Monday, April 20, 2015

निवडणुकीच्या आखाड्यात विजयोत्सवाचा उन्माद

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता कोंबड्या नाचवण्याचा केलेला हिडीस प्रकार पाहता राजकारण किती अधोगतीला जात आहे, याचेच प्रात्यक्षिक पाहावयास मिळाले. राजकारणात जीवित पशू-पक्ष्यांचा वापर करता कामा नये, असा कायदा असतानाही तो धाब्यावर बसवून शिवसैनिकांनी कोंबड्यांची जी छळवणूक केली, याचा सार्वत्रिक निषेध होत आहे.

 खेळातील हार-जीत ही खिलाडूपणाने घेतली जाते़ तशी राजकारणातील हार-जीतदेखील खिलाडूवृत्तीने घेतली जावीअशी अपेक्षा असते; परंतु गेल्या काही वर्षांत राजकारण जसजसे व्यक्तिकेंद्री होऊ लागले, तसे निवडणुकीचा फड हा एकमेकांचे जुने-नवे हिशेब चुकते करण्याचा आखाडाच बनू लागला़ राजकारणात मात्र किमान सभ्यताही पाळली जात नाही, याचा अनुभव वारंवार येऊ लागला आहे़.
 राज्यामध्ये नुकत्याच दोन पोटनिवडणुका झाल्या़ या पोटनिवडणुकांमध्ये दिवंगत आमदारांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली़ वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना, तर तासगाव येथे आऱ आऱ पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि या दोन्ही महिला उमेदवार विजयी झाल्या़ निवडणूक कोणतीही असली, तरीही या निवडणुकीत लोकशाहीची किमान मूल्ये आचारणात आणावी ही अपेक्षा गैर नाही
वांद्रे पूर्व आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन्ही पोटनिवडणुकांना भावनिकतेची झालर होती़ त्यांच्या निधनाने त्या मतदारसंघांवर दु:खाची छाया होती़ या पोटनिवडणुकांच्या निकालामुळे राज्यातील सत्ता समीकरणात कोणताही बदल होणार नव्हता़ या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुका अत्यंत गांभीर्य आणि सहानुभूतीपूर्ण वातावरणात व्हाव्याअशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते़ सुमनताई पाटील यांनी तासगावमधून लाख ३१ हजारपेक्षा अधिक मताधिक्क्यांनी विजय मिळवल्यानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लवंगीचा फटाकाही उडवला नाही़ कारण विजयाच्या आनंदापेक्षा आपले आबा आपल्यात नसल्याचे दु: कुटुंबाप्रमाणेच कार्यकर्त्यांच्या मनातही असल्यामुळे या मतदारसंघावर दु:खाचीच छाया अधिक होती़ दु:खामुळे आलेला संयम सर्वांच्याच कृतीतून व्यक्त होत होता़ या उलट वांद्रे पूर्व मतदारसंघात परिस्थिती निराळीच होती़ सुमनताई यांच्याप्रमाणे तृप्ती सावंत यांचा निकाल तितकासा सोपा राहिलेला नव्हतायाचे कारण काँग्रेसमधील एक वजनदार नेता नारायण राणे हे तृप्ती सावंतचे प्रतिस्पर्धी होते़ राणे यांच्यासारखा आक्रमक आणि प्रबळ उमेदवार समोर उभा असल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती़ त्यातच राणे आणि शिवसेना यांचे पूर्ववैमनस्य अजूनही कायम असून त्याचा परिणाम संपूर्ण निवडणुकीदरम्यान दिसून येत होता़ त्याचा पुरेपूर फायदा प्रसारमाध्यमांनीही घेतला आणि ही निवडणूक जणू
काही राणे आणि शिवसेना यांच्या अस्तित्वाचीच निवडणूक आहे, असे वातावरण निर्माण केले़ दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, हे तर खरेच़; पण राणेंच्या उमेदवारीला पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या राजकारणाचीही किनार असल्यामुळे राणे या आव्हानांचा कसा सामना करतात, याकडे साºया महाराष्ट्राचे लक्ष लागले होते़ सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत कुडाळमध्ये राणेंचा पराभव झाला
होता. शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील एक गट यांची राणेंविरुद्ध आघाडी झाली होती. या
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हेदेखील राणेंच्या प्रचारात सहभागी झाले होते़ राष्ट्रवादीबरोबरच शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षासह अनेक धर्मनिरपेक्ष पक्षांनी राणेंना पाठिंबा दिला होता़ त्यामुळे राणे हे निवडणुकीत चमत्कार घडवून आणतील, असे अंदाज व्यक्त केले जात होते़ मात्र या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी मनापासून काम केले नसल्याचा आरोप राणे यांच्या गोटातून करण्यात आला आहे. राणे यांचा पराभव जसा निश्चित होत गेला, तसे शिवसैनिकांनी विजयोत्सवाला सुरुवात केली आणि जेव्हा अधिकृत निकाल जाहीर झाला, तेव्हा मात्र शिवसैनिक उन्मादाने बेभान झाला़ राणेंच्या बद्दल असलेला टोकाचा द्वेष
बाहेर पडला आणि ते भान विसरून नाचू लागले़ विजयाचा हा उत्साह नव्हे, तर नारायण राणेंच्या पराभवाचा उन्माद दिसत होता़ हा उन्माद साजरा करण्यासाठी ढोलताश्यांबरोबरच कोंबड्या नाचवण्याचा हिडीस प्रकारही त्यांनी केला़ यात महिलादेखील आघाडीवर होत्या़ अत्यंत हीन पातळी गाठलेल्या या विजयोत्सवाबाबत सर्वसामान्यांची प्रतिक्रिया मात्र नाराजीचीच होती़ बाळा सावंत यांच्या निधनाच्या दु:खाचा कुठेही मागमूस दिसला नाही़ तृप्ती सावंत यांना सहानुभूती नसती, तर त्यांच्या विजयाची खात्री नव्हती;
परंतु पराभवाचा उन्माद साजरा करताना सहानुभूती अथवा दु: याचा कुठेही लवलेश नव्हता़ या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या उन्माद उत्सवाचे दोन्ही मुठी आवळून हात उंचावत, जणू
काही जग जिंकल्याच्या अविर्भावात शिवसैनिकांना समर्थन दिले आणि त्यांचा उन्माद टिपेला पोहोचला़ एवढा हिडीस प्रकार राज्याच्या राजकारणात यापूर्वी कधी दिसला नाही़ एकदा पुण्याच्या राजकारणात या घटनेशी थोडेसे साधर्म्य असणारा प्रकार घडला होता़ १९९७ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्याचे खासदार
सुरेश कलमाडी यांना तिकीट नाकारले गेले़ तेव्हा नाराज झालेल्या कलमाडींनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत बंडखोरीचे निशाण फडकावले होते़ काँग्रेसला शह देण्याकरिता त्यांनी थेट मातोश्रीलाच साद घालत बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा मिळवला़ पाठिंबा देताना मात्र बाळासाहेबांनी नेहमीच्या ठाकरे शैलीमध्ये हा कुंपणावरचा बेडूक असून तो कधीही कुठेही उडी मारू शकतो,’ असे वक्तव्य केले होते़ या निवडणुकीत
कलमाडी यांचा पराभव झाला काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला़ तेव्हा बाळासाहेबांच्या या वक्तव्यातून प्रेरणा
घेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक भला मोठा प्रतिकात्मक बेडूक काठीला उलटा टांगून त्याची मिरवणूक काढली  होती़ मात्र, कार्यकर्त्यांनी पातळी सोडून केलेल्या या कृत्याची गंभीर दखल तत्कालीन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी
आणि विशेषत: त्या वेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनीदेखील घेतली होती़ त्यांनी येथील कार्यकर्त्यांना
चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या़ कुठे उद्धव ठाकरे आणि कुठे शरद पवाऱ कुठे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून त्यांच्या हिडीस कृत्याला पाठिंबा देणारे उद्धव ठाकरे आणि कुठे कार्यकर्त्यांना संयमाचे खडे बोल सुनावणारे शरद पवाऱ पराभूत झालेल्या कलमाडींनीदेखील हा पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला़ कलमाडींच्या राजकीय अस्तित्वावर सर्वांनीच प्रश्नचिन्ह उभे केले असताना कलमाडींनी पूर्वीपेक्षा जास्त जोशात पुनरागमन करीत पुण्याच्या खासदारकीवर आपले नाव तर कोरलेच; पण महापालिकेत आपली निरंकुश सत्ता
अनेक वर्षे प्रस्थापित करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले़ या उदाहरणावरून हेच सिद्ध होते की, राजकीय परिस्थिती अस्थिर असते़ यावर कायमची हुकूमत कोणाचीच नसते़ त्यामुळेच राजकारणात कोणत्याही नेत्याचे अस्तित्व संपले, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ नारायण राणे आता संपले या आनंदात वावरणाºया त्यांच्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील शत्रूंनी कलमाडींपासून बोध घेतला पाहिजे़ कोणत्याही परिस्थितीला थेट सामोरे जाण्याचा राणे यांचा स्वभाव असल्यामुळे ते अनेकवेळा वादविवादात सापडले आहेत़ ही निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही़ कोण जिंकले, कोण हरले याहीपेक्षा लोकांचे मनोरंजन झाले़
मात्र, त्याचबरोबर राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे़ हेही दिसून आले़ गल्लीतील दादा-भाई जसे एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हाने देत शड्डू ठोकून प्रतिस्पर्ध्याला डिवचत असतात़ तसाच काहीसा बाळबोध प्रकार या निवडणुकीत दिसला़ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता कोंबड्या नाचवण्याचा केलेला हिडीस प्रकार पाहता राजकारण किती अधोगतीला जात आहे, याचेच प्रात्यक्षिक
पाहावयास मिळाले. राजकारणात जीवित पशू-पक्ष्यांचा वापर करता कामा नये, असा कायदा असतानाही तो धाब्यावर बसवून शिवसैनिकांनी कोंबड्यांची जी छळवणूक केलीयाचा सार्वत्रिक निषेध होत आहे़ नारायण राणे हे कोणे एके काळी कोंबडीचा व्यवसाय करीत होते़ म्हणून त्यांना डिवचण्याकरिता जिवंत कोंबड्यांचा वापर करणे निंदनीय आहे. राणे यांचा २००५ सालच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मातोश्रीबाहेर फटाके उडवले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात तथ्य असले तरी त्याचेही समर्थन होऊ शकणार नाही. अरेला कारे करण्याच्या प्रवृत्तीमुळे राजकारणात किमान सभ्यता तरी पाळली जाईलही अपेक्षा फोल ठरली आहे़ नवीन पिढीसमोर राजकारणाचा काय आदर्श ठेवत आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे़ 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP