Friday, April 10, 2015

नारायण राणे : बहुचर्चित चतुरस्र व्यक्तिमत्त्व

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा आज वाढदिवस. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना राणे जिंकणार की हरणार? याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. सध्या राज्यात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक चांगलीच गाजत आहे. आजपर्यंत अनेक पोटनिवडणुका झाल्या, पोटनिवडणूक येते केव्हा आणि जाते केव्हा याचा कुणालाही पत्ता लागत नाही. परंतु नारायण राणे हे असे नेते आहेत की, त्यांची निवडणूक असो अथवा पोटनिवडणूक असो तिची चर्चा झाली नाही, निवडणूक वाजली गाजली नाही, असे होत नाही. शिवसेनेमधून २00५ साली राणे जेव्हा काँग्रेसमध्ये आले, त्या वेळी कणकवलीमध्ये झालेली पोटनिवडणूकही चांगलीच गाजली होती. त्या वेळी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उमेदवार परशुराम उपरकर यांच्यासाठी प्रचारात उतरले होते. शिवसेनेचे सर्व लहान मोठे नेते तळकोकणात तळ ठोकून बसले होते. राणे काँग्रेसमध्ये गेल्याचा शिवसेनेने चांगलाच धसका घेतला होता. राणेंवर टीकास्त्र सोडताना बाळासाहेबांनी अत्यंत विखारी भाषा वापरली तरी शिवसैनिक काही पेटून उठले नाहीत, त्यांनादेखील बाळासाहेबांचे वारस उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती खटकत होती. राणे यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद उभी केली होती. परिणामी राणेंनी बाजी मारली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत मात्र परिस्थिती निराळी असल्याने राणेंचे काय होणार? याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. 

नारायण राणे यांचे भवितव्य काय? या एकाच प्रश्नाची चर्चा होत असली तरी प्रवाहाच्या विरुद्ध उभे ठाकून आव्हान स्वीकारण्याचे धाडस राणे यांच्यामध्येच आहे. सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आर.आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असून आबांचे महाराष्ट्रातील कर्तृत्व आणि वलय पाहता सुमनताईंची निवडणूक अत्यंत सोपी झाली आहे. त्या भरघोस मतांनी निवडून येतील याबाबत शंका नाही. मात्र वांद्रे पूर्व मतदारसंघात राणे आणि शिवसेनेच्या तृप्ती सावंत नव्हे तर राणे विरुद्ध शिवसेना म्हणजेच काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी रणधुमाळी सुरू झाली आहे. राणे हे मागील विधानसभा निवडणुकीत मालवण मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर काँग्रेसला राणेंची किंमत कळलेली दिसते. त्यामुळे तिकिटासाठी राणे यांच्याकडेच गुणवत्ता असल्याचा साक्षात्कार काँग्रेस पक्षश्रेष्ठींना झाला. पक्षाच्या राजकारणात अधिक सक्रिय होण्यासाठी राणेंनी पक्षश्रेष्ठींकडून आलेला आदेश शिरसावंद्य मानून निवडणूक रिंगणात उडी घेतली. शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या जागी त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत या पतीनिधनाने तयार झालेल्या सहानुभूतीवर निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीला आव्हान देऊन काँग्रेसमधील एक वजनदार नेता सर्व शक्तीनिशी उभा आहे. मतदारसंघातील लोकांची सहानुभूती शिवसेनेच्या पारड्यात मते टाकणार की सत्ताधारी शिवसेना-भाजपावर अंकुश ठेवण्याकरिता एक लढावू नेता विधानसभेत पाठवणार? हा खरा प्रश्न आहे. राणेंची निवडणूक, त्यांचे शिवसेनेतील संघटन, काँग्रेस पक्षातील कार्य, त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा महाराष्ट्रात कायम चर्चेचा आणि वादविवादाचा विषय ठरला असल्याने राणे यांचे व्यक्तिमत्त्व बहुचर्चित झाले आहे. अनेकदा वादविवादात सापडल्यामुळे राणेंना पक्ष पातळीवर, मग तो पक्ष काँग्रेस असो अथवा शिवसेना त्यांना प्रचंड मानसिक तणावातून जावे लागले. राणे संपले असे म्हणणार्‍यांना चांगलीच चपराक देऊन ते पुन्हा उभे राहिले. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रूचा मित्र तो आपलाही शत्रूच असतो, याचे भान नसलेल्या राजकारण्यांना जसा फटका बसतो तसा राणेंनाही अनेक वेळा बसला आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत राणे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यासह काँग्रेसमधील त्यांचे छुपे शत्रूदेखील सक्रिय झाले आणि त्यांचा पराभव झाला. राणेंच्या निवडणुकीची जशी चर्चा सुरू असते तशी त्यांच्या पराभवाचीही चर्चा चांगलीच रंगली होती. राणे यांच्यामध्ये असे काय आहे की त्यांच्या राजकारणातील हालचालींवर एवढी चर्चा व्हावी. शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक ते थेट मंत्री, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता अशी झेप घेऊन सर्वोच्च पदे अत्यंत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने सांभाळणार्‍या राणेंना काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्यांची निर्णयक्षमता, प्रश्न सोडविण्याची तळमळ, गोरगरीबांना मदत करण्यासाठी तत्परता, संसदीय कामकाजाचा सखोल अभ्यास, प्रशासनावर घट्ट पकड, संघटनकौशल्य, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व अशा तिन्ही गुणांनी संपन्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व तसेच राजकारणात आवश्यक असलेला आक्रमकपणा ही त्यांची फार मोठी जमेची बाजू आहे. मात्र परखड स्वभाव, वाद ओढवून घेण्याची प्रवृत्ती, मनाविरुद्ध घडले तर कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचा स्वभाव, मुत्सद्दीपणाचा अभाव आणि शीघ्रकोपी असल्यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यामुळे पक्षपातळीवर त्यांना चांगलाच फटका बसला. राणेंनी मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा कधी लपवून ठेवली नाही. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी जाहीरपणे आपली मागणी पुढे केली. काँग्रेसच्या राजकारणात मागून काही मिळत नाही, याची राणेंना कल्पना नसल्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला. शिवसेनेत असतानादेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातले ताईत असलेले राणे हे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना वारस नेमले तेव्हा दुखावले. उद्धव यांनी त्यांच्याभोवती असलेल्या चौकडीशी सल्लामसलत करत दरबारी राजकारण सुरू केले आणि शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला. राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे पक्षविस्तारासाठी जीवाचे रान करणारे नेतेही हतबल होऊ लागले. तेव्हा त्यांच्या मनात फुटीची बीजे रोवली गेली. अखेर व्हायचा तोच परिणाम झाला आणि राणेंनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर तोफ डागून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची अभेद्य तटबंदी भेदून तिला तडे देण्याचे काम छगन भुजबळ आणि त्यानंतर गणेश नाईक यांनी केलेच होते. राणे आणि राज यांनी तर खिंडारच पाडले. तेव्हापासून शिवसेनेची घसरण सुरू झाली. पण शिवसेनेत उरलेल्या लोकांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी आपले राजकारण सुरू ठेवले, शिवसेना जिवंत ठेवली असली तरी शिवसेनेचा पूर्वीचा करिश्मा राहिलेला नाही. अनेक नेत्यांनी इतर पक्षांत जाण्याकरिता प्रय▪केले नव्हते असे नाही. अनेकांना पक्ष सोडून जायचे होते, परंतु योग्य संधी मिळाली नसल्यामुळे शिवसेनेत राहणे भाग पडले. 

वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणूक ही राणेंच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेसच्या अस्तित्वाची असून काँग्रेसचे केंद्रात आणि राज्यात पानिपत झाले असताना राणेंचा विजय हा काँग्रेससाठी सुचिन्ह ठरणार आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षदेखील एकजुटीने राणेंच्या पाठीमागे उभा राहिला आहे. ही निवडणूक काँग्रेसला राज्यात उभारी देण्याची आणि शिवसेना-भाजपाच्या पराभवाची सुरुवात असेल, असे मानून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप आदी धर्मनिरपेक्ष पक्ष राणेंना सर्मथन देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राणेंना सिंधुदुर्गामध्ये त्रास दिला असला तरी त्यांनी शरद पवारांना आपल्या प्रचारासाठी आणून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला. काँग्रेसला राणे यांच्यासारखे कणखर, आक्रमक, विरोधकांशी दोन हात करण्याची तयारी असलेले नेतृत्व हवे आहे. 

राणेंना या निवडणुकीत एमआयएमचे आव्हान असून काँग्रेसमधील सर्व मुस्लिम नेते त्यांच्या प्रचारात उतरले असल्यामुळे एमआयएमला अपेक्षित असलेली मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळणे शक्य नाही, असा विश्‍वास हे नेते व्यक्त करीत आहेत. मात्र मुस्लिम मते काँग्रेसला मिळू नयेत यासाठी एमआयएमचे नेते ओवेसी बंधू प्रचारात उतरले असून आजपर्यंत त्यांनी जसे मतांचे ध्रुवीकरण केले तसे वांद्रे पूर्वमध्ये होऊन मतविभाजनाचा फायदा शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराला होईल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे. या मतदारसंघातील लोक भावनिक मुद्दय़ावर मते देणार की विधायक कामावर, हे लवकरच स्पष्ट होईल. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP