Monday, January 30, 2012

निवडणूक आयोगाचा तोंडपाटीलकीला झटका


निवडणूक आयोगाकडे आचारसंहिताभंगाच्या दररोज शेकडय़ांनी तक्रारी येत असून सध्या सुमारे दीड हजार तक्रारी प्रलंबित आहेत. नीला सत्यनारायण प्रत्येक तक्रारीमध्ये स्वत: लक्ष घालून त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे तक्रारीचा निपटारा करीत असतानाच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचे निकाल एकाच वेळी जाहीर करण्याची होत असलेली मागणी पूर्ण करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.

निवडणूक प्रचाराचा जोर जसजसा वाढत चालला तशा आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करणेहे मोठेच आव्हान निवडणूक आयोगासमोर असते. महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया सुरू असून असंख्य तक्रारी आयोगाकडे जात आहेत. त्यात काही बडय़ा नेत्यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेतत्यावरून चांगलेच वादळ उठले आहे. काही बोलघेवडय़ा नेत्यांनी तर आयोगावरच टीकास्त्र सोडले आहे. या परिस्थितीत राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्यावर मोठीच जबाबदारी आली आहे. लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया हेच बलस्थान असून त्या पारदर्शक आणि निर्भयपणे पार पाडणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग त्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत असतो. या देशात टी. एन. शेषन यांच्यासारखा खमक्या निवडणूक आयुक्ताने निवडणूक प्रक्रियेला एक शिस्त लावली. ध्वनिक्षेपकावरून अवेळी होणारी भाषणे आणि घोषणाबाजीभिंतींचे होणारे विद्रुपीकरणजाहीररीत्या होणारा पैशाचा बाजार या सर्वाना शिस्त लावण्याचा प्रयत्न शेषन यांनी केला.
 
सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे ढोल-नगारे वाजू लागले असून त्यावर निवडणूक आयोगाची बारीक नजर आहे. राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी अत्यंत कणखरपणे कारवाई करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. या तक्रारी सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या आहेत की विरोधी पक्षाकडूनयाचा विचार न करता त्यांनी निष्पक्षपातीपणे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाविषयी मर्यादा सोडून विधाने करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दणका दिला. त्याचबरोबर महाराष्ट्रात बोलका पोपट’ म्हणून प्रसिद्धी पावलेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही नीला सत्यनारायण यांनी आपला हिसका दाखवला आहे. आपण कुणाच्या हातातील बाहुली म्हणून राहणार नाहीहे त्यांच्या निर्णयातूनच स्पष्ट दिसून येत आहे.
 
निवडणुका घोषित झाल्याबरोबर पहिली तक्रार सतत वादाला तोंड फोडणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातच आली. अजित पवारांनी पुण्यात भूमिपूजन केले आणि भाजपच्या हातात आयते कोलित मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ताबडतोब आचारसंहिताभंगाची तक्रार आयोगाकडे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाला खुलासा पाठवून दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यावेळी कोणतेही राजकीय भाषण केले नाही अथवा कोणतीही घोषणा केली नाही. भविष्यात असे होणार नाही’ असा खुलासाही त्यांनी केला. त्यांचा खुलासा पटण्यासारखा असल्याने सत्यनारायण यांनी तो ग्राह्य धरून प्रकरण निकाली काढले. परंतु दादांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी रंगविल्या. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली. केवळ माफी मागितल्यानंतर माफ केले जात असेल तर अशा निवडणूक आयोगाचे काय लोणचे घालायचे का’, असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या या विधानावर नीला सत्यनारायण यांनी आक्रमकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्रत्याच वेळी असेच आपले वर्तन राहिले तर तुमच्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते,’ अशी तंबीही त्यांनी राज ठाकरे यांना दिली. आयोगाचा कुठेही उपमर्द होईलअसे कोणतेही वक्तव्य किंवा वर्तन करणार नाहीअसे राजकीय पक्षांनी मान्य केलेले असते. त्यांनी जर ते पाळले नाहीतर त्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकतेअसे सांगत नीलाताईंनी अत्यंत संयमी शब्दांत राज यांना अप्रत्यक्षपणे कारवाईचा इशारा दिला. राज यांनी अत्यंत तिखट लोणच्यासारखे झणझणीत शब्द वापरले असले तरी नीला सत्यनारायण यांनी त्यांच्याबाबत वैयक्तिक आकस ठेवला नाही. विलेपार्ले येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधी वक्तव्य केले.राज यांच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग तर झालाच आहेशिवाय प्रांतिक कलहही उद्भवला आहे,’ अशी तक्रार घेऊन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. राज यांच्या भाषणाची चित्रफीत ऐकून आयोगाने त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचा निर्वाळा दिला. यावरून निवडणूक आयुक्तांचा नि:पक्षपातीपणा दिसून येतो.
 
निवडणूक आयुक्तांचा कठोर निर्णयाचा झटका खरा बसला तो महाराष्ट्रात तोंडपाटीलकी करणा-या आर. आर. पाटील यांना. सांगली या आपल्या होमपिचवर चौकार-षटकार मारताना आर. आर. पाटील यांनी आचारसंहितेचा अतिरेक करणारा बाउन्सर टाकला. निवडणूक आयोगाचा अतिरेक होत असल्याचे सांगताना सरकारने आचारसंहिता कडक केलीती आमची चूक झाली,असे वक्तव्य त्यांनी केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच सत्यनारायण यांनी गृहमंत्र्यांना दूरध्वनी करून जाब विचारला.निवडणुका निर्भय व मुक्त वातावरण पार पाडण्यासाठी आचारसंहिता असते. कुणालाही त्रास देण्यासाठी नसतेअसे सत्यनारायण यांनी पाटील सुनावले. मात्र चूक मान्य करतील ते आबा कसले? ‘उलट निवडणूक आयुक्तांना आपण जे बोललो होतोत्यावर ठाम आहोत,’ असे उत्तर दिले.
 
त्यावर सत्यनारायण यांनीही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतोअसा इशारा दिला. त्यावर, ‘आपण निवडणूक आयोगाविषयी मत व्यक्त केले नाहीतर सरकारनेच आचारसंहिता कडक केली ती आमची चूक झाली,’ असे बोलल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यावर आचारसंहिता ही राज्य सरकारने तयार केलेली नाहीतर ती केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे. त्यामुळे सरकारने चूक केली असे म्हणण्यात कोणताही अर्थ नाही’ असे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. आबांनी अज्ञान दाखवून स्वत:चे हसे करून घेतले. परळीमध्ये पंडीतअण्णा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी पैसे देऊन लोक जमा केल्याची गंभीर तक्रार अजितदादांविरुद्ध करण्यात आली. त्यावर सत्यनारायण काय निर्णय देतातयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 
निवडणूक आयोगाकडे आचारसंहिताभंगाच्या दररोज शेकडय़ांनी तक्रारी येत असून सध्या सुमारे दीड हजार तक्रारी प्रलंबित आहेत. नीला सत्यनारायण प्रत्येक तक्रारीमध्ये स्वत: लक्ष घालून त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे तक्रारीचा निपटारा करीत असतानाच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचे निकाल एकाच वेळी जाहीर करण्याची होत असलेली मागणी पूर्ण करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.

नव्याने आलेल्या मशिन्सकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेली यंत्रे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या यंत्रांची तपासणी करून त्यातील नादुरुस्त मशिन्स बाजूला करण्यात येत आहेत. प्राप्त झालेल्या यंत्रांमधील सुमारे 10 टक्के यंत्रे नादुरुस्त करण्याचे प्राथमिक तपासणीत लक्षात आले आहे. या सर्वाचा आढावा घेऊन दोन्ही निकाल एकत्र लावण्याचाही त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. नीला सत्यनारायण यांनी निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत समतोल व नि:पक्षपाती कामगिरी केली असल्याने तोंडपाटीलकी करणा-यांना जाच वाटत असला तरी निवडणुकीत अशा कणखरपणाची गरज आहे.


0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP