Monday, September 26, 2011

मोदींचे उपोषण आणि अनेकांचे कुपोषण


सर्वधर्मसमभाव नसल्यामुळे अटकेपार झेंडा फडकविण्यासाठी मोदींनी घातलेल्या पेशव्यांच्या पगडीचा सकारात्मक परिणाम या देशात होईल अशी शक्यता नाही. एकीकडे मुस्लिम दुखावले गेले असतानाच अल्ला हो अकबराचा नारा व्यासपीठावरून दिल्याबद्दल संघ परिवारही नाराज झाला असल्याची चर्चा आहे. मोदींनी प्रतिमा उंचावण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी संघाचा खरा चेहरा जातीयवादी असल्याने ओबीसी नेता भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. उपोषणाचे महत्त्व कमी करण्यासाठी संघाने तातडीने अडवाणींच्या रथयात्रेला हिरवा कंदील दाखवला यावरून मोदींच्या कुपोषणाची प्रक्रिया सुरू झाली असे समजण्यास हरकत नसावी.

देशात कुपोषणांचे बळी वाढत आहेत. ज्याला उपवास घडतो त्याचे कुपोषण होतेहे आतापर्यंत माहीत होते. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तीन दिवसांच्या सद्भावना उपोषणाने त्यांचे कुपोषण झाले नाही तर पक्षात ते अधिक सुदृढ झाले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून थेट ते भावी पंतप्रधान होऊन बसले. अर्थात एकदा भावी शब्द मागे लागला की तो जन्मभर पाठ सोडत नाही. लालकृष्ण अडवाणीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कायमचे भावी पंतप्रधान राहिले. मोदींच्या नावामागील भावी शब्द किती दिवस टिकून राहतो हेच आता पाहायचे. मोदींनी उपोषण केल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले असले तरी अनेक राजकीय नेत्यांचे कुपोषण झाले. कुपोषणाची ही साथ केवळ गुजरात आणि भाजपपुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन धडकली. आधीच कुपोषित आणि शक्तिहीन झालेल्या शिवसेनेला मोदींच्या उपोषणाचा झटका बसला. डोकेदुखीजळजळमळमळ असे अनेक विकार एकाच वेळी सुरू झाले. मनसेच्या व्हायरसने शिवसेनेला अधिकच झटका बसला आणि कुपोषित कार्याध्यक्षांचा तोलच ढासळला.
 
मोदींनी उपोषण करीत पक्षातील आपले वजन वाढविण्याबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही साद घातली. अकाली दलापासून ते जयललितांपर्यंत काहींनी या उपोषणाला शुभेच्छा दिल्या. मात्र शेजारच्याच महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेला हे उपोषण फारसे भावले नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तिकडे पाठ फिरवली. मोदींच्या उपोषणाने या मित्राच्याच पोटात जळजळ होत असल्याचे दिसून आले. ही जळजळ शिवसेनेच्या मुखपत्रातून व्यक्त झाली.उपोषण मोदीचे की गादीचे’ या शीर्षकाच्या अग्रलेखात ऐंशी टक्के जनता रोजच उपाशी असते. भूक व बेरोजगारीची ती बळी आहे. त्यामुळे मोदींच्या उपोषणाला इतके महत्त्व का द्यायचे’, असा सवाल करण्यात आला. इतकेच नव्हे तर मोदींना शुभेच्छा देताना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जे गुजरातचे गोडवे गायले आणि महाराष्ट्रावर टीका केलीत्याबद्दल शिवसेनेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. दुस-या राज्यात जाऊन महाराष्ट्राच्या तोंडाला काळे फासण्याचे धंदे थांबवावेतअसा खडसेंना खडसावण्यात आले. यावरून शिवसेनेच्या पोटात मोदींच्या उपोषणाने किती जळजळ झाली हेच दिसून आले.
 
शिवसेना कार्याध्यक्षांनी या उपोषणाकडे पाठ फिरविली असली तरी मनसेचे अध्यक्ष गुजरात मित्र राज ठाकरे यांनी मात्र उपोषणस्थळी जाऊन मोदींना शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर शिवसेनेच्या मुखपत्रातून एकनाथ खडसे यांच्यावर जी टीका केली होतीत्याला परस्पर उत्तर देऊन टाकले. दुस-या राज्यात जाऊन बोलायचे नाही म्हणजे काय. तुम्ही इथे वाटोळे करून ठेवायचे आणि ते बोलायचे नाहीमुंबईची जी वाट लावलीतसर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे त्याचे दर्शन रोज लोकांना होतेय. ते बोलायचे नाहीआता काय स्किम काढलीय तर खड्डय़ाचे फोटो पाठवा आणि मग आम्ही खड्डे भरू. तिकडे तुम्ही जंगलात जाऊन जे जनावरांचे चित्र काढता नात्याऐवजी मुंबईच्या खड्डय़ांची छायाचित्रे काढा. खड्डय़ांमुळे मुंबईची जी माती झाली आहे तीही दिसेल आणि आपला फोटोग्राफीचा छंद जोपासला जाईल,’ अशा शब्दात शिवसेना कार्याध्यक्षांना खडसावून मुंबईतील खड्डे बुजविताना कशी टक्केवारी चालते याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.
 
राज यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या पोटात होत असलेली जळजळीचे मळमळीत रूपांतर झाले. राज यांनी घातलेला घाव शिवसेना कार्यप्रमुखांच्या इतका जिव्हारी लागला त्यांचा पार तोल सुटला. आपल्याच भावावर त्यांनी ज्या त-हेने गरळ ओकली ती सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती. पापीबेईमानकपटीजनावरनमकहराम अशी जेवढी विशेषणे देता येतील तेवढी विशेषणे त्यांनी राज ठाकरे यांना दिली. मोदींचे उपोषण गुजरातमध्येठाकरे बंधूंची भांडणे मुंबईत असा प्रकार घडला. दोघांचा शिमगा इतका रंगला की त्यात शिवसेनेचे कुपोषण झाले. राज-मोदी यांच्या मैत्रीने भविष्यात शिवसेना-भाजप युतीही कुपोषित होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
एकंदरीतमोदींच्या उपोषणाचे परिणाम केवळ गुजरात आणि भाजपमध्येच नव्हे तर मित्रपक्षातही दिसू लागले आहेत. उपोषणाच्या कुपोषणाचा सर्वाधिक फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधानपदाचे कायम उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना बसला. वेगवेगळय़ा यात्रा काढून सतत चर्चेत राहणा-या अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून नाव चर्चेत ठेवण्यासाठी अलिकडेच भ्रष्टाचाराविरोधात रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची हवा तापायला सुरुवात होण्यापूर्वीच मोदींनी हा उपोषणाचा इव्हेंट घडवून आणला आणि आपली ताकद दाखवून दिली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांचे नाव थेट देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गेले. लालकृष्ण अडवाणी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मोदी हेच पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार असल्याचे जाहीर करावे लागले. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपले शारीरिक वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली असली तरी त्यांचे राजकीय वजनही मोदींच्या उपोषणाने आपोआपच कमी झाले. राष्ट्रीय अध्यक्षांपेक्षा मोदींचे वजन जास्त असल्याची चर्चा माध्यमातून होऊ लागली. म्हणूनच गडकरी यांनीपंतप्रधानपदासाठी लायक अनेक उमेदवार भाजपात आहेत. योग्य वेळी नाव जाहीर केले जाईल’ असे सांगत मोदींच्या उमेदवारीवर काट मारण्याचा प्रयत्न केला. गडकरींना मोदींच्या भेटीस जाणे शक्य झालेले नसले तरी ते आपल्या मर्जीतील एखाद्याला पाठवू शकत होते. उलट विनोद तावडेंसह एकही गडकरी समर्थक मोदींच्या भेटीला गेला नाही हे विशेष.
 
उपोषणाने वजन वाढलेले मोदी जर खरोखर केंद्रीय राजकारणात आले तर आपल्या अस्तित्वाचे काय होईल, या शंकेने सुषमा स्वराज, अनंतकुमार, अरुण जेटली यांच्यासारख्या अनेकांचे चेहरे पडले. भाजपतील ओबीसींचा चेहरा म्हणून ख्याती पावलेल्या मुंडेंनाही या उपोषणाचा झटका बसण्याची भीती आहे. गडकरींशी असलेल्या मतभेदाने त्यांचे वजन सतत कमी करण्याचाच प्रयत्न होत असतो. मुंडेंचा ओबीसी चेहरा लक्षात घेऊन पक्षाने त्यांना पहिल्यांदा लोकसभेत आलेले असताना त्यांना उपनेतेपद देण्यात आले. मोदी जर केंद्रात आले तर मुंडेंचे आणखी कुपोषण होईल, अशी चर्चा होऊ लागली. उपोषणाने असे ज्ञात अज्ञात अनेक बळी घेतले असले तरी मोदींचेही वजन कायम राहण्याची शक्यता दिसत नाही. या उपोषणाच्या निमित्ताने आपला सर्वसमावेशक चेहरा निर्माण करण्यासाठी मोदींनी उपोषण स्थळी वेदमंत्रांच्या घोषाबरोबरच अल्ला हो अकबरचा नाराही दिला. मात्र असा नारा देत असताना आपली हिन्दुत्ववादी प्रतिमा कायम राहिली पाहिजे याची काळजी घेण्यासही ते विसरले नाहीत, त्यांनी मुस्लिमांची गोल टोपी घालणे नाकारले, मात्र पगडी तत्परतेने घातली. त्यामुळे मुस्लिम बांधव संतापले, सर्वधर्मसमभाव नसल्यामुळे अटकेपार झेंडा फडकविण्यासाठी मोदींनी घातलेल्या पेशव्यांच्या पगडीचा सकारात्मक परिणाम या देशात होईल अशी शक्यता नाही. एकीकडे मुस्लिम दुखावले गेले असतानाच अल्ला हो अकबराचा नारा व्यासपीठावरून दिल्याबद्दल संघ परिवारही नाराज झाला असल्याची चर्चा आहे. मोदींनी प्रतिमा उंचावण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी संघाचा खरा चेहरा जातीयवादी असल्याने ओबीसी नेता भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. उपोषणाचे महत्त्व कमी करण्यासाठी संघाने तातडीने अडवाणींच्या रथयात्रेला हिरवा कंदील दाखवला यावरून मोदींच्या कुपोषणाची प्रक्रिया सुरू झाली असे समजण्यास हरकत नसावी. 

Read more...

Monday, September 19, 2011

मोदी कसे होणार पंतप्रधान?


इंडिया शायनिंगच्या दुस-या टप्प्याचा असाच फज्जा उडण्याची शक्यता दिसत आहे. कारण रालोआत किती पक्ष राहिले ते शोधावे लागत आहेत. अण्णा द्रमुकच्या जयललिता मोदींच्या समर्थनार्थ पुढे आल्या. अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आले, पण जनता दल (संयुक्त)चे शरद यादव आणि नितीशकुमार यांचे प्रतिनिधीदेखील आले नाहीत. शरद यादव यांनी तर उपोषणाला महत्त्वच दिले नाही, देशातले 80 टक्के उपेक्षित लोक नेहमीच उपवास करीत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जयललिता यांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचा भरोसा नाही.भारतीय जनता पक्षाचे यात्रा फेम राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुजरातचे विकास फेम उपोषणवीर नरेंद्र मोदी यांनी पार मागे टाकले आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी अडवाणी देशभर भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढणार होते, पण मोंदीनी अण्णांचेच अनुकरण करीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी अण्णांप्रमाणे थेट उपोषणालाच बसण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. यावरून मोदींना आता पंतप्रधानपदाचे वेध लागले असल्याचे दिसून आले. विविधता आणि एकतेचा अनोखा अनुभव देणा-या आपल्या देशात सर्व सामाजिक स्तरांमध्ये सद्भावना आणि शांतता राहावी याकरिता मोदींनी प्रतीकात्मक उपोषण केले. या उपोषणाचा थाट पाहता याला पंचतारांकित शाही उपोषण असेच म्हणावे लागेल. अडवाणींची प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि अण्णांचे प्रचारतंत्र यांचा एकत्रित मिलाफ मोदींमध्ये दिसू लागला आहे. अमेरिकन संसदेच्या एका संशोधन समितीने दिलेल्या अहवालात मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे पुढील उमेदवार असतील, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदींचा वारू आता सुसाट वेगाने चौखूर धावू लागला आहे. प्रसिद्धी तंत्रात निष्णात असलेल्या भाजपने या अहवालाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. त्यातून मोदींची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना केल्यामुळे अडवाणींपासून गडकरी-मुंडेंपर्यंत सगळेच दुस-या-तिस-या फळीत गेले आहेत. नितीन गडकरी हे भाजपचे पक्षाध्यक्ष आणि सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. त्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली होती. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज तसेच नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा असलेले सुषमा स्वराज आणि गडकरी हे मोदींच्या उपोषणाकडे फिरकले नाहीत. ते नसल्यामुळे अरुण जेटली आणि मुंडे हिरीरीने पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. सुषमा स्वराज आणि गडकरींच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर संधी मिळूनही राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करणे त्यांना जमलेले नाही. गुजरातमध्ये जातीय दंगलींचे बळी ठरलेल्या मुस्लिमांचे खरे मारेकरी मोदीच असल्याची चर्चा जगभरात झाली. पण आपणच विकास पुरुष आणि पोलादी पुरुष दोन्ही असल्याचे मार्केटिंग करण्यात मोदी यशस्वी झाले. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे विकास पुरुष तर अडवाणी पोलादी पुरुष होते. आता हे दोन्ही पुरुष मोदींमध्ये एकवटल्याची प्रसिद्धी करण्यात आली. पण मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजाचे मारेकरी क्रूरकर्मा असलेली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू उजळ करणार कशी? ही बाजू उजळ करण्यासाठी शांतता आणि सद्भावनेचे आवाहन करून उपोषणाचे नाटक रचण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीचा निर्णय न्यायदंडाधिकाऱ्यांवर सोपविल्याचा निकाल आल्याने मोदींना तात्पुरता दिलासा मिळाला आणि मोदी सुसाट वेगाने धावू लागले. खरे तर हा दिलासा नव्हेच, पण मोदी आणि भाजप नेत्यांची प्रतिक्रिया पाहता न्यायदंडाधिकारी त्यांना सन्मानपत्रे देऊनच मुक्त करणार आहेत, असेच कोणाला वाटेल. ज्यांनी मोदींना व्हिसा नाकारला तेच त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत असल्याने भाजपच्या डावपेचांना परकीय शक्तींचा आशीर्वाद असल्याची शंका बळावत आहे.

