Monday, April 2, 2012

पाटलांच्या राज्यात देव आणि माणसे दोन्ही असुरक्षित

महाराष्ट्र राज्य दोन दशकांपूर्वी पूर्वी अन्नधान्य, उद्योगधंदे, वीज, पाणी यामध्ये आघाडीवर होते. पण गेल्या दहा वर्षात या सर्व क्षेत्रांत राज्य पिछाडीवर गेले असून गुन्हेगारीत मात्र आघाडीवर घेतली आहे. राज्यामध्ये खून दरोडय़ाचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकेकाळी संपूर्ण देशात सुरक्षित असलेले मुंबई शहर सर्वाधिक असुरक्षित आणि बकाल झाले आहे. शिवसेना, भाजप या प्रमुख विरोधी पक्षांना देवाच्या मूर्तीची चोरी माणसाच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते आहे. अर्थात, जेथे देवच सुरक्षित नाहीत तेथे माणसांचे काय? सर्व प्रकारची गुन्हेगारी वाढत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील मात्र पोकळ घोषणाबाजीशिवाय कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. यांचे कारण पोलिस यंत्रणेवर त्यांची पकड बसलीच नाही. या गृहमंत्र्याचे करायचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसलाही पडला असावा.

राज्यातील गुन्हेगारी मोडून काढू, गुंडांचा खातमा करू, कायद्याचा भंग करणारा कितीही मोठा असेल तरी त्याला पाठीशी घालणार नाही, गुन्हेगारांना दयामाया दाखवली जाणार नाही, दहशवाद्यांचा बिमोड केला जाईल, अन्याय अत्याचार करणा-यांवर कठोर कारवाई करू, कर्तव्यात कसूर करणा-यांची गंभीर दखल घेऊ, सावकारांच्या पाठी सोलून काढू, अशा गृहमंत्र्यांच्या राणा भीमदेवी थाटात केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासने विधिमंडळ सभागृहाच्या हौदात विरघळून गेली असून सर्व प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेश, बिहारलाही मागे टाकले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे मोडीत निघाली असून खुन, चो-या, दरोडे, बलात्कार, अत्याचार यापासून नक्षलवाद दहशतवादापर्यंत सर्व प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक मिळवला आहे. दोन दशकांपूर्वी राज्य पूर्वी अन्नधान्य, उद्योगधंदे, वीज, पाणी यामध्ये आघाडीवर होते. पण गेल्या दहा वर्षात या सर्व क्षेत्रांमध्ये राज्य पिछाडीवर गेले असून गुन्हेगारीत आघाडीवर पोहोचले आहे. राज्यामध्ये खुन दरोडय़ाचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसारख्या शहरात महिलांना एकटेदुकटे फिरणे कठीण बनले आहे. एकेकाळी संपूर्ण देशात सुरक्षित असलेले मुंबई शहर सर्वाधिक असुरक्षित आणि बकाल झाले आहे. शिवसेना, भाजप या प्रमुख विरोधी पक्षांना देवाच्या मूर्तीची चोरी माणसाच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटत आहे. अर्थात, जेथे देवच सुरक्षित नाहीत तेथे माणसांचे काय? सर्व बाजूंनी सर्व प्रकारची गुन्हेगारी वाढत असताना गृहमंत्री आर.आर.पाटील मात्र पोकळ घोषणाबाजी शिवाय कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. याचे कारण पोलिस यंत्रणेवर त्यांची पकड बसलीच नाही, या गृहमंत्र्याचे करायचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसलाही पडला असावा.

दिवेआगर येथील सोन्याच्या गणपती मूर्तीची चोरी झाली. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. या पूर्वी मांडरदेवी मंदिरात चोरी झाली होती. धोपेश्वर येथील मंदिरातून महादेवाचा मुकूट पळवून नेला होता. राजमाता जिजाऊंच्या वस्तू रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचड येथून पळविण्यात आल्या होत्या. जनतेच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या चो-या मा-यांबरोबरच त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे

देशाची आíथक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय आíथक केंद्र असणा-या मुंबई शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेलेच आहे. आता नक्षलवादीही मुंबईपर्यंत येऊन पोहोचले आहेत. मुंबई शहरापासून जवळच असलेल्या डोंबिवलीमध्ये दोन नक्षवलाद्यांना अटक झालेली आहे. नक्षलवाद्यांची भीती पार निघून गेली असून महाराष्ट्राचे गृहखाते आणि पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचा हा पुरावाच आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांमध्ये वाढलेली गटबाजी उघड झालीच पण हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्याकरता नियुक्त केलेल्या राम प्रधान समितीच्या शिफारशीची अमलबजावणी करण्याचे औचित्य गृहविभागाने दाखवलेले नाही. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी ज्या मुंबई पोलिसांची तुलना केली जात होती, ते मुंबई पोलिस दल गटबाजीने पोखरून गेले आहे. पोलिस दलातील मराठी-अमराठी वादाबरोबरच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी) यांच्यामध्ये श्रेयासाठी सतत स्पर्धा सुरू असते. त्याचा फटका पोलिसांच्या कार्यक्षमतेला बसला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राजकारण रंगत असल्याने पोलिस दलातील कर्मचारी व कनिष्ठ अधिका-यांच्या कामाचे योग्य नियोजन होत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा पोलिसांवर ताण-तणावामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. पोलिसांमध्ये असंतोष वाढत असून त्यांना वेतनदेखील वेळेवर मिळत नाही

एका बाजूला राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पोलिस ठाणे ही न्याय मिळण्याची ठिकाणे राहिली नसून, पैशाची देवाणघेवाण करणारे अड्डे बनली आहेत. आणि त्यातून तक्रार करणारे आणि आरोपी या दोघांचीही सुटका नसल्याचे चित्र राज्यात दिसून येते आहे. त्यामुळे नागरिकांना मानवी हक्क आयोगाकडे धाव घ्यावी लागत असून तेथे सध्या पाच हजारहून अधिक खटले प्रलंबित आहेत

मुंबई शहरामध्ये महिलांची सुरक्षितता ही चिंतेची बाब बनली आहे. अल्पवयीन मुली, शाळा महाविद्यालयाच्या विध्यार्थिनी, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच गृहिणी व ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटांतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत. शाळा-महाविद्यालयीन मुलींचे बलात्कार आणि खून यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच बोरिवली येथे एका महाविद्यालयातील मुलीचा खून झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. गेल्याच महिन्यात जीटी रुग्णालयातून घरी जाणा-या एका गृहणीला टॅक्सीचालकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मोबाइलचोरीसाठी महिला पत्रकारावर चाकूने हल्ला करण्यापर्यंत चोरांची मजल गेली. मोबाइलचोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्याची कोणी तक्रारही करत नाहीत. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2008 मध्ये 690 होते ते 2010 मध्ये 747 झाले. तर अपहरणाचे प्रमाण 552 वरून 749 पर्यंत वाढले. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढते असून 2010 मध्ये बलात्काराचे 1600 गुन्हे तर हुंडाबळी 395, लौंगिक अत्याचार 1185 तर सासरच्यांकडून होणारा छळाचे सात हजार 429 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत महिला सुरक्षित नाहीत2010 मध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यांची संख्या 192 होती, ती 2011 मध्ये 219 वर पोहोचली, अल्पवयीन मुलींवरील बलात्कारांची संख्या 108 वरून 141 वर गेली. छेडछाडीच्या गुन्ह्यांची संख्या 451 वरून 556 वर गेली. विनयभंगाचे प्रकार 120 वरून 177 वर पोहोचले. हुंडाबळी 4 वरून 8 वर गेले, विवाहित महिलांच्या खुनांची संख्या 4 वरून 9 वर गेली, तर हुंड्यामुळे अपघातील मृत्यूची संख्या 1 वरून 16 वर गेली.

सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची भाषा करणा-या गृहमंत्र्यांनी सावकारांवर कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही. कारण राज्यातील सावकारांची संख्या वाढत चालली असल्याचे सरकारच्या आíथक पाहणी अहवालातच नमूद करण्यात आले आहे. 2010 मध्ये 7,636 परवानाधारक सावकार होते. त्यांची संख्या वर्षभरात आठ हजार 323 झाली आहे. तर शेतक-यांना त्यांनी दिलेले कर्ज जवळपास दुप्पट झाले आहे2010 मध्ये 479 कोटी रुपये असलेला कर्जाचा आकडा 2011 मध्ये 851 कोटीपर्यंत पोहचला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धनकवडी येथे गुंड टोळ्यांची मारामारी, नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा होऊन 50 मोटारसायकली जाळण्याचा प्रकार, सांगोला-सोलापूर मार्गावर पारधी वस्त्यांवर झालेले हल्ले, पुणे येथे कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलीवर झालेला बलात्कार आणि खून, साता-यामध्ये तर बापाने आंतरजातीय विवाहाला विरोध करून मुलीचा केलेला खून, तसेच दलितांवरील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ऐवढेच काय महितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली तरी होणारे खून अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीने महाराष्ट्र पोखरला गेला आहे. दहशतवादी हल्ले झाले त्याच वेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना शरद पवार यांनी कमी बोलण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला गृहमंत्र्यांनी पाळलेला दिसत नाही. मात्र त्यांच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. नितीश कुमारांचा बिघडलेला बिहार सुधारतो आहे. तर सुधारलेला महाराष्ट्र बिघडत चालला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP