Monday, June 6, 2011

राजकारणासाठी वापरले जाते बाबासाहेबांचे नाव


प्रसिद्ध ठिकाणांना महापुरुषांची नावे देण्याची प्रथा सर्व जगात आहे. रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वेस्थानके, संग्रहालये, विद्यापीठे अशा सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या स्थळांना महापुरुषांची नावे दिली जातात. हे नामांतर बिनबोभाट होत असते. पण बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रश्न पुढे येताच समाजात वेगवेगळे प्रवाह निर्माण होतात. समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो. या संघर्षाला जातीय संदर्भ असल्याने तो संघर्ष चिघळत ठेवून त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न अनेक वर्षे लोंबकळत ठेवून समर्थक विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. आता तोच प्रकार दादरच्या नामांतराबाबत होईल की काय, अशी भीती वाटू लागली.

आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे चलनी नाणे वारंवार वापरले जाते. निवडणुका आल्या की सर्वाना बाबासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची आठवण होते. महानगरपालिकाजिल्हा परिषदांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेततसे बाबासाहेबांच्या नावाचे राजकीय भांडवल करण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. अगदी परवा-परवापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांना आणि नावाला विरोध करणा-या शिवसेनेनेही आता बाबासाहेबांबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करीत दलितांची घरे जाळणा-या शिवसेनेनेही आता दलित मतांसाठी आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास आपला कधीच विरोध नव्हता’, असा खुलासा केला. हा खुलासा करण्यासाठी शिवसेनेला 16 वर्षे लागलीयावरून त्यांचा विरोध किती तीव्र होता याची कल्पना येते. शिवसेनेचे पूर्णत: खच्चीकरण झाले आहे. त्यांच्या जागाही कमी होऊ लागल्या आहेत. त्यांची बहुसंख्य मते नारायण राणे व राज ठाकरे यांच्यामागे गेली आहेत त्यामुळे रामदास आठवलेंना बरोबर घेऊन दलितांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र मतांसाठी किती जरी गळय़ात गळे घातले तरी यांनीच पूर्वी आपले गळे कापले आहेतहे रामदास आठवले विसरले असले तरी दलित जनता कधीही विसरणार नाही. आठवले आणि त्यांच्या गटाला घेऊन शिवसेना दलितांची आळवणी करीत आहे. 9 जून रोजी होणा-या शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याचा प्रयोगही त्यासाठीच सुरू आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेततसा सर्वच पक्षांना आता दलित जनता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कळवळा निर्माण झाला आहे. काँग्रेसने हे वर्ष समरसता वर्षे म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहेतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला 11 वा वर्धापनदिन सामाजिक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एवढे करूनच थांबली नाहीतर त्यांनी अत्यंत चलाखीने दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा प्रश्न उकरून काढून दलितांची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 11 वा वर्धापनदिन 10 जून रोजी आहे. 10 जूनच्या कार्यक्रमात दादर रेल्वेस्थानकाला चैत्यभूमी’ नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची बातमी जाणीवपूर्वक पसरविण्यात आली.
 
ज्या ज्या वेळी दलितांना आकर्षित करून त्यांची मते वळविण्याची गरज भासते तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला जातो. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न चिघळत ठेवून असेच राजकारण करण्यात आले. राजकीय पुढा-यांचे राजकारण झालेमात्र त्यात गोरगरीब दलितांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक दलित तरुणांचे बळी गेले. आता पुन्हा दादरच्या नामांतराचा प्रश्न उकरून काढला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रश्न उकरून काढताच अपेक्षेप्रमाणे चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दादरच्या नामांतराची मागणी आपलीच असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या उत्साहावर पाणी टाकले. आम्ही केलेल्या मागणीमागे कोणतेही राजकारण नाही. वर्षभरापूर्वीच आम्ही तसे पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. सामाजिक समता वर्ष साजरे करण्याचा निर्णयही आम्ही आता निवडणुका डोळय़ांसोर ठेवून घेतला नसून तोही एक वर्षापूर्वीच घेतला असल्याचे सांगून माणिकराव ठाकरे यांनी मोठय़ा खुबीने राष्ट्रवादी काँग्रेसवर कडी केली आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नामांतरास स्पष्टपणे विरोध करताच राज आणि रामदास आठवले यांच्यामध्ये चांगलाच खटका उडाला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. नामांतरास विरोध करताना राज ठाकरे म्हणाले,असल्या भावनिक मुद्दय़ाने दलितांचे कल्याण होणार नाही. दादर रेल्वेस्थानकास आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव दिले तरी आपला विरोध कायम राहीलअसे त्यांनी सांगितले. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र 500 रुपयांच्या नोटेवर छापण्यासाठी शरद पवारांनी केंद्रात आवाज उठवावाअसे आवाहन केले.
 
राज ठाकरे यांच्या विरोधानंतर रामदास आठवले यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांना विरोध केला. दादरच्या नामांतराला विरोध करायचा असेल तर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या झेंडय़ातून निळा रंग काढून टाकावाअसे आव्हान त्यांनी दिले. इतके करून आठवले थांबले नाहीत तर राज ठाकरे यांनी नवीन पक्ष काढून आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. निळा रंग काय आठवले यांची खासगी मालमत्ता आहे कायअसा सवाल करून कलानगरच्या बाजूला आठवले यांनी तीन मजल्यांचा बंगला कसा बांधला. त्यासाठी पैसा कुठून आणला. शेजारी राहायला गेल्यापासून रामदास आठवले शिवसेनेच्या प्रवक्त्यासारखे वागत आहेतअसे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले. मात्र मातोश्रीच्या बांधकामासाठी पैसा कुठून आणलाअसा प्रश्न त्यांनी आपल्या काकांना कधी विचारला नाही.
 
दलित चळवळीतील विचारवंत राजा ढाले यांनी या सर्व गोंधळावर मांडलेली मते फार महत्त्वाची आहेत. दादरच्या नामांतरापासून होऊ घातलेल्या शिवशक्ती-भीमशक्तीचाही त्यांनी रोखठोक भाषेत समाचार घेतला आहे. आठवले म्हणजे काही भीमशक्ती नाही. ज्यांनी दलितांची डोकी फोडली त्यांच्यासोबत रामदास आठवले जात आहेत. हे दलित जनतेला कसे मान्य होणाररिपब्लिकन पक्षाचा वापर केवळ पायपुसण्यासारखा केला जात आहेअशी तमाम दलित कार्यकर्त्यांच्या मनात खदखदणारी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दादरच्या नामांतराचा वाद असा चिघळलेला असताना शिवसेना मात्र मूग गिळून आहे. एवढय़ा सगळय़ा वादात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास आमचा विरोध नव्हताअसे 16 वर्षानी सांगणा-या शिवसेनेने दादरच्या नामांतराबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात इतका कळवळा आहेतर त्यांनी दादरच्या नामांतराबाबत भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेचे हे मौनच मोठे बोलके आहे. मराठवाडा विद्यापीठाप्रमाणेच दादरच्या नामांतरालाही शिवसेनेचा स्पष्टपणे विरोध आहे. मात्र तसे जाहीर केले तर रामदास आठवलेंना बरोबर घेऊन दलित जनतेला भुलविण्याचा जो प्रयोग शिवसेनेने सुरू केला आहेतो यशस्वी होऊ शकणार नाहीम्हणून ते मूग गिळून बसले आहेत. मात्र हे न कळू शकण्याइतकी दलित जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP