Wednesday, April 6, 2011

सत्ताधारी की विरोधक...


विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि विधापरिषदेत सभापती शिवाजीराव पाटील यांनी हा ठराव मांडल्यानंतर संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा गजर करत सचिन आणि भारतीय संघाला मानवंदना दिली. अध्यक्ष वळसे-पाटील यांनी तर टाळय़ांचा आणि घोषणांचा आवाज फिका पडू नये यासाठी सदस्यांना प्रोत्साहन दिले आणि संपूर्ण सभागृहात टाळय़ा आणि घोषणांचा उच्चरव दुमदुमला.

विश्वचषक क्रिकेट सामन्याचा विजयोन्माद अद्याप कमी झालेला नाही. त्याचे प्रत्यंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घडले. भारताचा मानबिंदू ठरलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला अर्जुन अ‍ॅवॉर्ड, खेलरत्न, पद्मभूषण अशी सर्व गौरवपदे देऊन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, परंतु लाखो-करोडो लोकांच्या गळय़ातला ताईत असलेल्या सचिनला भारतरत्न मिळावे,अशी इच्छा देशवासीयांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. तीच भावना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत व्यक्त झाली. विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात आला. भारतीय संघाने कसे कौशल्य दाखवले याचे वर्णन सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी तोंडभरून केले. विश्वचषक सर्वच संघाने आणलेला असला, तरी या अभिनंदन ठरावाचा केंद्रबिंदू सचिन तेंडुलकर हाच होता.

अभिनंदनाच्या ठरावाबरोबरच सचिनला भारतरत्न किताब द्यावा, अशी केंद्र सरकारकडे शिफारस करणारा ठरावही दोन्ही सभागृहांत एकमताने संमत करण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि विधापरिषदेत सभापती शिवाजीराव पाटील यांनी हा ठराव मांडल्यानंतर संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा गजर करत सचिन आणि भारतीय संघाला मानवंदना दिली. अध्यक्ष वळसे-पाटील यांनी तर टाळय़ांचा आणि घोषणांचा आवाज फिका पडू नये यासाठी सदस्यांना प्रोत्साहन दिले आणि संपूर्ण सभागृहात टाळ्या आणि घोषणांचा उच्चरव दुमदुमला.

सभागृहातील हा आनंद सोहळा संपल्यानंतर मात्र विधान परिषदेतील वातावरण हळूहळू तापले. तापवण्याचे काम विरोधी पक्षांचे नेते किंवा सदस्यांनी नव्हे तर साक्षात सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी, त्यातही काँग्रेसच्या आमदारांनी केल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याने कर्तव्य भावनेने काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उमटली. विधानसभेत नगरविकास,गृहनिर्माण, सामान्य प्रशासन आणि मराठी भाषा या विभागांच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी सरकारवरच टीकेची झोड उठवली, तीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. मुंबईच्या विकासासंदर्भात बोलताना अनेक प्रश्न सिद्दिकी यांनी पोटतिडकीने मांडले. त्यांचे सभागृहातील वागणे आणि बोलणे नेहमीप्रमाणे उथळ नव्हते तर अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासू भाषण करीत त्यांनी सरकारलाच धारेवर धरले. अध्यक्षांना उद्देशून बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनाच उद्देशून ते आपले म्हणणे आग्रहाने मांडत होते. बिल्डरांना एफएसआयची खिरापत वाटणाऱ्या सरकारला सचिनच्या व्यायामशाळेसाठी एफएसआय देता येत नाही, याची शरम वाटली पाहिजे, असे त्यांनी उत्साहाच्या भरात सांगितले तेव्हा सर्वानी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. मात्र मुंबईच्या विकासासाठी प्रसंगी आपल्या सरकारवर टीकास्त्र सोडणा-या सिद्दिकी यांचे सत्ताधारी सदस्यांनी अभिनंदन केले, तर विरोधकांची तोंडे बंद झाली.


विधानसभेत बाबा सिद्दिकी संतप्त झाले, त्याच वेळी विधान परिषदेत हुसेन दलवाई असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर अत्यंत सडेतोड मते मांडत होते. घरेलू कामगार, बांधकाम कामगार इतकेच नव्हे तर हॉटेलमध्ये काम करणारे कामगारही असंघटित आहेत. त्यांच्यासाठी आपण काहीच कारीत नाही. आपल्या गृहमंत्र्यांनी डान्सबार बंद करून स्वत: पाठ थोपटून घेतली. पश्चिम महाराष्ट्रातल्या शिरूरची मुले मुंबईत येऊन पैसे उडवू लागली म्हणून डान्सबार एकदम बंद करण्यात आले. मात्र ते करताना त्यात काम करणा-या बारबालांची कोणतीही सोय केली नाही, असे सांगत त्यांनी आर. आर. पाटील यांचे नाव न घेता त्यांना टार्गेट केले. आबांना टार्गेट केल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी दलवाई यांच्या विधानाला हरकत घेतली. डान्सबार बंद झाल्याने अनेक घरांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर दलवाई आणि विद्या चव्हाण यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधारी आमदार आपसात हुज्जत घालत असल्याचे मनोहारी दृश्य विरोधक मात्र एन्जॉय करत होते.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP