Tuesday, July 14, 2009

दो दिलके टुकडे हजार हुए...

(
काँग्रेस पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीचे वेगळेपण काय आणि शिवसेनेपेक्षा मनसे कोणत्या अर्थाने स्वतंत्र पक्ष आहे, याचे संशोधन केले असता हाती काही सापडत नाही. राष्ट्रवादी ही प्रतिकाँग्रेस आणि मनसे ही प्रतिशिवसेना असून, केवळ नेत्यांच्या अहंगंडातून हे पक्ष वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली आहे, तर मनसे व सेना एकमेकांविरुद्ध उभे आहेत, एवढाच फरक.



महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी शिवसेना-भाजप या चार प्रमुख पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाचव्या पक्षाची चर्चा सध्या होत आहे. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्षांचे गट-तट, जनसुराज्य पक्ष असे काही छोटे पक्ष कार्यरत असले, तरी राज्यस्तरावर या पक्षांची ताकद उभी राहू शकली नाही. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन राष्ट्रीय पक्ष असून, त्यांची ध्येयधोरणे व तत्त्वप्रणाली स्वतंत्र आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला, तरी राज्यस्तरावर सर्वत्र या पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांचे वेगळेपण नेमके काय आहे? काँग्रेस पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीचे वेगळेपण काय आणि शिवसेनेपेक्षा मनसे कोणत्या अर्थाने स्वतंत्र पक्ष आहे, याचे संशोधन केले असता हाती काही सापडत नाही. राष्ट्रवादी ही प्रतिकाँग्रेस आणि मनसे ही प्रतिशिवसेना असून, केवळ नेत्यांच्या अहंगंडातून हे पक्ष वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसशी जुळवून घेऊन आघाडी केली आहे, तर मनसे व शिवसेना एकमेकांविरुद्ध तलवारी उपसून युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत, एवढा फरक दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आपण दोन्ही भाऊ-भाऊ मिळून सारे जण खाऊ, असा पवित्रा असून, एकत्र लढल्याशिवाय सत्तेचा मलिदा मिळणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे एकमेकांना सापत्न वागणूक दिली अथवा एकमेकांचे पाय खेचले, तरी वेळेवर एकत्र येण्याची किमया घडवून आणली जाते.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्यामधून विस्तव जात नसल्यामुळे शिवसेना व मनसे हे त्यांचे दोन पक्ष सत्तेच्या राजकारणात फार काही मिळवतील व यशस्वी होतील, अशी चिन्हे नाहीत. काँग्रेसमधून राष्ट्रवादीवाले बाहेर पडले, तेव्हा शरद पवार समर्थक व स्थानिक पातळीवरील असंतुष्ट काँग्रेसजन राष्ट्रवादीत गेले. या दोन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे आत-बाहेर चालू असते. तोच प्रकार शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू झाला आहे. आपापल्या मातृपक्षातून बाहेर येणे आणि पुन्हा आत जाणे ही आयाराम-गयाराम संस्कृती चांगली रुजत चालली आहे. दो दिल के टुकडे हजार हुए, कभी कोई इधर गिरा, कोई उधर, असा प्रकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हे प्रकार वाढण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेसमधून शरद पवार आपल्या समर्थकांसह बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना दहा वर्षापूर्वी केली. बाहेर पडण्याचा मुद्दा केवळ विदेशी सोनिया एवढाच होता. सोनियांच्या दारी आपली उपेक्षाच होईल, पंतप्रधानपदापर्यंत पोहोचता येणार नाही, यामुळे काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली. परंतु काँग्रेससोबत राहिले, तरच सत्तेची मजा चाखता येईल, हे कळून चुकल्यामुळे काँग्रेसशी आघाडी करण्यात आली. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा उपस्थित करून त्यांना पंतप्रधानपदापासून रोखण्यासाठी कंबर कसली, पण सोनिया गांधींमध्ये मनाचे औदार्य आणि विचारांची प्रगल्भता एवढी मोठी होती की, त्यांनी चालून आलेले पंतप्रधानपद नाकारले. मग भाजपसहित राष्ट्रवादीने केलेला विदेशीचा मुद्दा उरलाच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व ठेवण्याची गरज काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. वेगळे अस्तित्व ठेवले नाही, तर समर्थकांना तिकिटे मिळणार नाहीत. सत्ता आल्यावर सरसकट सर्वाना मंत्रीपदे मिळणार नाहीत. त्यामुळे वेगळे अस्तित्व ठेवण्याची गरज वाटत नाही.

स्वतंत्र पक्ष नसता, तर आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री काय मंत्रीही झाले नसते. दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासारखे मंत्री होऊ शकले नसते. आज वेगवेगळय़ा महामंडळांवर, समित्यांवर असलेल्या कार्यकर्त्यांना टिळक भवनात सतरंज्याच उचलाव्या लागल्या असत्या, अशी भावना या पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे, असेच अनेकांना वाटत आहे. मात्र ज्यांना पक्षात कोणी गॉडफादर नाही, अशा कार्यकर्त्यांना, पवारांनी पक्ष विलीन करावा, असे वाटत आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूला राजीव गांधींचे आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेला यशवंतराव चव्हाणांचे नाव देण्यात आले. दोन्ही पक्षांनी अत्यंत सामंजस्य राखून हे निर्णय घेतले, तेव्हा वेगळय़ा अस्तित्वाचा प्रश्नच उरत नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. पण दोघे भाऊ वाटून खाऊ नीती अवलंबिली असल्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाचा मुद्दा बाजूला सारण्यात आला आहे. पवारांना नेमके काय हवे आहे, मुख्यमंत्री कोणाला करायचे आहे, हे भविष्यात समजेल, तेव्हाच विलीनीकरणाचा मुद्दा जोर धरील.

काँग्रेस-राष्ट्रवादीत मनामनांचे सेतू बांधून आघाडीची एक्स्प्रेस वेगाने धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आघाडीला आतापासूनच सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. शिवसेना-मनसेत मात्र परिस्थिती नेमकी उलट आहे. या दोन्ही पक्षांना, आपणच मराठीचे कैवारी असे वाटत आहे; पण मराठीचा मुद्दा वेगळा राहिलेलाच नाही. दोघेही मराठी मुद्दय़ाचा दावा करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही सर्वसमावेशक धोरण स्वीकारून मराठी अस्मितेचा मुद्दा जवळ केला आहे. मात्र शिवसेना व मनसे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, समर्थ रामदासांचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांचाच अभंग आळवीत बसले आहेत. वन्ही तो चेतवा रे, चेतविताच चेततो म्हणजे काय? आग लावा, आग लावली की भडकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे विठ्ठल आहेत, पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे, असे म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि जय विठ्ठल करून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांना असाच घरचा आहेर मिळाला आहे. मनसेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता परूळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, मनसेचे विठ्ठल राज ठाकरे बडव्यांच्या कोंडाळय़ात आहेत, असा आरोप केला आहे.

खरे तर शिवसेनेचे आणि राज ठाकरेंचे खरे विठ्ठल सध्या पडद्याआड आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणात सक्रिय नाहीत. शिवसेना स्थापन झाल्यापासून गेली ४०-४२ वर्षे मराठी अस्मितेच्या मुद्दय़ाने जनमानस ढवळून निघाले होते. मराठी अस्मितेची भावना हेच विठ्ठलमय चैतन्य होते, तेच लोपले आहे आणि शिवसेना-मनसे हे दोन्ही पक्ष बडव्यांच्याच हाती गेले आहेत. विठ्ठलासोबत असलेले वारकरी जे जुनेजाणते नेते होते, शिवसेनेसाठी आणि विठ्ठलावरील अगाध श्रद्धेसाठी चाकू-सु-यांचे वार खाणारे आणि झेलणारे वारकरी निष्प्रभ ठरले आहेत. मनोहर जोशींसारख्या महापौर, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्षांपर्यंत उच्चपदे भूषविलेल्या ज्येष्ठ नेत्यालाही बाजूला सारले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करणारे आणि शिवसेना वाढविण्यासाठी अथक मेहनत करणारे नारायण राणेही तिथे राहिले नाहीत. बडवे मात्र उद्ध्वस्त छावण्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. विकासाच्या प्रश्नावर एक आंदोलन नाही, भावनिक मुद्दय़ांवर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न तेवढा होत आहे. राज ठाकरेंकडे नेतृत्व आणि वक्तृत्व गुण तरी आहेत. उद्धव ठाकरेंकडे तेही नाहीत. एकमेकांविरोधात लढून एकमेकांना गारद करण्याचा धंदा तेजीत आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP