गेल्या वर्षी जनगणनेचे आकडे जाहीर झाले आणि महाराष्ट्रातील सहा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींचे गुणोत्तर पाहून स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न ऐरणीवर आला. मुळातच राज्यात मुलींचे प्रमाण कमी होत असताना ते रोखण्याचा सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे. मात्र, जिथे मुलींचे प्रमाण सर्वात कमी आहे, त्या बीड जिल्ह्यातील मुलींच्या गर्भाची हत्या करणा-या डॉ. सुदाम मुंडेला वेळोवेळी पाठीशी घातलेले दिसून येते. एका महिलेचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्याने मुंडेचे ‘धंदे’ आणि मुंडे चर्चेत आले. डॉ. मुंडे याने नक्की काय केले, त्याचा पूर्वेतिहास, राजकारणी या प्रकरणी गप्प का, आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे काय म्हणणे आहे, हे थोडक्यात..

पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात.फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असे नारे दिले जातात. महाराष्ट्राच्या या थोर परंपरेचे गोडवे गायले जातात. मराठवाड्यात जन्मलेल्या संत जनाबाईसारख्या दासीचे काम करणा-या स्त्रीला संतांनी सन्मान दिला. कान्होपात्रेसारखी वारांगणेची मुलगीही संतपदी गेली. पण याच भूमीत स्त्रीभ्रूणहत्यांच्या घटनांनी कळस गाठला. त्या प्रकरणी डॉ. सुदाम मुंडेला अटक करण्यासाठी पकड वॉरंट निघाले आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र, त्याला असलेल्या राजकीय पाठबळाच्या जिवावर तो मोकळा सुटला.कुणा एका राजकीय नेत्याचे किंवा पक्षाचे नव्हे तर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या क्रूर कृत्यांकडे कानाडोळा केला आहे. हे सगळे राजकारणी मूग गिळून गप्प का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कोवळ्या कळ्यांना जन्माला येण्याआधी आईच्या कुशीतच निर्दयपणे ठार करणा-या डॉ. सुदाम मुंडेची अखेर शंभरी भरली. राजकीय आशीर्वाद, पोलिसांशी साटेलोटे, प्रशासनातील अधिका-यांशी संगनमत आणि प्रचंड दहशतीच्या बळावर डॉ. मुंडेची काळी कारस्थाने सुरू होती. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो, तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही. डॉ. मुंडेच्या बाबतीत तेच झाले. कोवळय़ा जिवांचा कत्तलखाना ठरलेल्या डॉ. मुंडे रुग्णालयातील एक-एक क्रूर कहाण्या चव्हाटय़ावर येऊ लागल्या. अखेर त्या रुग्णालयाला सील ठोकावे लागले. डॉ. मुंडेच्या मागील सर्व गुन्ह्यातील जामीन रद्द झाल्याने आता पत्नीसह त्याला पोलिसांपासून तोंड लपवीत फिरावे लागत आहे. गर्भलिंग चाचणी करण्यास कायद्याने बंदी असताना डॉ. मुंडे राजरोसपणे ती चाचणी करीत होता. आणि मुलीचा गर्भ असेल तर मातेच्या गर्भात असणा-या कोवळ्या जिवाला क्रूरपणे संपवत होता.
एवढे करूनच तो थांबत नव्हता तर या कोवळ्या अर्भकांची क्रूर चेष्टा केली जात होती. एखादा मेलेला उंदीर-मांजर जितक्या सहजतेने फेकून द्यावे तितक्या सहजतेने तो मुलींचे गर्भ नदी, नाल्यात फेकून देत होता. कुत्र्यांना खायला घालत होता. त्याची चर्चा झाली.महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या. मात्र, पोलिस आणि प्रशासनाशी असलेल्या संगनमतामुळे सुरुवातीला आलेल्या बातम्या केवळ वर्तमानपत्रातच राहिल्या. त्यावर व्हावा तेवढ्या गंभीरपणे तपास झाला नाही. अधिका-यांनीच गर्भाची विल्हेवाट नीट लावण्याच्या सूचना डॉ. मुंडेला दिल्या असाव्यात त्यामुळे नदी-नाल्यात सापडणारी स्त्रीगर्भ बंद झाले. मग ती डॉ. मुंडेच्या शेतातील पडीक विहिरीत टाकली जाऊ लागली. स्थानिक पोलिस, प्रशासन आणि राजकीय नेते डॉ. मुंडेच्या कारस्थानाकडे डोळे झाकून असले तरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन ही काळी कारस्थाने बंद करण्याचा निर्धार केला. त्यातूनच डॉ. मुंडेचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. सामाजिक संस्थांनीच डॉ. मुंडेच्या शेतात जाऊन पाहणी केली, तेव्हा तेथील विहिरीत मुलींचे गर्भ आढळले. भक्कम पुरावा मिळाल्यामुळे त्याला अटक करणे स्थानिक पोलिसांना टाळता आले नाही. त्याला अटक झाली. मात्र, अधिक रिमांडची मागणीच न केल्यामुळे त्याला लगेच जामीन मिळाला. सामाजिक संघटनांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. डॉ. मुंडेची एवढी दहशत की रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकालाच रुग्णालयातील कर्मचा-यांनी शटर लावून कोंडून ठेवले.
त्याबाबत परळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही त्याची फारशी दखल घेतली नाही. त्या उलट ज्यावेळी हा खटला न्यायालयात उभा राहिला, त्यावेळेला परळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांनीच न्यायालयाला ‘स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायद्याची कलमे’एफआयआरमधून वगळावीत, अशी विनंती केली. पोलिसच दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलम कमी करायला सांगत असतील तर तो तपास नि:पक्षपातीपणे कसा व्हायचा? डॉ. मुंडेच्या अटकेच्या आणि खटल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे त्याच्या रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी होईल, असे वाटले होते. मात्र, झाले उलटेच त्याची कुप्रसिद्धी झाली आणि गर्भलिंग करून घेण्यासाठी त्याच्या रुग्णालयातील गर्दी वाढत गेली. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, आंध्र येथूनही त्याच्या रुग्णालयात गर्भलिंग चाचणी करून घेण्यासाठी लोक येऊ लागले. मात्र, आता डॉ. मुंडे सावध झाला. नाल्यात टाकलेली अर्भके,विहिरीत टाकलेले गर्भही सापडल्यामुळे आपल्याविरोधात पुरावे मिळतात, हे पाहिल्यानंतर त्याने अर्भकांचे पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार सुरू केला. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार असा होता, त्याने चार कुत्रे पाळले आणि गर्भपात केलेली अर्भके त्या कुत्र्यांना खायला घालू लागला. आता कोणताही पुरावा मागे राहत नव्हता.
कोणताही गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कधी ना कधी चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. पूर्ण दिवसभरात आलेल्या एका महिलेचा गर्भपात करताना ती महिला दगावली आणि डॉ. मुंडेच्या गुन्ह्यांची शंभरी भरली. खरंतर अशा पूर्ण दिवस भरलेल्या दोन महिलांचा यापूर्वी मृत्यू झाल्याच्या कहाण्या परळी शहरात ऐकायला मिळतात. परंतु तेही प्रकरण डॉ. मुंडेने आपल्या दहशतीच्या बळावर मिटवून टाकले होते. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मात्र बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना जाग्या झाल्या. त्यांनी मोर्चे काढले.वर्तमानपत्रातून दबाव वाढला. अखेर परळी पोलिसांना गुन्हा दाखल करून अटक करावी लागली. मात्र, एकाच दिवसात डॉ. मुंडे पती-पत्नीला जामीनही मिळाला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. प्रसार माध्यमांचा दबाव वाढला. मंत्रालयापर्यंत तक्रारी आल्या आणि डॉ. मुंडेच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.
बुडत्या मुंडेचे पाय अधिकच खोलात गेल्याने त्याच्या राजकीय पाठीराख्यांनीही पाठिंबा काढून घेतला. पोलिस निरीक्षकावर टीकेची झोड उठवली गेली. माकडीन बुडायला लागते तेव्हा आपल्या पिलालाही पायाखाली घेते, या न्यायाने स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी डॉ. मुंडेच्या रुग्णालयाला सील ठोकण्याची शिफारस बीडच्या उपजिल्हाधिका-यांना केली. उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव यांनी रुग्णालयाला सील ठोकले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने डॉ. मुंडे याचा जामीन रद्द झाला. यापूर्वीच्या गुन्ह्यातील जामीनही न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे आता दोघेही पती-पत्नी पोलिसांपासून तोंड लपवत फिरत आहेत. सामाजिक संस्था जागृत झाल्या असून, समाजसेविका सुदामती गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन डॉ. मुंडेला पाठीशी घालणा-या पोलिस निरीक्षक गाडेकर याला निलंबित करण्याची, तसेच हा खटला बीड जिल्ह्यात न चालवता इतरत्र चालवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक उत्तर दिले आहे, असे गुट्टे यांनी सांगितले.
डॉ. मुंडे हा निवडणुकीत पैसा पुरवतो, त्याला समर्थन देणा-यांसाठी राजकीय कार्यकर्ते फोडण्यातही मदत करतो. बीड जिल्ह्यातील अनेक राजकारणी त्याचे मिंधे असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. कोणी आवाज उठवला की, त्याचा आवाज बंद करण्यासाठी मोठमोठे नेते पुढे येत होते, अशीही माहिती मिळते.
आता मोठा आवाज उठवल्यामुळे मुंडेला अटक होईलही. पण कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन तो सुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकटा मुंडेच नव्हे मुलींची संख्या कमी करणा-या सर्वांनाच जबाबदार धरले पाहिजे. महिलांना दुय्यम दर्जा देत असल्यामुळे त्यांना जन्मालाच येऊ द्यायचे नाही, अशी मानसिकता पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात चांगलीच रुजली आहे. पण उच्चशिक्षित डॉक्टरांची हीच मानसिकता असेल तर हे पुरोगामित्व कसले? दर हजारी पुरुषांशी असलेले स्त्रियांचे प्रमाण पाहून महिलांना किती महत्त्वाचे स्थान दिले आहे हे दिसून येते. डॉ. मुंडेला आणि जिल्ह्या-जिल्ह्यात असलेल्या त्याच्या साथीदारांना राजकारणी कशासाठी पाठीशी घालत आहेत. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंचे फोटो लावणारे सावित्रीच्या लेकी मारल्या जात असताना मूग गिळून गप्प का आहेत?
डॉ. सुदाम मुंडे याचे मूळगाव परळी तालुक्यातील सारडगाव. वडील शेतकरी, घरची जेमतेम स्थिती. चार भावांमध्ये डॉ.मुंडे हाच उच्चशिक्षित आहे. त्याचे अन्य भाऊ शेती करतात. गेल्या 30 वर्षापासून त्याने परळीत डॉ. मुंडे हॉस्पिटल नावाने रुग्णालय सुरू केले. त्याची पत्नी सरस्वती ही स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. तीही डॉ. मुंडेच्या अवैध व्यवसायाला हातभार लावत होती. काही काळ ती वैद्यनाथ सहकारी बँकेची संचालिका होती. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा व्यंकटेश उर्फ पापा हा बांधकाम व्यावसायिक असून, गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याने एका राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु ती नाकारण्यात आली. त्याची स्वत:ची फर्म आहे. मुंडेची सून देखील स्त्रीरोगतज्ज्ञाचा अभ्यास पूर्ण करत आहे.
जिल्ह्यांतील सहा वर्षाखालील मुला-मुलींचे गुणोत्तर
(2011 च्या जनगणनेनुसार हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण)
जिल्हा
| मुली |
नंदूरबार | 932 |
धुळे | 876 |
जळगाव | 829 |
बुलडाणा | 842 |
अकोला | 900 |
वाशिम | 859 |
अमरावती | 927 |
वर्धा | 916 |
नागपूर | 925 |
भंडारा | 939 |
गोंदिया | 944 |
गडचिरोली | 956 |
चंद्रपूर | 945 |
यवतमाळ | 915 |
नांदेड | 897 |
हिंगोली | 868 |
परभणी | 866 |
जालना | 847 |
औरंगाबाद | 848 |
नाशिक | 882 |
ठाणे | 918 |
मुंबई उपनगर | 910 |
मुंबई | 874 |
रायगड | 924 |
पुणे | 873 |
अहमदनगर | 839 |
बीड | 801 |
लातूर | 872 |
उस्मानाबाद | 852 |
सोलापूर | 871 |
सातारा | 880 |
रत्नागिरी | 940 |
सिंधुदुर्ग | 910 |
कोल्हापूर | 845 |
सांगली | 861 |
Read more...