हंगामा है क्यूँ बरपा...



‘दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताजा हवा चली है अभी’
‘चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है ’
‘कल चौदहवी की रात थी
शब भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है
कुछ ने कहा चेहरा तेरा’
असे गझलमय वातावरण निर्माण होत असताना शिवसेनेमुळे हा कार्यक्रमच रद्द होतो
‘हंगामा है क्यूँ बरपा
थोडी सी जो पी ली है
डाका तो नही डाला
चोरी तो नही की है’
असे म्हणण्याची वेळ दस्तुरखुद्द गुलाम अलींवर आली आहे़ हा हंगामा कशासाठी, थोडी गझलची नशा द्यायची आहे, दरोडा घालायचा नाही किंवा चोरी करायची नाही अशीच रसिकजनांची भावना असणार आहे़
शिवसेनेचा विरोध असलेल्या कार्यक्रमाला समर्थन देऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाभाजपा युतीमधील संबंध अधिक दुरावत चालले असल्याचे दाखवून दिले आहे़ याच वेळी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्या आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित केले होते़ हा कार्यक्रमदेखील उधळून लावण्याची धमकी शिवसेनेने दिली़ मात्र, कुलकर्णी यांनी शिवसेनेवर टीका करताना विरोध करावा; परंतु तो कायद्याच्या कक्षेत असावा. कार्यक्रम होऊच देणार नाही, हा पवित्रा अनाकलनीय आहे असे स्पष्टपणे सांगितले़ कार्यक्रम करणे हा आमचा हक्क असून आम्हाला ते स्वातंत्र्य आहे व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडेल, असाही गर्भित इशारा त्यांनी शिवसेनेला दिला़ पाकिस्तानी मान्यवर आणि कलाकार यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका पाहता गुलाम अली नक्कीच म्हणत असतील,
‘कैसी चली अब ये हवा तेरे शहर मे
बंदे भी हो गये है खूदा तेरे शहर मे’
पण राष्ट्रप्रेमाचा उमाळा आलेल्या शिवसेनेला हे सांगणार कोण?
आजदेखील महाराष्ट्रात अनेक पाकिस्तानी कलाकार वास्तव्यास आहेत़ सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात कव्वाली गाणारा अदनान सामी, नुसरत फतेहअली खान यांचा पुतण्या राहत फतेहअली खान, ‘हीना’ चित्रपटाची नायिका झेबा बख्तियार, अभिनेत्री वीणा मलिक, मीरा असे अनेक पाकिस्तानी कलाकार येथे बॉलीवूड आणि चित्रवाहिन्यांमध्ये कामे करत आहेत़ इतकेच नव्हे तर सूफी संगीताची उपासना करणारे, संगीतामध्ये मोठे योगदान देणारे पाकिस्तानी यात्रेकरू तसेच कव्वाली गायक भारतामध्ये दर्गे आणि मदरशांमध्ये आपली कला सादर करत आहेत़ त्या सर्वांना येथून हाकलून द्यावे लागेल. हे अभियान शिवसेना केव्हा हाती घेते, हेच आता पाहायचे़
महाराष्ट्रात सध्या मराठी गझल अत्यंत लोकप्रिय होत चालली आहे़ गझल ही सूफीतील कलाप्रकार असून मराठीत या गझलेचे अनुकरण करण्यात आले आहे़ सुरेश भटांनी प्रथम ही गझल परंपरा आपल्या येथे निर्माण केली़ यापूर्वी मराठीत कविता, पदे, गीते अशाच रचना होत्या़ औरंगाबादचे सुप्रसिद्ध गझलकार बशर नवाझ या प्रतिभावंत गझलकारांनी तयार केलेल्या गझला गुलाम अली, तलत अझीज यांच्यासारख्या नामवंत गायकांनी गायल्या आहेत़ संतांचे बोधप्रद कीर्तन, अभंगाप्रमाणे रचना असलेली उर्दू गझल आपल्या देशात इतकी लोकप्रिय झाली की, सुरेश भटांपासून प्रेरणा घेऊन अनेक गझलकार येथे तयार झाले़ इलाही जमादार, सतीश दराडे, सुधीर मुळीक, ममता सपकाळ, सदानंद बेंद्रे, अमित वाघ, प्रकाश घोडके आदी अनेक गझलकारांनी मराठी गझल आपल्या प्रतिभेने समृद्ध केली आहे़ इलाही जमादारसारख्या गझलकारांच्या गझल भीमराव पांचाळेंसारख्या समर्थ गायकांनी नावारूपाला आणल्या़ गझल केवळ मनोरंजनासाठी नसून वीरा राठोडसारख्या गझलकाराने दलितांचे दु:ख गझलेच्या चार ओळींमधून मांडले़ त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला़ विविध कलांचे अदानप्रदान होत त्यांना वैश्विक रूप मिळाले असल्याचे देशविदेशातील कलाप्रकारांनी सिद्ध केले आहे़ गझलकार मेहदी हसन यांनी कलाकारांना धर्म नसतो अशा प्रकारचे विधान केल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी आकाशवाणी व दूरदर्शनने बंदी घातली होती़ तशीच बंदी आपल्या लोकशाही देशात असावी का? दहशतवादाला आपल्या येथील जनतेचा जसा विरोध आहे तसा तेथील जनतेचाही विरोध आहे़ दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानबरोबर व्यापार व अन्य क्षेत्रांशी असलेली आपली देवाणघेवाण सर्वांना चालू शकते़ मग त्यांच्या गझल आणि क्रिकेटलाच विरोध का? त्यांच्या धर्मालाही कडवा विरोध दाखवायचा आणि आपलाच धर्म आणि संस्कृती श्रेष्ठ असल्याचा उद्घोष करायचा़ हिंदू धर्म हा सहिष्णू असल्याच्या बाता मारायच्या आणि असहिष्णुतेचे दर्शन घडवायचे हे कसे?
विकृत मानसिकतेचा बळी
पुण्यामध्ये गेल्या शुक्रवारी एका ६० वर्षांच्या इसमाने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिचे शिर कुºहाडीने धडावेगळे केले, ते शिर हातात घेऊन त्याची रस्त्यावर धिंड काढली़ एवढी क्रौर्याची परिसीमा गाठली असतानाही त्याला हे क्रूर कृत्य केल्याची जराही भीती वाटली नाही़ विकृत पुरुषी मानसिकता कोणत्या थराला पोहोंचली आहे, हेच यावरून दिसून येते़ महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत तरी त्याची जरब आजही पुरुष वर्गाला बसलेली नाही, हे पुण्यातील घटनेने सिद्ध झाले आहे़ एका मॉडेलवर अॅसिड हल्ला केलेल्या सहाय्यक दिग्दर्शकाला नुकतीच दोन वर्षांची शिक्षा झाली आहे़ या मॉडेल प्रेयसीने त्याला नकार दिला म्हणून तिला कोणत्याही पुरुषाने स्वीकारू नये, यासाठी तिच्या चेहºयावर अॅसिड टाकून चेहरा विद्रुप केला़ पुण्यात पत्नीचे शीर धडावेगळे करणारा अशिक्षित तर मॉडेलचा चेहरा अॅसिडने विद्रुप करणारा दिग्दर्शक उच्चवर्णीय सुशिक्षित आहे़ त्यामुळे पुरुष कोणत्याही वर्गाचा, धर्माचा, जातीचा असो त्याची मानसिकता ही स्त्रियांच्याबाबत विकृत अशीच असून स्त्री ही केवळ भोग्य वस्तू आहे आणि तिने पुरुषाच्या दास्यातच राहायला हवे़ तिला आचारस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य नसावे, अशी पुरुषाची अपेक्षा असते़ त्यातून तिने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर पुरुषी अहंकार दुखावला जातो व त्यातून अशा प्रकारे क्रूर हत्याकांड, बलात्कार, अत्याचार घडत असतात़
0 comments:
Post a Comment