Monday, January 13, 2014

आप रे आप.. राजलाही ताप

'आप'चा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे; पण सर्व पक्षांहून आपण वेगळे असल्याची केलेली वल्गना टिकवण्यासाठी राज यांनाही बराच खटाटोप करावा लागणार आहे. नाराज, भ्रमनिरास झालेल्या, दुखावलेल्या मतदारांची मोट बांधताना त्यांनाही 'आप'चा अडसर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित, त्यामुळेच मोदी आणि 'आप'च्या माध्यमातून त्यांनी हे एकाच धनुष्यातून दोन तीर मारले आहेत. ते कोणाच्या वर्मी लागतात की नुसतेच हवेत जातात, हे आगामी काळच ठरवेल.


महाराष्ट्रात आपणच बाप असल्याचे सांगत 'आप'ची खिल्ली उडवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष आपणही 'आप'ची मनसे धास्ती घेतल्याचेच जणू दाखवून दिले आहे. त्याचबरोबर महायुतीत जाण्याची इच्छा आतापर्यंत तरी प्रकट न केलेल्या राज यांना चौथी सीट मिळणार नाही, असे म्हणत खिजवण्यात भाजपाचेही हसू झाले आहे. सर्वच पक्षांनी अगदी मनसेनेही 'आप'ची धास्ती घेतली आहे, असेच वाटावे अशा घटना गेल्या आठवडाभरात राज्यात घडल्या. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 'आप'ने देशभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्याला महाराष्ट्रातही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. बहुधा त्यामुळेच सर्व पक्षांनी काही ना काही मते व्यक्त करून 'आप'ची दखल घेतली आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणार 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'आप' हा देशाच्या राजकारणातील अपघात आहे, या शब्दांत हेटाळणी केली. राज्यात गेल्या खेपेस 'आप' सारख्याच नव्याने उदयाला आलेल्या मनसेने राष्ट्रवादीसह बहुतेक सर्वच पक्षांची झोप उडवली होती, याची धास्ती त्यातून दिसून आली. 'आप' सारखेच अनपेक्षित व घवघवीत यश मनसेला पदार्पणातच मिळाले, हे विसरून चालणार नाही.

राज यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे एकच राजकीय धुरळा उडाला आहे. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदी नाव घोषित होण्यापूर्वीच राज त्यांच्या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झाले होते. मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांची त्यांनी तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. त्यामुळे शिवसेना व भाजपाचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले होते. पुढे महायुतीची मोट बांधताना मनसेला सहभागी करून घेण्याबाबत युतीचे कार्यकर्ते आग्रही होते; पण 'टाळी' देण्या-घेण्यावरून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी रंगलेल्या जुगलबंदीमुळे राज महायुतीत सहभागी होण्याची शक्यता धूंसर झाली. त्याच वेळी मोदी यांच्याशी राज यांच्या निर्माण झालेल्या उत्तम संबंधांमुळे ते महायुतीत सहभागी होतील, असा तर्क बांधला जात होता. प्रत्यक्षात राज यांनी थेट मोदी यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे सगळेच मुसळ केरात गेले. लोकसभा व विधानसभेसाठीची महायुती तर दूरच, पण आता नाशिकच्या महापालिकेतील तरी युती राहते किंवा कसे हा पेच निर्माण झाला आहे. राज यांनी मोदींवर टीकास्त्र सोडल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपाच्या नेत्यांनी नाशिक महापालिकेत मनसेला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारावजा धमकी दिली. त्यावर मला सत्ताच नको, अशी वरकडी करत राज तातडीने मुंबईला निघून गेले. पूर्वी सेना-भाजपामध्ये असे अनेकदा वाद-विवाद झाले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे प्रमोद महाजन यांच्या शब्दांवर कार्यकर्ते नमते घेत असत. आता या पक्षांमध्ये असे कोणी 'श्रेष्ठी' उरले नसल्याचे कार्यकर्त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे.

गुजरातचा विकास आणि नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणार्‍या राज यांनी आकस्मिकपणे असा पवित्रा का घेतला असावा? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दिल्लीतील 'आप'ची जागा महाराष्ट्रात 'मनसे'च भरून काढून शकतो हे अधोरेखित करण्यासाठी म्हणजेच वेळप्रसंगी भाजपाच्याही नेतृत्वाला आपण आव्हान देऊ शकतो हे दाखवण्यासाठी, तर राज यांनी हे वक्तव्य केले नसेल ना? की गेले काही दिवस राज्यात एवढय़ा घडामोडी घडूनही मूग गिळून गप्प बसलेल्या राज यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच हा स्टंट केला असावा, अशीही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. सत्ताधारी काँग्रेसला तसेच एकंदरच प्रस्थापित असलेल्या भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांच्या आश्‍वासनांना कंटाळलेल्या मतदारांनी 'आप'च्या जाहीरनाम्यावर विश्‍वास ठेवला. शुद्ध चारित्र्याच्या उमेदवारांवर भरवसा ठेवला व त्यांना निवडून दिले; पण राजकारणात नुसते यश मिळवणे सोपे नसते. ते टिकवणे आणि वृद्धिंगत करणे महत्त्वाचे ठरते. देशाच्या सर्व थरांतील आणि सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये त्यामुळे कमालीचे कुतुहूल आहे. दिल्लीत सुरू असलेल्या 'आप'च्या वार्‍याचा देशभर झंझावात तर होणार नाही ना? अशी चिंता कित्येक नेते खाजगीत व्यक्त करत आहेत. त्यामुळेच बहुदा राज यांनीही महाराष्ट्रात 'आप' नव्हे आम्हीच बाप, असे वक्तव्य करत त्यांना भेडसावणारी चिंताच अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यालाही भरभरून मते दिली, हे राज यांनी विसरता कामा नये.

लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि महापालिकेच्या गेल्या निवडणुका मनसेसाठी नवीन होत्या. या पक्षाला कितपत यश मिळेल? राज यांच्या सभांना होणार्‍या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होईल का? अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या; पण मतदारांनी मनसेला भरघोस मते देत सर्वच पक्षांना चांगलाच झटका दिला. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा एकही खासदार निवडून आला नसला, तरी पुण्यासारख्या शहरात रणजीत शिरोळे या तरुण उमेदवाराला तब्बल ७५ हजार मते मिळाली होती, हे विसरून चालणार नाही. राज्याच्या सर्वच भागातून त्यांना अशी घवघवीत मते मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत, तर पहिल्याच खेपेस तेरा आमदार निवडून आणून त्यांनी चमत्कार घडवला. त्या निवडणुकीत बारा ठिकाणी मनसेचे उमेदवार द्वितीय क्रमांकावर होते. एवढेच नव्हे, प्रस्थापित व प्रबळ उमेदवारांच्या विरोधात तर पंधरा ठिकाणी जेमतेम पाच हजारांपर्यंतच्या फरकाने पराभव झाला होता. मनसेच्या या यशाने प्रस्थापित पक्ष हादरले. राजकीय विश्लेषक बुचकळ्यात पडले. सर्व धर्मांतून, सर्व समाजातून, सर्व वयोगटातून आणि विशेषत: तरुणाईकडून मनसेला मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. पुढे पालिका-महापालिकांच्या निवडणुकीतही हेच प्रत्यंतर आले. पुण्यात २८ नगरसेवक निवडून आले. पुण्याची सत्ता थोडक्यात हुकली, तरी नाशिकला सत्ता मिळाली. मुंबई, कल्याण-डोंबवली अशा महापालिकांमध्ये तब्बल १३३ नगरसेवक निवडून आले. हा राज यांचा करिष्मा तर होताच; त्यापेक्षाही प्रस्थापित पक्षांपेक्षा आपण निराळे आहोत हे ठसवण्याचा त्यांचा प्रय▪यशस्वी झाला. मनसेच्या जाहीरनाम्यावर आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटवर विश्‍वास ठेवून मतदारांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. दिल्लीतील 'आप'पुढे जे आव्हान आहे, तेच आव्हान असलेली 'मनसे' मात्र या कसोटीत उतरू शकली नाही, असेच म्हणावे लागले. गेली पाच वर्षे नुसती चर्चा असलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट काही अद्यापि कोणाला दिसली नाही आणि राज यांनीही पुन्हा कधी त्याबाबत चर्चा केल्याचे स्मरत नाही. नाशिकमध्ये सत्ता मिळूनही ठोस विकासकामे मनसेला मार्गी लावता आली नाही. त्याबाबत जनतेमध्ये असंतोष वाढत असल्याचे लक्षात येताच 'गोदापार्क'चा प्रकल्प अंबानींच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. मध्यंतरी टोलसारख्या मुद्दय़ांवर राज्यभर आंदोलने छेडली गेली; पण टोलसारखी अनेक आंदोलने टीपेला पोहोचल्यावर आकस्मिकपणे का थंडावली? त्याचे 'राज' कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही ठाऊक झाले आहे. ज्या अपेक्षा मतदारांना मनसेकडून होत्या, त्या पूर्ण करण्यात मनसे तितकीशी यशस्वी ठरली नाही. प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत राज सभा कशा घेतात? ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कशी हुबेहुब नक्कल करतात? त्यांचे नियोजन किती चोख असते? गर्दी किती अफाट असते? स्थानिक प्रश्न मांडून लोकांची नेमकी नस कसे ते पकडतात? वगैरे गोष्टी 'लाईव्ह' दाखवून त्यांचा झेंडा उचलून धरला आहे; पण मनसेने मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता कितपत झाली? नगरसेवकांची कार्यपद्धती कशी आहे? याचे विश्लेषण कोणत्याही माध्यमांनी केले नाही. जनतेला दिलेली आश्‍वासने अंगलट येण्याच्या शक्यतेने तर मनसे नाशिकमधील सत्तेतून बाहेर पडायची तयारी दाखवत नाही ना? तशी जबाबदारी झटकणे म्हणजे मतदारांनी ठेवलेल्या विश्‍वासाला तडा देणे होय, कारण महाराष्ट्राच्या विकासाबद्दल राज ठाकरे यांची नेमकी कल्पना काय आहे? हे नाशिकवरूनच दिसणार आहे आणि राज आताच तेथील सत्ता सोडून बाहेर पडण्याची भाषा करीत आहेत. ही रणछोडगिरी महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडणारी नाही. बहुधा राज यांनाही हे ठाऊक असावे. त्यामुळेच काहीही कारण नसताना केजरीवाल, 'आप' आणि मोदींबाबत वादग्रस्त विधाने करून राष्ट्रीय स्तरावर आपली चर्चा होईल याची व्यवस्था त्यांनी केली असावी, अशी चर्चा आहे. मुंबईतील लोकलमध्ये तीनजणांच्या आसनावर थोडी सरकासरकवी केली, तर चौथाही बसू शकतो. महायुतीच्या लोकलमधील ही चौथी जागा स्वाभिमानी पक्षाने पटकावली आहे. त्यामुळे राज यांना 'मनसे'चा खुंटा हलवून अधिक बळकट करावा लागणार आहे. दिल्लीतील 'आप'चा झंझावात महाराष्ट्रात येऊन थडकण्यापूर्वीच आपणच सर्वांचे 'बाप'आहोत, अशी प्रतिमा तयार करावी लागणार आहे. 'आप'चा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे; पण सर्व पक्षांहून आपण वेगळे असल्याची केलेली वल्गना टिकवण्यासाठी राज यांनाही बराच खटाटोप करावा लागणार आहे. नाराज, भ्रमनिरास झालेल्या, दुखावलेल्या मतदारांची मोट बांधताना त्यांनाही 'आप'चा अडसर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित, त्यामुळेच मोदी आणि 'आप'च्या माध्यमातून त्यांनी हे एकाच धनुष्यातून दोन तीर मारले आहेत. ते कोणाच्या वर्मी लागतात की नुसतेच हवेत जातात, हे आगामी काळच ठरवेल.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP