Monday, February 13, 2012

सोळावं वरीस धोक्याचं.. भाजपसाठीही!

मतांचे घोटाळे, पक्षांतर्गत बंडाळी व शिवसेनेने केलेली लूटमार सहन न झाल्याने त्यांच्यासोबत राहायचे की नाही, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

मुंबई- शिवसेना-भाजप युतीने 15 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली. आलेल्या ब-यावाईट अनुभवांमुळे त्यांच्यातील प्रेम कमी झाले आहे. शिवसेनेने महापालिकेत केलेली लूटमार सहन न झाल्याने त्यांच्याबरोबर राहायचे की नाही, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. त्यातूनच मनसेबरोबर सलगीचा प्रयत्न होतो आहे. दुसरीकडे भाजपमध्येही लाथाळ्या, बंडाळीचे प्रकार वाढले आहेत. मतांचे घोटाळे, पक्षांतर्गत बंडाळी, पालिकेतील लूटमार तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमुळे पालिकेत सत्तांतराची शक्यता वाढली असून सत्तेतील सोळावे वर्ष भाजपला धोक्याचे ठरणार आहे.
 
सुमारे 25 वर्षे महाराष्ट्रात एकत्र राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीला घरघर लागली आहे. भाजपत शिवसेनेबद्दलच्या नाराजीला धुमारे फुटले आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र नसतील, असे संकेतही आहेत. त्यातूनच भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर मैत्री वाढवली आहे. दोघांमधील प्रेम आता उघड झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला बाजूला सारून मनसेबरोबर जाण्याचा भाजपचा विचार दिसतो आहे. त्यांच्यातील प्रेमानेच महापालिकेतही गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पक्षांतर्गत बंडखोरी आणि मनसेकडील ओढा यामुळे भाजप उमेदवारांच्या मतांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे मुंबई महापालिकेतील 28 नगरसेवक आहेत. ते 18 वर जाण्याचा अंदाज आहे. ही शक्यता दिसताच, रिपाइंचीही संख्या वाढू नये म्हणून भाजपने कंबर कसली आहे. रामदास आठवले यांना मिळालेल्या 29 जागांवर अधिक उमेदवार निवडून आल्यास आपले वर्चस्व कमी होण्याची भाजपला धास्ती आहे. महायुतीमुळे भाजपला नगरसेवक निवडून आलेल्या जागाही रिपाइंला सोडाव्या लागल्या. तेथील पदाधिकारी असंतुष्ट असल्याने रिपाइं उमेदवारांना मदत करायची नाही, असा छुपा कारभार चालला आहे. 

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची मैत्रीपूर्णयुती आहे. पण तिसरा भिडू आल्याने या मैत्रीमध्ये अंतर पडले आहे. भाजपला विश्वासात न घेता शिवसेना परस्पर निर्णय घेते आहे. बहुतेक निर्णय लूटमारीचे असल्यामुळे ते वारंवार अडचणीत येतात. मग युती टिकवण्यासाठी भाजपचे महापालिकेतील गटनेते अ‍ॅड. आशीष शेलार व भालचंद्र शिरसाट प्रशासनाला कोंडीत पकडून शिवसेनेला सोडवतात. भाजपने सर्वतोपरी मदत करूनही शिवसेनेत सुधारणा होत नसल्याने भविष्यात एकला चलो रेवा मनसेच्या इंजिनामागे धावणे हे दोनच पर्याय भाजपपुढे असतील.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP