Monday, October 14, 2013

सुने सुने शिवतीर्थ.!

गर्व से कहो हम हिंदू है', 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व', 'हिंदूंच्या वाटेला जाल तर खबरदार', असा इशारा बाळासाहेबांनी शिवतीर्थावर दिला होता. मशीद पाडली तरी चालेल; पण देश वाचला पाहिजे, पाक क्रिकेटपटूंना हिंदुस्थानात पाय ठेवू देणार नाही, जे जे हिंदूंना विरोध करतील त्यांना गाडले जाईल, असे प्रक्षोभक शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले की, शिवसैनिकांचे रक्त सळसळत असे आणि 'जय भवानी, जय शिवाजी' अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या जात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच होणार्‍या दसरा मेळाव्याला शिवसेनेतूनच ग्रहण लावण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला अघोषित बंडाचा झेंडा उभारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. मुंबईच्या महापौरपदापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे लोकसभा अध्यक्षपद अशी सर्व प्रमुख पदे उपभोगलेल्या मनोहर जोशींवर बाळासाहेबांचा संपूर्ण विश्‍वास होता. पक्षाचे खासदार कमी असताना लोकसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे घेऊन ते मनोहर जोशींना देणे, हा बाळासाहेबांचा करिष्मा होता. त्यांचा हा करिष्मा आणि संघटन कौशल्याच्या जोरावर वाढवलेली शिवसेना त्यांनी अभेद्य ठेवली. मोठमोठे मोहरे पक्षातून निघून गेले; पण बाळासाहेबांनी शिवसेनेला ऊर्जा देऊन ती टिकवली. बाळासाहेबांचा करिष्मा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नसल्यामुळे ज्येष्ठत्वाच्या नात्याने जोशींनी त्यांना योग्य सल्ला आणि साथ देण्याऐवजी शिवसेनेलाच ग्रहण लावण्याच्या त्यांच्या कृतीचे सर्मथन होऊ शकत नाही.

मेळाव्याला गर्दी जमवली असली तरी बाळासाहेबांविना शिवतीर्थ सुने सुने वाटले. मनामनांत जाज्वल्य विचारांचे स्फुल्लिंग चेतवणारे बाळासाहेबांचे भाषण यंदा ऐकायला मिळणार नाही, या विचाराने अस्वस्थ वाटत होते. शिवसैनिकांना नव्या उमेदीचं नवचैतन्याचं, नवविचारांचं सोनं लुटायला लावणारं बाळासाहेबांचं स्फुर्तीदायक भाषण ऐकायला मिळाले नाही. लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब तर नाहीच पण त्यांच्या समाधीपुढे नतमस्तक होण्यासाठी साधा चौथरा बांधण्यावरूनही वादंग होतो, याची खंत आणि रुखरुख मराठी मनाला लागून राहिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना भाषण करणे शक्य झाले नाही तेव्हा त्यांच्या भाषणाची सीडीदेखील तितक्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने बघितली गेली. आज मनामनांत घर करून राहिल्या आहेत केवळ आठवणी..

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३0 ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर झाला. तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांच्या साक्षीने केवळ त्यांच्या नावाने जगण्यापेक्षा त्यांच्याप्रमाणे इतिहास घडवा, असा संदेश बाळासाहेबांनी दिला होता. तेव्हापासून गतवर्षी २३ ऑक्टोबर, २0१२ पर्यंत दसरा मेळावा ही शिवसैनिकांसाठी एक चमचमीत मेजवानी असायची. मेळाव्याला प्रचंड गर्दी होत असे. बाळासाहेब, दसरा मेळावा आणि शिवसैनिक असे एक अतुट नाते बनले होते. शिवसैनिकांबरोबरच सर्व क्षेत्रांतील लोकांना बाळासाहेब काय बोलणार याची उत्सुकता असायची. प्रत्येक ज्वलंत विषयावर आणि घटनांवर बाळासाहेब मतप्रदर्शन करत असत. त्यातून शिवसैनिकांना माहिती मिळायची, शिकायला मिळायचे, शिवसैनिक भारावून जायचे, त्यांचे भाषण हेच शिवसैनिकांचे टॉनिक असायचे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान खचाखच भरायचे, जिकडे-तिकडे भगवे झेंडे, शिवसैनिकांचे भगवे उपरणे, भगव्या टोप्या, भगव्या पट्टय़ा सारे वातावरण भगवेमय झालेले असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या बाजूलाच भव्य व्यासपीठ उभारलेले असायचे. शिवसेना नेते आधीच हजर असायचे. त्यांची भाषणे चालायची आणि मग उद्धव आणि राज यांच्यासमवेत शिवसेनाप्रमुख सभास्थानी येताच फटाक्यांची आतषबाजी व्हायची. व्यासपीठावर येताच दोन्ही हात उंचावून त्यांनी गर्दीला अभिवादन केले की, शिवसैनिकांमध्ये एकच जल्लोष होत असे, उत्साह संचारत असे. 'आवाज कुणाचा, शिवसेनेचा', 'शिवसेनाप्रमुखांचा विजय असो', 'शिवसेना झिंदाबाद', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा आसमंतात घुमू लागत. त्यांना शांत केल्यानंतर शिवसेनाप्रमुख भाषणासाठी उभे राहत. 'माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' असे त्यांनी म्हणताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट होत असे. अनेकदा त्याचवेळी एखादे विमान आकाशातून जाऊ लागले की, शरद पवार घिरट्या घालत आहेत, अशी मिश्कील टिपण्णी बाळासाहेबांनी करताच सभेमध्ये हास्यकल्लोळ उडत असे. त्यांचे भाषण इतर राजकीय नेत्यांच्या भाषणाप्रमाणे नसे. आक्रमक, आकर्षक, उत्कंठावर्धक, विनोदप्रचुर, कधी मिश्कील भाषेत तर कधी संतापाने फटकारे मारणारे असायचेच; पण दादा कोंडकेंसारखे द्वयअर्थी शब्द वापरून सभेत हास्यांचे कारंजे उडवणारे असायचे. अनेकदा अश्लील शब्दांचा वापर करत असल्यामुळे महिलांना माना खाली घालाव्या लागत. पण एखाद्या विरोधी नेत्याला नामोहरम नव्हे भुईसपाट करण्याची आणि शिवसैनिकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची त्यांची ती पद्धत होती. महाराष्ट्र आणि शिवसैनिकांबद्दल शिवसेनाप्रमुखांना अपार प्रेम होते. त्यांची एकमेकांवर अगाध निष्ठा होती. बाळासाहेबांना नुसते पाहिले तरी त्यांना स्फुर्ती येत असे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल प्रेम वाढवण्याची आणि महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी कुठलीही तडजोड न करण्याची शिकवण त्यांनी पहिल्या दिवसापासून दिली होती. त्यांचे भाषण एवढे प्रभावी आणि परखड असे की त्यानंतर अनेक दिवस विरोधक आणि पत्रकार त्यांच्यावर टीकाटिप्पणी करत असत. तरीदेखील मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि मराठी माणसाला दृढविश्‍वास देणारी ही लढाऊ संघटना आहे, अशी लोकांची खात्री पटली होती. शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना धाडसी कृत्यांचे जणू धडेच दिले होते.

महाराष्ट्रातील दुसरे सार्मथवान नेते शरद पवार यांचे आणि बाळासाहेबांचे व्यक्तिगत पातळीवर चांगले सख्य होते; परंतु राजकारणात ते कायम एकमेकांचे विरोधक राहिले. दसरा मेळाव्यात कॉँग्रेसच्या दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांवर बाळासाहेब चांगलेच तोंडसुख घेत. त्यांची खिल्ली उडवत. पण पवारांवर त्यांनी केलेली टीका हे मेळाव्याचे खास आकर्षण असे. थापाड्या, मैद्याचं पोतं अशाप्रकारची विशेषणे लावली जात. अजिबात भीडभाड ठेवली जात नसे. त्यांच्या योजनांची व निर्णयांची चिरफाड करत. भाजपा मित्रपक्ष असूनही त्यांची खिल्ली उडवत असत. इंदिरा गांधींना त्यांनी आणीबाणीत पाठिंबा दिला असला तरी त्यांच्यासह राजीव गांधी, सोनिया गांधी, सुशीलकुमार शिंदे अशा सर्वांवर टीकास्र सोडत असत. शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतर १९८९ ची लोकसभा आणि १९९0 ची विधानसभा निवडणूक युतीने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर लढवली आणि हिंदू मते संघटित करण्याचा प्रयत्न केला. 'गर्व से कहों हम हिंदू है', 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व', 'हिंदूच्या वाटेला जाल तर खबरदार', असा इशारा बाळासाहेबांनी शिवतीर्थावर दिला होता. मशीद पाडली तरी चालेल; पण देश वाचला पाहिजे, पाक क्रिकेटपटूंना हिंदुस्थानात पाय ठेवू देणार नाही, जे जे हिंदूंना विरोध करतील त्यांना गाडले जाईल, असे प्रक्षोभक शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले की, शिवसैनिकांचे रक्त सळसळत असे आणि 'जय भवानी, जय शिवाजी' अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या जात.

माणसांची त्यांना जाण होती. ते मैत्रीचे पक्के होते. एकदा शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून 'मी शिवसेना सोडून देतो' असा निर्णय जाहीर करून ते घरात बसले आणि शिवसैनिक हादरले. सर्वजण शिवसेनाभवनासमोर जमले, कोणी डोके आपटून घेत होते, कोणी रडत होते, आर्जव करत होते. त्यांच्यासमोर प्रथम दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी आले, तेव्हा 'तुम्ही नको, बाळासाहेब पाहिजेत' असे शिवसैनिक ओरडून सांगू लागले. तेव्हा बाळासाहेब पुढे आले आणि गरजले 'शिवसेना वाढवण्यासाठी माझ्या एवढाच यांनी पण त्रास काढलाय, त्यांना असे बोललात हे मला आवडले नाही.' ज्या नेत्यांची बाळासाहेबांनी कदर केली तेच आज शिवसेनेवर उलटले असल्याचे चित्र दिसत आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसैनिकांना पोहोचता येत नसल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरेंचे सल्लागार चांगले नाहीत, असेही बोलले जात आहे. बाळासाहेबांच्या नावाला असलेले वजन उद्धव मिळवू शकले नाहीत. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आता राहिली नाही, हेच खरे!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP