Monday, August 19, 2013

दीडशे वर्षांपूर्वीचा पुरोगामी द्रष्टा

सयाजीराव महाराजांनी जर त्या वेळी उच्च शिक्षणासाठी मदत केली नसती तर बाबासाहेब महामानव घडलेच नसते आणि भारत देशाचे आजचे चित्र वेगळेच झाले असते. परंतु सयाजीराव महाराज हे द्रष्टे राजे होते. अस्पृश्यता निवारणावर त्यांचा सर्वाधिक भर होता.

फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असे समीकरण मांडले जाते. सर्व राजकीय नेते निवडणुकीच्या राजकारणात या तीन पुरोगामी नेत्यांचा उद्घोष करीत असतात. परंतु महाराष्ट्रातील या व इतर अनेक नेत्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणार्‍या राजे सयाजीराव गायकवाडांचा मात्र सर्वांना विसर पडला होता. त्यांची आठवण अमेरिकेने करून दिली. सयाजीराव महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी पाठविले त्या घटनेला २0 जुलै २0१३ रोजी १00 वर्षे पूर्ण झाली. परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतातील करोडो उपेक्षित मागास समाजातील लोकांना 'शिका, संघटित व्हा! संघर्ष करा' हा मानव मुक्तीचा संदेश त्यांनी दिला. दलितोद्धाराबरोबरच राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असा नावलौकिक त्यांनी मिळवला त्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील त्यांच्या प्रवेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऐतिहासिक प्रवेशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जगातील विद्वानांना आमंत्रित करून भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर रविवार, १८ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये चेंबूर येथे या स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले. जगातील अनेक देशांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. लंडनमधील फेडरेशन ऑफ डॉ. आंबेडकर राईजड्स अँण्ड बुद्धीस्ट ऑर्गनायझेशनचे महासचिव गौतम चक्रवर्ती आणि चेंबूर येथील नालंदा एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक व आमदार चंद्रकांत हांडोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कोलंबिया विद्यापीठातील या शताब्दी सोहळय़ाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले देशाचे माजी सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन हे उपस्थित होते. या वेळी राजे सयाजीराव गायकवाड यांचे वंशज राजे सत्यजितसिंह गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने पुरोगामी चळवळी संबंधी उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन केले आणि बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी पाठविणार्‍या सयाजीराव महाराजांचे ऋण केवळ आंबेडकरी जनतेवरच नाही, तर सर्व भारतीयांवर आहे. या उपकाराची जाणीव ठेवून सत्यजितसिंहांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड हे गुजरात वेगळा झाल्यामुळे त्या राज्याचे मानले गेले असले तरी मूळचे मराठी आहेत आणि महाराष्ट्रातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी सुधारणा करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या राज्यातील नेत्यांच्या पुरोगामी चळवळींना त्यांनी कायम मदतीचा हात दिला आहे. महात्मा जोतिबा फुलेंच्या 'शेतकर्‍यांचा आसूड'चे प्रकाशन करणे अथवा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई आणि दत्तक पुत्र यशवंत यांना पेन्शन देणे यासाठी त्यांनी मदत केली. डॉ. आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात शिष्यवृत्ती देऊन पाठवले. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला. तसेच छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या कार्यात मार्गदर्शन केले. सयाजीराव गायकवाडांइतके अस्पृश्य जातींसाठी दुसर्‍या कोणीही काम केलेले नाही. असे स्वत: डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि कायदे यांना तोड नाही. सर्वजातींना समान शिक्षण मिळाले तरच देशाची प्रगती होईल, यावर त्यांचा ठाम विश्‍वास होता. सर्व लोकांना समान लेखून प्रत्येकाला त्यांच्या गुणांप्रमाणे संधी मिळावी हाच खरा धर्म आहे, असे ते मानीत होते. डॉ. आंबेडकरांचा कोलंबिया विद्यापीठ प्रवेश स्मृतिसोहळा हा खर्‍या अर्थाने सयाजीराव गायकवाडांचा गौरव आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

सयाजीराव महाराजांनी जर त्या वेळी उच्च शिक्षणासाठी मदत केली नसती तर बाबासाहेब महामानव घडलेच नसते आणि भारत देशाचे आजचे चित्र वेगळेच झाले असते. परंतु सयाजीराव महाराज हे द्रष्टे राजे होते. अस्पृश्यता निवारणावर त्यांचा सर्वाधिक भर होता. अस्पृश्यता निवारण होऊन या समाजघटकांचे शिक्षण झाल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही, असा त्यांचा विश्‍वास होता. मुंबई येथे १९0९ साली डिप्रेस्ट क्लास मिशनच्या कार्यक्रमात भाषण करताना सयाजीराव महाराजांनी म्हटले आहे, 'अस्पृश्यतेसारख्या वेडगळ कल्पना इतर लोकांमध्ये नसल्यामुळे ते लोक आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या आपल्यापेक्षा पुढे सरसावले आहेत आणि भरतखंडाच्या संस्कृतीची एवढी ऐट मारणारे आपण हिंदू लोक त्या इतर लोकांच्या मागे राहिलो आहोत, अस्पृश्यतेचा हा प्रश्न राष्ट्रीय महत्त्वाचा आहे. एकट्या दुकट्या राजाने किंवा व्यक्तीने हाती घेऊन सोडवावा असा हा प्रश्न नाही. राष्ट्र म्हणून जर तुम्हाला उंच मान करावयाची असेल, तर अस्पृश्य लोकांच्या कार्याला सर्वांनी वाहून घेतले पाहिजे. त्यांचा सामाजिक व राजकीय दर्जा आधी उच्च केला पाहिजे.'

पुणे येथे २२ मार्च १९३३ रोजी अहिल्याश्रम शाळेला भेट दिली त्या वेळी केलेल्या भाषणात 'अस्पृश्यता घालवण्याचे कार्य प्रत्यक्ष करणे आणि अशा कार्यात मदत करणे हे मी माझे आद्यकर्तव्य मानतो,' असे सयाजीराव महाराजांनी म्हटले होते. या भाषणात त्यांनी दलित वर्गासाठी केलेल्या उदाहरणांचा ऊहापोह केला आणि त्यांच्या संस्थानातील व संस्थानाबाहेरील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत दिली जाते. हे सांगताना त्यांनी डॉ. आंबेडकरांचा उल्लेख केला होता. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आंबेडकरांचा सर्व खर्च त्यांनी केला आणि बडोद्यात नोकरीही दिली होती. परंतु घरगुती अडचणींमुळे डॉ. आंबेडकर मुंबईला गेले. ते मुंबईला गेले त्यासंबंधी बोलताना, 'आम्हाला आनंद झाला. कारण त्यांना शिकवून आणण्याचा आमचा मुख्य हेतू त्यांनी शहाणे होऊन समाजाच्या उद्धाराचे काम करावे हाच होता आणि ते काम त्यांनी नेटाने हाती घेतलेले पाहून आमचा हेतू सफल झाला, असे आम्हाला वाटले. तुमचा उत्कर्ष घडवून आणण्यास आमच्या हातून तुम्हाला मनुष्य मिळावा या योगायोगाचे आम्हास समाधान वाटते.'

डॉ. आंबेडकरांनी दलित मागासवर्गीयांना शिक्षणावर भर देण्याचा मूलमंत्र दिला त्यामुळे आज आंबेडकरी समाज शिक्षणात पुढारला आहे. या समाजातील लोक उच्च पदांवर पोहोचले आहेत. पण बाबासाहेबांसारखी समाजहिताची तळमळ कुठे दिसत नाही. अनेक जण उच्च शिक्षणासाठी परदेश वार्‍या करतात, अमेरिकेला जातात. पण त्यांचा समाजाला आणि देशाला कितपत उपयोग होत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. आ. चंद्रकांत हांडोरे यांनी आर्ट, सायन्स, कॉर्मस महाविद्यालयाबरोबरच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय काढले आहे. अशा पद्धतीने काम झाले तरच सयाजीराव गायकवाडांनी केलेल्या कार्याचा, बाबासाहेबांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा खर्‍या अर्थाने गौरव होईल, परंतु या समाजातील नेत्यांमध्ये असलेली फाटाफूट आणि एकमेकांबद्दल असणारा अनादर यामुळे बाबासाहेबांचे स्वप्न धुसर होत चालले आहे. बाबासाहेबांच्या चळवळींना सुरुंग लावण्याचे प्रकार त्यांच्याच समाजातील नेते करू लागले आहेत. मात्र समाज एकसंध असला तरी आज या समाजाला कुणी नेता उरला नाही आणि आंबेडकरांना गटातटात विखुरलेल्या नेत्यांनी एका समाजापुरते सीमित ठेवले आहे. खरे तर जागतिक कीर्तीच्या या विद्वानाचा कोलंबिया विद्यापीठ प्रवेश शताब्दी सोहळा सर्वांनीच साजरा करावयास हवा होता. जगातील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या २५0 विद्वानांमध्ये डॉ. आंबेडकर हे प्रथम क्रमांकाचे विद्वान असल्याचे प्रशस्तीपत्र विद्यापीठाने देऊनदेखील भारत देशातील सर्व समाज घटकांनी त्यांचा गौरव केला नाही, ही खेदाची बाब आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP