलती असल्यामुळे अनेक राजकारणी, नोकरशाह, गुंड­पुंड तसेच काही मोठे पोलीस अधिकारी या धंद्यात उतरले़ मोठमोठी डील्स या ठिकाणी होत असल्याने अनेक करोडपती व्यावसायिकही येथे येऊ लागले़ एवढी या डान्स बारची महती होती़ त्यामुळेच १९९० सालापासून सुरू असलेल्या धांगडधिंग्याने २००५ पर्यंत उग्र रूप धारण केले़

जाता जाता़़़
‘नाईटलाईफ’ची चलती
 शिवसेनेचे तरुण नेतृत्व उदयास आल्यानंतर त्यांनी तरुणांच्या भावनेला हात घालत ‘नाईटलाईफ’चा जोरदार पुरस्कार केला़ युवा पिढी संमोहित करण्याकरिता टाकलेले हे पाऊल होते़ सत्ताधारी शिवसेनेने ‘नाईटलाईफ’ला आधीच समर्थन दिले असल्यामुळे सर्वो
च्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवसेनेत ‘खुशी’ तर भाजपामध्ये ‘गम’ अशी परिस्थिती उद्भवली आहे़ भाजपा-शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या कलगीतुºयामध्ये आणखी एक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ आदित्य ठाकरे यांनी पब, डिस्को, डान्सबार या नाईटलाईफमुळे आर्थिक सुबत्ता येऊन महाराष्ट्राचा विकास होईल, अशी मांडणी केली़ त्यात न्यायालयाच्या निर्णयाची भर पडली असून संस्कृतीच्या बाता मारणारेहा प्रश्न कसा हाताळणार, हे लवकरच दिसून येईल़Read more...

Tuesday, October 13, 2015

हंगामा है क्यूँ बरपा...


जगप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आणि संयोजकांनी मुंबईतील त्यांचा कार्यक्रम रद्द करून टाकला़ शिवसेनेने एकप्रकारे पाकिस्तानबरोबर अघोषित युद्धच जणू पुकारले आहे! युद्धाची एवढीच खुमखुमी असेल तर सीमेवर जावे; पण कलाकारांना विरोध करण्यामध्ये कसले आले आहे शौर्य? पण कायम धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्षांनी धार्मिक भावनांचा उद्रेक करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे़ भाजपा असो की शिवसेना अथवा एमआयएमसारखा पक्ष असो हिंदू­मुस्लिमांमध्ये तेढ वाढवल्याशिवाय त्यांना राजकारण करताच येत नाही़ सत्ता मिळाल्यानंतर राज्यघटनेचे पालन करणे बंधनकारक असते़ त्यामुळेच पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे़अशा वेळी केवळ आपण एकटेच राष्ट्रप्रेमी असल्याचे भासवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न हास्यास्पद आहे़ आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरणानुसार मार्ग काढायचा की लोकांच्या भावना भडकवून कलाकारांच्या कार्यक्रमालाही राजकारणाचे स्वरूप द्यायचे? शिवसेनेची ही प्रवृत्ती वेळोवेळी प्रकट झाली असून पाकिस्तान क्रिकेटपटूंना विरोध करताना खेळपट्टीच उखडून त्यावर डांबर फासण्याचे कृत्य त्यांनीच केले होते़ एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध करायचा, दुसरीकडे बाळासाहेबांनी जावेद मियाँदादशी दोस्ती करायची आणि आदित्य ठाकरेंनी राहत फतेहअली खानच्या कार्यक्रमात हजेरी लावायची असा विरोधाभासही पहावयास मिळाला आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील केंद्र सरकारच्या भूमिकेला अनुसरून कार्यक्रमाला समर्थन दिले़ गुलाम अलींच्या संरक्षणात तसूभरही त्रुटी राहणार नाही, अशी हमीदेखील दिली़; पण शिवसेनेच्या विरोधाला तोंड देण्याऐवजी संयोजकांनी कार्यक्रमच रद्द करून टाकला आणि गझलप्रेमी रसिकजन नाराज झाले़  गुलाम अलींच्या गझलांची ही अविट गोडी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आतुर झालेले कान आणि मन तृप्त होतील, याची ते प्रतीक्षा करत होते़ गुलाम अली महाराष्ट्रात येणार, हे समजताच त्यांच्या एकापेक्षा एक सरस गझला रसिकजन गुणगुणू लागले़

‘दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताजा हवा चली है अभी’
‘चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है ’
‘कल चौदहवी की रात थी
शब भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है
कुछ ने कहा चेहरा तेरा’
असे गझलमय वातावरण निर्माण होत असताना शिवसेनेमुळे हा कार्यक्रमच रद्द होतो
‘हंगामा है क्यूँ बरपा
थोडी सी जो पी ली है
डाका तो नही डाला
चोरी तो नही की है’
असे म्हणण्याची वेळ दस्तुरखुद्द गुलाम अलींवर आली आहे़ हा हंगामा कशासाठी, थोडी गझलची नशा द्यायची आहे, दरोडा घालायचा नाही किंवा चोरी करायची नाही अशीच रसिकजनांची भावना असणार आहे़
शिवसेनेचा विरोध असलेल्या कार्यक्रमाला समर्थन देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना­भाजपा युतीमधील संबंध अधिक दुरावत चालले असल्याचे दाखवून दिले आहे़ याच वेळी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्या आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित केले होते़ हा कार्यक्रमदेखील उधळून लावण्याची धमकी शिवसेनेने दिली़ मात्र, कुलकर्णी यांनी शिवसेनेवर टीका करताना विरोध करावा; परंतु तो कायद्याच्या कक्षेत असावा. कार्यक्रम होऊच देणार नाही, हा पवित्रा अनाकलनीय आहे असे स्पष्टपणे सांगितले़ कार्यक्रम करणे हा आमचा हक्क असून आम्हाला ते स्वातंत्र्य आहे व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडेल, असाही गर्भित इशारा त्यांनी शिवसेनेला दिला़ पाकिस्तानी मान्यवर आणि कलाकार यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका पाहता गुलाम अली नक्कीच म्हणत असतील,
‘कैसी चली अब ये हवा तेरे शहर मे
बंदे भी हो गये है खूदा तेरे शहर मे’
पण राष्ट्रप्रेमाचा उमाळा आलेल्या शिवसेनेला हे सांगणार कोण?
आजदेखील महाराष्ट्रात अनेक पाकिस्तानी कलाकार वास्तव्यास आहेत़ सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात कव्वाली गाणारा अदनान सामी, नुसरत फतेहअली खान यांचा पुतण्या राहत फतेहअली खान, ‘हीना’ चित्रपटाची नायिका झेबा बख्तियार, अभिनेत्री वीणा मलिक, मीरा असे अनेक पाकिस्तानी कलाकार येथे बॉलीवूड आणि चित्रवाहिन्यांमध्ये कामे करत आहेत़ इतकेच नव्हे तर सूफी संगीताची उपासना करणारे, संगीतामध्ये मोठे योगदान देणारे पाकिस्तानी यात्रेकरू तसेच कव्वाली गायक भारतामध्ये दर्गे आणि मदरशांमध्ये आपली कला सादर करत आहेत़ त्या सर्वांना येथून हाकलून द्यावे लागेल. हे अभियान शिवसेना केव्हा हाती घेते, हेच आता पाहायचे़
महाराष्ट्रात सध्या मराठी गझल अत्यंत लोकप्रिय होत चालली आहे़ गझल ही सूफीतील कलाप्रकार असून मराठीत या गझलेचे अनुकरण करण्यात आले आहे़ सुरेश भटांनी प्रथम ही गझल परंपरा आपल्या येथे निर्माण केली़ यापूर्वी मराठीत कविता, पदे, गीते अशाच रचना होत्या़ औरंगाबादचे सुप्रसिद्ध गझलकार बशर नवाझ या प्रतिभावंत गझलकारांनी तयार केलेल्या गझला गुलाम अली, तलत अझीज यांच्यासारख्या नामवंत गायकांनी गायल्या आहेत़ संतांचे बोधप्रद कीर्तन, अभंगाप्रमाणे रचना असलेली उर्दू गझल आपल्या देशात इतकी लोकप्रिय झाली की, सुरेश भटांपासून प्रेरणा घेऊन अनेक गझलकार येथे तयार झाले़ इलाही जमादार, सतीश दराडे, सुधीर मुळीक, ममता सपकाळ, सदानंद बेंद्रे, अमित वाघ, प्रकाश घोडके आदी अनेक गझलकारांनी मराठी गझल आपल्या प्रतिभेने समृद्ध केली आहे़ इलाही जमादारसारख्या गझलकारांच्या गझल भीमराव पांचाळेंसारख्या समर्थ गायकांनी नावारूपाला आणल्या़ गझल केवळ मनोरंजनासाठी नसून वीरा राठोडसारख्या गझलकाराने दलितांचे दु:ख गझलेच्या चार ओळींमधून मांडले़ त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला़ विविध कलांचे अदानप्रदान होत त्यांना वैश्विक रूप मिळाले असल्याचे देशविदेशातील कलाप्रकारांनी सिद्ध केले आहे़ गझलकार मेहदी हसन यांनी कलाकारांना धर्म नसतो अशा प्रकारचे विधान केल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी आकाशवाणी व दूरदर्शनने बंदी घातली होती़ तशीच बंदी आपल्या लोकशाही देशात असावी का? दहशतवादाला आपल्या येथील जनतेचा जसा विरोध आहे तसा तेथील जनतेचाही विरोध आहे़ दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानबरोबर व्यापार व अन्य क्षेत्रांशी असलेली आपली देवाणघेवाण सर्वांना चालू शकते़  मग त्यांच्या गझल आणि क्रिकेटलाच विरोध का? त्यांच्या धर्मालाही कडवा विरोध दाखवायचा आणि आपलाच धर्म आणि संस्कृती श्रेष्ठ असल्याचा उद्घोष करायचा़ हिंदू धर्म हा सहिष्णू असल्याच्या बाता मारायच्या आणि असहिष्णुतेचे दर्शन घडवायचे हे कसे?

विकृत मानसिकतेचा बळी
पुण्यामध्ये गेल्या शुक्रवारी एका ६० वर्षांच्या इसमाने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिचे शिर कुºहाडीने धडावेगळे केले, ते शिर हातात घेऊन त्याची रस्त्यावर धिंड काढली़ एवढी क्रौर्याची परिसीमा गाठली असतानाही त्याला हे क्रूर कृत्य केल्याची जराही भीती वाटली नाही़ विकृत पुरुषी मानसिकता कोणत्या थराला पोहोंचली आहे, हेच यावरून दिसून येते़ महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत तरी त्याची जरब आजही पुरुष वर्गाला बसलेली नाही, हे पुण्यातील घटनेने सिद्ध झाले आहे़ एका मॉडेलवर अ‍ॅसिड हल्ला केलेल्या सहाय्यक दिग्दर्शकाला नुकतीच दोन वर्षांची शिक्षा झाली आहे़ या मॉडेल प्रेयसीने त्याला नकार दिला म्हणून तिला कोणत्याही पुरुषाने स्वीकारू नये, यासाठी तिच्या चेहºयावर अ‍ॅसिड टाकून  चेहरा विद्रुप केला़ पुण्यात पत्नीचे शीर धडावेगळे करणारा अशिक्षित तर मॉडेलचा चेहरा अ‍ॅसिडने विद्रुप करणारा दिग्दर्शक उच्चवर्णीय सुशिक्षित आहे़ त्यामुळे पुरुष कोणत्याही वर्गाचा, धर्माचा, जातीचा असो त्याची मानसिकता ही स्त्रियांच्याबाबत विकृत अशीच असून स्त्री ही केवळ भोग्य वस्तू आहे आणि तिने पुरुषाच्या दास्यातच राहायला हवे़ तिला आचारस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य नसावे, अशी पुरुषाची अपेक्षा असते़ त्यातून तिने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर पुरुषी अहंकार दुखावला जातो व त्यातून अशा प्रकारे क्रूर हत्याकांड, बलात्कार, अत्याचार घडत असतात़

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP