Monday, February 6, 2012

घड्याळाला हाताचाच आधार

कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले.

महाराष्ट्रातील 27 जिल्हा परिषदा आणि मुंबईसह10 महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे. या निवडणूक प्रचारात खरी टीका आणि टिप्पणी होत आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये. राज्यात एकत्र सरकार चालविणारे हे दोन पक्ष एकमेकांविरूद्ध संघर्षाच्या पावित्र्यात उभे ठाकले आहेत. त्यातही दिवसाढवळ्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिक आक्रमकपणे काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत. आपल्या राजकीय वाटचालीत मुख्य अडसर काँग्रेसचे ज्येष्ठ आणि आक्रमक नेते नारायण राणे यांचाच होण्याची भीती अजित पवारांना वाटत असावी म्हणूनच त्यांनी कोकणात जाऊन राणे यांना आपले लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. राज्यातील बोलके पोपट गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही कोकणात जाऊन राणे यांच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कर्मभूमीत येऊन आपल्यावर गुरगुरणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा आगाऊपणा अर्थातच नारायण राणे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे खपवून घेतला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वस्त्रहरणअशी जाहिरात देऊन राणे यांनी रणशिंग फुंकले. कुडाळ येथील प्रचारसभेत त्यांनी अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोकणातील राजकारणात राणे एकटे पडतील, अशी राष्ट्रवादीची अटकळ पुरती फोल ठरवून राणेंनी या नेत्यांनाच उघडे पाडले. त्यांनी कोकणात जे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वस्त्रहरणकेले ते एवढे बिनतोड होते की त्याचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही केले. कोकणात जाऊन कुणी राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न करीत असेल, त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करीत असेल आणि राणे यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले असेल तर त्यात चुकीचे कायअसा सवालच या नेत्यांनी केला.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात जाऊन राणे यांच्यावर मोघम आरोप केले. मात्र वस्त्रहरण करता राणे यांनी वस्तुनिष्ठ पुरावेच हातामध्ये ठेऊन या बिनबुडाच्या आरोपांचे खंडन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण निधी दिल्याच्या डरकाळ्या अजितदादांनी फोडल्या होत्या. राणे यांनी आपण मागितलेल्या निधीमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी कसा खोडा घातला तसेच गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कमी निधी देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कसा अन्याय केला हे राणे यांनी दाखवून दिले. सिंधूदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद असल्याच्या वल्गना करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर राणे जोरदार हल्ला चढविताना सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात आणि आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच गुन्हेगारी कशी वाढलेली आहे, हे आकडेवारीसह दाखवून दिले. एवढय़ावरच राणे थांबले नाहीत, तर पुण्यामध्ये होत असलेल्या जमीन गैरव्यवहाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. वस्त्रहरणचा दुसरा भाग पुण्यात करणार असल्याचा इशारा देऊन राणे यांनी पवार कुटुंबियांना चांगलीच धडकी भरवली. नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे सुविद्य सुपुत्र, रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार डॉ. निलेश राणे आणि स्वाभिमान या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनीही निवडणूक प्रचारात मुसंडी मारली असून बिनबुडाचे आरोप करणा-यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात शिवसेना, भाजप, रिपाइं आणि राष्ट्रवादी या अभद्र युतीने काँग्रेसला डिवचण्याचा कसा प्रयत्न केला याचा पर्दाफाश पत्रकार परिषद घेऊन केला तर निलेश राणे यांनी अजितदादांना जशास तसे प्रत्त्युत्तर देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठय़ा प्रमाणात काँग्रेस पक्षात प्रवेश दिला.
 
कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत संघर्ष पेटलेला असताना विलासराव देशमुख यांनी लातूरमध्येही राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले. राज्यात एकत्र काम करणा-या या दोन पक्षांमध्ये कलगी-तुरा रंगलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुंबई गाठली आणि पत्रकार परिषद घेऊन माध्यमांद्वारे आपल्या लोकांना सबुरीचा सल्ला दिला. काँग्रेसच्या हाताची साथ असेल तरच सत्तेची ऊब मिळेल, हात नसेल तर घडय़ाळ लावणार कुठे हे पक्के ठाऊक असलेल्या पवारांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नका असे आवाहन आपल्या नेत्यांना केले. मात्र आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे भान ठेवताना त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. काका जर मुख्यमंत्र्यांवर टीका करीत असतील तर पुतणे कसे मागे राहतील? मग अजितदादा मुख्यमंत्र्यांवर घसरले. दुस-या पक्षाच्या लोकांना फोडाफोडी करून आणल्यामुळे डोक्यात हवा शिरलेल्या अजितदादांचा तोल सुटला आहे हेच दिसून येत आहे. फोडाफोडीने पक्ष वाढत नसतो उलट नव्यांची खोगीरभरती झाली की जुन्यांची नाराजी वाढत जाऊन बंडखोरी वाढते हे दादांना सांगणार कोण? काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडणा-या दादांना पक्षांतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे.
 
केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहायचे असेल तर काँग्रेसच्या आधाराशिवाय पर्याय नाही, हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीतच पवारांच्या लक्षात आले. सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करीत पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. मात्र सत्तेच्या जवळपास पोहचण्याइतकेही आमदार त्यांना निवडून आणता आले नाहीत. अखेर ज्या काँग्रेसवर टीका करीत निवडणुका लढविल्या त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी हातमिळवणी करीत नमते घेण्याची वेळ पवारांवर आली आणि तेव्हापासून त्यांची काँग्रेसबरोबर राज्यात आघाडी आहे. एकीकडे मैत्रीचा हात पुढे करीत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे खच्चीकरण करून आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मतदारांनी त्यांचे मनसुबे तडीस जाऊ दिले नाहीत2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या घटली आणि काँग्रेसचे आमदार मोठय़ा संख्येने वाढले.

काँग्रेसच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला असला आणि राज्यातील जनता काँग्रेसच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यानेच अजित पवारांनी पक्ष वाढविण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. दुस-या पक्षात अकार्यक्षम ठरलेल्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून फोडण्याचा सपाटा लावला आणि आपली खूप शक्ती वाढत असल्याचा भास अजित पवार आणि आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांना झाला. काँग्रेसवर तोंडसुख घेऊन त्यांच्या नारायण राणे यांच्या सारख्या प्रभावी नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र शरद पवार यांना परिणामांची जाणीव झाली. सत्तेवर जर राहायचे असेल तर काँग्रेस नेत्यांशी पंगा घेणे घातक ठरू शकते हे ओळखून पवारांनी जुळवून घेण्याचे ठरविले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यापासून राष्ट्रवादीचे राजकारण काँग्रेसच्या आधारानेच चालेले आहे. हे पुढे टिकवायचे असेल तर कटुता वाढू नये यासाठी नारायण राणे यांच्यावर कोणतीही टिपण्णी करण्याचे त्यांनी टाळले.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP