पिंगळा बोले मंत्रालयाच्या महाद्वारी
पिंगळा या पक्ष्याला राज्यपक्षी बनवण्याचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला असून सध्या वन्यजीव मंडळाकडे पुढील प्रक्रियेसाठी देण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव येईल आणि त्याला मान्यता दिली जाईल, असे समजते.
पिंगळा बोले महाद्वारी। बोली बोलतो देखा।।
शकुन सांगतो तुम्हा। हा एक ऐका॥
डुग डुग ऐका डुग डुग ऐका॥ धृ॥
पिंगळा बैसोनी कळसावरी। तेथेनि गर्जतो नाना परी।
बोलबोलती अति कुसरी। सावध ऐका॥
असे एकनाथ महाराजांचे एक भारुड आहे. पिंगळा रुपकाच्या माध्यमातून समाजामध्ये भविष्यात होणा-या बदलाचे संकेत एकनाथ महाराजांनी दिले होते. अर्थात, पिंगळा पक्षी भविष्य जाणणारा म्हणून परिचित असल्याने त्याचे रुपक एकनाथ महाराजांनी वापरले. हा पिंगळा आता मंत्रालयाच्या महाद्वारी बसून डुगडुग करत सरकारला विविध शकुन सांगणार आहे. रात्री अंधारात फिरून भविष्यवाणी करणा-या या पक्षाचे भविष्य मात्र उज्ज्वल आहे. तो आता महाराष्ट्राचा ‘राज्य पक्षी’ ठरणार आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव वनविभागाने तयार केला असून सध्या वन्यजीव मंडळाकडे पुढील प्रक्रियेसाठी देण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव येईल आणि त्याला मान्यता दिली जाईल, असे समजते.
पिंगळा पक्षी घुबडांच्या जातीतील लहान पक्षी असून तो निशाचर आहे. त्याच्या आवाजातून शकुन-अपशकुन समजतात,असा समज आहे. या पक्ष्यांच्या नावावरूनच माणसांतही एक जात आहे. तेही पहाटेच्या वेळी गावात फिरून भविष्य सांगतात. पिंगळय़ाला दिवस निषिद्ध आहे.
0 comments:
Post a Comment