Tuesday, July 7, 2009

मना मनांचे सेतू बांधा

(
शिवसेना-भाजप युतीने दिलेल्या नावांना काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला नाही; पण दोन समाजांत फूट पाडून जातीपातीचे राजकारण करणा-या युतीने कायम भावना भडकवण्याचे काम केले आहे.


नावात काय आहे, असे आपण कितीही म्हणत असलो तरी नावातच सर्व काही आहे, असे राजकारण्यांना वाटते, त्याला आपण सर्वसामान्य माणसे काय करू शकतो. जगाचे लक्ष आकर्षित करणा-या तसेच देशाची शान आणि मुंबई महाराष्ट्राचे वैभव असणा-या वरळी-वांद्रे सागरी सेतूला राजीव गांधींचे नाव दिले त्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

नामकरणाचे राजकारण करणा-या विरोधकांना सत्ताधा-यांनी जी चपराक दिली आहे, ती त्यांच्या लक्षातही आलेली नाही. दोन तटांना सांधणा-या या सेतूला राजीव गांधींचे नाव दिले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तटांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले आहे. सागरी सेतूबरोबरच मनामनांचे सेतू बांधण्याच्या कामाचा शुभारंभ दस्तुरखुद्द शरद पवार यांनी केला आहे. सागरी सेतू उद्घाटन कार्यक्रमात हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कार्यक्रमात सागरी सेतूला राजीव गांधींचे नाव देण्याची सूचना केली व सरकारने ती तात्काळ उचलून धरली.

विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर आल्या असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच, असे संकेत या नामकरणाने दिले असून ऐक्याच्या बळावर शिवसेना-भाजप युतीला सागरी सेतूवरून ढकलण्याचा व अरबी समुद्रात डुबक्या मारायला लावण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. हे युतीच्या ध्यानीमनीही आलेले दिसत नाही. निवडणुका जवळ आलेल्या असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना शह-काटशह देणारी भाषा करीत होते. तुम्ही स्वबळावर लढणार तर हमी भी कुछ कम नही, आमच्याही भूजांमध्ये बळ आहे. आम्हीपण स्वतंत्र लढू, असे एल्गार सुरू झाले होते. पण आपल्या भुजातले बळ कमी झाले आहे, जातीपातीच्या पक्षांतर्गत राजकारणाने हे बळ कमी केले आहे, याची जाणीव पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याला झाली नसती तरच नवल. काँग्रेसपासून दूर जाणे परवडणारे नाही, हे माहीत असल्यामुळेच दोहोंच्या मनाचे सेतू बांधण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्यासाठी सागरी सेतूचा प्लॅटफॉर्म वापरला.
 
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला किना-याला लावायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच पाहिजे, अशी दोन्ही पक्षांतील अनेक नेत्यांची व असंख्य कार्यकर्त्यांची भावना होती; परंतु लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या यशाने हुरळून गेलेल्या विलासराव देशमुखांसारख्या काही नेत्यांना काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे वाटत होते. सत्तेचा पुरपूर उपभोग घेतलेल्या नेत्यांना सत्ता आली काय किंवा गेली काय, त्यांचे काही वाटत नाही. त्यामुळे स्वबळाची भाषा वापरली गेली. या प्रकाराने सामान्य कार्यकर्ता मात्र हवालदिल झाला होता. मतविभाजनाचा फटका बसण्याची भीती वाटत होती. सर्वात वाईट अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. आघाडी झाली नाही तर ना घरका ना घाटका अशी स्थिती होईल. या भीतीने अस्वस्थता वाढली होती. काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रात आघाडी आणि राज्यात बिघाडी असले अनैतिक राजकारण मतदार खपवून घेणार नाहीत आणि घरी बसवतील, केंद्रातले मंत्रीपदही सोडावे लागेल, हे कळून चुकल्यामुळे तडजोडीचे आणि बेरजेचे राजकारण अपरिहार्य असल्याचा साक्षात्कार झाला. त्यासाठी बहुधा पवार संधीची वाट पाहत होते. ती संधी सागरी सेतूने मिळवून दिली.
 
पवारांनी कधीही सरळ राजकारण केले नाही; पण लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आघाडीचे शिल्पकार होऊन राजकीय वजन वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. राजीव गांधींचे नाव सागरी सेतूला देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची मने त्यांनी जिंकलीच; पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही दिलास दिला. त्याच वेळी तिसरीकडे नवी दिल्लीत काँग्रेसचे प्रवक्तेमनीष तिवारी यांनी स्वबळावर लढण्याची भाषा नेत्यांनी बंद करावी, अशा कानपिचक्या दिल्या. या सर्व बाबी जुळून येणे हा योगायोग खचितच नव्हता. पण पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधी पक्ष दोहोंना एकाच वेळी चारीमुंडय़ा चित करणारी काँग्रेसची विलक्षण खेळी होती. पवार हे काँग्रेसीच असल्यामुळे त्यांचे वर्तन वेगळे असण्याची शक्यता नाही; परंतु त्यांनी राजकीय विश्वासार्हता गमावलेली असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक खेळीकडे संशयाने पाहिले जाते. या वेळी मात्र अशा संशयाला जागा नाही, याचे कारण काँग्रेसशी आघाडी करणे, ही त्यांची गरज बनली आहे.
 
गरजवंत काय वाटेल ते करीत असतात, निवडणुकीच्या राजकारणात आपले कट्टर विरोधक बनलेल्या विलासरावांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवारांनी आपल्या पंखाखाली घेतले आहे. तर राष्ट्रवादीला अरबी समुद्रात बुडवण्यास निघालेल्या विलासरावांनी पवारांच्या आश्रयाला जाणे पसंत केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवारांच्या पॅनेलमध्ये उपाध्यक्षपदासाठी विलासराव उभे आहेत. आघाडी होण्याचे संकेत मिळताच विलासरावांनी पल्टी खाल्ली. क्रिकेटचा आणि विलासरावांचा काय संबंध? एकदा त्यांनी हार खाल्ली आहे. मुख्यमंत्रीपदी असताना पवारांशी जमवून घेणारे, पद जाताच पवारांवर घसरले आणि आघाडीचे संकेत मिळताच पवारांशी हातमिळवणी करण्यास निघाले. कुरघोडीच्या राजकारणात पवारांना मागे टाकण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले असल्याचे दिसते.
 
विधानसभा निवडणुकीनंतर येत्या तीन महिन्यांतच राज्यात नवे सरकार येणार असल्याने मुख्यमंत्री पदासाठी आतापासून लॉबिंग सुरू झाले आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांसह अनेक हौशे, नवशे, गवशेही स्पर्धेत उतरण्याची तयारी करू लागले आहेत. आघाडीचे सूतोवाच होताच विलासरावांनी क्रिकेटच्या माध्यमातून पवारांशी संधान जुळवण्याचा प्रयत्न चालवला आहे, तो हेतुपुरस्सर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पवारांवर टीकास्त्र सोडणारे विलासराव आता पवारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटच्या राजकारणाचा आनंद लुटत असल्याची भाषा करू लागले आहेत.

विमानतळाचे नामकरण असो की रस्ते व पुलांचे, काँग्रेसने कधी भावनिक राजकारण केलेले नाही. मुंबईच्या सहार आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा गांधींचे नाव देण्याचा प्रस्ताव होता; परंतु तत्कालिन भाजपप्रणीत आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले तर मुंबई व्हीटी रेल्वे स्थानकाला काँग्रेस सरकारने छत्रपतींचे नाव दिले. शिवसेना-भाजप युतीने दिलेल्या नावांना काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला नाही; पण दोन समाजांत फूट पाडून जातीपातीचे राजकारण करणा-या युतीने कायम भावना भडकवण्याचे काम केले आहे. मने सांधण्याऐवजी मनामनात फूट पाडून मने दुभंगवण्याचेच राजकारण केले आहे. राजीव गांधींनी संगणक क्रांती घडवून संपूर्ण देशाला आधुनिक युगात नेऊन ठेवले, देशासाठी बलिदान केले, ते मुंबईचे भूमिपुत्र आहेत की नाही, मराठी आहेत की नाही असले संकुचित प्रश्न उपस्थित करून युतीच्या नेत्यांनी स्वत:लाच संकुचित करून घेतले आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP