Wednesday, March 9, 2016

अमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा

उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन महाराष्ट्रभर साजरा होत आहे़; परंतु या दिवसाचे औचित्य साधून एक मार्च पासूनच ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे़ कार्यक्रमांमध्ये नेहमीप्रमाणे महिलांचे स्वातंत्र्य, महिलांचे सबलीकरण, महिलांची प्रगती, गगनभरारी यावर चर्चासत्रे झडू लागली आहेत़ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले़ त्यांच्या प्रगतीचे रोखलेले रस्ते खुले व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे व त्यानुसार तयार झालेली न्यायव्यवस्था विविध कायदे यांना अधिन राहून मिळणारे हक्क स्त्रियांना हवे आहेत़ त्यासाठी समाजाने जागे होण्याची होण्याची सरकारने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे़


सभा, संमेलनामधून अशा प्रकारच्या सूर निघत असताना या विचारांना छेद देणारे प्रकार घडू लागले आहेत़ वाई तालुक्यातील पाचवड गावात आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करणाºया बापाबरोबर त्या पीडित मुलीलाही झोडपून काढण्याचा निंदनीय प्रकार गेल्या शुक्रवारी घडला़ भटके विमुक्त गोपाळ समाजाच्या वस्तीत घडलेल्या या भयंकर प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या समाजाच्या जातपंचायतीने ही शिक्षा दिली असून दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असल्याने जातपंचायतींवर तातडीने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे़ एकीकडे महाराष्ट्राची भौतिक प्रगती साधत असताना दुसरीकडे जुनाट रुढी, परंपरांनी निर्माण केलेल्या जातपंचायती आणि अंधश्रद्धा कायमच्या उखडून टाकणे आवश्यक आहे़ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी ‘महाराष्ट्र’ सामाजिक बहिष्कारापासून ‘संरक्षण’ हे विधेयक आगामी अधिवेशनात मांडले जाणार आहे़
जातसमुहातील आरोपींना कठोर शासन करण्याचे अधिकार जातीतील पंचांना देण्यात आले असल्याने वाळीत टाकणे, लग्नानंतर कौमार्याची परीक्षा देणे, शिक्षणावर बंदी, हातावर तापलेली कुºहाड ठेवून चालणे, उकळत्या तेलात हात घालणे, अशा प्रकारच्या अघोरी क्रूर शिक्षा या राज्यात अजूनही दिल्या जात आहेत आणि राज्यकर्ते कायम मूग गिळून बसले आहेत़ या देशात घटनात्मक न्यायालये अस्तित्वात असताना जातपंचायती कायम राहिल्या हे आश्चर्यकारक आहे़ जातपंचायती या केवळ भटके विमुक्त जात समुहातच नाहीत त्या इतर जातींमध्येदेखील अस्तित्वात आहेत़ महिलांवरील अन्याय, अत्याचाराची प्रकरणे वाढू लागली आहेत़ त्यात जातपंचायतींनी अधिक भर घातली आहे़ मुळात भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करीत तालिबान्यांसारख्या क्रूर शिक्षा देणाºया या जातपंचायतींवर तात्काळ बंदी आणली पाहिजे आणि त्या कायमच्या नष्ट करून टाकल्या पाहिजेत़
भारतीय समाजातील जातव्यवस्था ही हिंदू धर्मातून उगम पावली असून ‘जात नाही ती जात’ असे म्हण तिला समाजाशी कायमचे चिकटून ठेवले आहे़ या जातव्यवस्थेमागे वंशशुद्धी आणि रक्तशुद्धी असल्याचे सांगून विविध समूहांना जातींचा स्वीकार करण्याचे बंधन घालण्यात आले आहे़ जातीय मानसिकतेमुळे हिंदू धर्म संकूचित झाला असून जगभरातील देशांमध्ये या धर्माला लोकांनी स्वीकारले असल्याचे दिसत नाही़ उलट ज्या धर्मांमध्ये जाती नाहीत त्या धर्मांना जगात मान्यता मिळाली आहे़ प्रत्येक जातसमूह आपल्या जातीचा अभिमान बाळगताना दुसºया जातीबद्दल आपलेपणा दाखवित नाही़ आपलाच वंश आगळावेगळा आणि आपलेच रक्त शुद्ध असा वृथा अभिमान बाळगणाºयांनी ब्राम्हणादी कथित उच्च जातींचे नेतृत्व मात्र मान्य केलेले दिसते़; परंतु आपल्या समूहाचा विचार महत्त्वाचा मानला जातो़ जातीचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, नियमांचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला जातीतून बहिष्कृत केले जाते़ ज्या धर्माने समाजाला जातीपातींच्या जाचक नियमांमध्ये अडकवून ठेवले त्या जातीव्यवस्थेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधार तर नाहीच; पण त्या तर्कावर आधारीतदेखील नाहीत़ धर्माशास्त्राचा आधार दिला जातो; पण धर्मशास्त्र हे विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही़ त्यामुळे जातीव्यवस्था केवळ अंधश्रद्धेने पाळल्या जात आहेत़ जातींबरोबर परंपरावादी असल्याचा अभिमानही बाळगला जात आहे़ या जातीव्यवस्थेवर आधारीत पंचायती स्थापन करण्यात आल्या असून पंचायतींचे कायदे, नियम आणि त्यानुसार देण्यात येणाºया शिक्षा या भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत़
जात पंचायतींमधील पंचांचे जात समुहावर संपूर्ण नियंत्रण असते़ जातीतील लोकांवर वचक ठेवण्यासाठी देण्यात येणाºया शिक्षा अत्यंत कठोर आणि अघोरी असतात़ शारीरिक किंवा दंडाच्या शिक्षा दिल्या जात आहेत़ जात पंचायत किंवा गावकी केवळ भटके विमुक्त समाजापुरतीच मर्यादित नाही़ ती इतर जातींमध्येदेखील आहे़ अलीकडे जातसमुहातील व्यक्तीला बहिष्कृत केल्याची अनेक वृत्ते येऊ लागली आहेत़ जुलै २०१३ मध्ये नाशिक येथे आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्वत:च्या गरोदर मुलीला केवळ जातीच्या शुद्धतेसाठी बापाने मारून टाकले़ मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे जातपंचायतीने त्या परिवाराला बहिष्कृत केले होते़ त्याचा दोष मुलीवर टाकून बापाने हे कृत्य केले़ पुणे येथे माजी नगरसेवक काका धर्मावत, जितेंद्र शर्मा आणि जगदीश उणे या श्रीगौर ब्राम्हण जातीच्या तिघांवर बहिष्कार टाकण्यात आला़ जातीच्या कोणत्याही कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित राहू नये, अशी तंबी देण्यात आली़ धर्मावतच्या भाचीने महाराष्ट्रीयन ब्राम्हण मुलाशी लग्न केले होते तर शर्माच्या भावानी अन्य जातीतील मुलीशी लग्न केले होते़ त्याची शिक्षा त्यांना देण्यात आली़ कोकणातील चिपळूण तालुक्यात धामणदेवी गावच्या हरेश पारधी आणि सहदेव पडवळ यांनी जातीबाहेर लग्न केल्यामुळे त्यांनाही जातीतून बहिष्कृत करण्यात आले़ रायगड जिल्ह्यातील एका गावात एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेल्या गिर्यारोहकाच्या पत्नीने जीन्स पँट घातली आणि मंगळसूत्र व कुंकू लावत नसल्यामुळे त्या दांपत्याला बहिष्कृत करण्यात आले़ उस्मानाबाद जिल्ह्यातील एका दलित कुटूंबाने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे पोलिसात तक्रार दिली या कारणावरून वरच्या जातीतील गावकºयांनी त्यांच्या बहिष्कार टाकला़ त्यांना पिण्याचे पाणी नाकारले, दुकानातून अन्नधान्य घेऊ दिले नाही आणि त्यांच्या गुरांना शेतात चरू दिले नाही़ त्यांच्यावरील बहिष्कार उठविण्यात आला असला तरी या गावातील कुटूंबे भीतीखालीच वावरत आहेत़
जातपंचायतींमध्ये महिलांचे सर्वाधिक शोषण होत आहे़ लग्नानंतर कौमार्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मुलींवर लहानपणापासून बंधन येते़ इतर जातीत सहभागी होऊ नये म्हणून तिचे शिक्षण बंद केले जाते़ आईच्या पोटात, पाळण्यात किंवा अल्पवयीन असताना तिचे लग्न लावले जाते़ एका विवाहित महिलेचे चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिला उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढण्यास पंचांनी सांगितले़ बीड जिल्ह्यात ही घटना घडली़ अंधश्रद्धेचा पगडा इतका आहे की, काही जातींमध्ये अजूनही स्त्रियांना परपुरुषाचा झालेला स्पर्श पाप समजला जातो़ त्यामुळेच बाळांतपणात बाळ किंवा आई दगावली तरी चालले; परंतु डॉक्टरच्या स्पर्शाच्या भीतीने दवाखान्यात पाठविले जात नाही़ काही जातींमध्येतर पोलिसात जाणे हाच गुन्हा समजला जातो आणि त्यांना शिक्षा दिली जाते़ सातारा येथे नुकत्याच झालेल्या एका प्रकारात जातपंचायतीने अल्पवयीन मुलीला दोरीने बांधून काठीने बडविण्याची शिक्षा दिली़
समाजामध्ये पोशाखी सुधारणा झाल्या असताना जुन्या रुढी परंपरा अधिक घट्ट होत चालल्या आहेत़ पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद असलेल्या या जातपंचायती तात्काळ नष्ट करून टाकल्या पाहिजेत़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP