Wednesday, March 9, 2016

हे ‘प्रभू’, महिला प्रवाशांचे प्रश्न कायमच!

रेल्वे सेवेचा ‘प्रभू’ मार्ग हा खाचखळगे, अडीअडचणी यावर उपाययोजना करत देशभर सुविधांचे जाळे विणण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने उभे केले आहे़ कोणतीही भाडेवाढ नाही, नव्या रेल्वे मार्गांच्या पोकळ घोषणा नाहीत, अपूर्ण योजना पूर्ण करण्यावर भर, रेल्वे स्टेशनवर वाय­फाय सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता असा संयमित; पण रेल्वेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडला असला तरी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या अर्थसंकल्पाने कोणतीही नवी उपाययोजना केलेली नाही़ महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता या अर्थसंकल्पाने महिलांचा अपेक्षाभंग केला आहे, असेच म्हणावे लागेल़

रेल्वे प्रवाशी महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेली हेल्पलाइन, सर्व वर्गातील डब्यांच्या मध्यभागी महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण, ३०० स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमरे, लहान मुलांसाठी वेगळे भोजन अशा प्रकारच्या तरतूदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये करण्यात आल्या आहेत; परंतु दोन­अडीच कोटी लोकसंख्येच्या मुंबईसारख्या अवाढव्य शहरात जिथे उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाºया महिलांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे महिलांच्या सुरक्षेवर भर देणारी कोणतीही योजना देण्यात आलेली नाही़ कर्जत, कसारा, विरार, पालघरपासून सीएसटी, चर्चगेटपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेने दररोज महिला प्रवास करत असतात़ कार्यालयातील नोकरदार, कामगार, मजूर, छोटे­छोटे उद्योग करणाºया असंख्य महिला घरदार सांभाळून व मुलाबाळांची व्यवस्था लावून ठरलेल्या वेळेत धडपडत, दमछाक होईपर्यंत धावून लोकल पकडतात़ स्वत:चे पैसे खर्च करून रेल्वे पास, तिकीट खरेदी करून प्रवास करत असतात़ रेल्वे त्यांना फुकट प्रवास देत नाही, तेव्हा त्यांना प्रवासात योग्य सुविधा मिळणे, हा त्यांचा हक्क आहे, जेव्हा सकाळी व संध्याकाळी गर्दीची वेळ असते तेव्हा खचाखच भरलेल्या डब्यांमध्ये घुसणे, ही तारेवरची कसरत असते़ अशा वेळी अनेक महिला लोकलमधून पडतात, जखमी होतात, लोकलखाली जातात, हातपाय तुटतात, मृत्युमुखी पडतात़ दोन वर्षांपूर्वी मोनिका मोरे ही तरुणी रेल्वेखाली गेली़ त्यात तिचे दोन्ही हात गेले, तिला कृत्रिम हात देण्यासाठी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला़ अपंग झालेल्या लोकांना कृत्रिम अवयव देण्याचे कल्याणकारी काम त्यांनी केले आहे़ याच महिन्यात डोंबिवलीजवळ गर्दीच्या लोकलमधून २५ वर्षांची धनश्री पडली आणि रुग्णालयात नेतानाच मरण पावली़ यावर उपाय म्हणून प्लॅटफॉर्मची उंची मार्च २०१५ पर्यंत वाढवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता़ त्यानुसार काँग्रेस सरकारच्या काळात हे काम सुरू झाले होते; परंतु भाजपा सरकार आल्यानंतर वर्षभर हे काम ठप्प झाले़ या वेळी रेल्वे मंत्री प्रभू यांनी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घोषित केला आहे, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, ही अपेक्षा आहे़
महिला सुरक्षेअंतर्गत येणाºया सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल आहे़ महिलांची बॅग, मोबाइल, गळ्यातील चेन खेचून पळ काढणाºया भुरट्या चोरांची रेल्वेत कमी नाही़ याचा फटका महिलांना दररोज बसत असतो़ चोरांची टोळी आणि डब्यात छोट्या­छोट्या वस्तू विकणारे यांच्या संगनमताने या चोºया होत असतात़ बोरिवली ते विरार दरम्यान डब्यातील रॅकवर ठेवलेल्या लॅपटॉपच्या बॅगा चोरण्याचा प्रकार सुरू झाला होता; परंतु चोरीचा लॅपटॉप विकत घेण्यास नकार मिळत गेल्यामुळे चोर सापडला़ रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यातून महिला प्रवाशांवर दगड भिरकावण्याचे प्रकार सर्रास घडत असतात़ चालत्या लोकलवर भिरकावलेल्या दगडामुळे महिला प्रवासी जखमी होत असतात़ कित्येकदा मृत्यूदेखील ओढवतो़ नोकरी करणाºया तरुणी, कॉलेज तरुणी यांची छेडछाड करणारे असंख्य प्रकार घडत असतात़ छेडछाडीच्या गुन्ह्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते; परंतु या प्रकारच्या गुन्ह्यांच्या नोंदी वेळेअभावी होत नाहीत़ तरुणींना डब्यात एकटे गाठून तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याचेही प्रकार घडले आहेत़
रात्रपाळी करणाºया महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत़ महिला पत्रकार, परिचारिका, दूरध्वनी केंद्र, कॉल सेंटर तसेच बारबाला रात्री उशिरा लोकलने प्रवास करणाºया या महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर आहेत़ काही दिवसांपूर्वी रात्री उशिरा कामाहून जाणाºया एका महिला पत्रकारावर असा जीवघेणा प्रसंग ओढवला होता़ तिच्या हातातून बॅग खेचली, मोबाइल खेचला, डब्यात बारबाला असल्यामुळे ती वाचली़ त्यानंतर महिला पत्रकारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले़ महिला प्रवाशांना बलात्काराच्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते़ या देशातील महिला विकृत पुरुषी मानसिकतेच्या बळी होत आहेत संपूर्ण देशभर बलात्काराचे गुन्हे घडू लागले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे़ लोकल गाड्यांमध्ये एकट्या महिलेला गाठून बलात्कार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़
 मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांनाच सक्षम करण्याचा उपक्रम रेल्वे पोलिसांनी हाती घेतला आहे़ महिलांचे सशक्तीकरण करून त्यांनीच स्वत:चा बचाव करावा यासाठी रेल्वे स्थानकांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे़ यामुळे गुन्हे कमी कसे काय होऊ शकतील, हे पोलीसच जाणो़ याचे कारण चालत्या लोकलमध्ये घुसून गुन्हेगाराने गुन्हा केला तर एकटी महिला काय करू शकणार? पोलिसांची हेल्पलाइन, सीसीटीव्ही, पोलिसांची कमतरता, यामुळे गुन्हे थांबण्याची शक्यता दिसत नाही़ मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे़ सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे़ राज्य शासनाचे पोलीस दल तसेच रेल्वे संरक्षक पोलीस दलाच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे, ही उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे; परंतु हेल्पलाइनची मदत उपलब्ध होईपर्यंत गुन्हा घडून गेलेला असतो़ बरेचदा हेल्पलाइनचा तत्काळ प्रतिसादही मिळत नाही़ सीसीटीव्ही कॅमेºयाने गुन्हेगाराची ओळख पटवून गुन्हेगार पकडता येतील; पण ही व्यवस्था गुन्हा घडून गेल्यानंतरची आहे़ प्रत्यक्ष गुन्हा घडत असताना मदतीला कोणी नाही, अशी परिस्थिती आहे़ महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी मान्य करण्यात आली, एका लोकलमध्ये महिलांचे तीन डबे आहेत; परंतु पश्चिम व मध्य रेल्वेच्या महिला डब्यांपैकी पश्चिम रेल्वेच्या सहा लोकलमध्ये मिळून १८ तर मध्य रेल्वेच्या केवळ एका लोकलमध्ये तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात पश्चिम रेल्वेच्या १३०५ आणि मध्य रेल्वेच्या १६१८ लोकल फेºया असतात़ या कुर्मगतीने काम झाले तर सर्व लोकल गाड्यांच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागणार कधी आणि किती? हा प्रश्नच आहे़ गुन्हेगाराची ओळख पटवून गुन्हेगार पकडता येतील; पण गुन्हा घडून गेल्यानंतरची ही व्यवस्था आहे़ प्रत्यक्ष गुन्हा घडत असताना मदतीला कोणी नाही, अशी परिस्थिती आहे़ महिला डब्यांच्या समोर प्लॅटफॉर्मवर तसेच डब्यांमध्ये पोलीस असणे अत्यंत गरजेचे आहे़ शासनाच्या महिला पोलिसासह आणखी एक पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाचा पोलीस असे तीन पोलीस एका डब्यात असले पाहिजेत़ तरच गुन्हा घडताना बंदोबस्त होऊ शकेल अथवा गुन्हा घडणारच नाही़ सध्या मुंबईमध्ये मधल्या आणि शेवटच्या डब्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ पहिल्या डब्यात क्वचितच पोलीस असतात. त्यामुळे घटना घडू नये, यासाठी उपाययोजना केली पाहिजे़ घटना घडून गेल्यानंतर आरोपी पकडण्यासाठी उपाययोजना करणे योग्य नाही़ हे प्रभू... अशी उपाययोजना झाली तरच महिला सुरक्षेचा प्रश्न सुटू शकेल!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP