Monday, January 23, 2012

फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक


माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना, भाजपशी महायुती करण्याचे कारस्थान हा पवारांच्या कुटील नीतीचाच भाग आहे. पण सिंधुदुर्गातील जनतेचा नारायण राणेंच्या विकासकामांवर आणि सहृदयतेने केलेल्या मदतीवर पूर्ण विश्वास आहे आणि राणेंचाही आपल्या मतदारांवर विश्वास असल्याने महायुतीचा काही परिणाम होऊ शकणार नाही. पण राष्ट्रवादीची अवस्था अशी झाली आहे की, शिकार करताना वाघ मिळाला नाही तर कोल्हा किंवा भित्रा ससा देखील त्यांना चालतो. त्यामुळे राजकारणातील फोडाफोडीचे जनक म्हणून पवारांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदले गेले आहे.

बेरजेच्या राजकारणाच्या गोंडस नावाखाली आजकाल महाराष्ट्रात फोडाफोडीला वेग आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्र ताब्यात घेण्याची घाई झाली आहे. गेल्या तीन दशकांत आपल्या आमदारांची संख्या 50-55 च्या पुढे सरकत नसल्याने फोडाफोडीचा पर्याय अमलात आणण्यात आला आहे. राजकारणाचा दर्जा घसरला आहेच. पण किमान नैतिकताही पाळली जात नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील संघर्षाचा फायदा घेऊन त्यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे आणि पुतणे विधान परिषदेचे आ. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आश्रय दिला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे खा. आनंद परांजपे यांना आणून पक्षात आनंदी-आनंद असल्याचे दाखवून देण्यासाठी खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. सध्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने दलबदलूंची चलती झाली असून, आयाराम गयारामांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. याचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी राष्ट्रवादीने आपले हातोडे तयार ठेवले आहेत. जिथे राष्ट्रवादीची ताकद कमी तेथे काँग्रेसशी आघाडी आणि जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी शिवसेना भाजपशी हातमिळवणी, एकीकडे अशी हात मिळवणी किंवा महायुती आणि कुठे काँग्रेसशी आघाडी करीत असताना याच पक्षातील नेत्यांना आमदार, खासदारांना राष्ट्रवादीत आणण्याचेही प्रयत्न सुरू ठेवायचे, असा हैदोस घालून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचे राजकारण बिघडवून टाकले आहे. राजकारणात महत्त्वाकांक्षा जरूर असावी पण किमान नैतिकता गमावलेली अतिमहत्त्वाकांक्षा नसावी. महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राजकारणाचा मार्ग गटबाजी आणि फोडाफोडीतून जात असल्यामुळे राजकीय वातावरणात अस्थिरता वाढत जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षवाढीला हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 1978 साली जे पेरले तेच उगवले असल्याने अजितदादांकडून वेगळी अपेक्षा कोणी ठेवणार नाही. आपल्या फोडाफोडीच्या गळाला अजूनही लहान-मोठे मासे लागत असल्याचा आनंद जाहीरपणे व्यक्तकरण्याची खुमखुमी शरद पवारांना अजूनही येत आहे, याचेच आश्चर्य वाटते. आमिषांना बळी पडून जे येतील, अशा रेडिमेड नेत्यांना जाळय़ात अडकवण्याचे त्यांचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. जे नेते त्यांच्या पक्षात गेले नाहीत त्यांना संपवायचा प्रयत्न करायचा आणि जे पक्षात आले त्यांना निष्प्रभ करून टाकायचे. ही कूटनीती हा पवारांच्या राजकारणाचा स्थायीभाव बनला आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजपपासून ते थेट रिपब्लिकन,जनता दल, समाजवादी या पक्षांतर्गत सर्वानाच या नीतीचा फटका बसला आहे.
 
पुरोगामित्वाच्या बाता मारणा-यांनीच  रिपब्लिकन, जनता दल, समाजवादी यासारखे पुरोगामी पक्ष संपवले. पवारांनी 1978 ला वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस सरकार पाडले आणि जनसंघासह लहान लहान पक्षांना एकत्र करून पुलोदचा प्रयोग केला. तेव्हाचा जनसंघ म्हणजेच भाजपला, शक्ती देण्याचे काम पवारांनीच केले. तत्कालीन जनसंघवाल्यांना पुलोदमध्ये मंत्रिपद देऊन या पक्षाचे वजन वाढवले. त्यानंतर काँग्रेस पक्षात राहून आपला स्वतंत्र गट पवारांनी कायम ठेवला. या गटबाजीतून 1995 साली शिवसेना, भाजपला ताकद मिळून युतीचे सरकार आले. काँग्रेसमध्ये राहून आणि काँग्रेस बाहेर पडल्यानंतर काँग्रेसशी आघाडी करून त्यांनी कायम काँग्रेसलाच आपला शत्रू क्रमांक एक मानले आहे. त्यामुळेच काँग्रेसमधील प्रभावी नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब केला जातो.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणा-या नेत्यांना धक्केदेण्यासही राष्ट्रवादीचे नेते मागे-पुढे पाहत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना, भाजपशी महायुती करण्याचे कारस्थान हा पवारांच्या कुटील नीतीचाच भाग आहे. पण सिंधुदुर्गातील जनतेचा नारायण राणोंच्या विकासकामांवर आणि सहृदयतेने केलेल्या मदतीवर पूर्ण विश्वास आहे आणि राणोंचाही आपल्या मतदारांवर विश्वास असल्याने महायुतीचा काही परिणाम होऊ  शकणार नाही. जे राष्ट्रवादीत गेले त्यांची ताकद काय आहे ते सिंधुदुर्गवासीयांना चांगले माहीतच आहे. पण राष्ट्रवादीची अवस्था अशी झाली आहे की, शिकार करताना वाघ मिळाला नाहीतर कोल्हा किंवा भित्रा ससा देखील त्यांना चालतो. त्यामुळे राजकारणातील फोडाफोडीचे जनक  म्हणून पवारांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात गोंदले गेले आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांचे परममित्र आहेत, असा डंका पिटवला जातो. मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी कन्येला‘मातोश्रीवर’ पाठवले जाते. बाळासाहेबांच्या आनंदाला भरते आलेले असतानाच त्यांचा कल्याण-डोंबिवलीतला आनंद कसा शिताफीने हिरावून घेतला, हे लक्षात आल्यावर बाळासाहेबांची काय चरफड झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सदानकदा दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी बसून असलेले संजय राऊत कायमचे तिकडेच जाऊन राहिले तर आश्चर्य वाटायला नको. पवारांनी 1999 मध्ये काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेव्हा मतविभाजनाचा फायदा होऊन युतीचेच राज्य येईल, अथवा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे राज्य येईल, असे युतीच्या नेत्यांना वाटत होते. पण पक्षातील नेत्यांच्या दबावामुळे त्यांना काँग्रेसशी आघाडी करावी लागली. युतीच्या नेत्यांचा विरस झाला.

काँग्रेससोबत सत्ता उपभोगताना काँग्रेसबद्दल संभ्रम पसरवून देण्याचा उद्योग पवारांनी सुरू ठेवला आहे.  मैत्रीचा एक हात खांद्यावर ठेवायचा आणि दुस-या हातात फोडाफोडीसाठी हातोडा घ्यायचा. उत्तर प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पवार हे केंद्रात काँग्रेस सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही काँग्रेस-बसप वादाचा केंद्र सरकारवर परिणाम होऊन हे सरकार पाच वर्षे पूर्ण करील की नाही, अशी शंका व्यक्त करीत आहेत. फोडाफोडी करून त्यांना आपल्या सोबत घेतले. त्यांचे पंख कापण्याचेच काम केले आहे. आपले घर फोडल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी प्रतिक्रिया दिली की, ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण केले जात आहे. छगन भुजबळांनाही बाजूला सारले आहे. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचे मौन बोलके आहे. गोवारींचे हत्याकांड झाले तेव्हा पवार मुख्यमंत्री होते. त्यांची नैतिक जबाबदारी असताना त्यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. आजतागायत त्यांना मंत्री केले नाही. गेल्या 45 वर्षाच्या त्यांच्या राजकारणाचा अभ्यास करून आत्मचिंतन केले तर अजितदादांनाही कदाचित उपरती होऊन त्यांची फुरफूर थांबेल. त्यांचा ‘धनंजय’ होऊन सुप्रियांनाच क्रमांक एकवर आणले जाईल, याची खात्री पटेल आणि ते स्वतंत्रपणे राजकारण करू शकतील.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP