Monday, March 18, 2013

संमतीचं सोळावं.. मोक्याचं की धोक्याचं?

भारतीय संस्कृतीमध्ये सोळावं वरीस धोक्याचं असे सर्रास मानले जाते. या वयात मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता पालकांकडून आणि घरातील वडीलधार्‍यांकडून विशेष काळजी घेतली जाते. घरातली, नात्यागोत्याची, आजूबाजूची वडीलधारी मंडळी जास्त शिकलेली नसली, अशिक्षित असली अथवा आधुनिक विचारांची नसली तरी कुटुंब व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी लागणारे शहाणपण त्यांच्या ठायी निश्‍चितपणे असते. 

सरकारने विवाहासाठी मुलीचे वय अठरा व मुलाचे एकवीस वर्षे ही वयोर्मयादा कायद्याने घालून दिली. त्याची अंमलबजावणी होत आहे. काही ठिकाणी अजूनही बालविवाह होतात ही गोष्ट निराळी; पण विवाहाचे वय सर्वांनी मान्य केले आहे. मात्र भारत सरकारने बलात्कारासंदर्भातील प्रस्तावित सुधारणा विधेयकामध्ये सोळावं वरील धोक्याचं नव्हे तर शरीरसंबंधासाठी सहमतीचे असेल, अशी तरतूद केली आहे. या तरतुदीवरून सध्या गदारोळ उठला आहे. देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. लग्नाचे वय अठरा आणि एकवीस असे कायद्याने बंधनकारक असताना, सहमतीच्या शारीरिक संबंधाचे वय सोळा करण्यास कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. मुला-मुलींना लवकर समज येत असल्याने ही तरतूद करण्यात आली असल्याचे सर्मथन दिले जात आहे. यापुढील काळात मुला-मुलींना दहा-बारा वर्षांत शारीरिक संबंधाची समज आली तर हे संमतीचे वय सरकार बारावर आणणार का? हा प्रश्न उभा राहतो. शारीरिक समज आणि बौद्धिक परिपक्वता यांची गल्लत झालेली दिसते. सोळा वर्षे वय हे लग्नासाठी अल्प वय समजले जात असेल, तर ते शरीरसंबंधासाठी योग्य वय कसे? असा प्रश्न विचारला जात आहे. विवाहपूर्व संबंधाचे वय अठरावरून सोळा करण्यात येत असेल, तर विवाहाचे वयदेखील सोळा करण्यास हरकत नसावी. देशातील वाढत्या बलात्कार प्रकरणांमुळे सरकार चिंतेत असून, सरकारचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. एकीकडे बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वय कमी केले जात आहे, तर दुसरीकडे शारीरिक संबंध सहमतीने ठेवण्याची वयोर्मयादा सोळापर्यंत कायदेशीर करण्यात आली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, विवाहपूर्व संबंध कायदेशीर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बलात्कार करणार्‍या आरोपीला शारीरिक संबंध सहमतीने होता असा दावा करण्यासाठी आयती पळवाट मिळाली आहे. 



सोळाव्या वर्षी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय सामाजिक वातावरण दूषित करणारा असून, सरकारला नेमके काय साधायचे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. या निर्णयाचे परिणाम काय होतील, याचा सारासार विचार केलेला दिसत नाही. भारतीय संस्कृती, रुढी-परंपरा, संस्कार या बाबी जुनाट समजून बाजूला ठेवल्या तरी सोळाव्या वर्षी संमतीचा शारीरिक संबंध येऊन मुलगी गर्भवती झाली तर तिला कायदेशीर संरक्षण कसे मिळणार? तिच्या घराने आणि शरीरसंबंध ठेवणार्‍या तिच्या प्रियकराने गर्भवती झाली म्हणून तिच्यावर बहिष्कार टाकला तर तिचे पुनर्वसन करण्याची योजना सरकारने तयार ठेवली आहे का? वास्तविक पाहता सोळा वर्षे वय हे लैंगिक संबंधाकरिता परिपक्व नाही. अशा वयात गर्भधारणा झाली तर आई आणि मूल दोघांनाही धोका होण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. हा एक लैंगिक गुन्हा होऊ शकतो. त्यातून मुलीला सावरणार कसे? हा प्रश्नच आहे. १९७१ च्या गर्भपात कायद्यानुसार गर्भधारणेनंतर बारा आठवड्यांच्या आता गर्भपात करणे वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याने कायदेशीर आहे; परंतु बारा आठवड्यांनंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून सामाजिक परिणामांची जाणीव ठेवून गर्भपात करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. पण त्याची खात्री देणार कोण? सोळा ते एकवीस या वयोगटातील मुले-मुली शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या परिपक्व नसतात. त्यांचे लैंगिक ज्ञान र्मयादित असते. शाळेमध्ये लैंगिक शिक्षण मिळालेले नसल्याने अनेकदा ते अतिरंजीत आणि विकृतसुद्धा असू शकते. जी माहिती मिळालेली असते ती इंटरनेट, पोर्न साईट, व्हिडिओ पार्लर, पोर्न मॅक्झिन यामधून मिळालेली असते. त्यातून शास्त्रीय माहिती किंवा योग्य सल्ला मिळत नसतो. कायद्याने लहान वयातच शरीरसंबंध ठेवण्याची परवानगी मिळाली, तर नववी-दहावीची मुले मुली बिनधास्त शरीरसंबंध ठेवतील. पौगंडावस्थेतील या वयात शिक्षणावर भर देऊन व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे प्रय▪योग्य दिशेने करायचे असतात. शारीरिक आकर्षण असले तरी मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी आणि भवितव्य घडविण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असल्याचे संस्कार याच वयात केले जातात. सहमतीच्या वयाची चर्चा सुरू करून मुलांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. संमतीच्या शरीरसंबंधासाठी पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे शाळेत लैंगिक शिक्षण नाही आणि पालकांकडून यासंबंधी योग्य सल्ला दिला जात नाही. एवढा मोकळेपणा भारतीय पालकांमध्ये अद्याप आलेला नाही. यामुळेच भारतीय मुलींची लग्नानंतरच्या शरीरसंबंधालाच मानसिक तयारी असते. आधुनिक तंत्रज्ञानात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे जग जवळ आले आहे. शहरी भागात जी प्रगती झाली, ती ग्रामीण भागातही होऊ लागली आहे. त्यामुळे भारतातला ग्रामीण समाज देखील मुक्त झाला आहे. आणि सोळा वर्षे वयाच्या मुला-मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी देणार्‍या कायद्याचे स्वागत करील, अशी सरकारची समजूत झाली असावी. नैतिकतेच्या नव्या कसोट्या लावून कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असावा. 


बहुधा मुला-मुलींना लैंगिक संबंधासाठी मोकळीक दिली तर बलात्कार आणि अत्याचार थांबतील, असा जावईशोध सरकारमधल्या काही विद्वान मंत्र्यांनी लावला असावा. सरकारचे धोरण, निर्णय, कायदे आणि भारतीय वातावरण यांच्यामध्ये कमालीचा विरोधाभास दिसून येत आहे. शरीरसंबंधाचे वय सोळा वर्षे, विवाहासाठी वयोर्मयादा अठरा वर्षे आणि मद्यपानासाठी वयोर्मयादा पंचवीस वर्षे असे सरकारचे निर्णय असले तरी या संबंधित कायद्यांचे उल्लंघन करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते. सरकार करीत असलेला हा कथित संमती कायदा पुरुषधार्जिणा आहे असे वाटते. याचे कारण या कायद्याचा सामाजिकदृष्ट्या विपरीत परिणाम होऊ शकेल. संमती संबंधाचे वय सोळा वर्षावर आणल्याने बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार कमी कसे होणार हे स्पष्ट झालेले नाही. दोन वर्षांपासून पासष्ट वर्षे वयापर्यंत बलात्कार प्रकरणे घडलेली आहेत. तेव्हा सोळा वर्षे वयाला शरीरसंबंधाची परवानगी दिल्याने अत्याचार कमी होतील असे म्हणणे निर्थक ठरेल. याउलट अशाप्रकारच्या कायदेशीर तरतुदीने मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील. लग्न करताना योनीशूचितेला महत्त्व देणार्‍या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये लग्नाआधीचे शरीरसंबंध हा समाजमान्य करण्याची सूतराम शक्यता नाही. या कायद्याने मुलींचे शोषण आणखी वाढेल. वयाने मोठय़ा पुरुषांकडून मुलींचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे हा कायदा अस्तित्वात आला तर तो पुरुषधार्जिणाच असेल, याबाबत शंका नाही. याप्रकारच्या कायद्यातून आणखी काही सामाजिक प्रश्न आणि ताणतणाव निर्माण होऊ शकतात. 

एखाद्या उच्च जातीच्या मुलीचे उपेक्षित मागास दलित समाजातल्या मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाले तर त्या दलित तरुणाचे तुकडे करून टाकण्याची तीव्र जातीय विद्वेषाची मानसिकता ज्या समाजात अजूनही आहे, तो समाज लहान वयात मुक्त लैंगिक संबंध ठेवण्याला संमती कसा देईल? त्यामुळे कायद्याने सोळावं वरीस शरीरसंबंधासाठी मोक्याचं असलं, सहमतीचं असलं तरी वैद्यकीयदृष्ट्या धोक्याचं आणि सामाजिकदृष्ट्या असहमतीचं असेल, हेही तितकंच खरं.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP