Monday, June 20, 2011

मनमानी राजकारण्यांना सावधानतेचा इशारा


एकाधिकारशाहीविरुद्ध क्रांती सुरू झाली. भारतातही भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत संघटित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘आम्ही कर भरतो’, ‘आम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाढवितो’ त्यामुळे जीवन सुरक्षित आणि सुरळीतपणे जगण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकभावना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर राजसत्ता उलथवून टाकण्याचे नैतिक बळ लोकांमध्ये आहे, असा इशारा देण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. क्रांतीची बीजे आता सर्वत्र रोवली गेली. एकाच धर्माचा पगडा असलेल्या मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये क्रांती होऊन जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इजिप्तमध्ये नुकतीच झालेली क्रांती ही तरुणांनी घडवून आणली यावरून तरुणाई किती जागृत झाली आहे हेच दिसून येते.

सर्वसामान्य माणसांच्या राजकीय सामाजिक, आर्थिक हक्कांवर गदा आणून हुकूमशाही किंवा एकाधिकारशाहीने लोकांना दडपून टाकण्याचा मनमानीपणा राज्यकर्त्यांनी केला तर लोक रस्त्यावर येऊन उठाव केल्याशिवाय राहत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यकर्त्यांनी केलेल्या दडपशाहीविरुद्ध उठाव करण्याची लाट जगभरात आली आहे. टय़ुनिशियाच्या जस्मीन क्रांतीनंतर इजिप्त, सिरीया, येमेन, बहारीन, लिबीया या देशांमध्ये एकाधिकार राजसत्तेविरुद्ध क्रांती सुरू झाली. भारतातही भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत संघटित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘आम्ही कर भरतो’, ‘आम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाढवितो’त्यामुळे जीवन सुरक्षित आणि सुरळीतपणे जगण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकभावना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर राजसत्ता उलथवून टाकण्याचे नैतिक बळ लोकांमध्ये आहे, असा इशारा देण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. क्रांतीची बीजे आता सर्वत्र रोवली गेली आहेत. एकाच धर्माचा पगडा असलेल्या मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये क्रांती होऊन जगाला आश्चर्याचा धक्का देण्यात आला. इजिप्तमध्ये नुकतीच झालेली क्रांती ही तरुणांनी घडवून आणली यावरून तरुणाई किती जागृत झाली आहे हेच दिसून येते. त्याच धर्तीवर अण्णा हजारेंच्या आंदोलनातही जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला होता.?

गेल्या सप्ताहात इजिप्तला भेट दिली. या दौऱ्यात नुकत्याच झालेल्या क्रांतीच्या खुणा अजूनही पदोपदी जाणवत आहेत. गेली तीन दशके  लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणून मनमानी करणा-या राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या हुकूमशाही राजवटीला खाली खेचण्याची तेजस्वी क्रांती तरुणांनी घडविली. 25 जानेवारी 2011 रोजी मुस्लिमांना पवित्र असणा-या शुक्रवारच्या दिवशी कैरोच्या तहारीर चौकात हजारोंच्या संख्येने  जमा झालेल्या जनसमुदायाने आपला संताप व्यक्त केला. कैरोतील सुप्रसिद्ध म्युझियमशेजारी असलेल्या इमारतीमध्ये मुबारक यांच्या मुलाचे गमाल मुबारक यांचे कार्यालय युवकांनी जाळून टाकले. त्या बहुमजली इमारतीला आग लावली. 15 मजल्यांची ही इमारत जळून खाक झाली आहे.  याबाबत एका सुरक्षारक्षकाला विचारले असता, गमालचे कार्यालय आंदोलकांनी जाळून टाकले तो आता तुरुंगात आहे, असे धीटपणे सांगून टाकले.?मुबारक यांची दोन्ही मुले तुरुंगात आहेत आणि मुबारक शर्म-अल-शेख येथील एका रुग्णालयात दाखल आहेत.

तब्बल 18 दिवस तरुण आंदोलकांनी तहारीर चौक दणाणून सोडला आणि होस्नी मुबारक यांचे सिंहासन हादरवून टाकले. मुबारक यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा इजिप्तसह जगभरात आनंद व्यक्त करण्यात आला. होस्नी मुबारकविरुद्ध केवळ? 18 दिवसात उठाव झालेला नाही.?त्यांच्या कारभाराविरुद्ध लोकांमध्ये अनेक वर्षापासून असंतोष धुमसत होता. त्यांनी देशाच्या संविधानात जी काही कलमे घातली होती त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेची मर्यादा संपली होती. अध्यक्ष सक्षम नसेल तर सत्तेची सूत्रे उपाध्यक्ष किंवा पंतप्रधानांकडे असतील पण त्यांना कोणतेही संविधानी अधिकार नसतील. त्यांना मंत्रिमंडळ बरखास्त करता येणार नाही, घटना दुरुस्ती करता येणार नाही. अध्यक्षपद रिकामे असेल किंवा अध्यक्षाला अपंगत्व आले असेल तर मुख्य न्यायमूर्ती कार्यभार सांभाळतील पण त्यांना अध्यक्ष म्हणून पद स्वीकारता येणार नाही.? 60 दिवसात नव्या अध्यक्षाची निवड करावी लागेल. एक वर्ष सलग अध्यक्ष राहिलेलीच व्यक्ती अध्यक्षीय निवडणुकीत उतरू शकेल, अशी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवणारी कलमे मुबारक यांनी संविधानात घातली होती. ?

होस्नी यांच्या राजीनाम्यानंतर इजिप्तमध्ये सर्वसामान्य लोकांवर असणारे दडपण पार निघून गेले आहे. लोक उघडपणे या हुकूमशहाविरुद्ध बोलू लागले आहेत. पूर्वी लोक प्रतिक्रियाही देत नव्हते.?पण आता मुबारक यांना उघडपणे दूषणे देत आहेत. महंमद नावाच्या एका दुकानदाराला मुबारक यांच्याबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘मुबारक चोर आहे. तो परत येणार नाही.’ एका ड्रायव्हर अहमदला विचारले तर तो म्हणाला, ‘मुबारक आता परत येणे शक्य नाही. आम्हाला लोकांनी आणलेले सरकार हवे आहे. राजा असेल तर तो रामसेसारखा तरी असावा.?ज्याने पुरातन काळात इजिप्तचा विकास आणि लोकांचे कल्याण यावर भर दिला होता.’ आता इजिप्तमध्ये मुबारक गेल्याचा आनंद इतका उघडपणे साजरा केला जात आहे की, 25 जानेवारी, होस्नी मुबारक आऊट, वुई डिड इट (आम्ही हे केले) असे डिझाइन असलेले टी शर्ट, पर्सेस, शोभेच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. प्रत्येक वस्तूवर ‘होस्नी आऊट’ असे लिहिले जात आहे.

खरे तर इजिप्तची क्रांती ही संपर्काच्या क्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेली आहे. फेसबुकने ही क्रांती घडविली.टय़ुनिशियामधील पत्रकार महंमद क्रिशेने याने स्थानिक पत्रकाराला हाताशी धरून असंतोषाच्या घटनांचे व्हिडीओ फेसबुकवर पाठविले त्यामुळे आंदोलनाला सार्वत्रिक पाठिंबा मिळाला. त्यामुळे मुबारक यांनी फेसबुक, इंटरनेट, एसएमएस या सर्वावर बंदी घातली. तरीही या तंत्रज्ञानामुळे जगात माहिती पोहोचली. इजिप्तमध्ये सुरू झालेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.संतापलेल्या मुबारक यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची लैंगिक चाचणी करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे अरब जगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. महिलांच्या सहभागामुळे आंदोलनाला धार चढली. जेव्हा-जेव्हा महिला मोठय़ा संख्येने आंदोलनात उतरल्या त्या-त्या वेळी आंदोलनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आपल्या देशात स्वातंत्र्य आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच महागाई प्रतिबंधक आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, सीमा लढा या सर्व आंदोलनांमध्ये मोठय़ा संख्येने महिला उतरल्या होत्या. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने महिला घराबाहेर पडल्या असे दिसले नाही. अरब जगतामध्ये बुरखा पद्धती असूनही महिला रस्त्यावर उतरत आहेत. यावरून एकाधिकारशाहीविरुद्ध संताप किती तीव्र आहे याची कल्पना येते.
 इजिप्तमधील आंदोलनाला कुणी नायक नसला तरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचे माजी अध्यक्ष व शांतता नोबेल विजेते मोहंमद अल बरादाय याचे संपूर्ण पाठबळ मिळाले. आजही दर शुक्रवारी तहारीर चौकात लोक जमतात, पोस्टर्स, बॅनर्स लागलेले असतात.घोषणाबाजी सुरू असते. त्यांच्यावर निर्बंध आणण्याकरिता लष्कर तैनात केले जात आहे.चौकाकडे जाणारे सर्व रस्ते सार्वजनिक वाहतुकीकरिता बंद केले जात आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे ठरले आहे. परंतु या निवडणुकीबद्दल अनिश्चितता आहे. पण काही तरी चांगले निश्चित घडेल असा विश्वास लोकांना वाटतो आहे. सध्या मात्र या अनिश्चिततेमुळे इजिप्तच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. खरे तर पर्यटन हे इजिप्तच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. जगभरातील लोक येथील रामसे राजे, नेफरतरी राणी, स्फिंस्क, जगप्रसिद्ध पिरॅमिड, लग्झरचे कर्णाक मंदिर,अबू सिंबल, राजे राण्यांच्या ममीज असलेले संग्रहालय तसेच नाईल नदीवरील नौकानयन पाहण्यासाठी येत असतात. साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास पाहण्यासाठी लोकांची फार उत्सुकता आहे.पण त्या पर्यटनावरच आता परिणाम झाला आहे.?पण आपल्या देशामध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी किंमत मोजावी लागेल याचीही जाणीव येथील लोकांना आहे. अरब राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही विरुद्ध उमटत असलेली प्रतिक्रिया पाहता राजकारण्यांनी सावध होण्याची गरज आहे. लोक जागृत झाले आहेत. मनमानी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP