Monday, October 27, 2008

राजचे आंदोलन आणि सरकारची भंबेरी!

नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत शासनाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जसा बोजवारा उडालेला असतो, तसा राजकीय आपत्तीमध्ये `क्रायसिस मॅनेजमेंट'ची भंबेरी उडाली आहे. महाराष्ट्रात जेव्हा प्रचंड महापूर येतो, मुंबईसह राज्यातील अनेक शहरे आणि गावे जलमय होतात, जनजीवन विस्कळीत होतेलोक संकटात सापडतात, नेमका याच वेळी शासनाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा (आपत्ती व्यवस्थापनाचा) पत्ता दिसत नाही. त्याच धर्तीवर जेव्हा भावनिक मुदय़ावरून राजकीय वातावरण तापते आणि जनमानसात उद्रेक होऊन दंगलसदृश स्थिती निर्माण होते, अशा वेळी राजकीय दूरदृष्टीने क्रायसिस मॅनेजमेंट अथवा अचानक उद्भवलेल्या तणावग्रस्त परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याबाबतही सरकारचा
प्रचंड गोंधळ उडालेला दिसून येत आहे

मराठी अस्मितेचा प्रश्न, मराठी भाषेत पाटय़ा लावण्याचा प्रश्न, जेट एअरवेजच्या कामगारांची समस्या, छटपूजेचा वादग्रस्त विषय अथवा रेल्वे भरतीचा ऐरणीवर आलेला मुद्दा अशा भावनिक मुद्दय़ांना हात घालून राज ठाकरे यांनी मनसेच्या माध्यमातून वातावरण धगधगत ठेवले होते. अखेर रविवारी 18 ऑक्टोबर रोजी रेल्वे भरती परीक्षेच्या निमित्ताने या धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बदडून काढण्यास सुरुवात केली. कोणी उठले आणि कोणालाही विनाकारण अथवा कारणास्तव का होईना, मारत सुटलेतर त्याचे समर्थन कोणीही करणार नाहीं. त्याचप्रमाणे कोणत्याही कारणास्तव कोणी दगडफेक, जाळपोळ करून खासगी अथवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करीत असेल, तर त्याचेही समर्थन होऊ शकणार नाहीं. पण तरीही अशा घटना घडल्या असता सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न उभा राहिला. त्यामुळेच सरकारने वेळीच कारवाई केली नाही, सरकार निष्क्रिय राहिले आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास असमर्थ ठरले, अशी प्रतिक्रिया संसदेत उमटलीउत्तर भारतीय, बिहारी व अन्य खासदारांचा केंद्र सरकारवर दबाव वाढू लागलाअखेर केंद्राला महाराष्ट्र सरकारवर 355 कलमाखाली नोटिसा बजवाव्या लागल्या.

झारखंडमधील जमशेदपूरच्या न्यायालयाने छटपूजेसंदर्भातील राज ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होतेत्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन करीत नसल्याने झारखंडचे पोलीस मुंबईत दाखल झाले. त्यातच केंद्र सरकारची नोटीस येऊन थडकली, तेव्हा कुठे सरकार जागे झाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याने तातडीने ठोस कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी संसदेतच जाहीर केले. 355 कलमाखाली नोटीसच काय, 356 खाली राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे, असे पाटील यांच्या देहबोलीवरून वाटत होते, एवढे ते प्रक्षुब्ध झाले होते. केंद्राचे आदेश येईपर्यंत शासन झोपले होते की,
शासनाने झोपेचे सोंग घेतले होते, हे विलासराव, आर. आर. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ मंत्री आणि दस्तुरखुद्द शरद पवारांनाच ठाऊक

राज्यात मराठी मन धुमसत असताना आणि त्यावर फुंकर घालून राजने निखारे फुलवीत ठेवण्याचा प्रयत्न चालवला असताना राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय हे आपले पद राहील की नाही, या चिंतेत पडले होते; तर त्यांचे पद टिकवून ठेवायचे कसे, याची भ्रांत राज्याच्या गृहविभागाला पडली होती आणि त्यासाठी धडपड करण्यातच या विभागाचा वेळ चालला होता.

सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. राज्यापुढील कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे, याबाबत एकवाक्यता नाही. मुख्यमंत्र्यांचा वेळ खुर्ची टिकवण्यात, उपमुख्यमंत्र्यांचा वेळ शरद पवार, अजित पवारांचे आदेश पाळण्यात आणि राजकीय सोयी बघून अधिकाऱयांच्या नेमणुका करण्यात जात आहे. दुसरीकडे महसूलमंत्री नारायण राणे
जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर सभा घेत आहेत, तर छगन भुजबळ ओबीसींचे संघटन मजबूत करण्यात गर्क आहेत. राजने मराठी माणसांसाठी उग्र आंदोलन केल्यामुळे राणे व भुजबळ यांनी राजची पाठराखण केली, राणे यांनी तर जाहीरपणे सांगितले की, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आपण पदाची पर्वा करणार नाही. तणावाची परिस्थिती निर्माण झाली की, कठोर कारवाई करणार,
कोणाचीही गय केली जाणार नाही, वेळ पडल्यास मनसेवर बंदी आणणार, अशा प्रकारच्या घोषणा करण्यावरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा भर आहे.

शरद पवारांनी राजवर तोंडसुख घेतले, पण अखेर स्थानिकांच्या प्रश्नांना महत्त्व द्यावे लागेल, असे त्यांना सांगावे लागले. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे भरती परीक्षेत अडथळा आणल्याबद्दल राज यांच्यावर आगपाखड केली. पण उप्र.-बिहारातून मुलांना इथे कशाला पाठवता, असे आपल्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी लालूंना विचारले नाही. केवळ रेल्वेच नव्हे, तर या राज्यातून
केंद्राला सर्वाधिक निधी जेथून मिळतो, त्या आयकर, अबकारी व विक्रीकर विभागांमध्ये मराठी माणसाला डावलले जात आहे, याबाबत जाब विचारला जात नाही. जी मराठी माणसे मनसेकडे आशेने पाहत आहेत, ती काँग्रेसची नाहीत कापण सरकार हे दिशाहीन झाल्याप्रमाणे वागत आहे. मंत्रिमंडळाची अवस्था चौखुर उधळलेल्या घोडय़ासारखी झाली आहे. कोणाचाच पायपोस कोणात नाही. राज ठाकरेंकडे सुरुवातीपासून काणाडोळा केला, कोणतीही कारवाई केली नाहीत्याचा पुरेपूर फायदा उठवत राजने थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले.

मुख्यमंत्र्यांबद्दल अवमानकारक शब्द वापरले, पण राजवर कारवाई नाही. काँग्रेसराष्ट्रवादी दोघांनाही वाटत होते, राजला वाढवले, तर शिवसेनेची मते घटतील आणि फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल. पण राजला एवढे मोठे केले की, आता आपले काय होईल, याचीच सरकारला भीती वाटू लागली आहे.
अटक केल्यानंतर राज आणि मनसेचा बंदोबस्त होईल आणि त्यांचे वाढलेले राजकीय वजन कमी करता येईल, असा सरकारचा समज सपशेल खोटा ठरला आहे. करायला गेलो एक झाले भलतेच. करायला गेलो हीरोचा झिरो, पण झाले सुपरहीरो.

राज हे किती मोठे हीरो होत आहेत, हे सर्व चित्रवाहिन्यांनी दाखवले. त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवले, राज बसलेले आणि त्यांच्यासमोर पोलीस अधिकारी उभे. वेगवेगळय़ा पोलिस ठाण्यांत तक्रारी असल्याने त्यांना त्या-त्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यांच्यासोबत दोन-तीन डीसीपी, लाल दिव्यांच्या
गाडय़ा, काही राज यांच्या तर काही गाडय़ा देखरेख करणाऱया पोलिसांच्या आहेतअसा 10-12 गाडय़ांचा ताफा एका पोलिस ठाण्यातून दुसऱया पोलीस ठाण्यात निघालेला. पोलिस अधिकारी हे पुढे येऊन त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत आहेत, अधिकाऱयांच्या चेहऱयावर आदरयुक्त भाव दिसत आहेत, मोटारींचा ताफा जाताना रस्ते मोकळे केले जात आहेत, जणू काही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती
चालले आहेत, असा बडेजाव राखण्यात आला. कारण राज यांचा पोलिस ठाण्यांचा दौरा हा जणू काही मनसेचा प्रचार दौराच ठरला! तोही सरकारी खर्चाने.

राज यांच्या भाषणांवर, कार्यक्रमांवर, सभांवर बंदी घालण्यात आली, ही मराठीची मुस्कटदाबी असल्याचा प्रचार करायला ते मोकळे झाले. मराठी मने त्यांनी जिंकावी, असाच सरकारचा प्रयत्न राहिला. पण त्यांना जास्त मोठे केले गेलेयापुढे त्यांना दाबण्याचा जेवढा प्रयत्न होईल, तेवढे ते उसळून वर येतील, हे निश्चित!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP