Monday, February 4, 2013

आता राजकारण्यांचे वर्‍हाड लंडनला!

राजकारण्यांनी व्यक्तीकेंद्री किती व्हावे याचे भान राखले पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेत जाऊन बेनामी मालमत्ता खरेदी करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. पुण्याचे नानासाहेब गोरे हे लंडनमध्ये उच्चायुक्त असतानाही तिथे पायीपायी फिरत असत, आजचे राजकारणी मतदारसंघात हेलिकॉप्टर शिवाय जात नाहीत.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे 'वर्‍हाड निघलंय लंडनला' हे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशात चांगलेच गाजले. ज्येष्ठ नाटककार आणि नाटय़संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या प्रा. देशपांडेंनी आपल्या हयातीत निर्माण केलेल्या अनेक नाटय़कृतींमध्ये 'वर्‍हाड.' सर्वाच्या कायम स्मरणात राहिले आहे. 

या नाटकाने नाटय़रसिकांची जी करमणूक केली त्याला तोड नाही. त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाला लंडन सफरीचा मनमुराद आनंद दिला होता. आज ते हयात असते तर त्यांनी 'वर्‍हाड'चा पार्ट टू 'राजकारण्यांचे वर्‍हाड लंडनला' असे नाटक रसिकांच्या भेटीला नक्कीच आणले असते. आता काळ झपाटय़ाने बदलत चालला आहे. जागतिकीकरणाने मुक्त अर्थव्यवस्थेला मोकळीवाट करून दिली असून राजकारणी आणि उद्योजकांकडे भरपूर पैसा खुळखुळत आहे. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत भरपूर श्रीमंत अशी उदारीकरणाची देण आहे. त्यातून काळापैसा वाढू लागला आहे. या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक देशांनी लाल गालीचे अंथरून ठेवले आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांबरोबर राजकारणीही सरसावले आहेत.

गेल्या सप्ताहात लंडनला जाण्याचा योग आला होता. जगातल्या प्रत्येक देशातली एक तरी व्यक्ती लंडनमध्ये असावी, असे वाटले. कारण या शहरातील गर्दीत, रस्त्यावर बस आणि टय़ूब रेल्वेमधून जाताना नाना विध भाषांमधील संभाषण ऐकू येते, असे म्हणतात. लंडनमधील तीनशेहून अधिक भाषा बोलणारे लोक सध्या राहत आहेत. लंडन हे सर्वात मोठे जागतिक शहर आहे. टोकियो आणि न्यूयॉर्क एवढेच मोठे आर्थिक केंद्र आहे. जगातील सर्वात जास्त पर्यटक लंडनमध्ये जात असतात. पर्यटकांचा ओघ कायम असतो, बर्फ पडत असतानाही पर्यटकांची गर्दी होतेच, जगाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या गर्दीचा प्रवास मात्र अत्यंत सुलभ असतो. याचे कारण येथील वाहतूक व्यवस्था उत्तम आहे, लंडनचे हिथ्रो विमानतळ हे जगातील मोठे विमानतळ आहे. ट्रेन किंवा बससाठी ताटकळत उभे राहावे लागत नाही उत्तम भुयारी रेल्वे आहे, क्वचित एखाद्या लाईनवर मेगा ब्लॉक असतो, नाही असे नाही; पण इतर पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत नाही. आपल्याकडे मेगाब्लॉक तर असतोच; पण कधी ओव्हरहेड वायर तुटते, ती तुटली की प्रवाशांचे जे हाल होतात त्याला सीमा नाही. तिकडे वीजपुरवठा खंडित होत नाही, पाणी कपात होत नाही, रस्त्यांवर खड्डे नाहीत आणि सर्वाजनिक ठिकाणी कुठेही कचरा दिसणार नाही, असे चकचकीत स्वच्छ रस्ते असतात. कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कचर्‍याचे डबे ठेवलेले असतात आणि लोक डब्यातच कचरा टाकतात. आपल्याकडे कचर्‍याच्या डब्याच्या आजूबाजूला सगळा कचरा पडलेला पाहून आपल्या लोकांनी एकदातरी परदेशात जाऊन तेथील नागरी शिस्त पाहावी, असे वाटते; पण आपले जे लोक तिकडे जातात ते तिथे त्यांच्यासारखे वागतात, इकडे परत आले की पुनश्च कचर्‍याच्या डब्याबाहेर कचरा टाकण्याचे स्वातंर्त्य घेतात असे दिसून येते.

लंडनस्थित काही भारतीयांकडून माहिती मिळाली की, आपले राजकारणी सतत लंडन वारीला जात असतात. म्हणजे दिवसा पंढरपूरच्या वारीला आणि रात्री बारीला जाणारे अनेक राजकारणी लंडनवारीदेखील करू लागले आहेत. कोणाला लंडनच्या नाईट लाईफमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला पैशाची गुंतवणूक वेगवेगळय़ा फायनान्स कंपन्या व बँकांमध्ये करायची असते, कोणाला उद्योगांमध्ये, तर अनेकांना मालमत्ता खरेदी करून गुंतवणूक करायची असते. अनेक राजकारण्यांनी लंडनमध्ये घरे घेतली असून उद्योग उभारले आहेत. महाराष्ट्रातल्या एका बडय़ा नेत्याच्या सर्वाधिक मालमत्ता लंडनमध्ये असल्याचे समजले. महापालिकेत नगरसेवक असलेल्या राजकारण्यांपासून ते केंद्रात मंत्री असलेल्यांपर्यंत अनेकांनी परदेशात गुंतवणूक करून मालमत्ता घेतल्या आहेत. लंडनहून परत येता क्षणी बातमी वाचली, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी इंडोनेशियात कोळशाच्या खाणी खरेदी केल्या आहेत आणि त्यांना झारखंडचे वादग्रस्त माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या खास विश्वासू पुण्याच्या अनिल बसतावडेंनी मदत केली आहे. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशी अंती समजून येईलच. भुजबळांवरील आरोप ऐकण्याची लोकांना सवय झाली आहे. भुजबळांचे तेलगी प्रकरण सर्वाना परिचित आहे; पण त्यामुळे त्यांचे काही बिघडले नाही. चौकशीअंती काहीच निघाले नाही आणि त्यांनी निवडणूकही जिंकली. तेव्हा इंडोनेशियात भुजबळांच्या कोळशाच्या खाणी आहेत की नाहीत याचा निकाल यथावकाश येईलच. सांगण्याचे तात्पर्य असे की, राजकारण्यांनी व्यक्तीकेंद्री किती व्हावे याचे भान राखले पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेत जाऊन बेनामी मालमत्ता खरेदी करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. पुण्याचे नानासाहेब गोरे हे लंडनमध्ये उच्चायुक्त असतानाही तिथे पायीपायी फिरत असत, आजचे राजकारणी मतदारसंघात हेलिकॉप्टर शिवाय जात नाहीत. संसद आणि विधिमंडळ सदस्यांच्या विविध विषयांचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी समित्या असतात, त्यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असतो, या समित्यांचे सदस्य विविध देशांना भेटी देऊन अभ्यास करून येत असतात. त्या अभ्यासाचे भारतात आल्यानंतर काय होते हे त्यांनाच ठाऊक.

लंडनमध्ये बाथ नावाचे एक टूमदार असे लहानसे शहर आहे, पण त्या शहराचे नियोजन इतके सुंदर आहे की, लांबून पाहतानाच त्याचा आखीव रेखीवपणा लक्षात येतो. बाथ एक पर्यटन स्थळ आहे. पर्यटनस्थळाचे वैशिष्टय़ हे की येथे गरम पाण्याचे कुंड आहे. ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. जणू काही एक जागतिक आश्चर्य असल्याप्रमाणे लोक 'बाथ' ला भेट देण्यासाठी गर्दी करीत असतात. आपल्याकडे वज्रेश्वरी, गणेशपुरीला असे कितीतरी गरम पाण्याचे, गंधकयुक्त गरम पाण्याची कुंड आहेत, पण ही स्थळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याइतपत आपण विकसित केलेली नाहीत, आपली कोकणची सागरीकिनापट्टी गोव्याइतपत देखील विकसित केलेली नाही. लंडनमध्ये थेम्स नदीवरदेखील जगभरातून पर्यटक येत असतात, थेम्सवरील 'लंडन आय' या भल्यामोठय़ा उंच पाळण्यात बसून संपूर्ण लंडन एकाच दृष्टिक्षेपात पाहता येणे, अशी पर्यटनाची दूरदृष्टी आपण दाखवू शकत नाही. ज्यांच्या मतांवर आपण निवडून येतो, ज्यांच्या कराच्या पैशातून आपण मजा करतो पण त्या लोकांना साध्य नागरी सुविधाही अपण देत नाही, असे राजकारण्यांना वाटत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे अर्थशास्त्र हे सामाजिक न्यायासाठी होते. भारतातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता, त्यामुळे जागतिक मंदीच्या काळातही भारताने मंदीला तोंड दिले. आंबेडकरांनी अँडमिनिस्ट्रेशन अँण्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या पुस्तकात कंपनीच्या आर्थिक व्यवहाराचे विश्लेषण केले आहे. कंपनी बरखास्त करण्यात आली तेव्हा कंपनीवर 693 लाख पौंड एवढे कर्ज होते. ते भारतावर लादले होते. त्यांनी 'प्रॉब्लेम' ऑफ रुपी, इटस् ओरिजिन अँण्ड सोल्यूशन' या ग्रंथात रुपयाचे अवमूल्यन, मूल्यन, विनिमय दर, सुवर्ण विनिमय परिणाम, चलन फुगवटा, पेपर रुपया यांचे सखोल विश्लेषण केले आहे. 'इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्सेस ऑफ ब्रिटिश इंडिया' या ग्रंथात केंद्र-राज्य यांचे आर्थिक संबंध विकसित होण्याबाबतचे विश्लेषण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. त्यांच्या अर्थविषयक सखोल ज्ञानाची दखल घेऊन राणी एलिझाबेथ यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स या प्रतिष्ठित विद्यापीठाला बाबासाहेबांचा अर्धपुतळा आणि त्यांचे तैलचित्र भेट दिले. ते या विद्यापीठाच्या क्लेमण्ट नावाच्या इमारतीत प्रवेशद्वारासमोर लावण्यात आले आहे. आमचे राजकारणी मात्र आपल्या देशात वाम मार्गाने कमावलेला पैसा लंडनमध्ये घेऊन जात आहेत आणि मालमत्ता खरेदी करीत आहेत. कुठे डॉ. आंबेडकर आणि कुठे फुले-आंबेडकरांचा उद्घोषण करणारे आजचे राजकारणी!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP