मराठी साहित्य संमेलन वैश्विक होणार कसे?
मराठीपंजाबी भाई भाई, असा गजर करत घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले़ नेहमीप्रमाणे संमेलनाने काय दिले, या घासून गुळगुळीत झालेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात अर्थ नाही़ मराठी साहित्य हे किती समृद्ध आहे, हे दाखवण्याचा आटापिटा आपण गेली ८८ वर्षे करत आहोत़ ही साहित्य संमेलने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांतच नव्हे तर परदेशातही भरवून मराठी भाषेचा जागतिक पातळीवर डंका वाजवण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे; परंतु जागतिक पातळीवर संमेलने भरवली म्हणून आपल्या मराठी साहित्याला वैश्विकता लाभेल, असे समजणे दूधखुळेपणाचे ठरेल़ साहित्य संमेलन हे पंजाबात गेले काय अन् उद्या आयफेल टॉवरवर भरले काय ते वैश्विक कसे होईल? याचे उत्तर साहित्यिकांकडे नक्कीच नाही़ या प्रश्नाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करण्याची बगळ्याची प्रवृत्ती या प्रस्थापित साहित्यिकांमध्ये चांगलीच पोसली आहे. सध्या देशात बोकाळलेल्या सांस्कृतिक दहशतवादाचे तर हे हस्तक नाहीत ना, इतके भय वाटावे, अशी संशयाची परिस्थिती यांनीच निर्माण करून ठेवली आहे़ आपले साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे, असे अभिमानाचे बिरुद मिरवणाºयांनी आपल्या अवतीभवती काय घडत आहे, याकडे काणाडोळा करावा यासारखे दुर्दैव ते काय! याच साहित्य संमेलनात विवेकवादाचा जागर दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रा़ डॉ़ सदानंद मोरे यांनीच केला़, तरी देखील त्यावर साधकबाधक चर्चा, विचारविनिमय, किमान एखादा परिसंवाद तरी अथवा रामदास फुटाणेसारख्यांनी एखादी चारोळी तरी म्हणायची होती़ पण तसे काही घडले नाही़ ज्या विवेकवादाचा आणि विज्ञानवादाचा गेल्या दोन वर्षांत या पुरोगामी महाराष्ट्रात खून पडला़ दोन विचारवंतांची आहूती त्यामध्ये गेली़ त्याबाबत निषेध करण्याव्यतिरिक्त कसलेही प्रबोधन येथे घडले नाही. समाजातील अंधश्रद्धा, विज्ञाननिष्ठ विवेकवाद व बहुजनांच्या खºया इतिहासाची मांडणी करणारे पुरोगामी मोहरे डॉ़ नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या याच महाराष्ट्रात झाली़ सरकारला त्याचा जाब विचारण्याचे नैतिक धैर्य दाखवण्यात आले नाही. समाजात दहशत पसरवण्यासाठी जे कृत्य घडू लागले आहे, त्याचा सरकारला जाब विचारण्याऐवजी केवळ खंत व्यक्त करण्याचा मुळमुळीतपणा दाखवण्यात आला. साहित्यिक जर समाजाचा आरसा असेल तर त्यांच्या साहित्यांमध्ये अवतीभवतीचं प्रतिबिंब पडू नये, हे लांच्छनास्पद आहे़ मध्यमवर्गीय खिडकीत बसून आकाशातील ग्रहताºयांची गणती करत स्त्रीपुरुष नात्यातले अंधारे आडोसे चाचपडतच त्यांनी साहित्य निर्मिती केली़ समाजातल्या भयाण वास्तवाची झळ यांच्या लेखणीपर्यंत कधी पोहोचलीच नाही़
एकेकाळी साहित्यात जीवनवाद आणि कलावाद यावर जीव तोडून चर्चा तरी होत होती़ आजकाल कोणत्याही वादात न पडता आपापल्या चौकटी सांभाळत सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करत स्वान्त: सुखाय् लिहिण्याची किंवा जाणीवपूर्वक तशी झूल पांघरून साहित्य निर्मिती करण्याची मानसिकता अधिक घट्ट होत आहे. उच्चवर्णीयांचे एक वेगळे सांस्कृतिक राजकारण मराठी साहित्यात कित्येक वर्षे अखंड सुरू आहे़ याला छेद देणारे अत्यंत वास्तववादी भाषण डॉ़ सदानंद मोरे यांनी केले़ मराठी साहित्याच्या कक्षा संत साहित्य, कथाकादंबºया, गद्यपद्य, ललित लेखनाने कशा विस्तारत गेल्या, याचे विवेचन त्यांनी केले़ संत साहित्याच्या परंपरेने मराठी साहित्य खºया अर्थाने वैश्विक झाले होते; परंतु प्रस्थापितांच्या संकुचित मानसिकतेने त्याचा विस्तार होऊ शकला नाही़ बहुतेक सर्व संत हे बहुजन वर्गातून आलेले असल्यामुळे संत साहित्य हे सर्वसमावेशक जातीधर्म समभाव तसेच स्त्रीपुरुष समानतेचा पुरस्कार करणारे होते. मोरे यांनी संत साहित्यापासून आजमितीपर्यंत निर्माण होत असलेल्या साहित्याचा परामर्ष घेताना संत साहित्याला प्रस्थापित साहित्यिकांनी कसे बाजूला सारले आणि पाश्चात्य दृष्टिकोनातून आलेल्या नव्या अभिरुचीचा आणि साहित्यमूल्यांचा फटका संत साहित्याला कसा बसला, या विषयी सखोल चिंतन केले आहे़ संत साहित्यातील अध्यात्म समजणे अवघड असल्याचा बागुलबुवा उभा केला जात होता़ वारकºयांनी संतांना मंदिरमठात बंदिस्त केलेले प्रस्थापितांच्या पथ्यावरच पडले़ त्या संदर्भात ‘मराठी लोकांना अध्यात्म समजून घेणे अवघड नव्हते, एकनाथांनी भारुडामधून गहन अध्यात्मिक प्रमेये सामान्य माणसांना समजावून सांगितली़ त्याचा परिणाम अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींमधील कवींनीसुद्धा भेदिक नावाच्या लावणी प्रकारातून अध्यात्मिक चर्चा केलेली आढळते़ बहुधा येथूनच संत साहित्याला अध्यात्मिक, धार्मिक, पारमार्थिक समजून साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवण्याची प्रवृत्ती व प्रक्रिया सुरू झाली असावी,’ असे मत डॉ़ मोरे यांनी व्यक्त केले़ हे परखड मत व्यक्त करताना ऱ वा़ दिघे यांच्या कार्तिकी या दलितसवर्ण संघर्षावर तसेच सोनकी या आदिवासींवरील कादंबरीचा खास उल्लेखही त्यांनी केला़ कार्तिकीमध्ये दलितसवर्ण संघर्ष दाखवताना डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर तसेच दलितांचा अंतर्गत मानसिक संघर्ष, बौद्ध धर्म व वारकरी संप्रदाय यातील आंतरिक संबंध दाखवताना दिघ्यांचा वारकरी विचाराचा धागा सुटला नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे़ हिंदूमुस्लीम अस्पृश्य, आदिवासी या विविध सामाजिक, धार्मिक गटांचे अभिसरण संतांच्या व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांनी केले़ तसेच महात्मा जोतिबा फुलेंना अभिप्रेत असलेल्या एकसंध भारताचे प्रतिबिंब साहित्यात पाहू शकणारे ते लेखक होते, अशा शब्दांत त्यांनी दिघ्यांचा गौरव केला. अरुण कोलटकर, दि़ पू़ चित्रे, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ यांनी पुढे चालवलेली संत परंपरा हीच साहित्याची मुख्य धारा असल्याचे सांगून एक प्रकारे प्रस्थापित साहित्य संत परंपरेची वैश्विकता जपण्यात कमी पडले असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे़
प्रस्थापित साहित्यिकांची पांढरपेशी बुळबुळीत भूमिका पाहता त्यांच्या साहित्याला समाजमनाचा आरसा कसे म्हणावे, हा प्रश्नच आहे़ महाराष्ट्रात घडत असलेले अन्याय, अत्याचार, बलात्कार, दलितांवरील बहिष्कार हे यांच्या परिपेक्षात येऊच शकत नाहीत़ म्हणून या बेगडी चेहºयावरचे बुरखे फाडण्यासाठी दलित ओबीसी, आदिवासी, भटके, मुस्लीम, ख्रिस्ती, ग्रामीण, विद्रोही, कामगार अशी विविध साहित्य संमेलने याच राज्यात भरवली जात आहेत़ याचे कारण केवळ रंजनवादी साहित्य वाचण्यात संघर्षमय आयुष्य भोगणाºया सर्वसामान्यांना रस नाही़ या प्रस्थापितांमध्ये मुख्य प्रवाहात जाण्यासाठी धडपडणारे बहुजन साहित्यिकदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून साहित्य निर्मिती करू लागले आहेत़ बहुजनांमधल्या या अभिजनांमध्ये अनेक पदांची लालसा निर्माण झाली असून त्यांनी वारंवार अनेक पदे पदरात पाडूनही घेतली आहेत़ पदे मिळाली असलेले बहुजन साहित्यिक आणि प्रस्थापित साहित्यिक यांनी अखिल भारतीय नव्हे विश्व साहित्य संमेलने भरवली तरी सर्वसमावेशकता आणि वैश्विकता यांचे भान जोपर्यंत त्यांना येत नाही, तोपर्यंत त्यांचे साहित्य वैश्विक होऊ शकत नाही़ दलित साहित्याने मुख्य प्रवाह झुगारण्याची ताकद दाखवली आणि त्यांच्या जगण्याचे दु:ख, व्यथा, वैफल्य, बुरसटलेल्या परंपरेविरुद्धचा एल्गार साहित्यातून मांडला तेव्हा ते साहित्य जागतिक पातळीवर गेले आणि खºया अर्थाने वैश्विक झाले़ असे मानसन्मान मराठी साहित्य कृतीला यापूर्वी का मिळू शकले नाहीत? साहित्याचा उरुस भरवून साजूक तुपातील पुरणपोळीच्या जेवणावळीत धन्यता मानणाºयांचे त्रोटक, पोचट अनुभवविश्व पाहता ते अस्सल जगण्याचा विदारक अनुभव देऊ शकत नाहीत़ त्यांना सामाजिक प्रश्नांची झळ नको, अन्याय, अत्याचार, हत्याकांडे यांच्या निषेधाचे बोलणे त्यांच्यासाठी निषिद्ध आहे़ भित्रट, घाबरट चष्म्यातून पाहत असल्यामुळे समाजवास्तव समजू शकत नाही़ संपूर्ण महाराष्ट्र अन्याय, अत्याचार, बलात्कारांच्या घटनांनी पेटला आहे़ या पुरोगामी राज्याची वाटचाल अराजकतेकडे सुरू झाली आहे़ पण एकही साहित्यिक या विकृत प्रवृत्तीवर आणि पुरुषी मानसिकतेवर भाष्य करायला तयार नाही़ साहित्यिकांचे हे खुजेपण प्रस्थापित मराठी साहित्याला वैश्विकपण देणार कसे? राजकारण्यांनी दत्तक घेतलेल्या साहित्य संमेलनातून काय साध्य होणार? आधी राजकारणी होते, आता तर त्यांच्या सोबतीला बिल्डरही प्रायोजक बनू लागले आहेत़ सरकारमध्ये राजकारणी, अधिकारी आणि बिल्डर यांची अभद्र युती जशी झाली त्याच धर्तीवर राजकारणी, साहित्यिक आणि बिल्डर यांची मिलीजुली भगत दरवर्षी पाहावयास मिळेल़ हेच संमेलनाचे फलित आहे़
0 comments:
Post a Comment