गेली कित्येक वर्षे अडवाणी यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळय़ा पडत आहेत. त्यामुळे निवडणुकांचा मोसम आला की यात्रा काढून देशभर आपल्या नावाचा डंका पिटविण्याची त्यांची सवय जुनी आहे. सध्या नजीकच्या काळात लोकसभेच्या निवडणुकाही नाहीत. तीन वर्षानी 2014 मध्ये निवडणुका होणार आहेत. पण तरीही भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढण्याचे अडवाणींनी जाहीर केले आहे. मोदींचा सर्वत्र जो उदो, उदो चालला आहे त्या झगमगाटात आपली प्रतिमा निस्तेज होऊन काळवंडली जाऊ नये याकरिता अडवाणींचा खटाटोप सुरू झाला आहे. अडवाणी गृहमंत्रीपदी असताना अतिरेक्यांनी संसदेवर बॉम्बस्फोट केले. एवढा त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारही बोकाळला होता. पक्षात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली असताना अडवाणींनी भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढणे हास्यास्पद आहे.अडवाणींनी सत्तेसाठी रामरथ यात्रा काढली होती, ‘राममंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. राममंदिरसाठी सोन्याच्या विटादेखील देण्यात आल्या होत्या. सोन्याच्या विटा आणि पैसा यांचे ऑडिट झाले आहे का आणि विटा कोणत्या बांधकामासाठी वापरल्या याचा हिशेब लोकांना मिळालेला नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश आणि पक्षात वाढत चाललेला भ्रष्टाचार या पार्श्वभूमीवर काढलेल्या यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. हे आळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अडवाणींच्या यात्रेला विरोध केला असल्याचे दिसते. अडवाणींचे नेतृत्व कोणालाच मान्य नाही, त्यांची भाषणे अटलबिहारी वाजपेयींसारखी भुरळ पाडणारी नाहीत किंवा अंतर्मुख करणारीही नाहीत. त्यामुळे अडवाणी मागे आणि मोदी पुढे असे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच अडवाणींनाही मोदींची स्तुती करणे भाग पडले. आधी भाजपची सत्ता येऊ द्या, मोदी पंतप्रधान झाले तरी चालेल या  मानसिकतेप्रत अडवाणी आले असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

जातीय दंगलींनी मोदींची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी, जातीयवादी अशी बनली असल्यामुळे बिहारमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांच्या निवडणूक प्रचारसभा नकोत, असे स्थानिक नेत्यांनी त्यांना कळवून टाकले होते. त्याच मोदींची विकास पुरुष आणि पोलादी पुरुष अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. टाटा, अंबानींनी त्यांना प्रमाणपत्र देऊनही उपयोग झाला नाही, देशातील दलित-मुस्लिम समाज मोदींना पंतप्रधानपदासाठी मान्यता देतील अशी शक्यता नाही. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्याचा फायदा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला अधिक होईल. मोदींसारखे कट्टरपंथी या देशात जेवढा धुमाकूळ घालतील तेवढी काँग्रेसची दलित - मुस्लिम अल्पसंख्याक ही व्होट बँक मजबूत होत राहील. इंडिया शायनिंगचा नारा दिल्यामुळे वाजपेयी सरकार वाजत-गाजत दिल्लीच्या तख्तावर येऊन बसेल अशी वातावरणनिर्मिती प्रमोद महाजन प्रभूतींनी केली होती. पण सरकारचा पुरता बाजा वाजला आणि भाजप तर मागे पडलाच पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षदेखील फुटून बाहेर पडले. आता इंडिया शायनिंगच्या दुस-या टप्प्याचा असाच फज्जा उडण्याची शक्यता दिसत आहे. कारण रालोआत किती पक्ष राहिले ते शोधावे लागत आहेत. अण्णा द्रमुकच्या जयललिता मोदींच्या समर्थनार्थ पुढे आल्या. अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आले, पण जनता दल (संयुक्त) चे शरद यादव आणि नितीशकुमार यांचे प्रतिनिधीदेखील आले नाहीत. शरद यादव यांनी तर उपोषणाला महत्त्वच दिले नाही, देशातले 80 टक्के उपेक्षित लोक नेहमीच उपवास करीत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जयललिता यांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचा भरोसा नाही. उत्तर प्रदेशात मायावती, बिहारमध्ये नितीशकुमार,  पश्चिम बंगालमध्ये ममता, तमिळनाडूत जयललिता, महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी अशा मोठय़ा राज्यांमध्ये इतर पक्ष ताकदवान असताना मोदींना पाठिंबा मिळणार कसा? यामध्ये कम्युनिस्ट पक्ष काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे आहे. तेव्हा विकास पुरुष अथवा पोलादी पुरुष म्हणा किंवा उपोषण करू द्या, मोदी पंतप्रधान होणार कसे?

Read more...

Monday, September 5, 2011

विघ्नहर्त्यांचाच आता दिलासा..


विलासरावांची भाषा अण्णांना अवगत असल्यामुळे ते समजून चुकले आणि त्यांनी उपोषण सोडले. त्याचबरोबर राजकारणी सुटले. विघ्नकर्त्यांने उभी केलेली सारी विघ्ने दूर करण्याकरिता तमाम राजकारणी विघ्नहर्ता गणपतीसमोर नतमस्तक झाले आहेत. इतके दिवस टीव्हीवर अण्णाच दिसत होते. आता गणपतीबरोबर राजकारणीही दिसणार असल्याने सर्व जण मनोमन सुखावले असणार याबद्दल शंका नाही. गांधीगिरी, अण्णागिरीचा मुखवटा धारण करणा-यांसमोर राजकारण्यांनी संविधानाची ढाल धरल्यामुळे आता विघ्नहर्त्यांकडूनच दिलासा मिळेल, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.

तब्बल बारा दिवस जननायक बनलेल्या अण्णांच्या मागे लोक धावत होते. सरकारसत्ताधारीराजकारणी यांच्या भ्रष्टाचाराला अण्णागिरी वेसण घालणार असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांनी रंगविले असल्याने अण्णांच्या रूपात लोकांना जननायक गवसला होता. पण आता खरेखुरे गणनायक अकरा दिवसांसाठी वास्तव्यास आले असल्याने त्यांच्या दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. अण्णागिरीने भ्रष्टाचाराच्या भीतीचा ब्रह्मराक्षस निर्माण केला असून त्याने राजकारण्यांचा पाठलाग सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्र अस्वस्थ झाले. पण गणनायक,गणाधिपतीगणाधीशगणराय तुम्हा-आम्हा सर्वाचा आणि अर्थात राजकारण्यांचासुद्धा गणपती विघ्नहर्ता आला आणि सर्वांना दिलासा मिळाला. रामलीला मैदानावर गांधीगिरी नव्हे अण्णागिरी करणारे उच्चरवात काहीही म्हणोतगणनायकाच्या साक्षीने केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मालमत्ता जाहीर केली आणि भ्रष्टाचाराचा वारा ना शिवे माझ्या मना’ असे म्हणत आपल्या मनावरचे मणामणाचे ओझे दूर केले खरे. भ्रष्टाचारात राजकारणी आकंठ बुडाले असल्याचे दिल्लीत जनसागराच्या साक्षीने सांगून अण्णांनी आपल्या आंदोलनाने सर्वाची झोप उडविली होती. त्या अस्वस्थ मनावर गणनायकाने मायेची फुंकर घातली. कोणी कितीही विघ्ने निर्माण करोयापुढे एवढा मोठा जनसमुदाय आंदोलनाला लाभेल की नाहीयाचीही शंका वाटू लागली आहे. मात्र विघ्नकर्त्यांवर जालीम उपाय विघ्नहर्त्यांचा असल्याची खात्री पटली आहे.
 
आता सगळे राजकारणी सत्ताधीश गणाधिशाला साकडे घालू लागले आहेत. या देशात नेमके काय चालले आहे ते गणरायाने अंतज्र्ञानाने शोधून काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेगणपती आला आणि नाचूनी गेला असे होता कामा नये. गणपती येताना कसा वाजतगाजतनाचत येतो तसेच रामलीला मैदानावर घडले होते. गणपती आला आणि नाचून गेला एवढय़ापुरते हे आंदोलन राहील की कायअशी शंका अनेकांना वाटते आहे. सध्या घरोघरीगल्लीबोळातरस्त्यारस्त्यांवर,अंगणातपटांगणात येऊन बसलेले गणपती लाखो-करोडोंच्या मनामनात अकरा दिवस नाचणार आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर येईपर्यंत त्याची आरती गाणार आहेत. कोणी उपोषण करो की अण्णागिरी करोविघ्नहर्ता गणपती सर्व अपराध पोटात घालणार आहे. अपराध पोटात घालून-घालून त्याचे पोट मोठे झाले आहे. पण त्याला त्याची चिंता नाही. भक्तांचे रक्षण हेच त्याचे आद्यकर्तव्य आहे. भक्तांची गुणवत्ता बदलली तरी सुबुद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी त्याचा एक हात कायम वर असतो. स्वातंत्र्यलढय़ात जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. कार्यकर्त्यांनी पदरमोड करून हे उत्सव साजरे केले. पण आज गणेशोत्सव मंडळे विविध पक्षांचे कार्यकर्ते घडवत आहेत. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कार्यकर्ते स्वत:ला सक्षम बनवत आहेत. त्यासाठी वर्गणीपासून खंडणीपर्यंत त्यांची मजल गेली आहेपण गणपती कान टवकारून कोणतीही गजागिरी करीत नाही. आपल्या भक्तांना सोंडेवर घेऊन आपटत नाही.
 
अण्णागिरीने मात्र कमाल केली. काँग्रेसवाल्यांची गांधी टोपीदेखील त्यांच्याकडे ठेवली नाही. अण्णा समर्थकांनी गांधी टोपी हायजॅक केली. सफेद टोपीवर गांधी नाव लिहिण्याची गरज भासली नाही. या टोपीला गांधीटोपीची मान्यता आपोआप मिळाली होती. पण आता सगळी गंमत सुरू आहे. टोपी कोणाची आणि रॉयल्टी कोणालाअसा प्रकार घडला आहे. गांधीटोपीवर अण्णांचे नाव लिहून ती अण्णा ब्रँडने बाजारात आणली. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षाच्या काळात काँग्रेसवाल्यांनी लोकांना टोप्या घातल्या आणि स्वत: सफारीत फिरू लागलेयाचा प्रत्यय उपोषणस्थळी सर्वांना आलेलाच आहे. अण्णांच्या डोक्यावर गांधीटोपी आणि विलासराव देशमुख कडक सफारीत हे दृश्य देशाने पाहिले. अर्थात सफारी घालणे चुकीचे मुळीच नाहीजग अत्याधुनिकतेकडे जाताना नेत्यांनी गांधीटोपी घालण्याची किंवा पंचा नेसण्याची अपेक्षा कोणी करणार नाहीत्यात विलासराव झाले आहेत विज्ञान-तंत्रज्ञानमंत्रीत्यामुळे त्यांनी आधुनिक दृष्टिकोन बाळगण्याचीच अपेक्षा आहे. पण गांधींचा वसा घेतल्याची बतावणी करणा-या अण्णांनी मी अण्णा’, ‘मै अण्णा हू’, ‘आय एम अण्णा’ असे लिहिलेल्या टोप्या देशातल्या लहान-थोरांच्या डोक्यावर घातल्या. महात्मा गांधींच्या टोपीला अण्णांच्या टोपीच्या रूपाने एक कमर्शिअल स्पर्धक निर्माण झाला. गांधीटोपीची रॉयल्टी अण्णांनी खेचून घेतली आणि काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करून दुस-या स्वातंत्र्याची हाक दिली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह सर्व मंत्री आपली मालमत्ता जाहीर करू लागले आहेत. आपल्याकडे जाहीर करण्यासारखे काही नाही,  मी फकीर’ आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. ज्या माणसाला घरसंसार नाहीमुलाबाळांचे शिक्षण करायचे नाहीअ‍ॅडमिशनसाठी डोनेशन द्यायचे नाहीनोकरीसाठी वशिला लावायचा नाहीज्यांना पैसे द्यावे लागतातज्यासाठी पैसे घ्यावे लागतात असे काही अण्णांना करावे लागत नाही. प्रवासासाठी गाडी दारात हजर असते. विमानाची तिकिटे येतात. सगळी बडदास्त राखली जाते. वारेमाप प्रसिद्धीही मिळते. यापैकी काही झाले नाही तर राळेगणसिद्धीला येऊन यादवबाबांच्या मंदिरात राहता येते.
 
अरविंद केजरीवालकिरण बेदींसारख्या आयएएसआयपीएस अधिका-यांच्या हुशार डोक्यांनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साथीने असा काही माहोल निर्माण केला की भ्रष्टाचारात या ना त्या मार्गाने बुडालेली जनता आपल्या लेकराबाळांसह गांधी नव्हे अण्णाटोप्या घालून रस्त्यावर उतरली आणि अण्णांनी जाहीर केलेल्या उपोषणाचा बेमालूम उपयोग करून घेतला. लोकांचा उत्साह पाहून अण्णांना बळ चढत होते. बारा दिवसाचे उपोषण असताना लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याच्या जोशात ते बोलायचे आणि प्रसारमाध्यमे शूटिंग करायचे. सरकारकायदासंसदसंविधान या सगळय़ांची आपण तोडमोड करीत आहेत याचेही भान त्यांना नसायचे.
 
लालूप्रसाद यादवशरद यादव यांनी संविधानाचेच महत्त्व पटवून देऊन अण्णागिरीचा पर्दाफाश करून दाखविला आणि सर्वसामान्य जनता विरोधात जाऊ शकते याची जाणीव करून दिली. तेव्हा कुठे अण्णांना बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची आठवण झाली.


अण्णांचे उपोषण सोडण्याकरता मात्र त्यांच्या दहा-बारा उपोषणाचा अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील विलासराव देशमुखांची नियुक्ती करण्यात आली. शरद पवारांची जाहीर मालमत्ता कमी असली तरी त्यांच्याभोवती संशयाची वलये भरपूर असल्यामुळे त्यांनी अण्णांच्या उपोषणाबद्दल अवाक्षर काढले नाही. एरव्ही राजकीय पेचप्रसंगांत प्रथम प्रफुल्ल पटेलांना अहमद पटेलांकडे पाठविले जाते. त्यांना अण्णांकडे पाठविण्याची सरकारची हिंमत झाली नाही. विलासरावांवर ती जबाबदारी आली. विलासरावांची भाषा अण्णांना अवगत असल्यामुळे ते समजून चुकले आणि त्यांनी उपोषण सोडले. त्याचबरोबर राजकारणी सुटले. विघ्नकर्त्यांने उभी केलेली सारी विघ्ने दूर करण्याकरता तमाम राजकारणी विघ्नहर्ता गणपतीसमोर नतमस्तक झाले आहेत. इतके दिवस टीव्हीवर अण्णाच दिसत होते. आता गणपतीबरोबर राजकारणीही दिसणार असल्याने सर्व जण मनोमन सुखावले असणार याबद्दल शंका नाही. गांधीगिरी
अण्णागिरीचा मुखवटा धारण करणा-यांसमोर राजकारण्यांनी संविधानाची ढाल धरल्यामुळे आता विघ्नहर्त्यांकडूनच दिलासा मिळेलअसे प्रत्येकाला वाटू लागले आहे.


Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP