Monday, October 21, 2013

घरचं झालं थोडं..

शिवसेनेत अस्वस्थता आहे. निवडणुका समोर असतानाही दसरा मेळाव्यात नेहमीप्रमाणे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले यांना निमंत्रित केले नाही, यावरून रामदासांनी बोध घेतलेला बरा.

 शिवसेना नेते मनोहर जोशी यांची चांगलीच गोची करण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली असली तरी जोशींबाबत जे घडले त्यावरून शिवसेनेत सारे काही आलबेल आहे, असे दिसत नाही. शिवसेनेत सर्व प्रमुख पदांची सुखे उपभोगलेल्या जोशीसरांची 'आहे मनोहर तरी, पण गमते उदास..'अशी अवस्था झाली आहे. याचे कारण ज्यांनी 'मातोश्री'ला मंदिर मानले त्या सरांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 'मला मातोश्रीवर बोलावले तरी जाईन, नाही बोलावले तरी जाईन', असे सांगून जोशींनी चेंडू मातोश्रीवर टोलवला आहे. यात एकप्रकारची गर्भित धमकीसुद्धा आहे. लोकसभेचे तिकीट अथवा राज्यसभेची जागा मिळावी, यासाठी जोशीसरांनी हा घाट घातला असताना, रामदास आठवलेंनी त्याच मागणीसाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे 'घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे', अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.

आपल्याला शिवसेनेतून काढून टाकतात का? हेच पाहण्याचा जोशीसरांचा इरादा दिसतो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अन्य सर्व नेत्यांमध्ये वरचे स्थान दिले होते. शिवसेनेतील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे जोशीसर बाळासाहेबांना राजकारणाचे सल्ले देत असत. सल्ले देताना आपणच किती सक्षम आहोत, हे पटवल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना सर्व मोठी पदे बहाल केली, मात्र बाळासाहेबांच्या हयातीतच उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला सारण्यास सुरुवात केली होती. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करून शिवसेनेवर नियंत्रण ठेवण्याचा चाणाक्ष जोशीसरांचा विचार असावा, त्यामुळेच त्यांनी उद्धव यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्त केलेला दिसतो. शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिकांवर जीवापाड प्रेम होते. शिवसैनिक हीच माझी ताकद आहे, असे ते म्हणायचे; परंतु उद्धव ठाकरेंच्या दरबारी राजकारणाने शिवसैनिक हळूहळू बाजूला फेकले जाऊ लागले. वयपरत्वे बाळासाहेबांना शिवसेनेत लक्ष घालणे शक्य होईनासे झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चौकडीने त्यांचा ताबा घेतला आणि चौकडीच्या सल्ल्याने उद्धव यांनी शिवसेनेचा ताबा घेण्यास सुरुवात केली. अर्थात शिवसेनाप्रमुखांसारखे आक्रमक नेतृत्व नसल्यामुळे रस्त्यावर उतरण्याचे किंवा शिवसैनिकांना रस्त्यावर उतरविण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नसल्याने शिवसेनेतील उरली-सुरली आक्रमकता लोप पावली. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांच्यासोबत बारा नेत्यांचे मंडळ होते. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, सतीश प्रधान, गजानन कीर्तीकर, सुभाष देसाई यांचा त्यात समावेश होता. शिवसेनाप्रमुखांनी आदेश देताच रस्त्यावर उतरण्याची तयारी असलेले छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासारखे धडाडीचे कार्यकर्ते होते. भुजबळ आणि राणे हे शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने स्वकर्तृत्वावर मोठे झाले. त्यांना महत्त्वाची पदेही देण्यात आली. नेता मोठा झाला की, त्याचे पंख कापायचे ही नीती राजकीय पक्षांमध्ये असतेच; परंतु शिवसेनेमध्ये अपमानास्पद वागणूक मिळू लागल्यामुळे अनेक बिनीचे शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडले. नारायण राणे हे शिवसेनेत असताना त्यांना केवळ सात महिने मुख्यमंत्रीपद मिळाले. एवढय़ा अल्पकाळातही त्यांनी प्रशासनावर पकड बसवून आपल्या कारभाराचा ठसा उमटवला होता. सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेता म्हणूनदेखील त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती; परंतु अशा कर्तबगार नेत्यालाही उद्धव ठाकरेंनी बाजूला सारले. क्रिकेटची खेळपट्टी उखडवणारे आणि त्यावर डांबर टाकणारे शिशिर शिंदेही बाहेर पडले. छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांचे बाळासाहेबांशीच जमले नसल्याने त्यांनी आधीच शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेला मोठेच खिंडार पाडले. मोठमोठे नेते बाहेर पडल्यामुळे शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत फटका बसू लागला. त्यांच्या जागा कमी होत गेल्या. शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाचा एकएक चिरा उखडून त्याला खिंडार पडले असताना मनोहर जोशींना विरोध होत असूनही ते शिवसेनेत राहिले; पण बाळासाहेबांनी त्यांना जे महत्त्व दिले होते, ते पुढील काळात राहिले नसतानाही जोशी शिवसेना सोडून गेले नाहीत. वास्तविक पाहता महापौरपदापासून विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्रीपद, लोकसभा अध्यक्षपद दिल्यानंतर ते निवडणुकीत पराभूत झाले असता त्यांना राज्यसभेवर खासदारकीदेखील दिली. असे असताना आणखी पदाची अभिलाषा ठेवणे योग्य नव्हते. मागील विधानसभा निवडणुकीत जोशीसरांना युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेतही सहभागी करून घेतले नव्हते. काळाची पावले ओळखून जोशींनी बाळासाहेबांच्या हयातीत बंड केले असते तर समजू शकले असते; परंतु ४५ वर्षे निष्ठावंत राहिलेल्या जोशींना बाळासाहेबांनी राजकारणातील सर्व संधी दिल्याची जाणीव ठेऊन त्यांनी उद्धव यांना आव्हान देणे योग्य नव्हते. युवकांना संधी देण्याचा सर्व राजकीय पक्षांचा कल पाहता जोशींनी पदासाठी असा दुराग्रह ठेवणे चुकीचेच आहे. उद्धव ठाकरे हे जर अनुभवी आणि परिपक्व राजकारणी नसतील, त्यांचे नेतृत्व खुजे असेल तर शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणे अपेक्षित आहे. बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची नेतृत्वात धमक नाही, असे जाहीर वक्तव्य करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हानच दिले आहे. ज्यांच्यावर बाळासाहेबांची सर्व भिस्त होती त्यांनीच शिस्त पाळली नाही.

मनोहर जोशींपेक्षा छगन भुजबळ अधिक परिपक्व आहेत, असे म्हणावे लागेल. त्यांनी बाळासाहेबांच्या निधनाआधीच त्यांच्याशी तसेच उद्धव-राज यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले. शिवसेना सोडल्यामुळे भुजबळांना शिवसैनिकांनी पळताभुई थोडी केली होती; पण तरीही बाळासाहेबांच्या वृद्धापकाळात त्यांच्याशी जुळवून घेण्याचे राजकीय शहाणपण भुजबळांनी दाखवले. भुजबळांनी शिवसेना सोडल्याचे बाळासाहेबांना दु:ख जरूर झाले, पण त्यांच्याशी असलेले राजकीय वैर संपवण्याची आणि द्वेष दूर करण्याची भूमिका भुजबळांनी घेतली आणि ते यशस्वी झाले. पण मनोहर जोशींनी बाळासाहेबांनंतर शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत टाकण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याचे सर्मथन होऊ शकत नाही. शिवसेनेत गेल्या ४५ वर्षांत दसरा मेळाव्यातून मोठय़ा नेत्याला निघून जावे लागले, असे कधी घडले नव्हते. त्यांना मेळाव्यातून हाकलून दिल्यासारखा प्रकार घडला. हे पूर्वनियोजित होते हे खरेच. पण थांबायचे कुठे, हे जोशीसरांना समजत नसेल तर कोण काय करेल? आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकीट किंवा राज्यसभेवर जाण्यासाठी जागा द्यावी, म्हणून जोशींनी शिवसेनेत गोंधळ उडवून दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांकडे हा गोंधळ शमविण्याचे आव्हान असताना महायुती करून राज्यसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या रामदास आठवलेंची लगीनघाई सुरू झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सभा आणि पत्रकार परिषदा घेऊन राज्यसभेची एक आणि लोकसभेच्या किमान तीन जागा रिपाइंला मिळाल्या पाहिजे, असे वारंवार जाहीर करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यांना केवळ राज्यसभेवर जायचे आहे, हे लहान मूलदेखील सांगू शकेल. त्यामुळे आठवले आणि राज्यसभा हा राजकीय वतरुळात चेष्टेचा विषय बनला आहे.

मनोहर जोशी यांच्या आव्हानापुढे रामदास आठवलेंची इच्छापूर्ती करणे शिवसेनेला अवघड आहे. त्यांनी भाजपामधून प्रयत्न करावा, असा शिवसेनेचा सूर आहे. मला राज्यसभा द्या, नाही तर कार्यकर्ते नाराज होतील, असा हट्ट आठवलेंनी धरला आहे. संत रामदास स्वामींनी दासबोधातून लोकांना व्यावहारिक जीवन जगण्यासाठी 'अभंग वचने' दिली होती. पण हिंदुत्ववाद्यांबरोबर गेलेल्या रामदास स्वामींनी आपल्या उदासबोधातून राज्यसभा नसेल तर कार्यकर्ते नाराज होतील एवढेच वचन शिवसेनेला ऐकवण्याचा परिपाठ सुरू ठेवला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP