Tuesday, January 11, 2011

काकांच्या मैत्रीला पुतण्याचा सुरुंग

(10 January, 2011)
शिवसेना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी दादा सरसावले आहेत. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी खिळखिळ्या केलेल्या शिवसेनेचा फायदा करून घेण्याचा दादांचा प्रयत्न आहे. काकांच्या दोस्तीला पुतण्याची मस्ती खल्लास करील की काय, अशी शंका त्यांनी निर्माण केली आहे. काकांच्या मैत्रीला पुतण्या सुरुंग लावणार असे दिसते आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले काका-पुतणे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. काकाची गादी चालवण्याइतपत कर्तबगारी पुतण्यांनी गाजवली असल्याने त्यांच्या राजकारणाची दिशा जाणून घेण्याची उत्सुकता सर्वाना लागलेली असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारभाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे तसेच अगदी अलीकडे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा काका-पुतण्यांच्या जोडय़ा राजकारणात कार्यरत झाल्या आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि राज तसेच शरद पवार आणि अजितदादा हे राजकारणात केंद्रस्थानी आले असून आपापल्या काकांची जागा चालवणारे हे दोन पुतणे भविष्यात कशी राजकीय खेळी करतातयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. बाळासाहेबांना आलेले पुत्रप्रेमाचे भरते पाहून राज ठाकरेंनी मनसेची वेगळी चूल मांडली. तर शरद पवारांचे पुत्रीप्रेम आपली डाळ शिजू देईल की नाहीया शंकेने अजितदादांनी पक्षावर आपली मांड घट्ट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या सप्ताहात शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली आणि राजकीय वर्तुळात सर्वाच्या भुवया उंचावल्या. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. याच मैत्रीच्या जिवावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांनी एकमेकांना मदत केलेली आहे. काकांच्या या मैत्रीचे आता काय होणारयाचा विचार करण्याजोगा प्रकार अजितदादांकडून घडला आहे. शिवसेना फोडून पक्ष वाढवण्यासाठी दादा सरसावले आहेत. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी खिळखिळ्या केलेल्या शिवसेनेचा फायदा करून घेण्याचा दादांचा प्रयत्न आहे. काकांची दोस्ती पुतण्याची मस्ती खल्लास करील की कायअशी शंका त्यांनी निर्माण केली आहे. काकांच्या मैत्रीला पुतण्या सुरुंग लावणार असे दिसते आहे.


दादांच्या हातात सत्ता नव्हती तेव्हा शिवसेनेचीच मदत त्यांनी पुणे महानगरपालिकेत घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-भाजप युती हा फॉर्म्युला पुणे महानगरपालिकेत अस्तित्वात आला आणि या आघाडीच्या पुणे पॅटर्न राजकारणावर परिणाम होऊ लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समीकरणे बदलत असतात. पण पुणे पॅटर्नने त्यांचे नैतिक बळ वाढवले. यापुढील काळात सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली. तर अजितदादा पुणे पॅटर्नचा प्रयोग करून मुख्यमंत्री होऊ शकतीलअशी चर्चा होऊ लागली. पण आक्रमकफटकळअसयंमी असलेले अजितदादा हे उपमुख्यमंत्री होताच एखाद्या परिपक्व राजकारण्यासारखे वागू लागतीलअसे कुणालाच वाटले नव्हते. काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने नेतृत्व बदल केला आणि दादांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांना यापुर्वी उपमुख्यमंत्री केल्यानंतर दादांचा नंबर लागला आहे. खरे तर दादांना थेट मुख्यमंत्रीच व्हायचे होते. पण राष्ट्रवादीला राजकीय परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे नजीकच्या भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद घेण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थक आमदारांनीही सह्यांची मोहीम राबवणे आणि दिल्लीपर्यंत जाऊन साहेबांना साकडे घालण्याचे तंत्र अवलंबिले होते. उपमुख्यमंत्रीपद मिळण्याआधी काँग्रेसला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न दादांनी केला होता. काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शांत संयमी असल्यामुळे दादा त्यांना भारी पडतीलअशी भाकिते करण्यात आली होती. पण दादांनी पवित्रा बदलला आणि मुख्यमंत्र्यांशी जमवून घेण्याची भाषा सुरू केली. काँग्रेसशी जुळवून घेत शिवसेनेला धक्का देण्याचा अजितदादांचा विचार दिसत आहे. शरद पवारांच्या नेमके उलटे तंत्र अजितदादांनी अवलंबिले आहे.


शरद पवार यांनी सतत काँग्रेसचे खच्चीकरण करण्याची नीती अवलंबिली होती. ‘‘काँग्रेसची अवस्था जमीनदारीचे साम्राज्य गमावलेल्या वाडय़ासारखी झाली आहे.’’ ‘‘काँग्रेसला गरज नसेल तर आम्ही स्वतंत्र लढू.’’ ‘‘शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस या दोघांपासून आम्ही समान अंतर राखून आहोत.’’ अशा प्रकारची वक्तव्ये शरद पवार करीत असत. पक्षांतर्गत विरोधक आणि काँग्रेसमधील विरोधक यांना निवडणुकीत पराभूत करण्यावर पवारांचा भर आहे. या उलट शिवसेनाप्रमुख असतील किंवा भाजपमधील अन्य नेते असतील त्यांच्याबरोबर काँग्रेसएवढे शत्रुत्व पवारांनी कधी केले नाही. बाळासाहेबांशी असलेली मैत्री जपण्याचाच त्यांचा प्रयत्न राहिला. त्यामुळेच काँग्रेसनेदेखील पवारांना वेळोवेळी त्यांची जागा दाखवली आहे. अन्नधान्याची महागाई वाढल्याबाबत शरद पवारांनी मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगप्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम या ज्येष्ठ नेत्यांनी पवारांनाच जबाबदार धरले. अजितदादांचे वर्तन नेमके काकांच्या उलटे होऊ लागले आहे. काँग्रेसशी जमवून घेतपावसकरांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शिवसेनेला आपण मित्र समजत नसल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. राज आणि राणे यांनी शिवसेनेला भगदाड पाडले. त्यामुळे शिवसेनेची घसरण होऊन मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचे संख्याबळ भाजपपेक्षा कमी झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून शिवसेनेची सत्ता गेली तर शिवसेना संपण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच शिवसेनेच्या मतांवर डोळा ठेवून पुढील वाटचाल करण्याचे अजितदादांनी ठरविलेले दिसते. शिवसेनेतून अद्याप एकही मोठा नेता राज ठाकरेंकडे गेलेला नाही. याउलट नारायण राणेंकडे आमदारांबरोबरच शिवसैनिकांचा ओढा अधिक आहे. मनसेने आपण स्वतंत्र असल्याचे कितीही सांगितले तरी काँग्रेसशी त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही. एकीकडे काँग्रेस आणि वेळ पडेल तेव्हा शिवसेनेला वाकुल्या दाखवायला भाजप असा मनसेचा राजकीय प्रवास चालू आहे. त्यामुळे युतीमध्ये संभ्रम निर्माण करून काकांच्या भाजपशी असलेल्या मैत्रीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न राजनेदेखील केला आहे.


पुतण्याला डावलून पुत्रप्रेमाची महती गाणा-या आणि आक्रमक नेतृत्व व उत्तम वक्तृत्व असलेल्या राज आणि नारायण राणे यांना बाजूला सारणा-या शिवसेनाप्रमुखांवर याचि देहीयाचि डोळा’ शिवसेनेची घसरण पाहण्याची वेळ आली आहे. शिवसेनेची उरलेली मते राजकडे वळण्यापूर्वीच आपल्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करून अजितदादांनी पवारांच्या मैत्रीला धक्का दिला आहे. शिवसेनेचे राजकारण हिंदुत्व आणि मराठी अस्मिता या दोन मुद्दय़ांवर होते. त्यातला हिंदुत्वाचा मुद्दा सद्यस्थितीत निष्प्रभ ठरू लागला आहे. तर मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत अजितदादांनी मराठीजनांना हाक दिली आहे. पवार काँग्रेसबरोबर गेले तेव्हा त्यांचे अनेक समर्थक शिवसेनेत गेले होते. पुढील काळात पवारांच्या पाडापाडीच्या राजकारणाने पक्षवाढीला खिळ बसली. पश्चिम महाराष्ट्र आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही. तेथे काँग्रेसबरोबर शिवसेना-भाजप युतीचीही ताकद दिसत आहे. कोकणात राणे शिरकाव करू देत नाहीत. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाने ब-यापैकी साथ दिली आहे. पण तिथेही काँग्रेसबरोबर शिवसेना-भाजपयुतीची ताकद आहे. अशा परिस्थितीत पक्ष वाढणार कसा?त्यामुळेच अजितदादांनी आपली कार्यपद्धती बदलून टाकली आहेनव्हे पवारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे काम करणे थांबवले आहे. काकांच्या पद्धतीने पक्ष वाढणार नाहीआणि काकांनी वाढवलेल्या नेत्यांची निष्ठा आपल्यावर राहणार नाहीही खूणगाठ बांधूनच दादा कामाला लागले असावेत.


राष्ट्रवादीची 2009च्या विधानसभा निवडणुकीत झालेली घसरण पाहता पक्ष वाढेल कोठून
याची चाचपणी दादा करीत आहेत. शरद पवारांनी कामगार नेते शरद राव यांना पक्षाचे तिकीट देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केलापण निवडणुकीत तर ते हरलेचपण कामगार संघटनांवरही त्यांची पकड राहिली नाही. उलट अन्य कामगार नेत्यांच्या तुलनेत वयाने तरुण असलेले सचिन अहिर चांगले काम करीत आहेत. अजितदादांनीही पक्षातील वाचावीरांपेक्षा कृतीवीर झालेले दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे खरे कीकाका आपल्याला वाचवणार नसल्याचे पक्के माहीत असल्यामुळे पुतण्यांनी स्वकर्तृत्वावर सत्तासंपादनाची ईर्षा बाळगल्याचे दिसते.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP