Saturday, July 30, 2011

विरोधकांचा पर्दाफाश


गिरणी कामगारांच्या घरांचे प्रन सोडवण्याचा निर्धार आपलाच आहे, आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपणच त्यांना मोफत घरे देणार आहोत, असा आव आणून गुरुवारी मोर्चा काढणा-या विरोधकांचे प्रेम पुतना मावशीचे होते. हे आज दोन्ही सभागृहांत स्पष्ट झाले.


गिरणी कामगारांच्या घरांचे प्रन सोडवण्याचा निर्धार आपलाच आहे, आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपणच त्यांना मोफत घरे देणार आहोत, असा आव आणून गुरुवारी मोर्चा काढणा-या विरोधकांचे प्रेम पुतना मावशीचे होते. हे आज दोन्ही सभागृहांत स्पष्ट झाले. गिरणी कामगारांसाठी विविध कामगार संघटनांबरोबर सर्व विरोधी पक्ष आपापले झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारला जबरदस्त हादरा दिला, असा डांगोरा पिटणारे विरोधी पक्षाचे नेते आज उघडे पडले. लाखोंचा मोर्चा असल्याचा दावा करणा-या विरोधी पक्षांच्या दोन्ही सभागृहात विरोधी आमदारांची उपस्थिती नगण्य होती. मोर्चात डरकाळय़ा फोडणा-या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 पैकी मोजून सहा आमदार सभागृहात उपस्थित होते. कामगारांना मोफत घरे देण्याच्या मागणीसाठी आपले आमदार सभागृहात रणकंदन करतील आणि सरकारला जाब विचारतील ,अशी डरकाळी फोडणा-या ठाकरेंच्या आमदारांनी त्यांची पुरती गोची करून टाकली. मुंबईचे आमदारदेखील चर्चेच्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. शिवसेना, भाजप व मनसेचे मिळून एकूण 103 आमदार आहेत. यापैकी शिवसेनेचे पाच, भाजप पाच आणि मनसे पाच असे 15 आमदार चर्चेला उपस्थित राहिले.

खरेतर गिरण्यांच्या जमिनींची विक्री आणि कामगारांना घरे अशाप्रकारचा चर्चेचा प्रस्ताव आणून विरोधक स्वत:च उघडे पडले. सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवत गिरण्यांच्या जमीन विक्रीला युती सरकारच्या काळात परवानगी दिली आणि गिरण्यांच्या जमिनी शिवसेना व भाजप नेत्यांनीच बळकावल्या, असा पर्दापाश करून त्यांचा आवाज बंद करून टाकला. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तीन गिरण्यांच्या जमीनी घेतल्या आणि त्यावर टॉवर बांधले, ते गिरणी कामगारांसाठी नव्हे तर धंद्यासाठी आणि कोहिनूर मिलची जमीन शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याच मुलाने घेतली, असे सांगितल्याने शिवसेना, भाजप नेत्यांना थातूर-मातूर उत्तर देऊन वेळ मारून न्यावी लागली.
 
कालच्या मोर्चात शिवसेनेबरोबर मोफत घरांची मागणी करणा-या भाजपने सभागृहात घुमजाव केले. खडसे यांनी मोफत नव्हे माफक दरात द्या आणि लॉटरी काढून दिली तरी चालतील, अशी सरकारला अनुकूल भूमिका मांडली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून त्यांच्यासमोर चक्क नमते घेतले.
 
विधानसभेत काँग्रेसचे मधु चव्हाण, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, जिंतेद्र आव्हाड यांनी तर विधान परिषदेत काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी शिवसेना, भाजपने गिरणी कामगारांच्या टाळूवरचे लोणी कसे खाल्ले, हे सांगून त्यांच्या विरोधातील हवाच काढून घेतली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गोंधळ घालणा-या विरोधकांना कामगारांची नव्हे निवडणुकीची चिंता असल्याचे सांगून त्यांची बोलती बंद केली.
 
मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी अत्यंत भावूक भाषण करून गिरणी कामगारांच्या परिस्थितीचे दारुण वास्तव कथन केले. उद्धव आणि राज यांचा नामोल्लेख टाळून शिवसेनेच्या ‘मुंबई बंद’मध्ये मनसे सहभागी नसल्याचा मिश्किल टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मारला होता. त्यावर आमचे नाते रक्ताचे आणि भक्ताचे आहे, वाटा मागणारे नाही, असा प्रतिटोला नांदगावकर यांनी लगावला.


सभागृहाची नियोजित वेळ संपली तरी अनेक सदस्यांना बोलायचे होते. जिंतेद्र आव्हाड यांना अपेक्षित वेळ मिळाला नसल्याने त्यांनी रागात भाषण बंद करून सभागृहबाहेर धूम ठोकली. अध्यक्षस्थानी असलेल्या नवाब मलिक यांनी सदस्यांना वेळेचे भान ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, सदस्य आपले ऐकत नाहीत, तेव्हा संसदीय कार्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच निर्णय घ्यावा, असे सूचवले. थोरातही सदस्यांना थोपवू शकले नाहीत तेव्हा प्रत्येकाने समजून उमजून आवरते घ्यावे, असे मलिक यांनी सांगितले. शेवटी सदस्यांना आवरते घ्यायला लावून मुख्यमंत्र्यांचे उत्तर ऐकणे भाग पडले.

Read more...

Friday, July 29, 2011

उमाळा बिल्डरांचा..


बॉम्बस्फोट आणि वारकरी अपघात या प्रकरणी ढेपाळलेले विरोधक गुरुवारी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होतील, असे वातावरण सुरुवातीला निर्माण केले होते. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांच्या अंगाशी आला.


बॉम्बस्फोट आणि वारकरी अपघात या प्रकरणी ढेपाळलेले विरोधक गुरुवारी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होतील,असे वातावरण सुरुवातीला निर्माण केले होते. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांच्या अंगाशी आला. विरोधी सदस्यांना गिरणी कामगारांचा उमाळा आहे की, बिल्डरांचा असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. गिरण्यांच्या जमिनी खरेदी करणारे कोण, या सत्ताधा-यांच्या प्रश्नावर विरोधकांची बोलतीच बंद झाली. कारण युतीच्या अनेक नेत्यांनी गिरण्यांच्या जमिनी खरेदी करून उत्तुंग इमारती उभारल्या. त्यातले एकही घर गिरणी कामगाराला मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांच्या संघटनांना पाठिंबा देऊन मोर्चा काढला खरा, पण सभागृहात कामगारांऐवजी त्यांना बिल्डरांचाच उमाळा असल्याचे चित्र उमटले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली. विधानसभेत अध्यक्ष विराजमान होण्याआधीच विरोधक वेलमध्ये जमा झाले. अध्यक्षांचे आगमन होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सुटला नसल्याबद्दल निषेधाचे फलक फडकवले. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करून प्रश्नोत्तरे पुकारली. मात्र विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी आणि त्यासाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी अध्यक्षांनी चर्चेची तयारी दर्शवताना, प्रथम प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करू आणि त्यासाठी सर्व सदस्यांनी आपल्या जागेवर बसावे, अशी सूचना केली. मात्र सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवताना नेहमीच्या जागेवर न बसता अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये बसण्याचे ठरवले. सदस्य वेलमध्येच बसल्याने अध्यक्षांनी, ‘‘आज जेथे बसलात तेथेच उद्यापासून बसावे, प्रत्येकाने आपापल्या जागा लक्षात ठेवाव्यात,’’ असे सांगून त्यांची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सुरेशदादा जैन सहका-यांसोबत वेलमध्ये बसण्यासाठी पुढे आले. मात्र, अध्यक्षांनी त्यांना रोखले. ‘दादा तुम्ही कशाला त्यांच्याबरोबर वाहत जाताय, तुम्ही तुमच्या जागेवर बसा’, असे अध्यक्षांनी सांगताच दादा जागेवरच बसले. त्यानंतर भाजपचे आमदार सरदार तारासिंग पुढे येऊ लागले तेव्हा अध्यक्षांनी ‘सरदार तारासिंग तुम्ही देशाचे नेते आहात, तुम्ही तुमच्या जागेवर बसा’, अशी खिल्ली उडवत भाजपचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांना ‘तुम्ही उत्कृष्ट संसदपटू आहात, तुम्हीही जागेवर बसा’, असे सांगताच ते जागेवरच उभे राहिले. शेवटी सभागृहात विरोधकांच्या घोषणा वाढल्या तेव्हा सत्ताधारी सरसावले. ‘गिरण्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या शिवसेना, भाजप, मनसे नेत्यांची नावे जाहीर करा’,अशी मागणी करून राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी विरोधकांची तोंडे बंद केली.

विधान परिषदेतही गिरणी कामगारांच्या प्रश्नावरून स्थगन प्रस्ताव देण्यात आला. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न गंभीर असल्याची आम्हालाही जाणीव आहे. या मुद्दय़ावर चर्चा झालीच पाहिजे. मात्र
, प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा, अशी भूमिका मांडली. त्यानंतरही विरोधकांनी आग्रह धरला असता, सभापतींनी त्यांना आपल्या दालनात चर्चेला बोलावले. चर्चा लवकर पूर्ण न झाल्याने सहा वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. शेवटी सभागृहात आल्यानंतर विरोधकांनी गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, अशा घोषणा दिल्या. सरकारने दिवसभराचे कामकाज उरकून घेतले आणि सभापतींनी सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब केली. कामकाज तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी, विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांची घोषणा होती, ‘चर्चा नको घरे द्या’, त्यावर सत्ताधारी प्रत्त्युतर देत होते, ‘गिरण्यांच्या जमिनी लाटणा-या नेत्यांचा धिक्कार असो.’ सत्ताधा-यांच्या या आरोपावर विरोधकांकडे उत्तर नव्हते.

Read more...

Thursday, July 28, 2011

कुठे आहेत वार-करी?


गृहमंत्री आबा पाटलांनी एक पाऊल पुढे टाकत दारुडय़ाला वाहन चालक ठेवणा-या मालकाचीही चौकशी करू, असे सांगून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून टाकली. मालकाची चौकशी ऐकून सगळेच अवाक झाले. सगळी ‘मिलीजुलीभगत’ असल्याचे चित्र असून, सरकारवर हल्ला करणारे वार-करी कुठे आहेत, असा प्रश्न पडला आहे.


शेगावच्या गजानन महाराजांची पालखी-दिंडी नेहमीप्रमाणे निघाली होती. मजल-दरमजल करत त्यांना शेगाव गाठायचे होते. पंढरपूरहून परतीच्या मार्गाने शेगावकडे निघालेले वारकरी विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसले होते. हरिनामात मग्न असलेल्या बेसावध वारक-यांवर एक भरधाव कंटेनर गेला आणि त्याने अकरा वारक-यांचा जागीच बळी घेतला. अनेकांना जखमी केले. वारक-यांना असा भयानक अपघात घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. जवळच असलेल्या गावातील गावक-यांनी केलेली संतप्त दगडफेक, मोटारगाडय़ांची जाळपोळ असे प्रकार घडले आणि परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागली. लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार या पोलिसी आयुधांचा वापरही झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मात्र एवढय़ा मोठय़ा दुर्घटनेनंतर विधिमंडळात रणकंदन होईल आणि विरोधी पक्ष एकजुटीने सरकारवर तुटून पडतील, अशी अपेक्षा होती. ती संपूर्णपणे फोल ठरली. बॉम्बस्फोटाची चर्चा गांभीर्याने झाली नाही, तोच प्रकार या दुर्दैवी घटनेबाबतही घडला.

विरोधी पक्षांकडे या संबंधीच्या स्थगन प्रस्तावाबाबत कोणतेही डावपेच नव्हते. बॉम्बस्फोटासंबंधी दोन तासांच्या निश्चित कालावधीची चर्चा सरकारला मान्य करायला लावून मतदान घेण्याचा आग्रह विरोधकांकडून धरला जाईल अथवा किमान सभात्याग तरी केला जाईल, असे वाटले होते. पण तसे काही घडले नाही. उलट विरोधकांमध्ये फूट दिसली. एकटय़ा मनसेने हे प्रकरण लावून धरले. बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, नितीन भोसले आदींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. एवढा अपवाद वगळला तर अपघातप्रकरणी स्थगन प्रस्तावावर दोन तासांची चर्चा घेतली खरी पण त्यावर पोटतिडकीने बोलणे तर सोडाच मतदान मागण्यासाठीही विरोधी पक्षनेते उभे राहिले नाहीत. निरपराध, बेसावध लोक बॉम्बस्फोट होऊन ठार होतात. ट्रक, कंटेनर यासारखी अवजड वाहने त्यांना चिरडतात, राज्यात खून, दरोडे, बलात्कार अशा घटना राजरोस,दररोज घडत आहेत, लोकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी लोकांची बाजू घेऊन तळमळीने उभा राहणारा आणि सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष आहे तरी कुठे, असा प्रश्न पडतो.

वारक-यांच्या स्थगन प्रस्तावानिमित्ताने राज्यातील रस्ते सुरक्षा किती ढासळली आहे, दररोज किती अपघात होत आहेत,त्याची कारणे कोणती आणि अपघात टाळण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली यावर भर देण्याऐवजी विरोधक आपण कसे गजानन महाराजांचे भक्त आहोत. आपल्या खिशात गजानन महाराजांचा फोटो आहे. आपण नेहमी कसे वारीला जातो,असे हे सांगण्यात विरोधकांनी धन्यता मानली. त्यामुळे स्थगन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही वारीला जात असतो, हे सांगण्याची संधी सोडली नाही. बॉम्बस्फोटप्रकरणी उत्तरामध्ये त्यांनी जसे करमणूक प्रधान भाषण केले तसाच गांभीर्याचा अभाव बुधवारीही दिसला. बॉम्बस्फोटांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी न करता सरकारवर विश्वास दाखवणारे आणि वारकरी अपघातप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणारे विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी सरकारवर वार करणार तरी कसे? कोणत्या प्रकरणात काय मागणी करायची याच्या अभ्यासाचा अभावही दिसला. दारू पिऊन गाडी चालवणा-यांची न्यायालयीन चौकशी ती काय करणार? त्यावर कडी म्हणजे गृहमंत्री आबा पाटलांनी एक पाऊल पुढे टाकत दारुडय़ाला वाहन चालक ठेवणा-या मालकाचीही चौकशी करू, असे सांगून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमून टाकली. मालकाची चौकशी ऐकून सगळेच अवाक झाले. सगळी ‘मिलीजुलीभगत’ असल्याचे चित्र असून,सरकारवर हल्ला करणारे वार-करी कुठे आहेत, असा प्रश्न पडला आहे.

Read more...

Wednesday, July 27, 2011

विनोदांचे स्फोट


‘बडे शहरोंमे ऐसे छोटे-छोटे हादसे होते रहते है.’26/11 च्या बॉम्बस्फोटासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उच्चारलेले हे वाक्य देशभरात फेमस आहे. मंगळवारी त्या वाक्याची पुनरावृत्ती आर. आर. पाटील यांनीच केली आणि स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली.


जै‘बडे शहरोंमे ऐसे छोटे-छोटे हादसे होते रहते है.’26/11 च्या बॉम्बस्फोटासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उच्चारलेले हे वाक्य देशभरात फेमस आहे. मंगळवारी त्या वाक्याची पुनरावृत्ती आर. आर. पाटील यांनीच केली आणि स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली. आजपर्यंत सर्वच स्तरावर लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली गेली. आर. आर. आबांनी मोठय़ा अभिमानाने सभागृहात या वाक्याची पुनरावृत्ती करताना सांगितले की, माझ्या लहान भाच्याने माझ्या शैलीत हेच वाक्य ऐकवून माझी नक्कल करून दाखवली. या त्यांच्या विधानावर सभागृहात एकच हास्यास्फोट झाला.

मुंबईवरील भीषण बॉम्बस्फोटाचे पडसाद विधिमंडळात अत्यंत तीव्रतेने आणि गांभीर्याने उमटतील, या प्रकरणावर साधक-बाधक चर्चा होईल आणि सरकारकडून ठोस उपाययोजना जाहीर होतील, ही अपेक्षा फोल ठरली. बॉम्बस्फोटांवर सुमारे पाच तास चर्चा झाली. पण चर्चेचे फलित काय, हे कुणालाच समजू शकले नाही. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांकडून अपेक्षित गांभीर्य कुठेच दिसले नाही. बाष्फळ चर्चा, विनोद आणि एकमेकांवर कोटय़ा करून चर्चेला सदस्यांनी खालच्या पातळीवर नेऊन ठेवले. यावर गृहमंत्री आबा पाटलांनी कळस चढवला. ‘मी हिंदी भाषेत बोलायचे नाही,असे ठरवले आहे. कारण, लोक नक्कल करतात. त्यामुळे कमी बोलायचे ठरवले आहे.’ बॉम्बस्फोटाची सूचना गुप्तचर खात्याकडून मिळाली नाही हे गुप्तचर आणि संपूर्ण गृहखात्याचे अपयश असल्याची टीका झाली. स्वत: केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील गुप्तचर यंत्रणांना ही सूचना मिळालेली नव्हती, असे स्पष्ट सांगितले होते. तरीदेखील यासंबंधीच्या टीकेला उत्तर देताना आबा पाटलांनी विनोदाची कमाल केली. ते म्हणाले, बॉम्बस्फोटांचा कट आंतरराष्ट्रीय असतो. खबऱ्यांना कसा कळेल? ते माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानात जातील का?

आबांच्या या प्रतिप्रश्नांची चांगली खिल्ली उडवली जात होती. अमेरिकेत 9/11झाले तेव्हा अमेरिकेतील खब-यांनी मेट्रो रेल्वेचे तिकीट काढून पाकिस्तानात माहिती घेण्यासाठी जायला हवे होते का, असा प्रश्न जॉर्ज बुश यांनीही विचारला होता का, अशी मार्मिक प्रतिक्रिया उमटली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येनंतर गुन्हेगार पुरावे सोडत नाहीत ते हुशार झाले आहेत पण तरीही आम्ही गुन्हेगार शोधून काढू, असे माध्यमांना सांगितले. पण त्यांनी ‘गुन्हेगार पोलिसांपेक्षा स्मार्ट’ अशी बातमी केली. त्याला मी काय करू, असे आबांनी विचारताच सभागृहात पुनश्च हास्यास्फोट झाला. राम प्रधान समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली नाही, त्याची कबुली देताना त्यांनीही चर्चेसाठी आपल्याला चार ओळीचे पत्र पाठवले नाही,असे सांगून आबांनी पुन्हा टीका ओढवून घेतली.
 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा अभ्यास करण्यासाठी आपण लंडनला टीम घेऊन जाऊ आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनाही नेऊ, असे सांगताना आबा आणखीच घसरले. ते म्हणाले, तेथे आम्ही दोघे आमच्या खर्चाने जाऊ. जनतेच्या खर्चाने जाणार नाही. सरकारच्या खर्चाने गेलो तर आमच्या लंडनवारीची बातमी छापली जाईल. त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला. शेवटी तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनाच साकडे घातले की, आता तुम्ही सांगा मी काय करू? खूप बोललो तर प्रसिद्धीसाठी आणि नाही बोललो तर बोलत का नाही, असे म्हणतात. एकंदरीत बॉम्बस्फोटावरील चर्चेवर सर्वात जास्त विनोदाचे स्फोट दस्तुरखुद्द आबा पाटील यांनीच केले. त्या विनोदाने भारावलेल्या विरोधी पक्षांना सभात्याग करण्याचेही भान राहिले नाही. गृहमंत्री आबा आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दुपारी एकत्र भोजन केले होते. त्या स्नेहभोजनाचा तर हा परिणाम नव्हता ना?

Read more...

Tuesday, July 26, 2011

प्रथा, परंपरांची ऐशीतैशी


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेने वेगळाच पायंडा पाडला. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमताने सभागृहाच्या प्रथा, परंपरांचे उल्लंघन केले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेने वेगळाच पायंडा पाडला. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमताने सभागृहाच्या प्रथा, परंपरांचे उल्लंघन केले. आजवर बॉम्बस्फोटातील मृतांना अथवा अन्य संकटात मृत्यू पावलेल्यांना तसेच विधिमंडळाच्या दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव सभागृहाच्या नेत्यांनी म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी मांडण्याची प्रथा आहे. पण प्रसंगाचे गांभीर्य पाहता विधानसभेत अध्यक्षांनी तर विधान परिषदेत सभापतींनी हा शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्तावानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्याची आजपर्यंतची परंपरा आहे. आज मात्र या परंपरेलाच दोन्ही बाकांवरील सदस्यांनी हरताळ फासला. बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभागृहाचे कामकाज बंद होणे अपेक्षित असताना सरकारने सरकारी कामकाज उरकून 
घेतले.

मुख्य म्हणजे सरकारच्या या काम दामटवून नेण्याच्या प्रकाराला विरोधी पक्षनेत्यांनी साधा आक्षेपही घेतला नाही. बॉम्बस्फोटात चोवीस निरपराध मृत झाले आहेत. मुंबईवरील हा दुर्दैवी हल्ला तसेच विधानसभेचे विद्यमान सदस्य रमेश वांजळे यांचे अकाली निधन यामुळे हे दोन्ही शोकप्रस्ताव सभागृहात येणे अपेक्षितच होते. सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासासह सर्व कामकाज रद्द करून शोकप्रस्ताव घेण्याची सूचना केली. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेत्यांची सूचना मान्य करत बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला. सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने आपण स्वत: हा ठराव मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्याला अनुमोदन दिले आणि सभागृहाने एकमताने पहिला शोकप्रस्ताव मंजूर केला.

विधानसभेचे विद्यमान सदस्य रमेश वांजळे यांच्यासह अन्य काही माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसरा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मांडणार होते. त्यांनी तो मांडण्यास सुरुवात केली असता, त्यांच्या बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले आणि अगोदर सरकारी कामकाज करावे असे सांगितले. त्याचबरोबर अध्यक्षांनाही त्यांनी तशी विनंती केली. त्यावर अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अजितदादांची विनंती तत्परतेने मान्य करून कामकाज पुकारले. एक शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आणि दुसरा प्रस्ताव मांडायचा असताना मध्येच कामकाज करण्याची प्रथा नाही. मात्र अजितदादांची सूचना डावलणे अध्यक्षांनाही शक्य झाले नाही. तातडीने कामकाज सुरू करण्यात आले. अशी प्रथा-परंपरांची पायमल्ली होत असताना विरोधी पक्षांपैकी एकानेही त्याला साधी हरकतही घेतली नाही. शोकप्रस्तावावर गटनेत्यांसह दिवंगत सदस्यांच्या मतदारसंघातील सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. पण सोमवारी दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि पुरंदर जेजुरीचे आमदार विजय शिवतारे यांना बोलण्यासाठी झगडावे लागले. याला काय म्हणावे?


कामकाज आटोपल्यानंतर रमेश वांजळेंसह इतर दिवंगत सदस्यांना श्र
द्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. प्रत्यक्षात सरकारने पुरवणी मागण्यांसह अन्य कामकाजही उरकून घेतले होते. फक्त प्रश्नोत्तराचा तास, जो विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो, संपूर्ण राज्यातील प्रश्नांची माहिती सभागृहाला मिळते, सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा घेण्याची संधी विरोधकांना मिळते, एवढा महत्त्वाचा हा तास मागे राहिला, तोही विरोधकांच्या बेजबाबदारपणामुळे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारपुढे नमते घेतले, हा विरोधकांचाच पराभव नव्हे काय?

Read more...

Monday, July 25, 2011

अधिवेशनात निर्णयांचा पाऊस पडेल का?


मंत्रालयाची आणि प्रशासकीय कारभाराची स्वच्छता सोडा, शासनाचा कारभार गतीने होत असेल तर लोकांना काही प्रमाणात दिलासा तरी मिळेल. वाढती गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले, अतिवृष्टीसारखी नैसर्गिक संकटे यामुळे असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये आहे. अशा वेळी सरकारकडून अधिक अपेक्षा वाढलेल्या असतात. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निर्णय जलदगतीने होणे आवश्यक आहे. तेच होत नसल्याने सर्वत्र मरगळ आली आहे. आजपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात निर्णयांचा पाऊस पडू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील संबंध ताणले गेले असल्याचे चित्र निर्माण झाले असताना नुकत्याच झालेल्या राज्यसभा पोटनिवडणुकीत मात्र आघाडीची एकजूट भक्कम असल्याचे दिसून आले. आघाडी सरकार मजबूत असल्याचा संदेश या पोटनिवडणुकीत दिला असला तरी राज्यापुढील प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत मात्र विसंवाद वाढत चालला आहे. जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांकडे तळमळीने पाहिले जात नसल्याने जनता हवालदिल  अन् सरकार हताश असे काहीसे वातावरण दिसू लागले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गलिच्छ गलथान कारभाराचे प्रतिबिंब मुंबई शहरावर पडले असून हे शहर अधिकाधिक बकाल होत चालले आहे. त्याचेच अनुकरण मंत्रालयात होत आहे की काय, असे वाटू लागले आहे. आघाडी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर ‘स्वच्छ प्रशासन, गतिमान शासन’ असा नारा देण्यात आला होता. आता प्रशासनही स्वच्छ नाही आणि शासनही गतिमान नाही. किमान मंत्रालय तरी स्वच्छ करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे मंत्रालय  कसे कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे स्वच्छ, सुंदर, चकचकीत असेल, असा कोणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. मंत्री, राज्यमंत्री आणि सचिवांची दालने वगळता संपूर्ण मंत्रालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आरसागेट आणि गार्डनगेटकडून मंत्रालयात गेलो तर नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. प्रत्येक मजल्यावर काळोख आणि कळकट मळकट धुळीने भरलेल्या फायलींच्या ढिगा-यानेच आपले स्वागत होईल. वर्षाचे बारा महिने कोणत्या ना कोणत्या मंत्र्याच्या दालनाचे नूतनीकरण सुरू असते, पण इतर कार्यालयाकडे प्रशासनाचे विशेषत: ज्यांच्याकडे स्वच्छता राखण्याचे काम आहे त्या सार्वजनिक  बांधकाम विभागाचे आणि सामान्य प्रशासन विभागाचे लक्ष नाही. मंत्रालयात अनेक विदेशी शिष्टमंडळे येत असतात. त्यांच्यासमोर असलेला मंत्रालयाचा पसारा आणि अस्वच्छता पाहून ते आपल्याबद्दल काय मत करून घेतील याची कोणीही दखल घेत नाही. खरे तर गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आणि ग्रामविकास स्वच्छतामंत्री  म्हणून लोकप्रिय झालेल्या आर. आर. पाटील यांच्याकडे पूर्वीचे खाते द्यावे म्हणजे मंत्रालयात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ते राबवतील आणि मंत्रालय स्वच्छ तरी करतील.

वाढती गुन्हेगारी, दहशतवादी हल्ले, अतिवृष्टीसारखी नैसर्गिक संकटे यामुळे असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये आहे. अशा वेळी सरकारकडून अधिक अपेक्षा वाढलेल्या असतात. पण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निर्णय जलदगतीने होणे आवश्यक आहे. तेच होत नसल्याने सर्वत्र मरगळ आली आहे. आजपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात निर्णयांचा पाऊस पडू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशा प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर जास्त जबाबदारी येते. पण मुख्यमंत्र्यांचेच नियंत्रण नसेल तर सगळा कारभारच ढिसाळ होऊन जातो. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्र सरकारमधून राज्यात आले आहेत. त्यांची कार्यपद्धती निराळी आहे. त्यातच ते ज्या परिस्थितीत इथे आले ती ‘आदर्श’ परिस्थिती पाहता स्वच्छ राज्य कारभारासाठी त्यांची इथे पाठवणी झाली होती हे ही सर्वाना माहीत आहे. स्वच्छ कारभार द्यायचा तर डोळय़ात तेल घालून अधिक सतर्कतेने काम करावे तसेच आधीच्या मुख्यमंत्र्यांचे दुधाने तोंड भाजले म्हणून आपण ताक फुंकून प्यावे,असे पृथ्वीराज बाबांना वाटले असावे पण त्याचा अर्थ रात्र-रात्र डोळय़ात तेल घालून फायलींचा अभ्यास करणे आणि ताक बर्फासारखे थंडगार करून पिणे असा होत नाही. ‘आधीचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या इंटरेस्टच्या फायली तर काढायचे पण पृथ्वीबाबांना तर कसलाच इंटरेस्ट नसल्यामुळे ते राज्याच्या इंटरेस्टच्यापण फायली काढत नाहीत’ अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटू लागली आहे. मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी सगळेच असे बोलू लागले आहेत. गतिमान शासन कसले,गतीच थांबली आहे, अशी चर्चा मंत्रालयात करू लागले आहेत.

लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील कामांची पत्रेही हातावेगळी केली जात नाहीत. वर्ग एक, वर्ग दोन अधिका-यांचीच नव्हे तर सचिव, प्रधान सचिवांच्या बदल्या आणि नियुक्त्याही लवकर होत नसल्याने मंत्रालयातील कारभारात एक प्रकारची मरगळ आली असल्याचे जाणवते. कामाला गती असेल तरच उत्साह आणि चैतन्य वाढेल अन्यथा निरुत्साहाचे वातावरण वाढत जाईल. प्रत्येक फाईल, प्रत्येक पत्र आणि प्रत्येक नियुक्तीबाबत शंका घेऊन निर्णयास विलंब झाला तर कोणालाच काम करणे शक्य होणार नाही. मुंबई शहराची सुरक्षितता, शहराचा विकास, गिरणी कामगारांची घरे, म्हाडांच्या घरांचा प्रश्न,मॅक्सीकॅब, शेतीचे प्रश्न, सामाजिक न्यायाचे प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

गेल्या सप्ताहात मॅक्सीकॅबच्या प्रश्नावरून मंत्रिमंडळात बरीच वादावादी झाल्याचे समजले.  मुख्यमंत्री चव्हाण यांनी मॅक्सीकॅबला परवाने देऊन खासगी वाहतुकीला शासन मान्यता देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणला होता. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव लागोपाठ तीन मंत्रिमंडळ बैठकांमध्ये मांडला होता आणि बहुसंख्य मंत्र्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. गावोगावी अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याने एसटी गाडय़ांच्या पोटावर पाय दिला जात आहे अशी भूमिका घेऊन उभ्या राहिलेल्या एसटी कामगार संघटनांना मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. खाजगी मॅक्सीकॅबवर परवानाशुल्क आकारून 150 कोटी रुपये मिळतील. त्यातून एसटीची वाहतूक सेवा सुधारता येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. पण एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांच्यासह सर्व वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी एसटी महामंडळाच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांचा चांगलाच गोंधळ उडाला असावा त्यामुळे त्यांनी मंत्र्यांच्या उपसमितीवर हा निर्णय सोपविला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची नियुक्ती केली खरी पण त्या प्रसन्नांनी जिल्ह्यातील अवैध वाहतूक बंद करून टाकली. जिल्ह्यातील खाजगी वाहतुकीला येथील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचा आशीर्वाद असून लोकप्रतिनिधींनीच वाहतूक बंदीविरुद्ध आवाज उठविल्याने मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव आणला होता. गाव तिथे एसटी ही सर्वसामान्यांची वाहतूक सेवा, आशिया खंडात सर्वात यशस्वी सेवा म्हणून प्रसिद्धी पावली आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी, अपंग, दलित मित्र अशा 25 घटकांना एसटी तिकीटदरात सवलत दिली आहे. या सवलतीचे पैसे सरकारने भरावयाचे असताना ते वेळेवर भरले जात नाहीत, सवलतीपोटी सरकारने 965 कोटी रुपये देणे आहे,मॅक्सीकॅबच्या अवैध वाहतुकीमुळे एसटीला 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तेव्हा ही अवैध वाहतूक बंद करावी, अशी रास्त मागणी केली जात आहे. परंतु काही पुढा-यांच्याच आणि कार्यकर्त्यांच्या मॅक्सीकॅब असल्यामुळे विरोध वाढत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यानेच त्यांना वेठीस धरले आणि सर्वाच्या विरोधाने त्यांची कोंडी झाली. मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव तीन वेळा डावलला जाणे हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेलाच धक्का आहे, पण विषयाची पूर्ण माहिती नसल्याने गफलत झाली. अशा प्रकारे प्रत्येक प्रस्तावावर वादविवाद होत असतील तर निर्णय होणारच नाहीत. मॅक्सीकॅबच्या प्रस्तावापासून सरकारने धडा घेतलेला बरा. सरकारच्या सुदैवाने विरोधी बाकावर बसणा-या शिवसेना-भाजप युतीची कामगिरी अत्यंत सुमार असून त्यांची आक्रमकता व प्रभाव कमी झाला असल्याने सरकारला चांगले काम करून दाखविण्याची संधी आहे. या संधीचा सरकार कसा उपयोग करील ते दिसून येईलच.

Read more...

Monday, July 18, 2011

अन्यथा बॉम्बस्फोटाचे संकट अटळ

कोणत्याही विभागाचे यश हे त्या विभागाच्या नेतृत्वावर अवलंबून असते. नेतृत्वातच धमक नसेल तर प्रशासनावर पकड येणार कोठून? त्यामुळे गृहविभागाच्या एकूण कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जो विभाग आवश्यक तेवढे पोलिस बळ देऊ शकत नाही, तो विभाग सुरक्षिततेची दुसरी उपाययोजना कशी काय करू शकेल.?त्याचबरोबर ज्या देशामध्ये धर्म, जाती, वंश, पंथ, भाषा, प्रांत यावरून वादंग निर्माण केले जातात,?हिंदुत्वाचे ढोल बडवून दोन धर्मात दरी वाढविण्याचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले जाते. त्यामुळे एकत्रितपणे दहशतवादाचा सामना करण्यास येथील वातावरण अनुकूल नाही, हेही दिसून येत आहे.

मुंबईत बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि जागतिकआर्थिक केंद्र बनणारे मुंबई शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असणारहे केंद्र आणि राज्य सरकारच्या गृहविभागाला कोणी सांगण्याची गरज नाही. 12 मार्च 1993 सालच्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेनंतर 13 जुलै 2011 पर्यंत मुंबई शहरात 13 बॉम्बस्फोट झाले आहेत. पण सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याबाबत सरकार अपयशी ठरले आहे. या राज्याचा गृहविभाग आणि गृहमंत्री अत्यंत अकार्यक्षम असल्याची पहिली प्रतिक्रिया बॉम्बस्फोटानंतर उमटली. मुंबईकरांनी यापुढे बॉम्बस्फोटांची सवय करून घ्यावी आणि मरणाला सामोरे जावेअशी दुसरी प्रतिक्रिया उमटली. दहशतवाद हा जागतिक पातळीवरचा आहे. केवळ भारतावरच दहशतवादी हल्ले होत आहेतअसे नाही. जगभरात युरोपअमेरिकेसह अनेक देशांवर हे हल्ले होत आहेतच पण हे हल्ले थोपवण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी तेथील पोलिस यंत्रणा आणि सरकार सक्षम असल्याचे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे. आपल्याकडे मात्र गृहविभाग कृतीशून्य बनला आहे.

कोणत्याही विभागाचे यश हे त्या विभागाच्या नेतृत्वावर अवलंबून असते. नेतृत्वातच धमक नसेल तर प्रशासनावर पकड येणार कोठूनत्यामुळे गृहविभागाच्या एकूण कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जो विभाग आवश्यक तेवढे पोलिस बळ देऊ शकत नाहीतो विभाग सुरक्षिततेची दुसरी उपाययोजना कशी काय करू शकेल.?त्याचबरोबर ज्या देशामध्ये धर्म,जातीवंशपंथभाषाप्रांत यावरून वादंग निर्माण केले जातात.?हिंदुत्वाचे ढोल बडवून दोन धर्मात दरी वाढविण्याचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले जाते. त्यामुळे एकत्रितपणे दहशतवादाचा सामना करण्यास येथील वातावरण अनुकूल नाहीहेही दिसून येत आहे. दहशतवाद वाढला कसातो कोणत्या मानसिकतेतून पोसला गेला आहे. दहशतवादी निर्माण करणाऱ्या पाकिस्तानअफगाणिस्तानसारख्या देशात सामाजिकआर्थिकधार्मिक आणि राजकीय परिस्थिती कशी आहे यावर गांभीर्याने विचार करून उपाययोजना करण्याऐवजी परिस्थिती चिघळेल कशी यावरच भर देण्याचे काम होत आहे. केंद्रामध्ये काँग्रेसप्रणित आघाडीचे लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष सरकार असल्यामुळे लोकशाहीवादी देशांचा आपल्याला पाठिंबा मिळाला आहे. बॉम्बस्फोटानंतर इंग्लंडअमेरिकेसह इंडोनेशियाइजिप्तइराणसारखी लोकशाही मानायला लागलेले देशही दहशतवादाविरुद्ध आपल्यामागे उभे राहिले आहेत. भाजपप्रणित आघाडीचे हिंदुत्ववादी सरकार आणि कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि तेवढेच कडवे हिंदुत्ववादी शिवसेनेसारखे पक्ष सरकारमध्ये असल्याने त्यावेळी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होताहे विसरून चालणार नाही.

दहशतीने देशात अस्थिरता निर्माण करणेदेशांच्या सत्तेवर अंमल करणेधर्माधता वाढविणे याकरिता पाकिस्तान,अफगाणिस्तान या आपल्या शेजारी देशांनी अनेक दहशतवादी संघटनांची पाठराखण केली आहे. अंमली पदार्थाचा व्यापार करणारे अनेक ड्रग्ज माफिया शस्रस्र्े खरेदी आणि अतिरेकी संघटना चालवण्यासाठी पैसा पुरवत आहेत. कुटुंबाची जबाबदारी घेतली की जिवावर उदार होण्यासाठी तरुणांना उद्युक्त केले जाते. तशी मानसिकता तयार व्हावी यासाठी शिक्षण देणेशस्रस्रंचे प्रशिक्षण देणेत्यांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देणे आणि दहशतवादी कृत्य करण्यास सिद्ध करणे यासाठी जगभरात मोठमोठय़ा यंत्रणा कार्यरत असूनप्रचंड प्रमाणात काळय़ा पैशाचा वापर होत आहे. ही यंत्रणा एवढी सामर्थ्यशाली बनली आहे कीमोठमोठय़ा बलाढय़ राष्ट्रांनाही हुलकावण्या देऊन त्या राष्ट्रांमध्ये दहशत पसरवून त्यांना आव्हान दिले जात आहे. धर्माधता आणि दारिद्रय़ यामुळे तरुणपिढी पैशाच्या आमिषाला बळी पडत आहे. या भयानक प्रकाराने पाकिस्तानने एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त केली आहे. या दहशतवाद्यांना हवे असलेले सहकार्य आपल्या देशातून मिळत आहे. त्याचीही कारणे नेमकी हिच आहेत. कडवा धर्मवाद आणि दारिद्रय़ ही परिस्थती येथेही असल्यामुळे शेजारच्या देशातून आलेल्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर हवी असलेली मदत मिळत आहे. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला खऱ्या अर्थाने करायचा असेल तर येथील समाज घटकांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे.
धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईलअसे वातावरण होणार नाहीयासाठी दक्ष असले पाहिजे. सर्व स्तरांतील समाज घटकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर देशात कडक सुरक्षा राखण्यासाठी पोलिस दल आणि गुप्तचर यंत्रणा सक्षम असल्या पाहिजेत. या दोन्ही बाबींकडे सत्ताधा-यांकडून पुरेसे लक्ष दिले जात तर नाहीच पण विरोधी पक्षही जबाबदारीने वागण्याऐवजी मतांवर डोळा ठेवून आरोपांच्या फैरी झाडत आहे.

बॉम्बस्फोटाची पूर्वसूचना गुप्तचर यंत्रणेला मिळाली नाहीअसे देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. खरोखरच पूर्वसूचना मिळाली नसेल तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणावे लागेलपण गुप्तचर यंत्रणा आणि सरकारचा कारभार यावर टीकास्र् सोडणारे विरोधी पक्षांचे नेते प्रसंगाचे गांभीर्य ठेवून विधायक सूचना करू शकले नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात रुग्णालयाबाहेर घोषणा देणाऱ्या राज पुरोहित आणि भाजप कार्यकर्त्यांबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय नेते अडवाणी यांनी तर दहशतवादापासून देश मुक्त करण्यासाठी नवे सरकार निवडण्याची संधी द्याअसे सांगून मध्यावधी निवडणुकांचीच मागणी केली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सरकारला नैतिक बळ देण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी मध्यावधी निवडणुकांची मागणी करणेहास्यास्पद आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी दहशतवाद रोखण्यास 99 टक्के यश आले असल्याचे विधान करताच त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी विरोधी पक्षांसह प्रसारमाध्यमांमध्ये देखील अहमहमिका लागली होती. परंतु दहशतवाद रोखण्यास शंभर टक्के यश अद्याप मिळालेले नाहीअसे वास्तववादी विधान त्यांनी केले असेल तर चुकले कुठेवास्तवाचे भान असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही. निव्वळ कल्पना करून स्वप्न रंजनात रमणारे विधायक काम करू शकत नाहीत. राहुल गांधींवर सर्व बाजूंनी हल्ला होताना काँग्रेसवाले मात्र चिडीचूप होते. अर्थात ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नव्हती,पण अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात काँग्रेस पक्षाने आपली ठाम भूमिका मांडली पाहिजे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृह आणि अर्थ खाते काँग्रेस पक्षाकडे असले पाहिजेअसे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाकडे ही महत्त्वाची खाती असावीतअशी प्रथा सर्वच आघाडय़ांच्या सरकारांमध्ये आहेअसे त्यांनी म्हटले होते.बॉम्ब स्फोटानंतर गृहविभाग आणि गृहमंत्री पाटील यांच्यावर सर्व बाजूने टीका झाली तेव्हा काँग्रेस पक्षातील नेत्यांनी खाजगीत बोलताना याचा पुनरुच्चार केला आणि आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. त्यावर काँग्रेसने सावध पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना तसे म्हणायचे नाहीअसे खुलासे देण्यास सरुवात केली. वास्तविक काँग्रेसने असा बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही. गृहमंत्री आणि हा विभाग जर सक्षम नसेल आणि टीकेचे लक्ष्य बनले असेल तेव्हा त्यात बदल करण्याचा विचार  मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला असेल तर त्यात गैर काय राजकीय अभिनिवेश बाजूला सारून दहशतवादाचा मुकाबला करावा लागेल अन्यथा पुन्हा बॉम्बस्फोटाला सामोरे जावे लागेल.

Read more...

Monday, July 11, 2011

अ‍ॅट्रोसिटी कायद्यातून मुक्तीसाठी तंटामुक्ती

तंटामुक्ती योजनेंतर्गत भारतीय दंडसंहितेखाली असलेले दखलपात्र गुन्हे घेता कामा नये, असा नियम असूनही केवळ आपले गाव तंटामुक्त जाहीर व्हावे आणि गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळावा यासाठी गावातील फौजदारी गुन्हेदेखील गावातच मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही गावांमध्ये तर गुन्हा कितीही गंभीर असला तरी आधी गाव तंटामुक्त जाहीर होऊ द्या मग गुन्ह्याचे बघूअसे सांगून तक्रारदारांना गप्प केले जात आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दादर टर्मिनसला द्यायचे की मुंबई सेंट्रलला यावरून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना - भाजप - रिपाइं (आठवले) युती यांच्यातील वाद वाढत चालला आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांची चैत्यभूमी हे भव्य राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी इंदूमिलची बारा एकर जमीन ताब्यात घेण्यावरून सरकारमध्येच वादविवाद होऊ लागले आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे नाव दलित मागासवर्गीयांच्या अस्मितेचा विषय तर आहेच पण त्यांचे नाव देण्याचा भावनिक मुद्दा उचलून इतर प्रश्नांची सोडवणूक तर नाहीच पण साधी चर्चाही करायची नाहीही राजकारण्यांची जुनी चाल आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका समोर दिसत असल्यामुळे दलित मागासवर्गीयबौद्ध व अन्य मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवून नामांतरासारखे भावनिक प्रश्न ऐरणीवर आणले जात आहेत.
गेल्या 1 जुलै रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक मुंबईत आले होते. त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात दिवसभर राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा घेतला. अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांवर सवर्णाकडून होणा-या अत्याचारांमध्ये वाढ होत असून त्या प्रमाणात शिक्षेचे प्रमाण नगण्य असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. तसेच या प्रकारांबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे. अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहेयाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अत्याचारांच्या गुन्ह्यासाठी विशेष न्यायालये त्वरित व्हावीतअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीयांसाठी अनेक योजना सुरू केल्या पण त्यांचा लाभ सर्वापर्यंत पोहोचत नाही,त्याबद्दल वासनिकांनी अधिका-यांची चांगलीच झाडाझडती घेतली.?अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास जातीचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारच्या योजनांचे लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेतपण त्याचबरोबर त्यांना सन्मानाची वागणूकही मिळाली पाहिजे?यासाठी राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आवश्यक आहे. आजकाल नेमका त्याचाच अभाव दिसत आहे.?एवढेच नव्हे तर गावातील सत्ताधारी आणि धनदांडग्यांनी मागासवर्गीयांवर केलेल्या अत्याचारांना वाचा फोडू नये  याकरिता त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.  गृहविभागाच्या तंटामुक्त गाव योजनेने तर अत्याचार दडपून मागासवर्गीयांना न्यायापासून वंचित ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

महाराष्ट्रात गृहविभागाच्या तंटामुक्ती योजनेची अमलबजावणी सुरू आहे. गावेच्या गावे तंटामुक्त होत असल्याचा दावा करून गृहविभाग आपली पाठ थोपटून घेत आहेपण दिव्याखाली अंधार गडद होत चालला असल्याचे अन्याय -अत्याचाराच्या अनेक घटनांनी उघड होत आहे. आठ दिवसांपूर्वीच मराठवाडय़ामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बाजारबाहेगाव या गावात बौद्ध आणि मराठा कुटुंबात किरकोळ कारणावरून भांडण झाले ते तंटामुक्तीद्वारे मिटविण्याचा प्रयत्न झालापण भांडण धुमसत राहिले. त्यामुळे बौद्ध कुटुंबातील खिल्लारे पती-पत्नीने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकाराने संतापलेल्या सवर्णानी जयश्री खिल्लारे या महिलेला तिच्या पतीसमक्ष बळजबरीने मोटारसायकलवर बसविले आणि मोटारसायकलसह तिला नदीत फेकून दिले. चार दिवसांनी तिचा मृतदेह सापडला.

आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण आरोपींना तात्काळ?अटक करण्यात आली नाही. तंटामुक्ती योजनेंतर्गत भारतीय दंडसंहितेखाली असलेले दखलपात्र गुन्हे घेता कामा नयेतअसा नियम असूनही केवळ आपले गाव तंटामुक्त जाहीर व्हावे आणि गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळावा यासाठी गावातील फौजदारी गुन्हेदेखील गावातच मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही गावांमध्ये तर गुन्हा कितीही गंभीर असला तरी ‘आधी गाव तंटामुक्त जाहीर होऊ द्या मग गुन्ह्याचे बघू’ असे सांगून तक्रारदारांना गप्प केले जात आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची पाळी येते,जे तोंड उघडतील त्यांची अवस्था जयश्री खिल्लारेसारखी होण्याची शक्यता असते. तंटामुक्तीच्या नावाखाली गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्यातून मुक्ती मिळविण्यासाठी तंटामुक्तीचा वापर बेमालूमपणे केला जात आहे.

 अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे मागासवर्गीय दुर्बल घटकांना दिलेले कायदेशीर अधिकार तंटामुक्ती योजनेने काढून घेतले आहेत. दलितांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यास आपले पोलिस दलदेखील सक्षम नाहीमुंबई शहरातील पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना अत्याचार प्रतिबंधक कायद्याची पुरेशी माहिती नसतेअसे अधिकारी या कायद्याची योग्य अमलबजावणी करणार कसेकाही दिवसांपूर्वी टाटा सामाजिक संस्था आणि सामाजिक न्याय विभागाने संयुक्तरीत्या दलितांवरील अत्याचारासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होतीया कार्यशाळेमध्ये अनेकांनी जी भूमिका मांडली त्यावरून पोलिसांना या कायद्याची पूर्ण माहिती नसल्याचे तसेच त्यांनाही दबावाखाली काम करावे लागत असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे खाते अपयशी ठरले आहे. मात्र दलितांचे मतांसाठी लांगूलचालन सुरू केले असून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ‘सनद’ घोषित करण्यात आली आहे. सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या तसेच बंद पडलेल्या अशा अनेक योजना एकत्र करून सरकारला ही सनद सादर केली आहे. सनद देता क्षणी त्या संबंधित विषयाची अमलबजावणी सुरू होत असतेपण राष्ट्रवादीची सनद ही कागदी घोडा आहे असेच म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला सनद दिली तर तिची दुस-या दिवसापासून अमलबजावणी केली जात असे. सनद खरी असेल तर गोरगरीब मागासवर्गीयांना जमिनीचे वाटप तात्काळ होईलज्या स्थानकाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्यायचे ते तात्काळ देण्यात येईलचैत्यभूमी विकसित करण्याचे काम तात्काळ मार्गी लागेल पण राष्ट्रवादी काँग्रेसने ढोल बडवून घोषित केलेली सनद सरकारकडे सुपूर्द करण्यात आली. तिची अमलबजावणी केव्हा होणार याबाबत मात्र सुस्पष्टता नाही. गोरगरिबांच्या योजना मार्गी लावाव्यात यासाठी अमर्याद प्रतीक्षा करायला लावणारी सनद कशी काय असू शकते?  

इंदू मिलची जमीन द्यावी लागेल

देशातील लाखो मागासवर्गीयांचे विशेषत: बौद्धांचे श्रद्धास्थान असलेली बाबासाहेबांची चैत्यभूमी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी इंदू मिलची उपलब्ध जमीन सरकारला मिळाली पाहिजे. त्यासाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे पण राष्ट्रीय वस्रेद्योग महामंडळाच्या अखत्यारितील इंदूमिलच्याजमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारणाऱ्या एखादय़ा उद्योगपतीचा बूलडोझर फिरणार असेल तर सर्वप्रथम सरकारने विरोध केला पाहिजे पण सरकार आणि स्वत: मुख्यमंत्री याबाबत कचखाऊ धोरण घेत असतील तर त्यांना लाखो करोडो लोकांच्या प्रचंड विरोधाला तोंड द्यावे लागेल आणि त्याचा फटका काँग्रेसला बसेल. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याची समाधी अथवा स्मारक असेलदिल्लीतील राजघाट किंवा आग्रा येथील ताजमहाल असेल अशा वास्तू शेजारी पंचतारांकित हॉटेल उभारले जात नाहीमग चैत्यभूमीबाबत असा पक्षपातीपणा करणे योग्य ठरणार नाही. चैत्यभूमीसाठी इंदूमीलची सर्व बारा एकर जमीन घेऊन भव्य राष्ट्रीय स्मारक उभे केले पाहिजेत्यासाठी सरकारने कोणतीही तडजोड करू नये. ही जमीन बाजारभावाने घेण्याची वेळ आली तरी मागे हटता कामा नये  सामाजिक न्याय विभागाचे ४०० कोटी रूपये पाटबंधारे विभागाकडे तात्काळ वळविले जाऊ शकतात. मग लाखो करोडोंचे श्रद्धास्थानासाठी तेवढे पैसे गेले तर बिघडले कुठे?

Read more...

Monday, July 4, 2011

रेव्ह सेनेचे प्रताप; स्वाभिमानचा चापरेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे ‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे त्याचा तीव्र निषेध नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.
रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे 
‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे त्याचा तीव्र निषेध नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने  केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. युवासेनेचे हे रेव्ह प्रताप इतक्या स्पष्टपणे पुढे आल्यामुळे उद्धव ठाकरेंचा तीळपापड झाला नसता तरच नवल होते. त्यामुळे त्यांनी नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेतले. पण नितेश राणे त्यांना पुरून उरले आहेत. राज्यभरातील युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी रेव्ह सेनेला चांगलाच चाप दिला आहे. 


काळय़ा पैशाने मुजोर झालेली धनदांडग्यांची मुले-मुली अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असल्याचे वारंवार उघड? झाले आहे. मुंबई-पुण्यात मोठय़ा प्रमाणात पसरलेले हे लोण राज्याच्या इतर शहरांमध्ये पसरण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर येथे  ‘माऊंट व्ह्यू’ रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून धागडधिंगा घालणा-या 231 मुले व 59 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची घटना घडली आहे. चरस, गांजा, कोकेन, एमडीएम असे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 300 मुला-मुलींची रेव्ह पार्टी पोलिसांच्या पाठिंब्याने तर झालीच पण या पार्टीला राजकीय वरदहस्तही लाभल्याचे उघड झाले आहे. शिवसेना युवासेनेची साथ लाभलेली ही रेव्ह पार्टी असल्याचे उघड होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नाकाला अशा मिरच्या झोंबल्या की, त्यांनी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तोंडसुख घेतले. रेव्ह पार्टीचे आयोजक शिवसेना युवासेनेचा रायगड जिल्हा संघटक अपराजित मित्तल आणि त्याचा साथीदार विकी शहा असल्याचे समजताच स्वाभिमान संघटनेने मुंबई विद्यापीठात निदर्शने करून युवासेनेचे सिनेट सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंचा तोल गेला. उद्धव ठाकरेंचा हा थयथयाट पाहून त्यांना नितेश राणे आपले प्रतिस्पर्धी वाटू लागले की काय,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ?लागली आहे.
नितेश राणेंनी देखील ‘हम भी कुछ कम नही’ च्या जोषात उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. रेव्ह पार्टीने मनोबल खच्ची झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिववडापाव समोर नितेश राणेंनी छत्रपती वडापाव हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा करून राजकारणात चांगलेच रंग भरले आहेत. शिवसेनेला शिववडा पचणार नाही, अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेवरील पकड ढिली झाली आणि शिवसेनेची रेव्ह सेना कधी झाली, हे त्यांचे त्यांनाच कळले नसावे.? त्यांच्यात संघटना चालविण्याची धमक नसते त्यांच्या हातात एखाद्या राजकीय पक्षाची सूत्रे गेली की, त्याचे काय होऊ?शकते याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या युवासेनेची रेव्ह सेना पाहण्याची वेळ बाळासाहेबांवर आली आहे. रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे ‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे, त्याचा तीव्र निषेध केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. युवासेनेचे हे रेव्ह प्रताप इतक्या स्पष्टपणे पुढे आल्यामुळे उद्धव ठाकरेंचा तीळपापड झाला नसता तरच नवल होते. त्यामुळे त्यांनी नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेतले. पण नितेश राणे त्यांना पुरून उरले आहेत. राज्यभरातील युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी रेव्ह सेनेला चांगलाच चाप दिला आहे.

उद्धव ठाकरेंकडे सत्तेची सूत्रे आल्यामुळे शिवसेनेची जरब आणि आदरयुक्त धाक आपोआपच कमी झाला. इतर सर्वच राजकीय पक्षांच्या युवा संघटना असताना शिवसेनेने विद्यार्थी सेना हिच युवासेना ठेवली होती. मात्र, आता बाळासाहेबांनी नातवासाठी नवी युवासेना काढली. कोणतेही राजकीय, सामाजिक, संस्कार नसलेल्या आणि अद्याप कोणताही अनुभव नसलेल्या आदित्य ठाकरे याने आपल्या संघटनेत धनदांडग्या कुणालाही स्थान देण्यास सुरुवात केली. तेच त्याचे साथीदार बनले. त्यापैकीच एक असलेला अपराजित मित्तल याला रेव्ह पार्टी प्रकरणात  अटक झाली. गोरेगाव येथे राहणाऱ्या शिवसेना नेत्याचा मुलगाही रेव्ह पार्टीत असल्याचे तसेच काही आमदार व लोकप्रतिनिधींची मुले या पार्टीत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली होती. मात्र, राजकीय दबावामुळे ती नावे पोलिसांच्या दफ्तरातून गायब झाली.

शिवसेनेची युवासेना रेव्ह पार्टीत गुंतल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमान संघटनेने सर्वप्रथम निषेध केला तर युवक काँग्रेसच्या काही तरुणांनी या गलिच्छ कृत्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी शिवसेना भवनाजवळ? पथनाटय़ करण्याचे ठरविले होते. शिवसेना भवनाजवळ पथनाटय़ होणार, अशी कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे भाडोत्री गुंड शिवसेना भवनाजवळ जमवले. दोन तरुण शिवाजीपार्कजवळ आले असता, त्यांना पोलिसांनी अडवले ते पाहताच त्या भाडोत्री गुंडांनी त्यांना लाठय़ा-काठय़ा आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.? मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत त्यांच्यापैकी कोणालाही अटक केली नाही.

सामाजिक भावनेतून पथनाटय़ करू पाहणा-या दोन तरुणांना दोनशे जणांनी मारहाण केल्याचा उद्धव ठाकरेंना एवढा अभिमान वाटला की, त्यांनी ‘हाच शिवसेनेचा खरा चेहरा’ असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. रेव्ह पार्टीत युवासेनेचे पदाधिकारी सापडल्याने पुरती अब्रू गेलेली असताना उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांचे नाव न घेता शिंतोडे उडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवसेना विभाग प्रमुख, माजी आमदार, नगरसेवक, युवासेनेचे कार्यकर्ते या सर्वानी मारहाण केल्याबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले. या सर्वाची नावे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने प्रसिद्ध केली असताना पोलिसांनी साधी चौकशी करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि गृहखात्याने आपल्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले नाहीत. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याने शिवसेनेबाबत बोटचेपीची भूमिका घेतली आहे. गृहखात्याची भूमिका अनेकदा दुटप्पी आणि पक्षपाती असल्याचे निदर्शनास आले आहे. निष्पाप तरुणांना मारहाण झाल्याचा पुरावा असताना त्यांच्या चौकशीचे अथवा अटकेचे आदेश नाहीत. जे. डे. सारख्या ज्येष्ठ पत्रकाराची हत्या का केली याचा तपास सीबीआयकडे द्यायचा नाही. मात्र, चिंटू शेखसारख्या चिटरने केलेल्या तक्रारीची ‘गंभीर’ दखल घेत ते प्रकरण लगेच सीबीआयकडे देण्याची तत्परता न्यायालयात दाखवायची, जे. डे. पेक्षा चिंटू शेख श्रेष्ठ अशी दुटप्पी, पक्षपाती भूमिका गृहविभाग घेत आहे.

नितेश राणे यांनी अशा दुष्प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. पाणी समस्या, नालेसफाई,रस्त्यांवरील खड्डे, बेरोजगारी, साथीचे रोग यांसारख्या अनेक नागरी समस्या स्वाभिमानने हाती घेतल्या असून, वॉटर टँकर माफिया तसेच पालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने अनधिकृत जागेवर शिव वडापावच्या गाडय़ा टाकून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर देण्यासाठी स्वाभिमान संघटनेने प्रतीकात्मक छत्रपती वडापाव सुरू केला. शिव वडापावला छत्रपती वडापावने जोरदार धडक दिल्यामुळे शिवसेनेची पुरती भंबेरी उडाली असून, पालिका प्रशासनासमोर मोठाच पेच उभा राहिला आहे. छत्रपती वडापाव बंद करायचा तर शिव वडापाववर देखील कारवाई करावी लागेल, अशा पेचात प्रशासन अडकले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना स्वाभिमानने वडापावच्या गाडय़ांकडून हप्ते वसूल करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि  शिवसेना नगरसेवकांची चांगलीच पंचाईत करून टाकल्यामुळे स्वाभिमानला जनसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. तर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. स्वाभिमानने शिवसेनेला दणका देऊन आपली ताकद दाखवून दिल्यामुळे राजकीय वर्तुळातही स्वाभिमानची चर्चा सुरू झाली आहे.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP