Monday, February 25, 2013

कदम, कदम बढाये जा..


राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. गावे ओसाड होऊ लागली आहेत. शहरांमध्ये स्थलांतर होऊ लागले आहे. मुंबई-पुणे शहरांमध्ये डोक्यावर गाठोडे घेतलेले, विसाव्याला रस्त्याच्या कडेला टेकलेले खेडूत दिसू लागले आहेत. बाया बापुडे, मुलंबाळे पाण्यासाठी वणवण करू लागले आहेत, पिण्याचे पाणी आणि उदरभरणासाठी चार घास कसे मिळतील याच्या विवंचनेत या लोकांची भ्रमंती चालू आहे. 

दुष्काळाच्या या परिस्थितीची पाहणी करून लोकांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवा कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेस खेड्यापाड्यात रस्त्यावर उतरली असून, त्यांनी पदयात्रा सुरू केली. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत पदयात्रेची आगेकूच सुरू आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही पदयात्रा नव्हे तर, संवाद यात्रा मजल दरमजल करीत 5 मार्च रोजी सांगली येथे येऊन थांबणार आहे. बुलढाणा ते सांगली हे 500 किलोमीटरचे अंतरही संवादयात्रा पार करणार आहे. युवक कॉँग्रेसने आजपर्यंत अनेक उपक्रम राबवले असतील. परंतु अशा प्रकारचा वेगळा उपक्रम कॉँग्रेसने तर नाहीच पण अन्य पक्ष संघटनांनी देखील राबवलेला दिसत नाही. देशात आणि राज्यात विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी वेगवेगळय़ा यात्रा काढल्या, दिंड्या काढल्या; पण एवढी प्रदीर्घ संवादयात्रा काढण्यासाठी युवक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले नव्हते आणि कॉँग्रेसचे युवक तर अजिबात उतरलेले नव्हते. स्वातंत्र्यानंतर गेल्या 65 वर्षांत बिगर कॉँग्रेसी सरकारांचा जेमतेम 10 वर्षांचा कालावधी वगळता केंद्र सरकारमध्ये कॉँग्रेस पक्षाचीच सत्ता दीर्घकाळ राहिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजतागायत युती सरकारचा साडे चार वर्षांचा कालावधी वगळता कॉँग्रेसच सत्ता उपभोगत आहे, मात्र कायम सत्ताधीश राहिल्यामुळे मुजोरी, मनमानी, व्यक्तीकेंद्री राजकारण अशाप्रकारे सत्तेचा दर्प या पक्षामध्ये निर्माण झाला. 

आज चित्र पालटत चालले आहे. हा देश तरुणांचा देश बनत चालला आहे. येत्या दशकात तरुणांची संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे आजचा तरुण सुशिक्षित, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने अधिक शिक्षित, धर्म, जात, पंथविरहित विधायक कामावर भर देणारा, वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन सकारात्मक विचार करणारा असेल, या तरुणांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना कर्तव्याची समज यावी या उद्देशाने कॉँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी चिंतन शिबिरात युवकांना नवा संदेश दिला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा लोकांशी संबंध राहिलेला नाही. प्रत्येकजण सत्तेमुळे आपल्याच मस्तीत मजा करत आहे. ही मानसिकता बदलून युवक कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांशी थेट, संवाद साधला पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे काम केले पाहिजे, असा नवा संदेश राहुल गांधींनी दिला. राहुल गांधींचे युवकांविषयी असलेले विचार देशभरातील सर्व राज्यात पोहोचवण्याची जबाबदारी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव हे पार पाडीत आहे. मराठवाड्यातील हिंगोलीसारख्या ग्रामीण भागातून आमदार राजीव सातव शांत, संयमी आणि संघटन कुशल नेते असून, आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विशेषत: राहुल गांधींचा विश्‍वास संपादन केला आहे. डॉ. विश्‍वजीत कदम हे मोठय़ा मताधिक्याने प्रदेश युवक कॉँग्रेसपदी निवडून आले. तेव्हापासून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे युवकांचे संघटन सुरू केले असून, त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. युवक कॉँग्रेस उपाध्यक्ष सत्त्यजीत तांबे यांची त्यांना उत्तम साथ असून, विश्‍वजीत आणि सत्यजीत या जोडीने संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी चांगलीच मेहनत घेतलेली दिसते. 

महाराष्ट्रात पावसाचे कमी होणारे प्रमाण, पाणीटंचाई, सतत दुष्काळाचा सामना करावा लागण्याची परिस्थिती, त्याचा शेतीवर होणारा विपरित परिणाम आणि शेतीवर उपजीविका अवलंबून असणार्‍या सुमारे 1 कोटी ४0 लाख शेतकरी कुटुंबाचे होणारे हाल, दरवर्षी कमी होत जाणारे शेती उत्पादन याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन उपाय योजना सुचवण्यासाठी तसेच शासनस्तरावर प्रय▪करण्यासाठी डॉ. कदम यांनी संवादयात्रा सुरू केली आहे. पिण्याचे पाणी नाही, शेतीला पाणी नाही, वीज नाही, गुराच्या छावण्या नाही, मिळालेल्या छावण्यात चारा नाही, रोजगार नाही, विहिरीच्या कामाचे पैसे मिळत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नाहीत, रेशन नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, या दुष्काळाची 1972 च्या महाभयंकर दुष्काळाशी तुलना होऊ लागली आहे. या बिकट परिस्थितीत भर उन्हात सुरू असलेल्या संवादयात्रेत युवक कॉँग्रेसचे तरुण सहभागी होत आहेत. एरव्ही लहानसे पद मिळालेला पदाधिकारी मोठा नेता होण्याचे स्वप्न पाहतो, निवडणूक लढविण्याची महत्त्वकांक्षा ठेवतो आणि नेत्यांप्रमाणे वागू लागतो, विमान प्रवास आणि हेलिकॉप्टर वापरण्याचीही सवय लावून घेतो. विश्‍वजीत कदम हे तर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव तसेच देशभर आणि परदेशातही शिक्षण क्षेत्रात आपल्या विद्यापीठाचा ठसा उमटवलेल्या भारती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला असून केंद्राने त्यांना पहिल्या श्रेणीचे प्रमाणपत्र दिले आहे. अशा युवक नेत्याला पंचतारांकित सुविधांमध्ये आलिशान आयुष्य उपभोगणे कठीण नाही; परंतु पतंगरावांचे सुपुत्र असलेल्या विश्‍वजीत कदम यांना हवेत पतंग उडविणे मान्य नाही, हेलिकॉप्टरमधून दुष्काळाची पाहणी करणे त्यांना पसंत नाही. राहुल गांधींचा एक सच्चा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी संवादयात्रेतून दाखवून दिले आहे. दररोज 20-30 मैल चालून दुष्काळाचा सामना करणार्‍या ग्रामस्थांशी चर्चा करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देणे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आहे किंवा नाही याची माहिती घेणे, त्यावर तत्काळ उपाययोजना सुचवणे, शासन दरबारी त्यांची कैफियत पोहचवणे प्रत्येक गाव खेड्याच्या पाहणीचा अहवाल तयार करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थांना दिलासा देणे, त्याच्या समस्यांना जाणून घेण्यासाठी आपणही उन्हाचे चटके सोसत इथपर्यंत आलो आहोत याचा प्रत्यय दुष्काळ पीडितांना देणे हे सोपे काम नाही आणि सगळी सुखे आणि वैभव समोर हात जोडून उभे असतानाही सर्व सामान्य माणसांशी संवाद साधण्यासाठी पायी पायी चालत जाणे कोणी पसंत करणार नाही. सामाजिक कार्य करण्याची मनापासून तळमळ असलेला कार्यकर्ताच उन्हातान्हात पायपीट करू शकतो. वातानुकूलित दालनांमध्ये बसून काम करणार्‍यांना याची कल्पना येऊ शकत नाही; असा अनुभव घेण्याची त्यांची मानसिकता असू शकत नाही, असे अनेक रेडिमेड युवक नेते आपल्या आजूबाजूला वावरत असतात, कपड्याची इस्त्री मोडू नये, उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून एसी गाडीतून उतरायचे तर नाहीच पण, गाडीची काळी काचही खाली करायची नाही, केवळ मोठय़ा नेत्यांची चमचेगिरी करायची, वेळप्रसंगी रस्त्यावर केवळ हाणामारीसाठी उतरायचे, नेत्यांच्या स्वागतासाठी मोठ-मोठे पुष्पगुच्छ घेऊन विमानतळावर जायचे, काम करायचे नाही, केवळ क्रेडिट घेण्यासाठी नेत्यांच्या पुढे मागे फिरत राहायचे. अशा शानोशोकीत राहणार्‍या युवक कार्यकर्त्यांची आजकाल कमी नाही. 

या पार्श्‍वभूमीवर विश्‍वजीतने सुरू केलेली पायीपायी संवादयात्रा ठळकपणे उठून दिसत आहे. या संवादयात्रेने युवकांना निश्‍चितपणे स्फूर्ती दिली आहे, ही संवादयात्रा युवकांसाठी काम करण्याची प्रेरणा ठरली आहे. मोठमोठय़ा नेत्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढल्या, कोणी राममंदिरासाठी यात्रा काढल्या, युवकांनी बाजूला ठेवून वयोवृद्ध नेते रस्त्यावर उतरू लागले तेव्हा वृद्धांचा हा देश म्हणजे करुण भारत वाटत होता; परंतु राहुल गांधींच्या प्रेरणेने आता हा देश तरुण भारत असल्याची प्रतिमा तयार होऊ लागली आहे. या प्रेरणेतून विश्‍वजीत कदम यांची संवादयात्रा 'कदम कदम बढाये जा' असा स्फूर्ती संदेश युवकांना देत आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP