Monday, March 4, 2013

पवार-ठाकरे फॅमिलीची सेकंड इनिंग

राज ठाकरेंना खरोखरच महाराष्ट्राची सत्ता घ्यायची असेल तर करमणुकीवर भर देऊन चालणार नाही. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उंचीवर टिप्पणी करून गृहमंत्री आले कुठे, गेले कुठे कळत नाही, अशा प्रकारे व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली आणि खिल्ली उडवली तर लोक एक-दोन वेळा हसतील. कायम हसत राहणार नाही.




क्रिकेटमधील पहिली इनिंग ही एकमेकांना आजमावत आपापले स्थान पक्के करण्याची असते आणि दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र कमालीची ईर्षा निर्माण झालेली असते. पवार-ठाकरे कुटुंबात नेमके हेच झाले असल्याचे दिसते. सेकंड इनिंगमध्ये खेळाचा निकाल यायचा असतो, सर्व क्रिकेटप्रेमींचे या इनिंगकडे विशेष लक्ष असते. राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री आणि राजकीय स्पर्धा सर्व परिचित आहे. त्यांनी राजकारण केले आणि व्यक्तिगत पातळीवर मैत्रीदेखील जपली; पण दोन दिग्गज नेत्यांच्या मनाचा उमेदपणा सेकंड इनिंगमध्ये उतरलेल्या अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दिसत नाही. बाळासाहेबांनी पातळी सोडली तर शरद पवार सोडत नसत; खिलाडूवृत्तीने ते बाळासाहेबांची टीका घेत असत, त्यांच्यात फारसे तू-तू मै-मै देखील होत नसे; पण धाकटे पवार आणि ठाकरे यांचे सध्या जे काय चालले आहे ते करमणूकप्रधान फार्सिकल नाटक आहे की काय, हेच समजत नाही. पक्षवाढीच्या ईर्षेने महाराष्ट्र दौर्‍यावर निघालेले राज ठाकरे यांनी काकापेक्षा पुतण्या वरचढ होऊ शकतो, असे दाखवण्याचा प्रय▪चालवला असून त्यांना तरुणांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी त्यांच्या कायम पाठीशी राहील का? अथवा या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होईल का? हे निवडणुकीनंतर कळून येईलच; पण सध्या तरी राज ठाकरे यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पहिल्या इनिंगमध्ये मैदानावर उतरलेले शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे तोलामोलाचे होते. पवार हे दमदार अष्टपैलू फलंदाज होते तर बाळासाहेब ते तुफान बॉलिंग करणारे द्रुतगती गोलंदाज होते. बाळासाहेबांनी एका पाठोपाठ टाकलेल्या चेंडूला टोलवून चौकार-षटकार मारण्यात पवार तरबेज होते. बाळासाहेबांचे चेंडू ते कौशल्याने टोलवायचे. कधी कधी एकच फटका असा मारायचे की, बाळासाहेब चिडून त्यांच्यावर जोरदार मारा करायचे. बाळासाहेब त्यांच्यावर घसरले की, पवार त्यांची खिल्ली उडवत असत. पवार-ठाकरेंचे राजकीय सामने महाराष्ट्रातील जनतेने असंख्य वेळा अनुभवले आहेत; पण एकमेकांवर टीका करताना मैत्रीचा धागा कायम ठेवत त्यांनी राजकीय सामने खेळले. जनतेची करमणूक करतानाच त्यांनी जनतेच्या हिताचे आणि महाराष्ट्राच्या विकासाचे कार्यक्रम दिले. त्यांनी सत्तेची देवाण-घेवाण देखील केली. 1995 साली कॉँग्रेसची अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली, पवार सर्मथक आणि कॉँग्रेस निष्ठावंत एकमेकांसमोर उभे ठाकले. तेव्हा त्रिशंकू विधानसभा आली आणि 40 अपक्षांना सोबत घेऊन कॉँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची वेळ पवारांवर आली; पण पवारांनी अशा अस्थिर परिस्थितीत सरकार स्थापन करण्यास नकार देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि शिवसेना-भाजपा युतीला सरकार बनवण्याची संधी मिळाली. या दोन ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राची तुलना कधी इतर राज्यांशी केली नाही. महाराष्ट्राला कधीही कमी लेखले नाही. या दोन नेत्यांचे पुतणे आता सेकंड इनिंग खेळण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. ते इतके जोरात उतरले आहेत की, प्रतिस्पध्र्याला नामोहरम केल्याशिवाय, धूळ चारल्याशिवाय आपले राजकारण फत्ते होऊ शकत नाही, असे या दोघांना वाटू लागले आहे. त्यातूनच ऐकमेकांच्या कार्यकर्त्यांचे डोके फोडणे आणि कार्यालये जाळणे, त्यांची तोडफोड करणे, असे प्रकार घडू लागले आहेत. कोणी अंगावर धावून येत असेल तर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार, अशी ईर्षा राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. हा प्रकार पवार-ठाकरे या ज्येष्ठ नेत्यांमध्ये कधी घडला नाही. पुतण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे वैमनस्य वाढत चालले आहे. 

अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा असला तरी त्यांना अनेकदा र्मयादा पाळली आहे. र्मयादेचे उल्लंघन होऊ दिलेले नाही. अर्थात, राज ठाकरेंना डिवचण्याची संधी ते सोडत नाहीत आणि राज ठाकरे हे तरुणांना आकर्षित करण्यासाठी टपोरी भाषेचा उपयोग करत असल्याने प्रचंड मोठय़ा संख्येने तरुण मुले त्यांच्या सभेला गर्दी करत आहेत. राज ठाकरेंची सडेतोड भाषा, त्यांनी केलेली नेत्यांची टिंगल आणि नकला, यामुळे लोकांची चांगलीच करमणूक होत आहे. युवकांना त्यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आजपर्यंत राजकारणात आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांपेक्षा राज ठाकरे वेगळे आहेत. तरुणांना अपेक्षित असलेल्या भाषेत ते बोलत असल्यामुळे त्यांनी तरुणांमध्ये आशास्थान बनण्याचा प्रय▪सुरू केला असून त्यात त्यांना यश मिळू लागले आहे. गेल्या सप्ताहात दैनिक 'पुण्य नगरी' कोल्हापूर आवृत्तीच्या दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरला गेले असता शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या प्रमुख 

डॉ. निशा मुडे-पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी विद्यापीठात बोलावले होते. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातील सर्वाधिक प्रश्न हे राज ठाकरेंशी संबंधित होते. राज ठाकरेंनी घेतलेली मराठी आणि मराठी माणसांची भूमिका चुकीची आहे का? प्रस्थापित नेत्यांच्या भूमिकेला त्यांनी विरोध करायचा नाही का? दुसर्‍या राज्यांबाबत त्यांनी बोलायचे नाही का? त्यांचे काय चुकले? अशा प्रकारचे प्रश्न ऐकून तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली उत्सुकता लक्षात येते. हे नेते एकमेकांवर आरोप करतात, कोणाचे बरोबर आणि कोणाचे चूक याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज ठाकरे म्हणतात, सिंचनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे राज्यात दुष्काळ पडत आहे, तर अजितदादा म्हणतात, दुष्काळ निसर्गनिर्मित आहे, विलासराव देशमुख हे आठ वर्षे मुख्यमंत्री होते तरीही त्यांच्या लातूरमध्ये महिन्यातून एकदा पाणी मिळते हे कसे? अशा पद्धतीने सुरू असलेले सवाल-जवाब, बतावणी आणि त्यातून रंगणारा कलगी-तुरा लोकांचे मनोरंजन करत आहेत. प्रत्येक सभेत राज ठाकरे हे लोकांना आवाहन करत आहेत की, महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या. सत्ता आल्यानंतर ते 'करून दाखवणार' आहेत; पण काय करून दाखवणार? महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिण्ट काय आहे? ती देणारा होता ती गेली कुठे? मनसे लोककल्याणाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा नेमका कार्यक्रम काय आहे? हे तरुणांनी आणि या राज्यातील जनतेला समजले पाहिजे. 'माझ्या हातात महाराष्ट्र द्या' असे म्हणणे आणि मागितले म्हणून तिजोरीच्या चाव्या लगेच हातात येतील, एवढे ते सोपे नाही. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न पाहता असे लक्षात येईल की, तुम्ही जिज्ञासा निर्माण केली, त्यातून उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळण्यासाठी त्यांच्यासमोर कार्यक्रम ठेवावा लागेल. बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांची करमणूक केली. सभांना तुफान गर्दी होत असे; पण मते मिळाली नाहीत. काँग्रेसअंतर्गत भांडणाचा लाभ होऊन एक वेळ सत्ता मिळाली ती देखील स्वबळावर नव्हे तर भारतीय जनता पक्षासोबत केलेल्या युतीमुळे. त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस गेली १५ वर्षे सत्ता उपभोगत आहे, ती देखील स्वबळावर नव्हे तर कॉँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यामुळे. स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर कोणा एकाच्या हातात सत्ता येईल, अशा भ्रमात कोणी राहू नये. राज ठाकरेंना खरोखरच महाराष्ट्राची सत्ता घ्यायची असेल तर करमणुकीवर भर देऊन चालणार नाही. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उंचीवर टिप्पणी करून गृहमंत्री आले कुठे गेले कुठे कळत नाही, अशा प्रकारे व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली आणि खिल्ली उडवली तर लोक एक-दोन वेळा हसतील. कायम हसत राहणार नाहीत. गृहमंत्री पाटील यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य माणसावर त्यांचा असलेला प्रभाव पाहता त्यांचा मतदार सहजासहजी राज ठाकरेंच्या तंबूत दाखल होणार नाही, याचाही गांभीर्याने विचार करावा लागेल.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP