Friday, May 29, 2009

पश्चिम महाराष्ट्र तुपाशी

28 May, 2009

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय , अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, तर अन्य विभागांवर मात्र अन्याय,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.मंत्रिमंडळात महाराष्ट्राला नऊ मंत्रिपदे मिळाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राच्या पदरात झुकते माप आहे. पश्चिम महाराष्ट्रात १० जागा असताना चार, तर तितक्याच जागा असलेल्या विदर्भाला दोन मंत्रिपदे मिळाली.

मुंबईला दोन मंत्री पण ठाण्याचा एकही नाही, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात आठ, तसेच मराठवाडय़ातही आठ खासदार असून केवळ मराठवाडय़ालाच मंत्रिपद, याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार जागांपैकी काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी भिवंडीची जागा जिंकली, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ काँग्रेसचे डॉ. निलेश राणे यांनी जिंकला. तळकोकणात शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून काँग्रेसला प्रथमच जागा मिळाली असल्याने, कोकणाच्या विकासावर अधिक लक्ष देण्यासाठी कोकणाला प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक होते. विधानसभा निवडणुकांचा विचार केल्यास, कोकण व ठाणे भागात ३९ विधानसभा जागा आणि मुंबईत ३६ जागा असताना मुंबईतील सहा खासदारांपैकी दोघांना मंत्रिपदे मिळाली. मुरली देवरा दुस-यांदा मंत्रिपद देण्यात आले, तर गुरुदास कामत हे पाचव्यांदा खासदार झाले असताना त्यांची बोळवण राज्यमंत्रिपदावर करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन मराठवाडय़ाला महत्त्व तर दिले आहेच, पण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. देशमुख आणि पाटील या दोघांनाही २६/११च्या पार्श्वभूमीवर आपापल्या पदांचे राजीनामे द्यावे लागले होते. पण विलासरावांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग करून पाटील यांचा पत्ता कट करण्यात यश मिळवले. मुख्यमंत्रीपद गमावण्याची कारवाई झाली असताना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रधान समितीच्या अहवालात राज्य सरकारला क्लीनचिट मिळाली आणि विलासरावांचा समावेश झाला. मात्र याच कारणावरून पद गमवावे लागलेल्या शिवराज पाटील आणि आर. आर. पाटील यांचा मात्र वनवास कायम राहिल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांचा काँग्रेसने मान राखला आणि त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादीला तीन मंत्रिपदे देण्यात आली. प्रतीक पाटील हे दुस-यांदा लोकसभेवर गेले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अजित घोरपडे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली असूनही ते विजयी झाले, त्याचे हे बक्षीस मानले जाते.

Read more...

Sunday, May 24, 2009

रामदास आठवले को गुस्सा क्यों आता है?

साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखेच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


रिपब्लिकन नेते रामदास आठवले भयंकर संतापले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येदेखील संतापाची लाट पसरली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव आठवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इतका की, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोहोंनी जाणूनबुजून आपला पराभव केला, असा थेट आरोप आठवले यांनी केला आणि राज्यभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रचारप्रमुख बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले. आठवलेंचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिल्यानंतरच त्यांचे समर्थक शांत झाले. या प्रकाराने अनेक प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यामध्ये आठवलेंचा पराभव होतोच कसा? त्यांचा पराभव कसा झाला, कुणी केला, कशासाठी केला, पराभव करण्यामागे नेमकी कारणे कोणती, याचा अंदाज घेतला असता, आठवलेंच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. आठवलेंचा पराभव जाणूनबुजून करण्यात आला, जातीय प्रवृत्तीमधून करण्यात आला, शिर्डी मतदारसंघातील साखरसम्राटांनी आठवलेंना पाडण्याचाच निर्धार केला होता. मात्र केवळ विखे-पाटीलच नव्हे, तर कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह येथील सगळेच साखरसम्राट व शिक्षणसम्राट त्यांच्या पराभवास जबाबदार असल्याचे दिसून येते. मराठा आणि बौद्ध दलित यांच्यातील वैमनस्यातून आठवलेंचा पराभव घडवून आणण्यात आला आहे.


काँग्रेस नेत्यांनी ठरवले, तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे त्यांना अशक्य नाही. १९९८ साली प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, आठवले व जोगेंद्र कवाडे या चौघांना काँग्रेसने निवडून आणले होते. हिंदुत्ववादी शिवसेना-भाजप युतीचे आव्हान परतवून लावण्यासाठी सर्वधर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन युतीचा सामना करण्याचा निर्णय घेतला होता. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट तर एकत्र आले होते. परिणामी एकजुटीचा विजय झाला होता. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत सर्वानी पुन्हा वेगळय़ा चुली मांडल्या आणि पराभूत झाले. गवई काँग्रेससोबत, तर आठवले राष्ट्रवादीसोबत गेले. वास्तविक पाहता रिपब्लिकन पक्षामध्ये एकजूट नसेल, तर त्यांच्या मतांची विभागणी होऊन त्यांची राजकीय शक्ती क्षीण होते. या मतांचा विजयासाठी फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप उमेदवाराला फायदा मिळू शकतो, याची जाणीव असल्यामुळे दलित जनता काँग्रेस पक्षाला भरभरून मते देत असल्याचा अनुभव येतो. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने गवई-आठवले यांचा सन्मान ठेवला आहे. त्यांच्या नेत्यांना अनुक्रमे अमरावती व शिर्डी या दोन जागा सोडल्या. काँग्रेस पक्षात असलेल्या निष्ठावान दलित नेत्यांसाठी काँग्रेस कार्यकर्तेही निष्ठेने काम करीत असल्याचे मुकुल वासनिक आणि एकनाथ गायकवाड यांच्या विजयाने सिद्ध झाले आहे.


अहमदनगर आणि शिर्डी (राखीव) या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिजलेल्या अंतर्गत राजकारणाचा आठवले हे बळी ठरले आहेत. आठवलेंचा तर बळी गेलाच, पण काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या असे पायात पाय घालून पाडले की, अहमदनगरमध्ये भाजप आणि शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. नगर जिल्ह्यातील एका माजी आमदाराने शिर्डीच्या पराभवावर मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, पती मेल्याच्या दु:खापेक्षा सवत विधवा झाल्याचा आनंद अधिक आहे. यावरून कुरघोडीचे राजकारण अशा थराला गेले की, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको लेकर डुबेंगे असा प्रकार घडला. पवारांनी खेळी केली, विखे-पाटलांबरोबर असलेल्या दुश्मनीतून आठवलेंना काँग्रेसच्या गळी उतरवून त्यांच्या कोटय़ात टाकले व विखेंचा काटा काढण्याचे ठरवले. विखेंचा काँग्रेसचा हात मतदारसंघात जाऊच नये, अशी तजवीज करून ठेवली. त्यांनी शहाला काटशह देऊन आठवलेंचा शिर्डीत आणि नगरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवाजी कर्डिलेंचा पत्ता कट केला. शिर्डीमध्ये साखरसम्राटांनी आठवलेंना ठरवून पाडले असल्याचे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपैकी शिर्डी हा काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांचा मतदारसंघ. त्यात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना २८ हजाराचे मताधिक्य आहे. काँग्रेसचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमध्ये २३ हजार, काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार जयंत ससाणे यांच्या मतदारसंघात ३० हजार, राष्ट्रवादीचे शंकरराव कोल्हे यांच्या कोपरगावमध्ये २५ हजार आणि राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघात ११ हजार असे मताधिक्य शिवसेनेचे वाकचौरे यांना मिळाले आहे. निवडणूक प्रचारासाठी आठवलेंनी आमदारांना दिलेले पैसे धनुष्यबाणासाठी वापरण्यात आले, अशी चर्चा होत आहे. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा तालुक्यांमध्ये दहा सहकारी साखर कारखाने आहेत. शिवसेनेच्या अशोक काळे यांचा कोपरगाव सहकारी साखर कारखाना वगळता नऊ कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि त्या प्रत्येकाच्या शिक्षणसंस्था आहेत. प्रत्येक संस्थेत १० ते १५ हजार कामगार आहेत. सभासद शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंबीय धरून प्रत्येकाची हक्काची किमान एक लाख मते आहेत. त्यांच्या जीवावर ते कुणालाही निवडून आणू शकतात, अथवा पाडू शकतात. कोल्हें,पिचड,रामदास धुमाळ, नरेंद्र घुले, थोरात,विखे, यशवंतराव गडाख या काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या अधिपत्याखाली कारखाने आहेत, तेवढय़ाच शिक्षणसंस्थाही आहेत. एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित मते मिळतील, अशी आठवलेंची अपेक्षा होती; परंतु विखेंना नगरची जागा मिळाली असती, तर विखेंनी काँग्रेसच्या कोटय़ात आलेल्या आठवलेंना मदत केली असती; परंतु आठवलेंना काँग्रेसकडे पाठवून नगरची जागा पवारांनी राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवले आणि राजकारण सुरू झाले. शिर्डी हा एकमेव मतदारसंघ आहे जेथे अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा खूप चर्चिला गेला.नीळ हवी की गुलाल असा जातीय प्रचार झाला आणि मराठा समाज गुलालाच्या बाजूने भगव्याला साथ देण्यास एकवटला.शरद पवारांनी आठवलेंना माढातून उभे करायला हवे होते, या मतदारसंघातून (पूर्वीचा आठवलेंचा पंढरपूर राखीव मतदारसंघ) अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आठवलेंना निवडून आणले होते; पण नगरमधले साखरसम्राट बेजबाबदारपणे वागले. त्यात विखे आणि थोरातांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आठवलेंना राग येणे स्वाभाविक आहे; पण पवारांनी आठवलेंना या राजकारणाच्या खाईत लोटणे योग्य नव्हते. आयुष्यभर पवारांच्या ओंजळीने पाणी पिणारे आठवले पवारांच्या खेळीचेही बळी ठरले आहेत.रिपब्लिकन नेते एकत्र येऊ शकत नाहीत, ऐक्याची ताकद दाखवू शकत नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव आणता येत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून आठवलेंनी निदर्शने थांबवली पाहिजेत, अन्यथा बौद्ध-मराठा यांच्यातील वैमनस्य अधिक वाढेल  ते समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरेल. 

Read more...

Monday, May 18, 2009

शिवसेनेच्या गडाला सुरुंग17 May, 2009 10


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.


ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी विजय मिळवून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. कल्याणमध्ये मात्र युतीचे आनंद परांजपे यांनी यश मिळवून युतीची लाज राखली. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षित विजय मिळवला. तर रायगड मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बॅ. ए. आर. अंतुले यांना पराभवाचा हादरा बसला. या ठिकाणी शिवसेनेच्या अनंत गिते यांनी विजय मिळवला. शिवसेनेला भोवला फाजील आत्मविश्वासअनेक वर्षे ठाणे लोकसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवत पारंपरिक मतदारांना गृहीत धरणा-या शिवसेनेला यंदा प्रथमच हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. आपलाच मतदारसंघ असल्याच्या आविर्भावात गाफील राहण्याचा फाजील आत्मविश्वास शिवसेनेला या निवडणुकीत चांगलाच नडला. येथील मतदारांनी संजीव नाईक यांना विजयी करताना मनसेच्या पारड्यातही भरभरून मते टाकली. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आले.


यातच ‘कॉस्मोपॉलिटीन’ झालेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वडापाव चारून मराठी बाण्याचा हाकारा द्यायला सांगितला. मात्र महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने डम्पिंग ग्राऊंड, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. याचा परिणाम निवडणुकीत दिसला. याशिवाय युतीच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीही मतदारांची नाराजी ओढवून घेण्यास कारणीभूत ठरली. यात भरीस भर टाकत मनसेच्या राजन राजे यांनी मतांचे धुव्रीकरण केल्याने नाईक यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. ठाणेकर आपल्याच तालावर नाचतात, हा शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटला, हेही या निकालावरून स्पष्ट होते.


राखली युतीची लाज भूकंपाचे हादरे बसावेत आणि उत्तुंग इमारती क्षणार्धात जमीनदोस्त व्हाव्यात अगदी अशीच परिस्थिती युतीची ठाण्यात झाली असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आनंद परांजपेंनी परांजपे यांनी विजय मिळवून शिवसेना-भाजप युतीची आक्षरश: लाज राखली. खरे तर परांजपे यांचा ठाणे हा मतदारसंघ. तरी पक्षाने त्यांना कल्याण हा नवीन मतदाससंघ दिला. त्यामुळे त्यांनी मिळवलेला हा विजय महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपासून डावखरे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात दिग्गज नेत्यांना उतरवून सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, परंतु या सगळ्या प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही. युतीच्या बालेकिल्ल्यात मनसे फॅक्टर प्रभावी ठरला.


मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख मते मिळाल्याने येथील युतीचे मताधिक्य घटले. मनसेमुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मनसेच्या मराठीच्या मुद्दय़ावरील आंदोलनाची ठिणगी कल्याण-डोंबिवलीत चांगलीच धगधगली होती. नंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. मनसेने युतीच्या बालेकिल्ल्यात मिळवलेली मते म्हणूनच युतीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहेत.संतोष गायकवाड मुस्लिम फॅक्टरच ठरला निर्णायकनव्याने निर्माण झालेल्या भिवंडी मतदारसंघात मुस्लिम फॅक्टर महत्त्वाचा होता. या ठिकाणी युतीने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. खरे तर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण आर. आर. पाटील यांनी बंडखोरी करून सपची उमेदवारी मिळवल्याने मतविभाजन होण्याचे आखाडे काही जणांनी बांधले होते.


परंतु त्यानंतरही येथील मतदारांनी काँग्रेसलाच पसंती दिली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथेही मनसे फॅक्टरचा फटका युतीच्या उमेदवाराला बसला. १९८४च्या दंगलीनंतर भिवंडी हे शहर संवेदनशील म्हणून देशात ओळखले जाऊ लागले. त्यामुळे मुस्लिमांचे खरे कैवारी आपणच आहोत, असे समजणाऱ्या समाजवादी पक्षाने येथे आपले पाय रोवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. समाजवादीने अलीकडे कल्याणसिंग यांच्याशी जवळीक साधल्याने येथील मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावला. त्याचे स्पष्ट चित्र या निवडणुकीत दिसले. या साऱ्याचा परिपाक म्हणजे काँग्रेसशिवाय आपणास पर्याय नाही, अशी मतदारांची समजूत झाल्याने त्यांनी काँग्रेसलाच भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचा येथील विजय अधिक सुकर झाला. गटातटाच्या राजकारणाचा जाधवांना फायदाबहुजन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बळीराम जाधव यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयाची मोहोर उमटवत प्रस्थापितांना पराभूत केले.


काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा, युतीचे अ‍ॅड. चिंतामण वनगा आणि माकपचे लहानू कोम असे दिग्गज उमेदवार असूनही जाधव विजयी होणे हा आ. हितेंद्र ठाकूर यांचाच करिश्मा म्हणावा लागेल. येथे शिंगडा यांच्याविषयी काँग्रेसमध्ये नाराजी होती. भाजपचे चिंतामण वनगा व माकपच्या लहानू कोम यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध नसला तरी त्यांची ताकद कमी पडली. शिवसेना कार्यकर्त्यांची आ. ठाकूर यांच्याशी जवळीक होती. त्याचा फटका युतीला बसला. माकपच्या कोम यांना जनता दलाचा पाठिंबा होता. पण त्याचा फायदा झाला नाही. आ. ठाकूर यांनी वसई विकास आघाडीची सारी ताकद जाधव यांच्या मागे उभी केली होती. त्यामुळे एका बाजूला ठाकूर आणि दुस-या बाजूला युती, आघाडी आणि माकप असे चित्र होते. त्यात ठाकूर आपला उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


पालघर, डहाणू, तलासरी, बोईसर इत्यादी भागांतील नव्याने मतदारसंघात आलेल्यांनाही आकृष्ट करण्यात यश आले. पक्षांतर्गत बंडखोरीचा काँग्रेसला फटकारायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांना प्रवीण ठाकूर व सिद्धार्थ पाटील यांच्या बंडखोरीचा चांगला फटका बसला. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील, बहुजन समाज पक्षाचे किरण मोहिते व श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक या सर्वाच्या उमेदवारीमुळे अंतुले यांना मतविभाजनाचा फटका बसेल, अशी चर्चा होत होती. त्याचा नेमका फायदा गीते यांना झाला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे व काँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी अंतुले यांना पाठिंबा दिला असला तरी तरुण वर्गाला अंतुलेंची उमेदवारी मान्य नव्हती. पक्ष शिस्तीचा भंग करून आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर तसेच पेणचे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार ए. टी. पाटील यांचे पुत्र सिद्धार्थ पाटील यांनीही अंतुले यांना आव्हान दिले होते. त्याचाही येथे परिणाम झाला. शिवसेनेचे अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला होता. त्याचा चांगलाच फायदा गितेंना झाला. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेला आगरी व कोळी समाज शेकापबरोबर असून त्यांची एकगठ्ठा मते गिते यांच्या पदारात पडली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अंतुले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला.

Read more...

राष्ट्रवादीची वाटचाल दिल्लीकडून गल्लीकडे!

शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले.


देशाच्या राजकारणात आघाडय़ांचे पेव फुटले होते. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना विश्वास देण्याऐवजी पंतप्रधानपदासाठी एकमेकांना विश्वास देण्यात अनेक नेते आघाडीवर होते. आपापल्या वेगवेगळय़ा आघाडय़ा करायच्या आणि वेळ येताच पंतप्रधानपदावर दावा ठोकायचा, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. देशाला स्थिर आणि मजबूत सरकार देणा-या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने सरकार बनवण्यासाठी आघाडय़ांवर अवलंबून राहावे आणि त्यांना सरकार बनवणे अशक्य करून टाकावे म्हणजे ते आपलेच नाव पर्याय म्हणून पुढे करतील, अशा वेडाने अनेकांना झपाटले होते. त्यात महाराष्ट्रातील जाणते राजे आघाडीवर होते. लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, मायावती, मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद पवार, जयललिता, चंद्राबाबू नायडू, रामविलास पासवान, सीताराम येच्युरी, प्रकाश करात असे किती तरी सिंहासनावर उडी मारण्यासाठी टपून बसले होते; पण एकालाही जनतेचा विश्वास संपादन करता आला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर या सर्व नेत्यांच्या किती तरी आधी पंतप्रधानपदावर नजर ठेवली होती; पण कालच्या निकालाने त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. गल्लीतून दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला माढाच्या गल्लीतच परतावे लागले, दिल्ली बहोत बहोत दूर है हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राष्ट्रवादीला आणि शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे तोडफोडीचे राजकारण आजवर केले, त्याचा सर्वाधिक फटका त्यांना स्वत:लाच बसला आहे. आता तरी जाणते राजे वास्तव जाणून घेतील का, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून त्यांच्या सगळय़ा चाली चुकल्या आणि त्यांनी स्वत:ला हास्यास्पद करून ठेवले, इतके की एकाने निकालानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की, आता बारामतीचे पंतप्रधान होणार का? अशा प्रकारे पवारांची लोकांनी खिल्ली उडवावी, हे अत्यंत खेदजनक आहे.

आघाडय़ांच्या राजकारणाचा जमाना असून कोणालाही बहुमत मिळत नसल्याने कितीही कमी जागा आल्या तरी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, असे मानून चाललेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला आपली प्रतिक्रिया देताना दुसरे टोक गाठावे लागले व सांगावे लागले की, लोकांना स्थिर सरकार हवे असल्याने यूपीएच्या बाजूने कौल दिला आहे. शरद पवारांनी राजकारणात विश्वासार्हता कधीच कमावली नाही, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी तर नाहीच; पण लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवसागणिक त्यांची विश्वासार्हता कमी होत गेली. एवढी की, राज्यात किमान १५ जागा मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या राष्ट्रवादीला आठ जागांपर्यंत खाली यावे लागले. राज्यात १००हून अधिक प्रचारसभा घेणा-या पवारांना राष्ट्रवादीची एक जागादेखील वाढवता आली नाही. उलट आधीच्या नऊ जागांमधली एक कमी झाली आहे. राष्ट्रवादीची पश्चिम महाराष्ट्रवादी काँग्रेस अशी अवहेलना केली जात होती; पण या वेळी आणखी गजब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता पश्चिम महाराष्ट्रवादीदेखील राहिला नाही. जिकडे - तिकडे पाटलांच्या सवत्यासुभ्यांना खिंडारं पडली आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून येणे अपेक्षित होते, तसे माढातून स्वत: पवार निवडून येणार नाहीत, असे म्हणण्याचे धाडस कोणी केले नाही. थोडय़ाफार फरकाने का होईना निवडून येतील, अशी भावना लोक बोलून दाखवत होते.
 
बारामती व माढा वगळता पवारांच्या सर्वाधिक प्रचार सभांचा परिणाम एकाही मतदारसंघात दिसला नाही, साता-यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले, त्याचे श्रेय पवारांना देता येणार नाही. उदयनराजेंनी तिकीट घ्यावे याकरिता राष्ट्रवादीनेच त्यांच्यासमोर लालगालिचे पसरले होते. निकालानंतरची उदयनराजेंची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. ते म्हणाले, मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, माझ्या हिमतीवर जिंकली आहे, पक्षबिक्ष गेला खडय़ात! पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ातच जाणार आहे. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकची समीर भुजबळ यांची जागा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निवडून आणली आहे. तिथे मराठा समाजाने त्यांना भरपूर त्रास दिला होता. त्यानंतर भंडारा-गोंदियाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांची जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा हातभार लागला आहे. पटेलांनी सोनियांच्या सभेचा आग्रह धरला होता. त्यानंतर मराठवाडय़ात उस्मानाबादची डॉ. पद्मसिंह पाटील यांची जागा त्यांनीच निवडून आणली. त्यांच्या भावनिक आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला. बारामती, माढा, सातारा, नाशिक, भंडारा, उस्मानाबाद या सहा जागा प्रत्येकाच्या ताकदीवरच्या आणि उरलेल्या ईशान्य मुंबईची संजय पाटील यांची व ठाण्याची संजीव नाईक यांची जागा मनसेच्या कृपेने आल्या आहेत. तेव्हा पवारांचा करिश्मा कुठेही दिसलेला नाही. पंतप्रधानपदासाठी ज्या नेत्याला महाराष्ट्रासमोर उभे करण्यात आले, त्या नेत्याच्या शब्दाला किंमत देऊन अधिकाधिक जागा जिंकून द्यावयास हव्या हात्या; पण तसे काही घडले नाही. याचे स्वत: पवारांना व त्यांच्या चेलेचपाटय़ांना आत्मपरीक्षण करावे लागेल.
 
राष्ट्रवादी पक्षाला व्यापक दृष्टिकोणातून वाढवणे पवारांना शक्य झाले नाही. प्रत्येक मतदारसंघातील प्रस्थापित मराठा नेत्यांच्या सवत्यासुभ्यांवर लक्ष ठेवून एका जातीची अस्मिता जोपासण्याचे आणि त्यांचे संघटन आपल्या बाजूने उभे करण्यावरच त्यांच्या राजकारणाचा भर राहिला, त्यातूनच विनायक मेटे, पुरुषोत्तम खेडेकरांसारखे फुटीर वृत्ती जोपासणारे लोक पुढे आले. दलित मागासवर्गीय आणि महिला यांचे संघटन करून उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्याच्या वल्गना अनेकदा केल्या; पण त्या हवेतच विरल्या. या वल्गना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न झाला नसल्यामुळे राष्ट्रवादीची निवडणूक म्हणजे वाऱ्यावरची वरात ठरली. राष्ट्रवादीच्या ज्या जागा निवडून आल्या त्यात काँग्रेसच्या पुण्याईचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, यापुढे काँग्रेसने स्वबळावरच निवडणुका लढवल्या पाहिजेत. विश्वासघातकी राजकारण करणा-यांचे लोढणे किती दिवस सांभाळायचे याची चर्चा सुरू झाली आहे.


आता देशात काँग्रेसच्या बाजूने वारे वाहू लागले आहेत, ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणारच आहेत. शिवसेना-भाजपला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला, मनसेने त्यांची उरलीसुरली ताकददेखील खच्ची केली आहे. या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा गौण ठरला. भावनिक मुद्दय़ांऐवजी लोकांनी विकासाला अधिक महत्त्व दिले. हिंदूंचा मसिहा अशी प्रतिमा असलेल्या नरेंद्र मोदींनाही लोकांनी झटका दिला. अनेक राज्यांनी मोदींच्या सभा नाकारल्या. मनसेला मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावर भरपूर मते मिळाली. शिवसेनेपासून मराठी माणसे दूर गेली होती आणि अमराठींचे काँग्रेसच्या बाजूने मजबूत संघटन झाले, त्यामुळे मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. 

Read more...

Friday, May 15, 2009

अहो आबा, मला विधानसभेचे तिकीट द्या ना!


14 May, 2009

लावणीच्या फडात बोर्डावर उभे राहून रसिकांना घायाळ करणा-या सुरेखा पुणेकर गेल्या काही दिवसांपासून राजकीय फडावर येण्यास उत्सुक आहेत.

लई दिवसाची विनंती माझी लक्षात जरा घ्या ना अशी लाडिक साद लावणीसम्राज्ञी ‘नटरंगी नार’ सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष आर. आर. आबांना घातली. लावणीच्या फडात बोर्डावर उभे राहून रसिकांना घायाळ करणा-या सुरेखा पुणेकर गेल्या काही दिवसांपासून राजकीय फडावर येण्यास उत्सुक आहेत.

मागच्या विधानसभेच्या वेळीसुद्धा त्यांनी उमेदवारीच्या ‘तिकीट-बारीवर’ हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी त्यांना ती मिळू शकली नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ संपण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या नव्या खेळाचे बोर्ड सर्वच पक्षांच्या कार्यालयात लागले आहेत. उमेदवारीच्या तिकीट बारीवर इच्छुकांची झुंबड उडालेली आहे. प्रत्येक पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकांचे फड रंगू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी होत असल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधान सभा मतदारसंघातून उत्सुक असणा-या सुरेखा पुणेकर यांनी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या युवानेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि‘ताई मला मोहोळचा मोह काही आवरेना’ अशी आळवणी केली. सुप्रिया सुळे यांनीही, ‘चला आपण आबांनाच जाऊन भेटूया’ असे सांगितले आणि त्या पुणेकर यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या. तेथे प्रदेश अध्यक्ष आर. आर. पाटील यांची त्या दोघींनी भेट घेतली.

उमेदवारीसाठी उतावीळ झालेल्या पुणेकर यांच्याकडून, माझ्या उमेदवारीचे काही तरी ठरवाआबा माझा मोहोळचा हट्ट जरा पुरवा अशा अचानक झालेल्या मागणीने आबा जरा गांगरलेच पण स्वत:ला सावरून ते लगेच म्हणाले, ‘मागच्या विधान सभेच्या वेळीच उत्तर सोलापूर या राखीवर मतदार संघातून तुमचा विचार सुरू होता.

पण ते काही जमलं नाही. यावेळी मात्र नक्कीच विचार करू’ आबांनी आश्वासन देताच आपण आमदार होणार या कल्पनेने हरखून गेलेल्या सुरेखा पुणेकर मग गुणगुणतच बाहेर पडल्या..होणार होणार गं, बाई मी आमदार होणार गं..

Read more...

Monday, May 11, 2009

नवी मुंबई टोलेजंग करण्याचा चंग


10 May, 2009

मुंबई शहरातील शैक्षणिक संस्थांना मिळणारा ५ .३२ एफएसआय नवी मुंब ईतील शैक्षणिक संस्थांना मिळावा, असा शिक्षणसम्राटांचा आग्रह आहे.

मुंबई शहरातील शैक्षणिक संस्थांना मिळणारा ५.३२ एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) नवी मुंबईतील शैक्षणिक संस्थांना मिळावा, असा शिक्षणसम्राटांचा आग्रह असून स्वत:ची शिक्षणसंस्था असलेले महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीच त्याला हिरवा कंदील दाखवल्याने या हट्टाला भलतेच वजन आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ मे रोजी हा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती मिळते. शिक्षणसम्राटांनी नवी मुंबईतील त्यांच्या शिक्षणसंस्था टोलेजंग करण्याचा चंगच बांधला आहे. महसूलमंत्र्यांकडे गुरुवारी यासंदर्भात बैठक झाली. तेथे कमलकिशोर कदम तसेच यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे सदस्यही उपस्थित होते. त्यात माजी महसूल मंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार आदींचा समावेश होता. कमलकिशोर कदम यांनी ‘एफएसआय वाढवून मिळालाच पाहिजे’ असा निर्वाणीचा इशारा दिला, असे समजते.

राज्यातील राजकारण्यांनी नवी मुंबईतील सरकारच्या जमिनी नगण्य भावात बळकावून त्यावर शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. या नेत्यांनी आपल्या शिक्षण संस्थांचा १५ टक्के भाग अन्य कमर्शिअल वापरासाठी उपयोगात आणण्याची मान्यता घेतली आहे, आता एफएसआय वाढवून घेतल्यानंतर कमर्शिअल वापरासाठी मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकेल.

शैक्षणिक संस्था कमर्शिअल झालेल्याच आहेत, २५ ते ५० लाखांपर्यंत डोनेशन घेण्यापर्यंत मजल गेलेलीच आहे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जात नाही, शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेले शुल्कासंबंधीचे नियम डावलले जात आहेत. असे असतानाही सरकारवर दबाव वाढवून फायदे घेतले जात आहेत.

मुंबई शहरात सरकारी, निमसरकारी व खासगी शिक्षणसंस्थांना (नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे झाली असल्यास) एफएसआय वाढवून देण्यात आला आहे. मुंबई शहरात एकऐवजी ५.३२, तर उपनगरात १.३३ ऐवजी ४ एवढा एफएसआय देण्यात आलेला आहे. नवी मुंबईत एफएसआय वाढ मुंबई शहराप्रमाणेच मिळावी, असा शिक्षणसम्राटांचा हट्ट आहे.

एफएसआयचा फायदा कुणाला?

* पतंगराव कदम : भारती विद्यापीठ (सीबीडी बेलापूर)

* डी. वाय. पाटील : डी. वाय. पाटील वैद्यकीय व इंजिनीअरिंग महाविद्यालय (नेरुळ)

* कमलकिशोर कदम : महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (कामोठे, सीबीडी व वाशी)

* डॉ. पदमसिंह पाटील : तेरणा वैद्यकीय महाविद्यालय (नेरुळ, कोपरखरणे)

* सतीश चतुर्वेदी : लो. टिळक इंजिनीअरिंग (कोपरखरणे)

* विलासराव देशमुख : सुशीलादेवी शैक्षणिक संस्था (वाशी)

गणेश नाईक, रोहिदास पाटील, जावेद खान, सुनील तटकरे, नामदेव भगत, मंदा म्हात्रे यांच्याही शिक्षणसंस्था.

Read more...

अमानुष कृत्याचे समर्थन कशासाठी?

राज्यातील काही बडय़ा पोलिस अधिका-यांनी कदमच्या कर्तव्यतत्परतेचे समर्थन करताना, त्याला झालेल्या शिक्षेने पोलिस दलाचे मनोधैर्य खचेल, असे मत मांडले आहे. बेछूट गोळीबार केल्याने १० माणसे जागीच ठार होतात. संपूर्ण समाज हवालदिल होऊन त्याचे मनोबल खचते. त्याबद्दल ते मौन कसे बाळगतात?जगाला शांतीचा संदेश देणा-या तथागत गौतम बुद्धांची २५५३वी जयंती देशभर उत्साहाने साजरी होत आहे. महाराष्ट्रातही सर्वत्र जयंती सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती सोहळय़ाच्या दोन दिवस आधी घाटकोपर येथील रमाबाई नगरात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निकाल आला. गोळीबारास जबाबदार असलेल्या मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि सोहळय़ाच्या आनंदात भर पडली. अर्थात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्यामुळे हे प्रकरण घडले होते; परंतु विटंबना करणारे हात कोणते, याचे उत्तर न्यायालयाकडूनही अद्याप मिळालेले नाही.


पुतळय़ाजवळ मोठा जमाव प्रक्षुब्ध झालेला होता. राज्य राखीव दलाची एक तुकडी तेथे पाठवण्यात आली. जेथे मोठा जमाव जमलेला होता, त्या ठिकाणी पोलिसांकडून कृती नाही आणि एक हजार फुटांवर रास्ता रोको पाहण्यासाठी बाहेर आलेले आणि रस्त्यालगत बसलेले जे निरपराध लोक होते, त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात दहा जण ठार झाले व २५ माणसे जखमी झाली. पोलिस नियमावली धाब्यावर बसवून कमरेच्या वर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करण्यापूर्वी लाउड स्पीकरवर वॉर्निग दिली जाते. ती दिली नाही. हवेत गोळीबार केला जातो. तोही केला नाही. सर्वप्रथम जमाव पांगवण्याच्या सूचना द्यायच्या. त्या पाळल्या नाहीत, तर अश्रुधुराची नळकांडी, पाण्याचा मारा, लाठीमार यापैकी कोणताही उपाय केला नाही. पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याच्या नेतृत्वाखाली आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाने थेट गोळीबारच केला.
 
सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती एस. डी. गुंडेवार यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात या सर्व बाबी सविस्तर नोंदवल्या असून, न्यायालयाने त्या ग्राह्य धरल्या आहेत. मनोहर कदम व त्याच्या गोळीबार करणाऱ्या सात सहका-यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शिफारसदेखील केली. शिवसेना-भाजप युती सरकार राज्यात असताना ११ जुलै १९९७ रोजी ही घटना घडली.

न्यायमूर्ती गुंडेवार यांनी वर्षभरात ३१ ऑगस्ट १९९८ रोजी अहवाल सादर केला. या अहवालावरून युती सरकार कारवाई करणे अशक्य होते. त्यांनी गोळीबाराचे समर्थनच केले होते आणि समर्थन करताना लबाडी केली होती. टँकर थिअरी जन्माला घातली होती. पेट्रोलने भरलेल्या टँकरवर जमाव पेटते बोळे फेकत होता. त्यामुळे आग भडकून रमाबाई कॉलनी बेचिराख झाली असती, असे कथानक रचण्यात आले. प्रत्यक्षात तसे काहीच घडलेले नव्हते, असे निरीक्षण नोंदवून ही थिअरी कपोलकल्पित असल्याचे मत न्यायमूर्ती गुंडेवार यांनी व्यक्त केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे भाचे पोलिस उपायुक्त संजय बर्वे यांच्या सुपीक डोक्यातून ही थिअरी जन्माला आली असल्याचे सांगण्यात येते. युती शासनाने कदमवर बडतर्फीची कारवाई केली नाही, चौकशी होईपर्यंत त्याला व त्याच्या सहका-यांना निलंबित करण्यात आले; पण लगेच कामावर घेण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनेदेखील मनोहर कदमवर कारवाई केली नाही. त्याला कामावर कायम ठेवण्यात आले आणि गुंडेवार अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. त्या वेळी छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी या प्रकरणात बराच रस घेतला होता.

युती सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधिमंडळात हे प्रकरण लावून धरले होते. आघाडी सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर रमाबाई नगरात काळी दिवाळी आणि भाऊबीज करण्यासाठी ते जात. अजूनही जातात, पण त्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. कदम हा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा असल्याने राष्ट्रवादीतील बडय़ा मराठा नेत्याने त्याची पाठराखण केली. त्यामुळे भुजबळांचे काही चालले नाही.
 
युती आणि आघाडी दोन्ही सरकारांनी कदमवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे दलित जनतेमध्ये या सरकारांबद्दल नाराजी निर्माण झाली. आघाडी सरकारला पाठिंबा देणा-या रिपब्लिकन नेत्यांविरुद्ध जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. हे नेते जेव्हा रमाबाई आंबेडकर नगरात गेले, तेव्हा जनतेने त्यांना पिटाळून लावले. जनतेने पुढाकार घेतला. नेत्यांना जनतेच्या मागे जावे लागले. या प्रकरणी वकिलांनी सामाजिक बांधिलकीतून चांगले काम केले. त्यात अ‍ॅड. संघराज रुपवते, बी. जी. बनसोडे, विजय प्रधान यांचा खास उल्लेख करावा लागेल. दलित समाजातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, चळवळीतील कार्यकर्ते या सर्वानी हे प्रकरण लावून ठरले. त्यामुळेच कोणत्याही मोठय़ा नेत्याचे सहकार्य नसूनही प्रकरण निकालापर्यंत पोहोचू शकले. निकालामुळे चळवळीतील कार्यकर्ते व दलित जनता यांचे मनोबल नक्कीच वाढले आहे.
 
निकाल लवकर लागावा म्हणून आघाडी सरकारने हे प्रकरण शिवडीच्या जलदगती न्यायालयात सोपवले खरे, पण ते दाखवण्यापुरतेच होते. त्यासाठी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यास कितीतरी विलंब लावला होता. एक-दीड वर्षापूर्वी वकील नेमल्यानंतर सुनावणी सुरू झाली. मनोहर कदमने पोलिस मॅन्युअलमधील सर्व नियम डावलून बेछूट गोळीबार केला. ज्यांच्यावर केला ते अतिरेकी नव्हते, निरपराध नागरिक होते. आंदोलकदेखील नव्हते. हे सर्व न्यायालयात सिद्ध झाल्यामुळेच त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. असे असताना या राज्यातील काही बडय़ा पोलिस अधिका-यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.

निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी कदमच्या कर्तव्यतत्परतेचे समर्थन करताना, त्याला झालेल्या शिक्षेने पोलिस दलाचे मनोधैर्य खचेल, असे मत मांडले आहे. पोलिसांनी कमरेच्या वर बेछूट गोळीबार केल्याने १० माणसे जागीच ठार होतात. संपूर्ण समाज हवालदिल होऊन त्याचे मनोबल खचते. त्याबद्दल प्रतिक्रिया न देता हे अधिकारी मूग गिळून बसतात. त्यात अग्रभागी आहेत जे. एफ. रिबेरो. या रिबेरोंना येईल त्या सरकारने वेळोवेळी फार मोठे मानसन्मान दिले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा आदर केला आहे. पण मनोहर कदम प्रकरणी रिबेरोंनी न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यांनी संपूर्ण निकालपत्र वाचून प्रतिक्रिया द्यायला हवी होती. गुंडेवार आयोगाच्या अहवालाचे आणि पुन्हा पोलिस मॅन्युअलचेही वाचन करायला हवे होते.
एम. एन. सिंग, तुकाराम चौधरी, रणजीत शर्मा या माजी वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ माजी पोलिस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी, नियमांचे उल्लंघन झाले. नागरिक निरपराध व नि:शस्त्र होते.


गोळीबारापूर्वी इतर प्रतिबंधात्मक उपाय केले नव्हते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याशिवाय उपनिरीक्षक असलेल्या कदमची एवढी हिंमत कशी झाली, त्याला ऑर्डर कुणी दिली, त्यामागे कोण होते, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. यावरून मनोहर कदमचे कृत्य सूडबुद्धीचे होते. यामागे षड्यंत्र होते. युतीच्या जातीयवादी प्रवृत्तीने पोलिस बेमुर्वत झाले होते, हे स्पष्ट होते. आघाडी सरकारमध्ये असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील बडय़ा नेत्यांची दलित जनतेप्रती असलेली पक्षपातीपणाची प्रवृत्तीही यानिमित्ताने उघड झाली. याचा परिपाक असा की, या राज्यात दलितांचेच बळी जातात आणि न्यायासाठी दलित जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागते!

Read more...

Sunday, May 3, 2009

अंदाज अपना अपना...


02 May, 2009

पुढचा पंधरवडाभर अंदाज बांधण्याशिवाय नेतेमंडळींपुढे दुसरा पर्याय नसल्याने प्रत्यके पक्ष आपापले भविष्य मांडून स्वत :चे समाधान करून घेत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यावर राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. पंधरवडाभर केवळ अंदाज बांधण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसल्याने प्रत्येक पक्ष आपापले भविष्य मांडून स्वत:चे समाधान करून घेत आहे.

राज्यातील ४८ पैकी ३२ ते ३४ जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आहे. तर शिवसेना भाजप
युतीला २६ ते २८ जागा जिंकण्याची आशा आहे. तर, ‘युतीला ३३ जागा मिळतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मराठवाडयात्न साफ होईल, त्याचा आम्हाला अधिक फायदा मिळेल’ असे शिवसेना नेते रामदास कदम यांचे म्हणणे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याशी चर्चा केली असता आठ जागांवर चुरशीची लढत होईल मात्र १८ जागा निश्चितपणे येतील, असेच त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने राज्यात २६ जागा लढवल्या; त्यापैकी १८ जागा नक्कीच मिळतील. यावेळी विदर्भातही आमच्या ३ ते ४ जागा येतील - मुख्यमंत्री अशोक चव्हाण

राष्ट्रवादीला १६ जागा मिळतील. यावेळी जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या ठिकाणी आमची
ताकद वाढली आहे त्याचा फायदा मिळेल- गोविंदराव आदिक, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना भाजप युतीला २६ ते २८ जागा मिळतील. ही संख्या निकालानंतर वाढेल, पण कमी होणार नाही - गोपीनाथ मुंडे, भाजप

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP