Monday, January 12, 2015

पत्रकारितेला सुरक्षाकवच मिळणार कसे?

फ्रान्समध्ये 'चार्ली हेब्डो' या साप्ताहिकावर महाभयंकर हल्ला करून १0 पत्रकारांना ठार मारल्याची दु:खद घटना घडल्यामुळे संपूर्ण जग हळहळले. पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच एवढी क्रूर घटना घडल्याचे पडसाद जगभर उमटले. या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. वृत्तपत्र हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. 


वृत्तपत्रे आणि सर्व प्रसारमाध्यमे केवळ वार्तांकन करणारी नसून घडणार्‍या घटनांचे विश्लेषण करणे, सामाजिक प्रबोधन करणे व लोकांना जागृत करणे हे त्यांचे काम आहे. त्यात एखाद्या धर्माबद्दल काही छापले तर क्रूर हत्याकांड करण्यापर्यंत अतिरेकी मजल मारू शकतात. ही घटना लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालणारी असल्यामुळे लोकांनी रस्त्यावर येऊन या घटनेचा निषेध केला आहे. हे जग आधुनिक विचारांचे आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे, माहिती-तंत्रज्ञानाचे आहे, मध्ययुगीन विचारांचे नाही. आजच्या युगात प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा हक्क जगाने मान्य केला आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामुळे तर सर्व जग इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअँपच्या माध्यमातून अधिक जवळ आले आहे. त्यामुळे आपण म्हणू तीच पूर्व दिशा आणि आपलेच म्हणणे खरे, आपलाच धर्म खरा, अशी धर्मांध विचारसरणी दुसर्‍यांवर दहशतीद्वारे लादणे हासुद्धा अधर्म नाही का? यापूर्वी गौतम बुद्धांच्या ३00 फूट उंचीच्या दोन जगप्रसिद्ध मूर्ती तालिबान्यांनी तोडून-फोडून टाकल्या. तसेच येशू ख्रिस्ताबद्दल अनेकदा आक्षेपार्ह लिखाण झाले तेव्हा कोणी आंदोलन केले नाही. अशा काही घटना घडल्या तर निषेध जरूर केला जातो; परंतु कोणाला ठार मारले जात नाही. 'चार्ली हेब्डो' या व्यंगचित्र साप्ताहिकाला उज्ज्वल पत्रकारितेचा वारसा आहे. जगातल्या कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींवर तसेच जगभरातल्या कोणत्याही घटनेवर व्यंगचित्रातून टिप्पणी करत आपली निर्भीड पत्रकारिता त्यांनी समाजासमोर ठेवली आहे. त्यांनी मुस्लीम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचे प्रसंगानुरूप व्यंगचित्र काढले म्हणून त्यांनी पैगंबरांचा अपमान केला असे होत नाही अथवा असे व्यंगचित्र काढल्याने पैगंबरांचा विचार कमी होत नाही. युरोपातील कोणत्याही घडामोडींवर या वृत्तपत्राने व्यंगचित्राच्या माध्यमातून बेधडक भाष्य केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक वाद झेलले होते आणि त्यांना खुनीहल्ल्याच्या धमक्याही आल्या होत्या; परंतु या वृत्तपत्राने घाबरून आपला प्रखरपणा सोडला नाही. शेवटी एका दहशतवाद्याच्या धर्मांध मानसिकतेने त्या वृत्तपत्रातील पत्रकारांचा बळी घेतला. तरीदेखील या वृत्तपत्राने शेवटपर्यंत माघार घेतली नाही. ही आजच्या प्रसारमाध्यमांनी आदर्श घ्यावा अशी घटना आहे. सच्च्या पत्रकारितेसाठी झालेले त्यांचे हे बलिदान पुढील काळातही पत्रकारिता क्षेत्राला प्रेरणा देणारे असेल.

आज जगभरात पत्रकारांवर खुनीहल्ले होत आहेत. समाजातील अपप्रवृत्तीचे लोक, समाजकंटक, धर्मांध लोक या खुनी हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे जगाने पाहिले आहे. आजवर शेकडो पत्रकारांचे हल्ल्यांत बळी गेले आहेत. भारतातही पत्रकारितेवर दबाव आणण्याचे प्रयहोत आहेत. अनेक पत्रकारांचा या अपप्रवृत्तीने बळी घेतला आहे. महाराष्ट्रातही खुनी हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पत्रकारांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी येथील पत्रकार संघटना सरकारकडे करत आहेत. यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असली तरी समितीचा अद्यापि निर्णय झालेला नाही. पत्रकारितेतही अपप्रवृत्ती शिरल्या असून स्वार्थासाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्यानेदेखील हल्ले होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र कायदा करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे वरवर भासत असले तरीही ते पूर्णसत्य नाही. काही भांडवलदार, मालक, सरकारमधील दुखावलेली मंडळी, समाजकंटक, काळाबाजार करणारे दलाल यांचा दबाव या क्षेत्रावर असतो. त्यामुळे पत्रकारिता स्वतंत्र आहे, असे आपण म्हणू शकत नाही. स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता समाजप्रबोधनासाठी, समाजजागृतीसाठी असलेली ध्येयवादी पत्रकारिता होती. पत्रकारिता हे समाजहितासाठी व्रत समजले जात असे; परंतु पुढे वृत्तपत्र चालवणे कठीण झाल्यामुळे जाहिराती घेणे भाग पडले आणि त्याचे व्यवसायात रूपांतर झाले. जागतिकीकरणामुळे तर या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले. व्यापार म्हटला की त्यात गुंतवणूक आली, नफा-तोटा आला आणि व्यावसायिकतेच्या या गणितामध्ये पत्रकारिता भरकटू लागली. अनेक उद्योगपती या क्षेत्राकडे वळले असल्याने हे क्षेत्र भांडवलदारांच्या ताब्यात गेल्यासारखेच झाले आहे. प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील गेल्या २0 वर्षांत चांगलाच फोफावला असून, यामध्ये चंगळवाद जोर धरू लागला आहे. तरीदेखील या परिस्थितीत राष्ट्रहिताचे आणि सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न, अनेक विषय वेशीवर टांगले जात आहेत. खाजगी वृत्तवाहिन्यांची सुरुवात झाली तेव्हा वृत्तपत्रे संपून जातील की काय, अशी भीती वाटत होती; परंतु ते खोटे ठरले आहे. विविध खाजगी वाहिन्यांबरोबरच वृत्तपत्रेदेखील वाढली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोल्हापूर येथे वृत्तपत्रांनी अभ्यासपूर्ण टीकाकाराची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन करताना टीकेमुळे सकारात्मक सुधारणा घडून येतात, असे मत मांडले आहे. जगातील एका देशात केवळ व्यंगचित्रामुळे दहशतवाद्यांकडून मोठे हत्याकांड घडले असताना, दुसरीकडे भारतात मोदींचे पत्रकारितेसंबंधीचे विचार प्रखर लोकशाहीवादी असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. मात्र, त्याचबरोबर राजकीय पक्षांचे नेते व संघटनांना वृत्तपत्रांतून झालेली टीका सहन होत नाही, त्यांनाही मोदींनी चार खडेबोल सुनावण्याची गरज आहे. जनमानसात माध्यमांबद्दल विश्‍वासार्हता टिकून आहे. आजही सरकारे बदलून टाकण्याची किंवा एखाद्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याची क्षमता या चौथ्या स्तंभात आहे. दिग्गज राजकारणी, उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांत वावरणारी दिग्गज मंडळी व अब्जाधीश भांडवलदार माध्यमांना घाबरतात, एवढे सार्मथ्य माध्यमांनी मिळवले आहे. अर्थात त्यामुळे माध्यमांची जबाबदारीदेखील वाढली आहे. लोकहिताचे आणि देशहिताचे काम व्हावे याकरिता माध्यमांनी पुढाकार घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. समाजातील दुष्ट-अनिष्ट प्रवृत्तींबरोबर संघर्ष करावा लागला तरीही त्याची पर्वा करता कामा नये, अशी कठोर भूमिका घेऊन माध्यमांनी मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.

आजच्या काळात पत्रकारांनादेखील काम करणे अधिक अवघड झाले आहे. त्यांना आर्थिक सुरक्षा तसेच आरोग्य सुविधा आणि नोकरीची हमी मिळणे कठीण झाले आहे. तरीदेखील हजारो पत्रकार जीवावर उदार होऊन समाजविघातक प्रवृत्तींना उघडे पाडत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल. नुकताच ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन (पत्रकार दिन) संपन्न झाला. त्यानिमित्ताने आजच्या पत्रकारितेबाबत सर्वत्र चर्चा करण्यात आली. पत्रकारितेत असणार्‍या त्रुटी दूर करून भ्रष्टाचार, गरिबी, धर्मांध प्रवृत्ती, अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यावर जोरदार प्रहार करायला हवा. लेखणी हेच शस्त्र समजून प्रहार केले तर समाजात सुधारणा होऊ शकतात. मात्र, त्यासाठी वास्तववादी आणि सत्यवादी लेखन व्हायला हवे. लोकशाही स्वातंत्र्यावर हल्ला करणार्‍या प्रवृत्तींविरुद्ध संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, ही काळाची गरज आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP