Monday, January 16, 2012

जेणे आचारसंहितेचा धसका घेतिला..


बसपचे हत्ती झाकले तरी त्यांचा आकार कायम राहिल्याने मायावतींना कदाचित लाभ होईलही, पण शिववडय़ाच्या गाडय़ा झाकल्याने त्यांच्यावर रेखाटलेले निवडणूक चिन्ह आणि बोध चिन्ह खरोखरच झाकले जाईल आणि शिवसेनेला लाभ होणार नाही. हे नितेश राणे यांचे तर्कशास्त्र शिवसेनेला अडचणीत आणणारेच ठरेल. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात आचारसंहिता भंगाच्या भीतीचा गोळा उठला आहे. अशा प्रकारे नितेश राणे यांनी शिवसेनेला पेचात पकडल्याने राजकारणात चांगलीच रंगत आली आहे. चक्रधर स्वामींच्याच भाषेत सांगायचे झाले तर जेणे आचारसंहितेचा धसका घेतिला, त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठिला, असेच म्हणावे लागेल.

जेणे पावो देखिला। तो म्हणे हत्ती खांबा सारिखा॥ जेणे कानू देखिला। तो म्हणे हत्ती सुपा सारिखा॥ जेणे सोंड देखिली। तो म्हणे हत्ती मुसळा सारिखा॥.. महानुभाव पंथांचे चक्रधर स्वामी यांनी सांगितलेली ही सात आंधळय़ांची कथा. सात आंधळय़ांना हत्तीजवळ नेऊन त्यांना हत्ती कसा आहे, असे विचारले. ज्या आंधळय़ाला हत्तीच्या ज्या अवयवाचा स्पर्श झाला तो अवयव म्हणजेच हत्ती आहे, असे ते आंधळे सांगू लागले. ज्याच्या हाताला हत्तीचे पाय लागले तो हत्ती खांबासारखा,ज्याच्या हाताला कान लागला तो सुपासारखा, सोंड लागली तो हत्ती मुसळासारखा, असे ते सांगू लागले. एखाद्या विशाल गोष्टीचे ज्याला जितके आकलन झाले असेल ते आकलन म्हणजेच ती वस्तू, असे प्रत्येक जण समजतो. प्रत्यक्षात ती वस्तू कितीतरी विशाल असते, असा या कथेचा बोध आहे.
 
चक्रधर स्वामींनी आंधळय़ांना हत्ती नेऊन दाखवला. मात्र, उत्तर प्रदेशातील सत्तांध पक्षांना मायावतींचा संपूर्ण हत्ती  लोकांना दिसू नये, असे वाटत असावे. म्हणूनच निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचे पुतळे आणि त्यांच्या बहुजन समाज पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेले हत्ती झाकण्याचा फतवा काढला.  आचारसंहितेचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने ठिकठिकाणी उभारलेले हे हत्ती झाकण्याचे आदेश दिले. हत्ती प्रथम निळय़ा कापडाने झाकण्यात आले, परंतु निळा रंग हा बसपच्या झेंडय़ाचा असल्यामुळे त्यालाही आक्षेप घेण्यात आला. मग गुलाबी कपडय़ाने हत्ती झाकण्यात आला. मात्र,वरून कापड असले तरी हत्तीचा आकार काही बदलला नाही. तो हत्तीसारखाच दिसू लागला. डोळे झाकून हात लावला तरी लोकांना तो हत्तीच वाटत आहे. आता निवडणूक आयोग काय करणार? उलट या प्रकारामुळे हत्तीची आणि बसपची अधिक चर्चा होऊन त्याचा त्यांच्या प्रसिद्धीला हातभार लागला. आचारसंहिता पालनात अशा अनेक गमतीजमती होताना दिसून येतात. या प्रकारानंतर वेगवेगळय़ा चर्चाना ऊत आले. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. अनेक तळय़ांमध्ये कमळे फुलली आहेत आणि असंख्य मंदिरांमध्ये कमळाच्या प्रतिकृती आहेत. समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल हे तर सर्वसामान्यांचे वाहन, लोकांना सायकलवर बसण्यापासून कसे रोखणार? समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह नेमके सायकलवरून प्रचार करतात. काँग्रेसचे चिन्ह तर हाताचा पंजा आहे. सर्वाचे हात कसे झाकून ठेवणार? अशा चर्चा रंगू लागल्या.
 
कडक आचारसंहितेने जशा गमती होतात तशाच अनेकांच्या अडचणीही होतात. आचारसंहितेच्या काळात प्रत्येक गोष्ट अत्यंत मोजून-मापून करण्याकडे राजकीय नेत्यांचा कल असतो. एरव्ही सुसाटपणे बोलणारे, बिनधास्त वागणारे नेतेही आचारसंहितेच्या काळात ‘मग जपून टाक पाऊल जरा,’ असे वागू लागतात. महाराष्ट्रात होत असलेल्या 10 महानगरपालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येक पाऊल जपून टाकत होते. राज्यातील निवडणुका मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एरव्ही बुधवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी सोमवारीच घेऊन त्यात अनेक निर्णय धडाधड?घेतले. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरलेला धारावी पुनर्विकास आणि झोपडय़ांच्या स्ट्रक्चरला संरक्षण देण्याचा निर्णय घाईघाईत जाहीर केला.
 
आचारसंहिता भंगाच्या धसक्याने प्रत्येक पाऊल जपून टाकले तरी काही नेत्यांकडून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी आल्याच. ज्या दिवशी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आचारसंहिता जाहीर केली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूर्वनियोजित भूमिपूजनाचा कार्यक्रम पुण्यात होता. इकडे निवडणूक आयुक्त आचारसंहितेची घोषणा करीत होत्या आणि तिकडे अजितदादा भूमिपूजन करीत होते. त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. तर एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात विधान केले, त्याचीही तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या दोन्ही तक्रारी तपासून पाहिल्या जातील, असे सत्यनारायण यांनी सांगितले. त्यामुळे आचारसंहितेचा धसका इतर नेत्यांनीही घेतला. सातारा येथे एका दलित महिलेला मारहाण केल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री या नात्याने वर्षा गायकवाड त्याबद्दल काही निवेदन करून इच्छित होत्या. मात्र, तसे निवेदन केले तर आचारसंहितेचा भंग तर होणार नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला. मग निवेदन करण्याऐवजी त्यांना आयोगाला पत्र लिहावे लागले. देशाचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषीमंत्री म्हणून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करू इच्छित होते. मात्र, त्याने आचारसंहितेचा भंग होईल म्हणून आयोगाकडे परवानगी मागितली. पण ती मिळाली नसल्याने त्यांचा मनोभंग झाला.

आचारसंहितेच्या या अस्त्राचा ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला आणि‘आचारसंहिता नाटय़ात’ निराळेच रंग भरून गंमत आणली. शिवसेनेच्या वतीने ठाणे-मुंबईत ‘शिव वडापाव’च्या गाडय़ा अनेक ठिकाणी लागल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य-बाण’ आणि बोध चिन्ह वाघाचा जबडा आहे. ते झाकावे, अशी मागणी नितेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली. ‘शिव वडय़ा’च्या माध्यमातून शिवसेना तरुणांची कशी लूट करते, हे नितेश राणे यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. ‘शिव वडय़ा’च्या विरोधात ‘छत्रपती वडा’ सुरू करून त्यांनी मोठीच धमाल उडवून दिली होती. छत्रपती वडापावच्या गाडय़ांवर कारवाई करायची असेल तर महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘शिव वडय़ा’च्या गाडय़ांवरही करा, असा पेच त्यांनी महानगरपालिका आयुक्तांसमोर टाकला होता. नितेश यांच्या या तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांना त्या गाडय़ांवर कारवाई करावी लागली. मात्र, आता शिवसेना पक्षातर्फे या गाडय़ा रस्त्यावर आणण्यात आल्या आहेत. यामुळे आचारसंहिता लागू होताच नितेश राणे यांनी आपले अस्त्र पुन्हा बाहेर काढले. मायावतींच्या हत्तींप्रमाणे शिवसेना प्रचारक असलेल्या या गाडय़ा झाका, अशी मागणीच त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. विशेष म्हणजे बसपचे हत्ती झाकले तरी त्यांचा आकार कायम राहिल्याने मायावतींना कदाचित लाभ होईलही, पण शिव वडय़ाच्या गाडय़ा झाकल्याने त्यांच्यावर रेखाटलेले निवडणूक चिन्ह आणि बोध चिन्ह खरोखरच झाकले जाईल आणि शिवसेनेला लाभ होणार नाही. हे नितेश राणे यांचे तर्कशास्त्र शिवसेनेला अडचणीत आणणारेच ठरेल.त्यामुळे शिवसेनेच्या पोटात आचारसंहिता भंगाच्या भीतीचा गोळा उठला आहे. अशा प्रकारे नितेश राणे यांनी शिवसेनेला पेचात पकडल्याने राजकारणात चांगलीच रंगत आली आहे. चक्रधर स्वामींच्याच भाषेत सांगायचे झाले तर जेणे आचारसंहितेचा धसका घेतीला, त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठीला, असेच म्हणावे लागेल.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP