Monday, September 19, 2011

मोदी कसे होणार पंतप्रधान?


इंडिया शायनिंगच्या दुस-या टप्प्याचा असाच फज्जा उडण्याची शक्यता दिसत आहे. कारण रालोआत किती पक्ष राहिले ते शोधावे लागत आहेत. अण्णा द्रमुकच्या जयललिता मोदींच्या समर्थनार्थ पुढे आल्या. अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आले, पण जनता दल (संयुक्त)चे शरद यादव आणि नितीशकुमार यांचे प्रतिनिधीदेखील आले नाहीत. शरद यादव यांनी तर उपोषणाला महत्त्वच दिले नाही, देशातले 80 टक्के उपेक्षित लोक नेहमीच उपवास करीत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जयललिता यांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचा भरोसा नाही.



भारतीय जनता पक्षाचे यात्रा फेम राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुजरातचे विकास फेम उपोषणवीर नरेंद्र मोदी यांनी पार मागे टाकले आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी अडवाणी देशभर भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढणार होते, पण मोंदीनी अण्णांचेच अनुकरण करीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी अण्णांप्रमाणे थेट उपोषणालाच बसण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. यावरून मोदींना आता पंतप्रधानपदाचे वेध लागले असल्याचे दिसून आले. विविधता आणि एकतेचा अनोखा अनुभव देणा-या आपल्या देशात सर्व सामाजिक स्तरांमध्ये सद्भावना आणि शांतता राहावी याकरिता मोदींनी प्रतीकात्मक उपोषण केले. या उपोषणाचा थाट पाहता याला पंचतारांकित शाही उपोषण असेच म्हणावे लागेल. अडवाणींची प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि अण्णांचे प्रचारतंत्र यांचा एकत्रित मिलाफ मोदींमध्ये दिसू लागला आहे. अमेरिकन संसदेच्या एका संशोधन समितीने दिलेल्या अहवालात मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे पुढील उमेदवार असतील, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदींचा वारू आता सुसाट वेगाने चौखूर धावू लागला आहे. प्रसिद्धी तंत्रात निष्णात असलेल्या भाजपने या अहवालाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. त्यातून मोदींची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना केल्यामुळे अडवाणींपासून गडकरी-मुंडेंपर्यंत सगळेच दुस-या-तिस-या फळीत गेले आहेत. नितीन गडकरी हे भाजपचे पक्षाध्यक्ष आणि सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. त्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली होती. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज तसेच नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा असलेले सुषमा स्वराज आणि गडकरी हे मोदींच्या उपोषणाकडे फिरकले नाहीत. ते नसल्यामुळे अरुण जेटली आणि मुंडे हिरीरीने पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. सुषमा स्वराज आणि गडकरींच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर संधी मिळूनही राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करणे त्यांना जमलेले नाही. गुजरातमध्ये जातीय दंगलींचे बळी ठरलेल्या मुस्लिमांचे खरे मारेकरी मोदीच असल्याची चर्चा जगभरात झाली. पण आपणच विकास पुरुष आणि पोलादी पुरुष दोन्ही असल्याचे मार्केटिंग करण्यात मोदी यशस्वी झाले. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे विकास पुरुष तर अडवाणी पोलादी पुरुष होते. आता हे दोन्ही पुरुष मोदींमध्ये एकवटल्याची प्रसिद्धी करण्यात आली. पण मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजाचे मारेकरी क्रूरकर्मा असलेली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू उजळ करणार कशी? ही बाजू उजळ करण्यासाठी शांतता आणि सद्भावनेचे आवाहन करून उपोषणाचे नाटक रचण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीचा निर्णय न्यायदंडाधिकाऱ्यांवर सोपविल्याचा निकाल आल्याने मोदींना तात्पुरता दिलासा मिळाला आणि मोदी सुसाट वेगाने धावू लागले. खरे तर हा दिलासा नव्हेच, पण मोदी आणि भाजप नेत्यांची प्रतिक्रिया पाहता न्यायदंडाधिकारी त्यांना सन्मानपत्रे देऊनच मुक्त करणार आहेत, असेच कोणाला वाटेल. ज्यांनी मोदींना व्हिसा नाकारला तेच त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत असल्याने भाजपच्या डावपेचांना परकीय शक्तींचा आशीर्वाद असल्याची शंका बळावत आहे.

गेली कित्येक वर्षे अडवाणी यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळय़ा पडत आहेत. त्यामुळे निवडणुकांचा मोसम आला की यात्रा काढून देशभर आपल्या नावाचा डंका पिटविण्याची त्यांची सवय जुनी आहे. सध्या नजीकच्या काळात लोकसभेच्या निवडणुकाही नाहीत. तीन वर्षानी 2014 मध्ये निवडणुका होणार आहेत. पण तरीही भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढण्याचे अडवाणींनी जाहीर केले आहे. मोदींचा सर्वत्र जो उदो, उदो चालला आहे त्या झगमगाटात आपली प्रतिमा निस्तेज होऊन काळवंडली जाऊ नये याकरिता अडवाणींचा खटाटोप सुरू झाला आहे. अडवाणी गृहमंत्रीपदी असताना अतिरेक्यांनी संसदेवर बॉम्बस्फोट केले. एवढा त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारही बोकाळला होता. पक्षात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली असताना अडवाणींनी भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढणे हास्यास्पद आहे.अडवाणींनी सत्तेसाठी रामरथ यात्रा काढली होती, ‘राममंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. राममंदिरसाठी सोन्याच्या विटादेखील देण्यात आल्या होत्या. सोन्याच्या विटा आणि पैसा यांचे ऑडिट झाले आहे का आणि विटा कोणत्या बांधकामासाठी वापरल्या याचा हिशेब लोकांना मिळालेला नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश आणि पक्षात वाढत चाललेला भ्रष्टाचार या पार्श्वभूमीवर काढलेल्या यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. हे आळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अडवाणींच्या यात्रेला विरोध केला असल्याचे दिसते. अडवाणींचे नेतृत्व कोणालाच मान्य नाही, त्यांची भाषणे अटलबिहारी वाजपेयींसारखी भुरळ पाडणारी नाहीत किंवा अंतर्मुख करणारीही नाहीत. त्यामुळे अडवाणी मागे आणि मोदी पुढे असे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच अडवाणींनाही मोदींची स्तुती करणे भाग पडले. आधी भाजपची सत्ता येऊ द्या, मोदी पंतप्रधान झाले तरी चालेल या  मानसिकतेप्रत अडवाणी आले असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

जातीय दंगलींनी मोदींची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी, जातीयवादी अशी बनली असल्यामुळे बिहारमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांच्या निवडणूक प्रचारसभा नकोत, असे स्थानिक नेत्यांनी त्यांना कळवून टाकले होते. त्याच मोदींची विकास पुरुष आणि पोलादी पुरुष अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. टाटा, अंबानींनी त्यांना प्रमाणपत्र देऊनही उपयोग झाला नाही, देशातील दलित-मुस्लिम समाज मोदींना पंतप्रधानपदासाठी मान्यता देतील अशी शक्यता नाही. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्याचा फायदा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला अधिक होईल. मोदींसारखे कट्टरपंथी या देशात जेवढा धुमाकूळ घालतील तेवढी काँग्रेसची दलित - मुस्लिम अल्पसंख्याक ही व्होट बँक मजबूत होत राहील. इंडिया शायनिंगचा नारा दिल्यामुळे वाजपेयी सरकार वाजत-गाजत दिल्लीच्या तख्तावर येऊन बसेल अशी वातावरणनिर्मिती प्रमोद महाजन प्रभूतींनी केली होती. पण सरकारचा पुरता बाजा वाजला आणि भाजप तर मागे पडलाच पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षदेखील फुटून बाहेर पडले. आता इंडिया शायनिंगच्या दुस-या टप्प्याचा असाच फज्जा उडण्याची शक्यता दिसत आहे. कारण रालोआत किती पक्ष राहिले ते शोधावे लागत आहेत. अण्णा द्रमुकच्या जयललिता मोदींच्या समर्थनार्थ पुढे आल्या. अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आले, पण जनता दल (संयुक्त) चे शरद यादव आणि नितीशकुमार यांचे प्रतिनिधीदेखील आले नाहीत. शरद यादव यांनी तर उपोषणाला महत्त्वच दिले नाही, देशातले 80 टक्के उपेक्षित लोक नेहमीच उपवास करीत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जयललिता यांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचा भरोसा नाही. उत्तर प्रदेशात मायावती, बिहारमध्ये नितीशकुमार,  पश्चिम बंगालमध्ये ममता, तमिळनाडूत जयललिता, महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी अशा मोठय़ा राज्यांमध्ये इतर पक्ष ताकदवान असताना मोदींना पाठिंबा मिळणार कसा? यामध्ये कम्युनिस्ट पक्ष काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे आहे. तेव्हा विकास पुरुष अथवा पोलादी पुरुष म्हणा किंवा उपोषण करू द्या, मोदी पंतप्रधान होणार कसे?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP