Monday, June 27, 2011

बूंदसे गई वो हौदसे नही आती...


ओबीसींना आरक्षण देणा-या मंडल आयोगाला विरोध करायचा आणि निवडणुकीत मतांसाठी ओबीसींना जवळ करायचे, समाजातील जाती-जातींमध्ये विद्वेष वाढविण्याचे काम करायचे, अशा प्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम संघ परिवाराने सुरू ठेवले आहे आणि हिंदुत्ववादी ओबीसी नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, त्याविरुद्ध ठाम भूमिका घेऊन उभे राहिले नाहीत. व्यक्तिगत पातळीवर काही कमी पडले की बंडाची भाषा सुचते. मुंडेंच्या बंडाने नेते आणि पक्ष दोघांची घसरण सुरू झाली असल्याचे दिसत आहे.

भारतीय जनता पार्टीचे नाव बदलून भारतीय झगडा पार्टी ठेवले पाहिजे. गटबाजीने पूर्णत: पोखरलेल्या या पक्षाने अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांना काँग्रेसवर सोडून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली होतीपण भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याच पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारून काँग्रेसच्या डोकेदुखीवर उपचार करण्याची तत्परता दाखवली. मुंडेंचे बंड हे काँग्रेसच्या डोकेदुखीवर झंडूबाम ठरले आहे. पक्षांतर्गत गटबाजीने आणि भांडण-झगडय़ाने पोखरलेला भाजप हा विरोधी पक्ष सत्ताधा-यांवर अंकुश कसा काय ठेवणारलोकसभेत विरोधी पक्ष उपनेते असलेल्या मुंडेंनी आपल्या पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यामुळे हा पक्ष जखमी होऊन निपचित पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर कशीबशी मलमपट्टी करण्याचे आणि मुंडेंना समर्थन देऊन आपला गट समर्थ करण्याचे काम विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केले. पण दुखावलेले मुंडे सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षनेतृत्वाला पूर्णपणे उघडे पाडण्याचा निर्धार करून ते महाराष्ट्र दौ-यावर जाणार आहेत.           
 
भाजपमध्ये गेले कित्येक महिने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धुसफूस सुरू झाली आहे. तिला चव्हाटय़ावर मांडण्याचे काम मुंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारवर अण्णा-बाबांना सोडून मजा पाहणा-या भाजपचा पुरता फज्जा उडाला आहे. गोपीनाथ मुंडेंनी बंड नेमके कशासाठी केलेत्यांना काय करायचे होतेत्यांना काय हवे होतेया प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. राज्यात आपल्या समर्थकाचे विरोधी पक्षनेतेपद जाणार आणि पुण्यात आपल्या समर्थकाला अध्यक्ष केले नाही यावरून राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने  आकांडतांडव करून पक्ष सोडण्याच्या धमक्या द्याव्यात एवढे नेतृत्व खुजे झाले आहेअशी चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेसमध्ये आधार नाही आणि भाजपमध्ये निराधार अशी बंडानंतर झालेली अवस्था पाहता बंड फसले असेच म्हणावे लागेल. याचे कारण या बंडामागे कोणतीही योग्य रणनीती नसल्याचे दिसले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये यापूर्वी बंड झाले नाहीअसे नव्हे. शिवसेनेतले बंड तर फारच गाजले आहे. छगन भुजबळ,नारायण राणेगणेश नाईक आणि राज ठाकरे यांनी बंड केले. पण त्यामागे एक निश्चित विचार होता. भुजबळांना तेव्हा आक्रमक शिवसेनेचा पक्षांतर करताना त्रास झाला. पण नारायण राणेंनी पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी मांडलेली परखड मते कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना पटली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. तो समजताच राणे काँग्रेस पक्षात गेले आणि त्यांनी महसूलमंत्रीपदाची शपथही घेतली. काळाची  पावले ओळखून त्यांनी बेमालूमपणे यशस्वी राजकारण केलेराज ठाकरे यांनी तर स्वतंत्र पक्ष काढला आणि पाहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले. पण एरव्ही स्वत:ला शरद पवारांच्या पंक्तीत नेऊन बसवणारे मुंडे आपल्या बंडाचे डावपेच आखण्यात सपशेल फसले. त्यांच्या बंडाचा त्यांना किंचितही फायदा मिळाल्याचे दिसत नाही. मुंडे काँग्रेसमध्ये जाणारत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणारते विलासरावांना भेटलेमोहन प्रकाशना भेटले एवढेच काय अहमद पटेलांना भेटलेसोनिया गांधींना भेटणारअशी वृत्ते दिवस-रात्र वाहिन्यांवर दाखवली जात होती. पण मुंडेंना ग्रीन सिग्नल मिळू शकला नाहीगाडी रेड सिग्नलजवळच थांबली आणि परत यार्डात गेली. किमान पाच दिवसात ग्रीन सिग्नल मिळेल अशा तयारीने डावपेच आखले असते तर बंड फसले नसते. मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ शकले असते. पण त्यासाठी तटबंदी मजबूत करावी लागतेपण मुंडेंना काँग्रेसने का घ्यावेहाही प्रश्न आहे. काँग्रेसला त्यांची गरज नाही आणि मुख्यमंत्रीपदासाठी तर काँग्रेसमध्ये लाइन लागलेली आहे. तसे पाहता मुंडे हे विलासराव,नारायणरावअशोकराव या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत. मराठवाडय़ात निवडणुकीच्या राजकारणात विलासराव-गोपीनाथराव हे सख्खे शेजारी असतातएकमेकांचे निकटवर्ती निवडून आणण्याकरिताएकमेकांना मदत करीत असतात,एकमेकांचे विरोधक पाडण्यासाठीदेखील मदत होत असते. त्यामुळेच बहुधा विनोद तावडेंनी लातूर पॅटर्न म्हटले असावे. ही राजकीय मैत्री आता सर्वपरिचित झाली आहे. नारायण राणेंना तर मुंडेंच्या मदतीची गरज नसतेकोकणातील आपल्या निवडणुका लढविण्यासाठी ते स्वत:च समर्थ आहेत. अशोक चव्हाणांना सोयीनुसार त्यांची मदत होते. त्यामुळे तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा प्रश्न नव्हता. पण आपल्याच विवंचनेत असलेल्या भाजपची आणखी नाचक्की नको,असा सूज्ञपणा काँग्रेसने दाखविलेला दिसतो. त्यामुळे मुंडे माघारी फिरलेसोनिया गांधींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सुषमा स्वराज यांच्यासोबत बचावात्मक पवित्रा घेत आपण भाजपमध्येच राहणारअसे त्यांना जाहीर करावे लागले. मुंडेंची घुसमट काही थांबली नाही. त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मान्य करण्याचे आश्वासन त्यांना मिळालेअसेही झालेले नाही. कारण भाजपमध्ये राहणारअसे जाहीर करून चार तास उलटत नाहीत तोच मुंडेंनी पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागलीत्यांचा नेम गडकरींवर असल्याने चिडलेल्या गडकरींनी आधी ठरलेली मुंडेंची भेट टाळली. त्यामुळे मुंडेचा पक्षांतर्गत संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडेंनी केलेल्या बंडाचा सर्वाधिक परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आहे. कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. नेत्यालाच पक्षात किंमत नसेलबंड करावे लागत असेल. तर आपले काय होणारहा प्रश्न त्यांना पडला आहे. तसे कार्यकर्त्यांना तिकिटेही मिळत नाही आणि केवळ आशेवर काम करावे लागते. नेत्याची पत राहिली नसेल,घसरण होऊ लागली असेल तर कार्यकर्त्यांनी तरी सोबत का राहावेअशी कुजबूज सुरू झाली आहे.
 
शेटजी-भटजीचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसी नेत्यांचा वापर करून घेतला आणि त्याच वेळी ओबीसी नेत्यांची वाढलेली ताकद कमी करण्यासाठी त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्नही केला. नितीन गडकरींसारख्या संघाच्या निष्ठावान उच्चवर्णीय नेत्याची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करून संघाबरोबरच भाजपचा जातीय चेहरा त्यांनी पुन्हा एकदा लोकांसमोर आणला. सामाजिक समरसत्तेच्या नावाखाली सोयीनुसार रंग पालटणा-या संघाची अनेक रूपे वेळोवेळी प्रगट झाली आहेत. ओबीसींना आरक्षण देणा-या मंडल आयोगाला विरोध करायचा आणि निवडणुकीत मतांसाठी ओबीसींना जवळ करायचेसमाजातील जाती-जातींमध्ये विद्वेष वाढविण्याचे काम करायचेअशा प्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम संघ परिवाराने सुरू ठेवले आहे आणि हिंदुत्ववादी ओबीसी नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेत्या विरुद्ध ठाम भूमिका घेऊन उभे राहिले नाहीत. व्यक्तिगत पातळीवर काही कमी पडले की बंडाची भाषा सुचते. मुंडेंच्या बंडाने त्यांची तसेच नेते आणि पक्ष दोघांची घसरण सुरू झाली असल्याचे दिसत आहे.

धर्म-जातीच्या नावाने राजकारण करणारे आजही जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मागासवर्गीय नेत्यांचा वापर केवळ मतांसाठी होत आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेदेखील स्वत:चा बळी द्यायला निघाले आहेत. मुंडे भाजप सोडणार, या वृत्ताने भाजपत नव्हेत तर शिवसेनेत अस्वस्थता वाढली होती. कारण शिवशक्ती-भीमशक्तीत ओबीसी चेहरा हवा होता. दुबळय़ा उद्धव ठाकरेंना धनुष्य पेलवणार नाही त्यासाठी मुंडेंची प्रत्यंचा हवी आहे. म्हणूनच मुंडेंना गडकरी भेटत नाहीत पण उद्धव ठाकरे दोन वेळा भेटले. दुखावलेले मुंडे आता महाराष्ट्र दौरा काढणार आहेत. तो कार्यकर्त्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पक्षनेतृत्वाविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असेल. मुंडेंच्या फसलेल्या बंडाने  ‘बूंदसे गई वो हौदसे नही आती’ असा प्रकार घडला आहे

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP