Monday, January 6, 2014

पुरोगामी नेत्यांनाही सावित्रीचे विस्मरण

गेल्या ३ जानेवारी रोजी राष्ट्रसेवा दलाच्या महिलांनी पुणे विद्यापीठावर दुचाकी रॅली काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाव धारण करणारा फलक मोठय़ा उत्साहात, घोषणांच्या गजरात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावला आणि चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. 


आता सरकारला जाग केव्हा येते, ते पाहूया.राही भिडेक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात येईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु विद्यापीठ अधिसभेचा ठराव होऊनही व्यवस्थापन परिषदेने त्यावर शिक्कामोर्तब करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रस्ताव थंड बस्त्यात गुंडाळला जाईल की काय, अशी शंका वाटू लागली. निवडणुका जवळ आल्या की, फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या नावांचा गजर करायचा आणि त्यांचे नाव विद्यापीठाला अथवा अन्य संस्थांना देण्याची वेळ आली की ठाम भूमिका घेऊन उभे राहायचे नाही, समाजामध्ये फूट पाडून मतांचे राजकारण करायचे हे आता लपून राहिलेले नाही. भारतीय संविधानानुसार सरकारने ध्येयधोरणे आखलेली असताना मागे हटण्याचे कारण काय? जातीयतेच्या मानसिकतेतून नेतेही बाहेर पडलेले नाहीत, याचे प्रत्यंतर ३ जानेवारी रोजी सावित्रीबाईंच्या जयंती दिनी आले. महाराष्ट्राच्या समृद्ध, साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सामाजिक जीवनाचे वास्तव मांडणेदेखील तेवढेच आवश्यक आहे. मात्र संमेलनाने विशेषत: संमेलनात सक्रिय सहभाग असलेल्या राजकारण्यांनी सामाजिक भान ठेवून भूमिका मांडणे अपेक्षित असताना त्यांनी उद््घाटनाच्या सोहळय़ात सावित्रीबाईंचे नावही घेऊ नये, याचे आश्‍चर्य वाटले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची ३ जानेवारीला नामकरण करण्याची खरोखर इच्छा होती का? हाही प्रश्न उभा राहतो. सरकारने नामकरणाचा आग्रह धरला असता तर कदाचित व्यवस्थापन परिषदेने तो ठराव शासनाकडे पाठवला असता; परंतु परिषदेने ठराव पाठवला नसल्यामुळे शासनाला पळवाट मात्र काढता आली. खरे तर पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा चालवत असल्याचा आव आणणार्‍या राजकीय नेत्यांपासून साहित्यिक आणि लेख, कवींच्याही पुरोगामी निष्ठा तपासण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या प्रत्येक माणसाला सासवड येथे सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सुरू झालेल्या अधिवेशनात नामविस्ताराची चर्चा मान्यवरांनी करणे अपेक्षित होते. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी संमेलन सुरू होणार असल्याने अपेक्षा उंचावल्या होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संमेलनाच्या विचारपीठावर ही घोषणा करतील असे वाटले होते. प्रत्यक्षात विद्यापीठ नामविस्ताराची घोषणा सोडा, सावित्रीबाईंचा साधा उल्लेखही कोणी केला नाही आणि मुख्यमंत्री तर तिकडे फिरकलेही नाहीत. उद््घाटनाच्या मंडपात सावित्रीबाईंचा फोटोदेखील नव्हता. मग हार कुठून असणार. फोटो लावून हार घालण्याचे सौजन्यही दाखवले नाही. सर्व वक्त्यांनी आचार्य अत्र्यांच्या मूळ गावी सासवड मुक्कामी संमेलन असल्यामुळे अत्र्यांचा महिमा सांगितला, ते योग्य होते; परंतु त्यांच्याच तालुक्यात सासर असलेल्या सावित्रीबाईंना मात्र अनुल्लेखाने मारले. पुरंदर तालुक्यातील खानवडी हे जोतिबा फुल्यांचे गाव आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी नेते असा ज्यांचा सतत उदोउदो केला जातो, त्या शरद पवारांनी उद्घाटकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना तरी सावित्रीबाईंचे स्मरण करावयास हवे होते. सावित्रीच्या लेकींसाठी महिला सबलीकरणाचे धडे देत फिरणार्‍या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही आपल्या भाषणात सावित्रीचे विस्मरण झाले.

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कवी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत सहभाग घेणारे तसेच 'आई' कवितेने आपल्या संवेदनशील मनाची साक्ष देणारे साहित्य वतरुळातील प्रतिष्ठेचे संमेलनाध्यक्षपद भूषवणारे 'आई'फेम फ. मुं. शिंदेही सावित्रीमाईंना विसरले. पवारांनी तर नाहीच; पण फ.मुं.नीदेखील छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला. त्यांनी अन्य कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसते तर प्रश्न उभा राहिला नसता; परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करून फ.मुं.नी 'नमो'ची भाषा केली हेच दिसून आले. स्वत:च्या पुरोगामीत्वाचा डंका पिटणार्‍या संमेलनाध्यक्षांनी सामाजिक भान ठेवण्याऐवजी मैफलीत बसल्यासारखे उथळ कोट्य करणेच पसंत केले. मैफलीत बसल्यावर आपल्याच साहित्य कृतींवर सोबत्यांना टाळय़ा देणार्‍यांनी पवारांच्या हातावर टाळी दिली नाही हे संमेलन आयोजकांचे नशीबच म्हणायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्या संमेलनात संवैधानिक पदे भूषवणारे राज्यपाल डी. वाय. पाटील होते, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते, तिथे संविधानाचा आणि आपल्या राष्ट्रीयत्वाचा मान ठेवण्यासाठी राष्ट्रगीत होणे आवश्यक होते. पसायदान झाले हे संमेलनातील सारस्वतांच्या भावनेचा आदर होता असे समजू शकते. पण राष्ट्रगीत होऊ नये याचे सर्मथन कसे होईल. संमेलनातील मान्यवरांचा वैचारिक गोंधळ उडाला की काय अथवा त्यांनी जाणीवपूर्वक काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले कीकाय, असा संभ्रम निर्माण झाला. सावित्रीबाईंचा नामोल्लेख टाळला आणि डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही केला नाही. पुरोगामित्वावरील निष्ठा ठामपणे व्यक्त करण्याची नामी संधी या सर्वांनी का दवडली, त्यांना कोणत्या शक्तींनी आणि प्रवृत्तींनी मागे खेचले हा संशोधनाचा विषय आहे.

रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे हिंदुत्वावाद्यांसोबत गेल्यामुळे त्यांना सतत आपले पुरोगामित्व सिद्ध करावे लागत आहे. संमेलनाचे मोठे स्टेज मिळाल्यामुळे ते कदाचित पुणे विद्यापीठ नामांतर अथवा दाभोळकरांची हत्या हे विषय बोलतील म्हणून त्यांना भाषणाची संधीच दिली नाही, याचा वचपा काढण्यासाठी आणि दाभोळकरांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी दुसर्‍या दिवशी संमेलनावरच मोर्चा काढला. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्यासाठी १९९६-९७ सालापासून जोर धरण्यात आला. आंबेडकरी संघटना तसेच डाव्या पुरोगामी संघटनांना नामांतरासाठी मोर्चे, धरणे, निदर्शने करावी लागली. हळूहळू सर्व बहुजनांना जाग येऊ लागली, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, बहुजन शिक्षक संघ, सत्यशोधक संघटना, ओबीसी संघटना या सर्वांनी ही मागणी लावून घरली. त्यानंतर २000 साली 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे' नामकरण कृती समितीची स्थापना प्रा. गौतम बेंगाळे यांनी केली. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी या कृती समितीमध्ये कार्यरत आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन विद्यापीठ अधिसभेने २६ ऑक्टोबर, २0१३ रोजी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याच्या ठरावास मंजुरी दिली; परंतु विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने या विषयासंदर्भात बैठक लावली नसल्यामुळे नामविस्ताराचा घोळ कायम राहिला आहे. दरम्यान, नामविस्ताराला काही ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला असून, नामकरणात 'पुणे' शब्द नसावा, असा आग्रह धरला आहे तर राष्ट्रसेवा दलासारख्या पुरोगामी संघटनांनी नामविस्ताराला आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे ही केवळ पेशव्यांची, प्रतिगामी ब्राह्मणांची तसेच सनातन्यांची जहागीर नसून, पुणे हे जोतिबांचे आहे, सावित्रीचे आहे, पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे, या शहराला प्रबोधनाचा वारसा आहे, उलट सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापीठाला दिले तर पुण्याची सनातनी पेशवाई आणि प्रतिगामी ही ओळख पुसली जाईल, त्यामुळे 'पुणे' नाव लावण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित करून नामविस्तार प्रक्रिया लांबवण्याचा छुपा अजेंडा राबवला जात आहे की, काय अशी शंका येते. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविली जात आहे. गेल्या ३ जानेवारी रोजी राष्ट्रसेवा दलाच्या महिलांनी पुणे विद्यापीठावर दुचाकी रॅली काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाव धारण करणारा फलक मोठय़ा उत्साहात, घोषणांच्या गजरात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावला आणि चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. आता सरकारला जाग केव्हा येते ते पाहूया. नामविस्ताराने विद्यापीठाचा दर्जा सुधारणार आहे का? असा प्रश्न विचारून खोडा घालण्याचा प्रय▪काही हितसंबंधी मंडळी करत आहेत. नामविस्ताराने विद्यापीठाचा दर्जा सुधारणार नसेलही; पण येथील प्रतिगाम्यांनी एकविसाव्या शतकातही 'जुनं तेच पुणं' ही जी पुण्याची प्रतिमा केली आहे, ती नक्कीच पुसली जाईल.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP